जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 390/2015 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 01/09/2015.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-22/09/2015.
किशोर बापुराव पेटकर,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
रा.रेल्वे क्वॉर्टर नंबर 908 (ए), 8 बंगला एरिया,
ई सी सी बँक भुसावळ जवळ, ता.भुसावळ,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. युनीयन ऑफ इंडीया व्दारा सेक्रेटरी,
मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वे बोर्ड, रफी मार्ग,
नवी दिल्ली 01.
2. जनरल मॅनेजर, पश्चिम मध्य रेल्वे,
इंद्र मार्केट, जबलपुर, मध्य प्रदेश 01.
3. चिफ मेडीकल सुपरिटेंडेंट, रेल्वे हॉस्पीटल,
पश्चिम मध्य रेल्वे, जबलपुर.
4. डॉ.पी.के.मित्तल,मेडीकल ऑफीसर,
रेल्वे हॉस्पीटल,पश्चिम मध्य रेल्वे, जबलपुर.
5. डॉ.एस.के.रॉय,मेडीकल ऑफीसर, रेल्वे हॉस्पीटल,
पश्चिम मध्य रेल्वे, जबलपुर.
6. चिफ पर्सनल ऑफीसर, पश्चिम मध्य रेल्वे,
इंद्र मार्केट, जबलपुर.
7. जनरल मॅनेजर, मध्य रेल्वे,सी.एस.टी.मुंबई.
8. विभागीय रेल्वे व्यवस्थापक,भुसावळ विभाग,
मध्य रेल्वे, भुसावळ 01. ......... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.अशोक टी.पाटील वकील.
निकालपत्र
व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारी मध्ये नमुद केलेल्या बाबींचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी त्यात दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन केले. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? तसेच सदरील तक्रार ही या मंचाचे कार्यक्षेत्रात चालण्यास पात्र आहे काय ? असा प्राथमिक मुद्या उपस्थित करण्यात आला. तक्रारदार यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदाराचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार हे लॉ असिस्टंट या पदावर रेल्वेमध्ये रिकरुटमेंट बोर्डाची परिक्षा सन 2004 मध्ये दिली. त्यांना रेल्वे हॉस्पीटल,जबलपुर येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले त्याकामी त्यांनी रु.24/- फी भरली. रेल्वे मेडीकल बोर्डाने त्यांची तपासणी करुन रिपोर्ट दिला त्यामध्ये तक्रारदार यांना क्षयरोग ( Tuberculosis ) आजार असल्यामुळे त्यांनी पुन्हा तीन महीन्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी यावे असे सांगीतले. तदनंतर तक्रारदार यांनी खाजगी दवाखान्यातुन तपासणी करुन घेतली तसेच इतर चाचण्या करुन घेतल्या असता त्यास क्षयरोग ( Tuberculosis ) आजार नसल्याचे निष्पन्न झाले. सदरील बाब तक्रारदार यांनी सामनेवाला यांना कळविली परंतु सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दिलेल्या तारखेस यावे असे सांगीतले. तक्रारदार यांना दि.15/6/2005 रोजी तपासण्यात आले व वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले. तक्रारदार हे दि.17/8/2005 रोजी रुजु झाले. तक्रारदार यांनी पुढे असे कथन केलेले आहे की, त्यांना क्षयरोग ( Tuberculosis ) आजार नसतांना ते आजारी असल्याचे नमुद करुन उशिराने वैद्यकीय तपासणी घेतली त्यामुळे तक्रारदार हे अगोदर नौकरीवर रुजु होऊ शकले नाहीत. तदनंतर तक्रारदार यांनी दि.25/5/2012 रोजी माहिती अधिकार कायदयाखाली माहिती मागवली. सामनेवाला यांचे चुकीमुळे तक्रारदाराचे रु.19,00,000/- चे नुकसान झाले. त्यामुळे सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले.
2. तक्रारदार यांचे वकीलांनी तक्रारीत नमुद केलेल्या बाबी विषद करुन असा युक्तीवाद केला की, तक्रारदार सध्या भुसावळ येथे कार्यरत आहेत त्यामुळे सदरील तक्रार या मंचास चालविण्याचे अधिकार आहेत. तसेच मुदतीच्या बाबतीत त्यांनी असा युक्तीवाद केला की, सामनेवाला यांचे विरुध्द तक्रार दाखल करण्यास सतत कारण घडत आहे. त्याचे प्रित्यर्थ त्यांनी मा.वरिष्ठ न्यायालयांनी दिलेले निवाडे दाखल केले ते खालीलप्रमाणेः-
1) मा.राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, नवी दिल्ली यांचेकडील निल कमल पेपर मिल्स प्रा.लि. // विरुध्द // न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लि LAWS (NCD)-1998-11-57 निकाल दि.9 नोव्हेंबर,1998.
2) मा.सुप्रिम कोर्ट ऑफ इंडीया, एम आर गुप्ता //विरुध्द // युनीयन ऑफ इंडीया व इतर 1996 ए आय आर पान क्र.669.
3. वर नमुद केलेला युक्तीवाद व संपुर्ण कागदपत्रांचे अवलोकन केले. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) तक्रारदार हे सामनेवाला यांचे प्रथमदर्शनी ग्राहक
आहेत काय ? नाही.
2) सदरील तक्रार मुदतीत आहे काय ? नाही.
3) सदरील तक्रार या मंचासमोर चालण्यास पात्र आहे
काय ? नाही
4) कोणता आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसाः
मुद्या क्र. 1 ते 4 ः
4. तक्रारदार यांचे तक्रारीतील बाबींचे काळजीपुर्वक अवलोकन केले असता तक्रारदार यांची लॉ असिस्टंट म्हणुन रेल्वे रिकरुटमेंट बोर्डाने निवड केली होती. सदरील निवडीच्या अनुषंगाने तक्रारदार यांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले व त्यामध्ये तक्रारदार यांना क्षयरोग ( Tuberculosis ) आजार असल्याचे नमुद करुन पुन्हा तीन महीन्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले. तक्रारदाराची दि.14/6/2005 रोजी वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्यांना दि.15/6/2005 रोजी फीटनेस सर्टीफीकेट देण्यात आले व तक्रारदार हे दि.17/8/2005 रोजी नौकरीवर नियुक्त झाले.
5. वर नमुद केलेल्या बाबींचा विचार केला असता, तक्रारदार व
सामनेवाला यांचे मध्ये काही वाद होता तो सन 2005 सालातील होता. तक्रारदार यांचे कथन की त्यांना क्षयरोग ( Tuberculosis ) आजार नव्हता परंतु सामनेवाला यांनी क्षयरोग ( Tuberculosis ) आजार हा आजार दाखवुन पुन्हा तीन महीन्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी येण्याचे सांगीतले त्याच वेळेस तक्रारदार यांना त्यांचे कायदेशीर हक्कास बाधा उत्पन्न झाली होती तर ते योग्य त्या सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागु शकत होते. तसेच तक्रारदाराची वैद्यकीय तपासणी कधीही या मंचाचे अधिकार क्षेत्रात झालेली नाही तसेच दाव्यास कारण या न्यायमंचाचे अधिकार क्षेत्रात घडलेले नाही. सन 2015 मध्ये तक्रार दाखल करण्यास कोणते कारण घडले ? व तक्रार दाखल करण्यास सतत (निरंतर) कारण घडत होते ही बाबही मांडली नाही अगर ती सिध्द करण्यासाठी कोणतेही कारण दिले नाही केवळ सन 2015 मध्ये पगारात काही बदल झाले त्या कारणास्तव सन 2005 मध्ये घडलेल्या कारणास्तव दावा दाखल करता येत नाही. प्रथमदर्शनी सदरील तक्रार ही मुदतबाहय आहे. तसेच या मंचाचे कार्यक्षेत्रात कोणतेही कारण घडलेले नाही. सामनेवाला हे या मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाहीत. जे कारण घडले आहे ते जबलपुर (मध्यप्रदेश) व दिल्ली येथे घडलेले आहे. तक्रारदार यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक,भुसावळ विभाग यांना प्रतिवादी म्हणुन सामील केलेले आहे. त्यांचे विरुध्द कोणतीही दाद मागीतलेली नाही अगर त्यांचे विरुध्द दावा दाखल करण्यास कोणते कारण घडले आहे ? हेही नमुद केलेले नाही. तक्रारदार यांचे कथन की, ते सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी वैद्यकीय तपासणीकामी रु.24/- फी भरलेली आहे ती फी सन 2005 मध्ये सामनेवाला क्र. 5 यांचेकडे रेल्वे बोर्डाची वैद्यकीय तपासणी करणेकामी भरली आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिका-यांनी जर चुकीचा रिपोर्ट त्यावेळेस दिला असेल तर, तक्रारदार यांनी त्याच वेळेस योग्य ती दखल घेऊन सामनेवाला यांचेविरुध्द कारवाई करावयास पाहीजे होती. तक्रारदार यांनी सन 2005 पासुन सन 2015 पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक नाहीत. सबब तक्रारदार यांची तक्रार प्राथमिक मुद्यावर रद्य होण्यास पात्र आहे. यास्तव मुद्या क्र. 1 ते 3 चे उत्तर आम्ही नकारार्थी देऊन मुद्या क्र. 4 चे निष्कर्षास्तव खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदार यांची तक्रार रद्य करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
3) निकाल पत्राची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 22/09/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.