निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 23/09/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 03/10/2011
तक्रार निकाल दिनांकः- 18/03/2013
कालावधी 01 वर्ष 05 महिने 15 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
श्रीमती सरस्वती उत्तमराव चव्हाण, अर्जदार
वय 44 वर्षे. कामधंदा.घरकाम. अड.एस.एन.वेलणकर.
रा.व्दारा मुंजाजी उत्तमराव चव्हाण,
मु.नागनगाव, पोस्ट – वस्सा ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
1 वरिष्ठ शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार.
नॅशनल इन्शोरन्स कं.लि.डायरेक्ट एजंट्स ब्रँच- अड.एस.ए.पाठक.
(270106) 11,महात्मा गांधी रोड,4 था मजला,
रेड क्रॉस बिल्डींग,पुणे (411 001)
2 अधिकृत प्रतिनिधी
नेटसर्फ कम्युनीकेशन्स प्रा.लि. अड.बी.के.भक्ते.
ऑफीस क्र.4,तारा आयकॉन प्लॅनेट बजाज शोरुम समोर,
वाकडेवाडी,पूणे (411003)
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराने तीचे पती नामे उत्तमराव पुंजाजी चव्हाण यांचे अपघाती मृत्यू झाल्यामुळे विमा कंपनीकडून विम्याची रक्कम मिळावी म्हणून हा तक्रार अर्ज मंचासमोर दाखल केलेला आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचे पती उत्तमराव पुंजाजी चव्हाण हे दिनांक 26/02/2011 रोजी जिंतुर परभणी रोडने जात असतांना बोरी गावा जवळील विजया जिनिंगच्या बाजूच्या रोडवर मोटार सायकल क्रमांक एम.एच.22/ एच 3492 च्या चालकाने धडक दिल्यामुळे गंभिर जखमी झाले व मरण पावले.
अर्जदाराचे गैरअर्जदार क्रमांक 2 अधिकृत प्रतिनीधी नेटसर्फ कम्युनीकेशन्स प्रा.लि.
पूणे यांच्या मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 वरिष्ठ शाखा व्यवस्थापक नॅशनल इन्शोरंस कंपनी लि. रेड क्रॉस बिल्डींग,महात्मा गांधी रोड,पुणे याच्याकडे टेलरमेड ग्रुप वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत एकुण 2,059 मेंबर्स / सभासदांची यादी आहे.सदर पॉलिसीचा क्रमांक 270106/42/10/8200000198 असा असून पॉलिसीचा कालावधी दिनांक 24/06/2010 ते 23/06/2011 असा आहे तसेच विम्याच्या लाभाची रक्कम प्रत्येकी रु.1,00,000/- फक्त एवढी आहे.सदर पॉलिसी मध्ये मयताची नॉमिनी म्हणून अर्जदार सरस्वती उत्तमराव चव्हाण यांच्या नावाचाही उल्लेख केलेला आहे.
सर्व कागदपत्रे अर्जदाराने विम्याचा क्लेम मिळावा म्हणून गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठविला व त्यानी ती गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिनांक 20/05/2011 रोजी पोहचवली सदरची कागदपत्रे पॉलिसीच्या अटी व नियमा प्रमाणे नमुद केल्या प्रमाणे म्हणजेच मृत्यूच्या दिनांका पासून 8 दिवसांच्या आत न पाठवता 90 दिवसाच्या विलंबाने पाठविली म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम नामंजूर करुन अर्ज परत पाठविला व तो अर्जदारास दिनांक 28/06/2011 रोजी मिळाला.
अर्जदाराने कंपनीने नैसर्गिक न्यायाच्या व तत्वाच्या विरुध्द गैरअर्जदाराने क्लेम नाकारला असे नमुद करुन अर्जदासरास गैरअर्जदाराकडून वैयक्तिक व संयुक्तिक अपघाताची मृत्यू दाव्याची रक्कम रु.1,00,000/- व क्लेम नाकारला त्या तारखे पासून म्हणजेच दिनांक 20/05/2011 पासून 12 टक्के व्याजासह मिळावे व मानसिकत्रासा बद्दल रु.10,000/- व तकारीचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर व पुराव्या बाबत कागदपत्रे नि.क्रमांक 4 सोबत जोडलेले आहेत.
अर्जदाराच्या तक्रार अर्जावर आपले लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचा मार्फत नोटीसा पाठविण्यात आल्या व त्यांना नोटीसा प्राप्त झाल्याचा पुरावा म्हणून मंचास पोहच पावतीही प्राप्त झाली.
सदरची नोटीस मिळाल्या नंतर गैरअर्जदार क्रमांक 1 हे अड. एस.ए.पाठक मार्फत दिनांक 15/11/2011 रोजी हजर झाले व तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे अड. बी.के.भक्ते हे दिनांक 15/12/2011 रोजी हजर झाले.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी निवेदन नि.क्रमांक 14 वर दिनांक 11/01/2012 रोजी दाखल केला व आपले लेखी निवेदनात असे नमुद केले आहे की, कंपनी उत्पादनाची विक्री करण्याचे काम करते व मयत हा कंपनीचा वितरक डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करत होता व त्यामुळे मयत या कंपनीचा ग्राहक या संज्ञेत समाविष्ट होत नाही, तसेच कंपनीने गैरअर्जदार क्रमांक 1 कडून अपघात विमा पॉलिसी घेतली व ती पॉलिसी मयतास लागु होती तसेच पॉलिसी नुसार लाभधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास नुकसान भरपाईची मागणी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे मृत्यू झाल्यापासून 1 आठवड्याच्या आत लेखी कळविणे आवश्यक आहे व ती अट आहे, परंतु अर्जदाराने नुकसान भरपाईची मागणी मुदतीत केली नाही.असे गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे म्हणणे आहे तसेच अर्जदाराने मयताचे वारसदार त्यांची पत्नी आहे असे कथन केले आहे,परंतु अर्जदार त्याचा मुलगा मुंजाजी यांच्या सोबत राहते असे म्हंटले आहे त्यामुळे कायदेशिर वारसदाराची माहिती दिली नाही म्हणून सदरचा अर्ज कायद्याने चालणार नाही असे लेखी निवेदनात म्हंटले आहे तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 हे गैरअर्जदार क्रमांक 1 चे एजंट असल्यामुळे नुकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार क्रमांक 2 हे जबाबदार नाही व त्याच्या विरुध्द प्रकरण चालवता येत नाही असे लेखी कथनात गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी म्हंटले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र सादर केले आहे. तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपले लेखी म्हणणेची मराठी प्रत नि. क्रमांक 14 वर दाखल केलेली आहे. व मराठी शपथपत्र नि.क्रमांक 15 वर दाखल केला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी आपले लेखी म्हणणे नि.क्रमांक 19 वर दिनांक 15/05/2012 रोजी दाखल केले.व शपथपत्र नि. क्रमांक 20 वर दाखल केले.गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी आपल्या लेखी निवेदनात असे नमुद केले आहे की, मयत हा कंपनीचा डिस्ट्रीब्युटर वितरक असल्याने ग्राहक या संज्ञेत समाविष्ट होत नाही,पॉलिसी नुसार अपघाती मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई मागणीसाठी नियम व अट व करारनामा याचा करार केलेला आहे त्यानुसार व्यक्ति मयत झाल्यानंतर 1 आठवड्याच्या आत अर्जदाराने आपला क्लेम सादर करणे आवश्यक आहे असे नमुद केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपल्या लेखी जबाबाच्या परिच्छेद क्रमांक 2 मध्ये असे नमुद केले आहे की, अर्जदाराने मयताची माहिती पॉलिसीतील नियम व अटी प्रमाणे नसून 90 दिवसांनी पाठविली म्हणून तो नुकसान भरपाई मागण्यास पात्र ठरत नाही, तसेच परिच्छेद क्रमांक 3 मध्ये असे नमुद कले आहे की, दोन गाडयांनी समोरासमोर धडक देवुन अक्सीडेंट झाला व सदर व्यक्ति कशामुळे मयत झाला याचे कारण समजून येत नाही असे नमुद केले आहे. तसेच परिच्छेद क्रमांक 4 मध्ये अर्जदाराने एफ.आय.आर., पोलिस इन्व्हेस्ट पंचनामा, पॉलिसीच्या माहिती बद्दलची कागदपत्रे व गरजेच्या असलेल्या कागदपत्रे क्लेमसोबत पाठविलेली नाही असे नमुद केले आहे. व तसेच परिच्छेद क्रमांक 7 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे म्हणणे असे आहे की, मयत व्यक्तिचा ड्रायव्हींग लायसेंन्स दाखल केला नाही व मयताच्या चुकीमुळे अक्सीडेंट झाला असे नमुद केले आहे.
तक्रार अर्जाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारातर्फे अड एस.एन.वेलणकर व गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे एस.ए.पाठक यांनी युक्तिवाद केला.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराचा विमा क्लेम
नाकरण्याच्या बाबतीत सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय
2 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? होय.
कारणे
मुद्या क्रमांक 1 व 2
अर्जदाराचे मयत पती उत्तमराव पुंजाजी चव्हाण यांचा दिनांक 26/02/2011 रोजी अपघात होवुन मृत्यू झालेला आहे हे नि.क्रमांक 4/5 मरणोत्तर पंचनामा, नि,क्रमांक 4/6 मरणोत्तर तपासणीसाठी सिव्हील सर्जनकडे पाठविण्याचा रिपोर्ट, नि.4/10/6 पोस्ट मार्टम रिपोर्ट, Opinion as to the clause probable clause of death वैद्यकीय अधिकारी बोरी इत्यादी नोंदीतून व दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द झालेले आहे.वारसदार बाबतीत पॉलिसी मध्ये नॉमिनी म्हणून फक्त अर्जदार सरस्वती उत्तमराव चव्हाण या नावाचाच उल्लेख आहे त्यामुळे इतर वारसदाराच्या बाबतीत कायद्यानुसार विम्याच्या लाभासाठी त्याचा समावेश करणे मंचास संयुक्तिक वाटत नाही, मयत उत्तमराव पुंजाजी चव्हाण हे ग्राहक होत नाही हे म्हणणे देखील चुकीचे वाटते कारण विमा पॉलिसी ही विमा धारकास पॉलिसीचा लाभ मिळविण्यासाठीच असते तसेच मयत हा कंपनी किंवा कंपनीचा संचालक नसून व्यक्ती आहे त्यामुळे व्यक्ति हा ग्राहक होत नाही हे गैरअर्जदाराचे म्हणणे मंचास संयुक्तिक वाटत नाही मयत गाडी चालवत होता या बाबतचा पुरावा गैरअर्जदारानी दाखल करु शकले नाही त्यामुळे ड्रायव्हींग लायसेंन्स दाखल करण्याचा प्रश्नच उदभवत नाही गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे पॉलिसी नाकारण्यासाठी अन्य सबळ पुरावा सादर करु शकलेले नाही.
पॉलिसीचा क्लेम विलंबाने दाखल केल्यामुळे सदरचा क्लेम गैरर्जदार क्रमांक 1 ने देण्यास नाकारला आहे एवढेसे कारण संयुक्तिक वाटत नाही, या संदर्भात मा.राज्य आयोग,ग्राहक वाद निवारण आयोग,महाराष्ट्र राज्य यांनी अपील क्रमांक 1052/2007 कमलबाई प्रकाश चव्हाण विरुध्द आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड इंन्शुरंस कंपनी व इतर या प्रकरणा मध्ये दिनांक 05/10/2009 रोजी दिलेले निकालपत्र प्रमाणे (सी.पी.आर.2010 (1)) पान क्रमांक 219 या प्रकरणाच्या आधारे अर्जदार विमा पॉलिसीच्या क्लेमची रक्कम घेण्यास पात्र आहे. असे मंचास वाटते, अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्राच्या पुराव्याने अर्जदार मयताचे अपघात विमा पॉलिसीची नुकसान भरपाई रु.1,00,000/- ( अक्षरी रु.एकलाख ) मिळणेस पात्र आहे. असे या मंचाचे मत आहे, म्हणून हे मंच मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराच्या मयत पतीच्या अपघाती मृत्यू क्लेमची रक्कम रु.1,00,000/- ( अक्षरी रु. एकलाख फक्त ) अर्जदारास 1 महिन्याच्या आत द्यावी, तसेच सदर रक्कमेवर दिनांक 20/05/2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने संपूर्ण रक्कम अदा करे पर्यंत व्याज द्यावे.
3 तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास दाव्याच्या खर्चापोटी रु.2,000/- ( अक्षरी रु. दोनहजार फक्त) द्यावे.
4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
सदस्य अध्यक्ष