ORDER | निकालपत्र ( पारित दिनांक :26/11/2014) ( मा. अध्यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्या आदेशान्वये) तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. - तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा की, त्याने दि.19.11.2009 रोजी इस्कोर्ट कंपनीचा ट्रॅक्टर नोंदणीकृत क्रं. एम.एच.32, पी-521 बँक ऑफ महाराष्ट्र, आर्वी शाखे सोबत हायर परचेस अॅग्रीमेंट केलेला होता. सदर ट्रॅक्टरचा विमा त.क.ने वेळोवेळी वि.प.कडे काढलेला आहे. त.क.ने सन 2011-2012 या वर्षाकरिता सदर विमा नुतनीकरण केलेला आहे. तसेच सदर ट्रॅक्टरचा विमा दि.29.08.2012 ते 28.08.2013 पर्यंतचा असून, विमा क्रं. 230902/47/12/96/00000340असा आहे व तो वि.प.कडे काढलेला आहे. परंतु वि.प.ने सदर ट्रॅक्टरचे नुतनीकरण करतांना त.क.च्या नांवे न करता बबन गुलाबराव नाखले यांच्या नांवे केला व फार मोठी चूक केली. वि.प.ला प्रत्यक्ष भेटून या चुकिबद्दल वारंवांर कळविले. परंतु वि.प.ने कोणतीही दखल घेतली नाही. सदर विमामध्ये रुपये4,00,000/- पर्यंत अपघाताच्या नुकसान भरपाईची तरतुद केली आहे.
- त.क.ने पुढे असे कथन केले आहे की, वादातील ट्रॅक्टरचा उपयोग त.क. हा त्याच्या शेतीच्या कामाकरिता करीत होता. त.क.ने मौजा फेफरवाडा येथे ठेकयाने शेती केली आहे. दि. 19.05.2013 रोजी त्या शेतीमध्ये नेहमीप्रमाणे त.क.चा ट्रॅक्टर चालक वाल्मीक शेळके हा नांगरणी करीत होता, परंतु अचानक ट्रॅक्टर अनियंत्रीत होऊन तो शेतातील विहीरीमध्ये पडला, त्यामुळे ट्रॅक्टरचे रुपये 3,00,000/-चे नुकसान झाले. सदरहू दुर्घटनेबद्दल त्याच दिवशी त.क.ने वि.प.ला त्याच्या वर्धा येथील कार्यालयात कळविले. त्याप्रमाणे वि.प.ने त्याच्या कार्यालयातील कर्मचा-याला ट्रॅक्टरचे अपघाताची शहानिशा व पंचनामा करण्याकरिता पाठविले. त्याप्रमाणे ट्रॅक्टरचा पंचनामा करण्यात आला व ट्रॅक्टरची झालेली नुकसान भरपाई वि.प.कडून मिळेल अशी हमी देण्यात आली. त.क.ने अपघातग्रस्त ट्रॅक्टरची दुरुस्ती लहानुजी मोटर्स आर्वी कडून करुन घेतली व त्याकरिता रु.3,00,000/-खर्च आला. दि.29.07.2013रोजी वि.प.ने त.क.ला पत्र देऊन ट्रॅक्टर चालकाकडे ट्रॅक्टर चालवितांना LMV Transport हे लायसन्स असल्या कारणाने व LMV Tractor चे लायसन्स नसल्या कारणाने त.क.चा ट्रॅक्टरचा अपघात विमा दावा नाकारल्याचे कळविले. त.क.ने सदर ट्रॅक्टरचा विमा काढला असून त्या ट्रॅक्टरला दुरुस्तीकरिता रुपये 3,00,000/- खर्च केलेला आहे तरी सुध्दा वि.प. जाणूनबुजून ट्रॅक्टरचा अपघात दावा देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे त.क.ने दि. 16.08.2013 रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस वि.प.ला पाठवून विचारणा केली असता, वि.प.ने त्याच्या वकिलामार्फत दि.03.09.2013 रोजी खोटया आशयाचे उत्तर देऊन अपघाताचा विमा दावा पूर्णपणे नाकारला व त.क.ला दोषपूर्ण सेवा दिली. त्यामुळे त.क.ला अतोनात शारीरिक व मानसिक त्रास झाला. म्हणून त.क.ने प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करुन अपघातग्रस्त ट्रॅक्टरच्या दुरुस्तीची रक्कम रु.3,00,000/-व्याजासह व शारीरिक , मानसिक त्रासाबद्दल 50,000/-रुपये व तक्रारीचा खर्च 5,000/-रुपये मिळावे अशी मागणी केलेली आहे.
- वि.प. ने आपला लेखी जबाब नि.क्रं. 11 वर दाखल केला असून, तक्रार अर्जास सक्त विरोध केला आहे. वि.प.ने वादातील ट्रॅक्टरचा सन 2011-2012 वर्षाकरिता विमा काढला होता हे कबूल केले आहे. परंतु सन 2012-2013 या वर्षाकरिता बबनराव गुलाबराव नाखले हयांचे नांवे सदरील ट्रॅक्टरचा विमा काढलेला आहे. इतर सर्व आक्षेप अमान्य केलेले आहे. वि.प.चे म्हणणे असे की, ट्रॅक्टर चालक ज्या शेतात नांगरणी करीत होता, त्या शेतातील विहिरीला भिंतीचे गोलकडे जमिनीच्यावर बांधलेले नव्हते. त.क.च्या ट्रॅक्टर ड्रायव्हरने अतिवेगाने व निष्काळजीपणाने ट्रॅक्टर चालवून अपघात घडवून आणला आहे. अपघाताची माहिती वि.प.ला मिळाल्यानंतर त्यांनी अधिकृत सर्व्हेअर व लॉस असेसर यांच्याकडून अपघात ट्रॅक्टरच्या घटना स्थळावर जाऊन ट्रॅक्टरच्या झालेल्या नुकसानीबाबत फायनल सर्व्हे रिपोर्ट मागविण्यात आला. त्याप्रमाणे अनील एस. साखरकर , सर्व्हेअर व लॉस असेसर यांनी घटना स्थळावर जाऊन ट्रॅक्टरचे फोटोग्राफ घेतले व ट्रॅक्टरला झालेल्या नुकसानीबाबत ट्रॅक्टरचे सर्व भागाचे व पार्टची पाहणी करुन दुरुस्तीकरिता आलेला अंदाजे खर्चाचा अहवाल दि. 12.06.2013 रोजी वि.प.कडे देण्यात आला. सदर अहवालाप्रमाणे ट्रॅक्टरचे रुपये 30,738.25 पै. इतकेच नुकसान झाल्याचे निदर्शनास येते. त.क.ने सदर ट्रॅक्टर दुरुस्तीकरिता रुपये 3,00,000/- खर्च केल्याचे खोटे आहे. त.क.ने खोटे बिल तयार केलेले आहे. ट्रॅक्टरचा विमा असतांना व त्याला कायद्याप्रमाणे ट्रॅक्टर विमा कंपनीकडून संपूर्णपणे दुरुस्तीकरुन मिळणार असतांना त.क.ने स्वतः अनाधिकृतपणे लहानुजी मोटर्स, आर्वी यांच्याकडून दुरुस्ती करुन घेण्याकरिता कोणतेही सबळ कारण नव्हते व नाही.
- वि.प.ने असे कथन केले आहे की, ट्रॅक्टर चालक वाल्मीक शेळके याच्याकडे LMV Transport चे ड्रायव्हींग लायसन्स अपघाताच्या वेळी होते व LMV Tractor चे लायसन्स नव्हते. त.क.ने कोणतीही काळजी न घेता ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना नसतांना वाल्मीक शेळके यांना ट्रॅक्टर चालविण्यास दिला व विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केले. त्यामुळे त.क. कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. सदर अपघातात जे ट्रॅक्टरचे नुकसान झाले त्यासाठी ट्रॅक्टर मालक अथवा त.क. स्वतः जबाबदार आहे.पॉलिसीप्रमाणे त.क. हा वाहनाचा मालक आहे असे दिसून येते नाही व वाहन मालक बबनराव गुलाबराव नाखले दिसतात. त्यामुळे त.क. नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. ट्रॅक्टर मालकाने पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे ते नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. त.क. ने खोटया स्वरुपाची तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे तक्रार खारीज करण्याची विनंती केलेली आहे.
- त.क.ने त्याच्या कथनाच्या पृष्ठयर्थ कुठलाही तोंडी पुरावा दाखल केलेला नाही किंवा शपथपत्र दाखल केलेले नाही. व वेळोवेळी गैरहजर होते. त.क. ने फक्त अर्जासोबत वर्णन यादी नि.क्र. 4 सोबत एकूण 6 दस्ताऐवज दाखल केलेले आहे. वि.प.ने नि.क्रं. 13 वर ब्रॉन्च मॅनेजर प्रकाश के. धनवीज यांचे शपथपत्र दाखल केले आहे व वर्णन यादी नि.क्रं. 12 प्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहे.
- त.क. ने त्याचा लेखी युक्तिवाद दाखल केलेला नाही. तसेच तोंडी युक्तिवादाच्या वेळेस त.क. व त्यांचे वकील गैरहजर होते. वि.प.चे अधिवक्ता यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतला.
- वरीलप्रमाणे त.क. व वि.प. यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणमिमांसा पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्रं. | मुद्दे | उत्तर | 1 | विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा अपघात विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? | नाही | 2 | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | नाही | 3 | अंतिम आदेश काय ? | नामंजूर |
: कारणमिमांसा :- - मुद्दा क्रं.1, बाबत. त.क. वादातील ट्रॅक्टरचा मालक आहे व सदरील ट्रॅक्टरचा सन 2011-2012 व 2012-2013 या वर्षाकरिता वि.प. विमा कंपनीकडे विमा काढला आहे व सदर ट्रॅक्टर दि. 19.05.2013 रोजी शेतामध्ये नांगरणीचे काम करीत असतांना विहिरीत पडून अपघात झाला व नुकसान झाले हे वादातीत नाही. तसेच त.क.कडून अपघाताची माहिती मिळाल्यावर वि.प. कंपनीने सर्व्हेअर व लॉस असेसर नेमून ट्रॅक्टरच्या नुकसानी संबंधी अहवाल मागितला. त्याप्रमाणे सर्व्हेअरने अहवाल वि.प.कडे सुपूर्द केला. तो अहवाल वि.प.ने मंचासमोर दाखल केलेला आहे. अहवालाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, वि.प.च्या सर्व्हेअरने ट्रॅक्टरच्या संपूर्ण नुकसान झालेल्या भागाची पाहणी करुन प्रत्येकी वाजवी किंमत लावून एकूण रुपये 30,738.25 पै. चे नुकसान झाल्याचे कळविले. तसेच सर्व्हेअरने हे सुध्दा कळविले की, अपघाताच्या वेळी ट्रॅक्टर ड्रायव्हरकडे LMV Transport चे ड्रायव्हींग लायसन्स होते. वाहन चालकाकडे LMV Tractor चे ड्रायव्हींग लायसन्स नव्हते. त.क.ने LMV Tractor चे ड्रायव्हींग लायसन्स नसलेल्या व्यक्तिला ट्रॅक्टर चालविण्यास दिले, त्यामुळे त्यांना विमा दावा देता येणार नाही. त्या अहवालावरुन वि.प. विमा कंपनीकडून त.क.चा विमा दावा नामंजूर केलेला आहे. वि.प. च्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, त.क.च्या नांवाने वि.प.कडे सदर ट्रॅक्टरची पॉलिसी नोंदविण्यात आली नाही तर बबनराव गुलाबराव नाखले यांच्या नावाने विमा पॉलिसी काढण्यात आलेली आहे. त्यामुळे त.क.ला विमा दावा मिळू शकत नाही. विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता विमा धारक म्हणून बबनराव गुलाबराव नाखले यांचे नांवाने वादातीत ट्रॅक्टरची विमा पॉलिसी काढण्यात आलेली आहे. परंतु नोंदणीकृत सर्टिफिकेटचे अवलोकन केले असता त.क. हा वादातील ट्रॅक्टरचा नोंदणीप्रमाणे मालक आहे. पॉलिसी ही वादातील ट्रॅक्टरची काढण्यात आलेली आहे. त.क.ने त्याच्या तक्रारीमध्ये सन 2012-2013 या वर्षाकरिता वादातीत ट्रॅक्टरची पॉलिसी देत असतांना वि.प.ने चुकिने बबनराव गुलाबराव नाखले यांच्या नांवाने विमा पॉसिली दिलेली आहे, ही बाब त.क.ने वि.प.च्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु वि.प.ने कुठलीही कारवाई केली नाही. सन 2012-2013 या वर्षापूर्वी वादातील ट्रॅक्टर हे त.क.च्या नांवे विमा पॉलिसी होती, त्याचे नुतनीकरण सन 2012-2013 या वर्षाकरिता करण्यात आले. परंतु नांवात चुकिने बबनराव नाखले यांचे नांव लिहिण्यात आले असे दिसून येते. वि.प. कंपनीने विमा पॉलिसी देत असतांना वादातील ट्रॅक्टर हे कुणाच्या नांवे हे पाहणे आवश्यक होते. परंतु वि.प.ने रजिस्टर्ड प्रमाणपत्रावरुन नांव न पाहता त.क.च्या वडिलांच्या नांवाने म्हणजेच बबनराव गुलाबराव नाखले यांच्या नांवाने विमा पॉलिसी दिल्याचे दिसून येते. विमा पॉलिसी काढतांना बबनराव नाखले यांच्या नांवाने असलेला असा कुठलाही दस्ताऐवज मंचासमोर दाखल केलेला नाही तरी सुध्दा सदरील विमा पॉलिसी ही ट्रॅक्टरसाठी काढण्यात आलेली आहे आणि त.क. हा रजिस्टर्ड मालक असल्यामुळे चुकिने दुस-याचे नांवाने सदरील विमा पॉलिसी दिलेली असल्यामुळे त.क.ला दावा देता येत असे म्हणता येणार नाही.
- वादग्रस्त ट्रॅक्टरचे अपघातात झालेल्या नुकसानीबाबत विचार करावयाचा झाल्यास त.क.च्या म्हणण्याप्रमाणे त्यानी अपघातानंतर सदर ट्रॅक्टरची दुरुस्ती लहानुजी मोटर्स, आर्वी यांच्याकडून स्वखर्चाने रु.3,00,000/- खर्च करुन करवून घेतली व त्याची मागणी वि.प.कडे केली. परंतु वि.प.ने ती नाकारली. येथे नमूद करावेसे वाटते की, त.क.ने वादातील ट्रॅक्टर दुरुस्तीकरिता रु.3,00,000/- खर्च लागला त्या संबंधी कुठलाही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. तसेच त्यांनी स्वतःचे शपथपत्र दाखल केलेले नाही. वेळोवेळी संधी देऊन ही ते गैरहजर राहीले. जरी असे गृहीत धरले की, त.क.ने अपघातग्रस्त ट्रॅक्टरची लहानुजी मोटर्स आर्वी यांच्याकडून दुरुस्ती करुन घेतली व त्याकरिता रुपये 3,00,000/- खर्च लागला तर निश्चितच त्याची बिले त.क.च्या ताब्यात असायला हवी किंवा ते बिल त.क.ने वि.प.कडे दाखल करावयास पाहिजे होते. परंतु त.क.ने तसे कुठलेही बिल दाखल केलेले नाही किंवा त्यांनी सदरील बिल दाखल केले असे कुठेही तक्रार अर्जात नमूद केलेले नाही. त्यामुळे अपघातग्रस्त ट्रॅक्टरच्या दुरुस्तीकरिता त.क.ने रुपये 3,00,000/- खर्च केला असे म्हणता येणार नाही.
- वि.प.ने त.क.चा विमा दावा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे नाकारला आहे . हे सत्य आहे की, वाल्मीक शेळके हा वादातीत ट्रॅक्टर चालवित होता व ट्रॅक्टर विहीरीत पडून अपघात झाला. वि.प.च्या सर्व्हेअरने त्याच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये वाल्मीक शेळके कडे ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना नव्हता, त्याच्याकडे LMV Transport या सदराखाली ड्रायव्हींग लायसन्स होते. त.क.ने वाल्मीक शेळके यांच्याकडे ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना होता हे दाखविण्यासाठी कुठलेही कागदपत्र, पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. त.क.ने वाल्मीक शेळके यांच्या ड्रायव्हींग लायसन्सची झेरॉक्स प्रत नि.क्रं. 4(3) प्रमाणे दाखल केलेली आहे. त्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, वाल्मीक शेळके यांच्याकडे LMV Transport चे वाहन चालविण्याचा परवाना होता. सदर परवाना याचे अवलोकन केले असता LMV Transport व LMV Tractor हे दोन वेगवेगळे ड्रायव्हींग लायसन्सचे वर्ग आहे. ट्रॅक्टर चालविण्यासाठी LMV Tractor या सदराखालचे वाहन चालविण्याचा परवाना राहणे आवश्यक आहे. परंतु त.क.ने वाल्मीक शेळके यांच्याकडे ट्रॅक्टर चालविण्याकरिता दिले, LMV Tractor चे लायसन्स होते हे दाखविण्यासाठी कुठलाही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. तसेच सर्व्हेअर समोर सुध्दा तसा परवाना त.क.ने सादर केलेला नाही. त्यामुळे वाल्मीक शेळके यांच्यकडे अपघाताच्या दिवशी ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना नव्हता हे सिध्द होते व त.क. अपघातग्रस्त ट्रॅक्टरचे मालक या नात्याने ज्या व्यक्तिकडे ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना आहे तशा व्यक्तिला ट्रॅक्टर चालविण्यास द्यावयास पाहिजे होते. परंतु परवाना नसलेल्या व्यक्तिला ट्रॅक्टर चालविण्यास देऊन पॉलिसीतील अटी व शर्तीचे उल्लंघन केले हे दिसून येते. त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्ती प्रमाणे त.क.सदरील अटीच्या भंगामुळे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. वि.प. कंपनीने त.क.चा विमा दावा नाकारला ते संयुक्तिक वाटते व वि.प. कंपनीने कुठलीही दोषपूर्ण सेवा त.क.ला दिली असे म्हणता येणार नाही.
वरील विवेचनावरुन मंच या निष्कर्षा प्रत येते की, त.क. यांनी तक्रार अर्जात केलेले आपले कथन सिध्द करु शकला नाही व वि.प.ने त्याचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असे सिध्द केले नाही. म्हणून वरील सर्व मुद्दयाचे उत्तर नकारार्थी देण्यात येते. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येते. आदेश 1 तक्रारकर्त्याची तक्रार नामंजूर करण्यात येते. 2 उभय पक्षाने खर्चाचे वहन स्वतः करावे. 3 मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 4 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात. | |