नि.29 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 181/2010 नोंदणी तारीख – 28/7/2010 निकाल तारीख – 22/10/2010 निकाल कालावधी – 84 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री बाळासाहेब निवृत्ती घनवट 2. सौ निर्मला बाळासाहेब घनवट दोघे रा.मु.पो.पिंपरद, ता.फलटण जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री व्ही.पी.जगदाळे) विरुध्द 1. मॅनेजर, मे.सेमीनिस व्हीजीटेबल सीड्स (इंडिया) प्रा.लि., गट नं.14, चिटेगाव ता.पैठण जि.औरंगाबाद 2. चंद्रशेखर पवनलाल दोशी रा.शिवाजी चौक, रविवार पेठ, फलटण जि.सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री जितेंद्र कोठारी) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांचा शेती हा व्यवसाय आहे. जाबदार क्र.1 ही बियाणे निर्मिती करणारी कंपनी आहे व त्यांच्या बियाणाची विक्री जाबदार क्र.2 हे करीत असतात. अर्जदार यांनी त्यांचे शेतजमीनीत विजयता टोमॅटो या वाणाचे पीक घेण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी जाबदार क्र.1 यांनी उत्पादित केलेले बियाणे जाबदार क्र.2 यांचे दुकानातून दि.3/2/2008 रोजी खरेदी केले. खरेदी करतेवेळी अर्जदार यांनी जाबदार क्र.2 यांचेकडून सदरचे पिकासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती घेवून त्यांची लागण केली. तदनंतर त्याची रोपे तयार झालेनंतर त्याची पुनर्लागण केली व त्यामध्ये त्यांनी फुलकोबीचे आंतरपीक घेतले. मूळ टोमॅटो पिकावरती येणारी कीड व अन्य रोगाचा प्रथम प्रादुर्भाव हा आंतरपिकावर होतो व त्यामुळे मूळ टोमॅटो पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याची योग्य ती काळजी घेता येते हा आंतरपीक घेण्यामागचा मुख्य उद्देश होता. तक्रारदाराने सदरचे टोमॅटो पिकास आवश्यक असा योग्य तो मंडप घातलेला होता तसेच खते, पाणी, औषधे, मशागत इ.चा संतुलित वापर केला होता. सदरचे पिकास दोन महिन्यानंतर फुले व फळे लागणे अपेक्षित होते परंतु ती लागली नाहीत. म्हणून सदरची बाब अर्जदार यांनी जाबदार क्र.1 व 2 यांना कळविली. त्यानंतर जाबदार क्र.1 यांचे प्रतिनिधींनी अर्जदारचे प्लॉटला भेट दिली व ते बियाण्याचा लॉट नंबर घेवून गेले परंतु ते परत आलेच नाहीत. सबब अर्जदार यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती फलटण यांचेकडे तक्रार केली. त्यानुसार जिल्हा बियाणे तक्रार निवारण समिती सातारा यांनी सदरचे पिकाची पाहणी केली. त्यावेळी जाबदार क्र.1 व 2 यांचे प्रतिनिधी हजर होते. सदरचे समितीचे अहवालानुसार बियाणात दोष असल्यामुळे उत्पन्नात सुमारे 40 ते 45 टक्के घट येईल असा निष्कर्ष काढला आहे. सबब नुकसान भरपाईपोटी रु.3,02,600/- मिळावेत, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार क्र.1 व 2 यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत अनुक्रमे नि. 11 व 15 ला दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार हा ग्राहक नाही. सदरचे प्रकरण हे या मंचाचे अधिकारक्षेत्राबाहेरील आहे. सदरचा वाद मिटविण्याचे अधिकार केवळ दिवाणी न्यायालयालाच आहेत. तक्रारदाराने टोमॅटो बियाणांची पेरणी व पिक व्यवस्थापन याबाबतच्या निर्देशांचे पालन केलेले दिसत नाही. ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(क) नुसार बियाणाची फिल्ड टेस्ट घेण्यात आली नाही. लागवडीनंतर टोमॅटो पिक हे 89 ते 90 दिवसात तोडणीकरीता तयार होते परंतु तक्रारदार याने 147 दिवसानंतर टोमॅटो पिकाला फळे लागली नाहीत अशी तक्रार केली आहे. अर्जदार हा सदरचे पिकाचे व्यवस्थापन करण्यास असमर्थ ठरला आहे. बियाणे तक्रार निवारण समितीचा निर्वाळा तथ्यहीन आहे. सदरचे पिकावर आलेल्या चुरडामुरडा या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अर्जदारने कोणतेही ठोस व्यवस्थापन केलेले नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि.28 ला पाहिला. जाबदार क्र.1 व 2 तर्फे दाखल लेखी युक्तिवाद अनुक्रमे नि. 26 व 27 ला पाहिला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. अर्जदार यांचे तक्रारअर्जातील मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांना जाबदार यांनी पुरवठा केलेले टोमॅटो या पिकाचे बियाणे हे सदोष होते व त्यामुळे अर्जदार यांचे नुकसान झाले. परंतु सदरचे बियाणे सदोष होते हे दर्शविणारा कोणताही ठोस पुरावा अर्जदार यांनी दाखल केलेला नाही. ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 13(2) मधील तरतुदीप्रमाणे संबंधीत लॉटमधील बियाणाची योग्य त्या प्रयोगशाळेत अथवा संबंधीत क्षेत्रातील तज्ञांमार्फत तपासणी होणे गरजेचे आहे. परंतु अर्जदार यांनी त्यांना पुरवठा करण्यात आलेल्या बियाणांची अशी कोणतीही तपासणी केलेली नसल्याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत आहे. त्यामुळे सदरचे बियाणे हे सदोष होते ही बाब पुराव्यानिशी शाबीत होत नाही. 6. अर्जदार यांनी नि.6/8 ला जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल सादर केलेला आहे. सदरचे अहवालामधील निष्कर्ष पाहिले असता पहिला निष्कर्ष हा शेतक-याने पिकाची निगा व देखभाल केली नसलेचे दिसून आले असा आहे. सदरचे अहवालामध्ये जरी निष्कर्ष क्र.2 मध्ये बियाणात दोष असलेमुळे उत्पादनात घट येईल असे नमूद केले असले तरी संपूर्ण अहवालाची बारकाईने पाहणी केली असता बियाणामध्ये दोष असल्याबाबत कोणताही सविस्तर तपशील अहवालामध्ये नमूद नाही. अहवालातील अंतिम निष्कर्ष क्र.2 वगळता संपूर्ण अहवालामध्ये बियाणे दोषयुक्त असल्याबाबत काहीही नमूद नाही. तसेच सदरचे अहवालामध्ये एकीकडे असे नमूद करण्यात आले आहे की, पिकावर मोठया प्रमाणावर करपा व चुरडामुरडा रोग तसेच किडीचा उपद्रव झालेमुळे पिक पूर्ण निस्तेज झाले असून वाढ खुंटली आहे तर दुसरीकडे निष्कर्षामध्ये मात्र बियाणात दोष असलेमुळे उत्पादनात घट येईल असे नमूद केलेले आहे. अशाप्रकारे सदरचे अहवालामध्ये विसंगती आढळून येते. सबब सदरचे अहवालावर विसंबून सदरचा तक्रारअर्ज मंजूर करता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. 7. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 22/10/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |