जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 3/2016 तक्रार नोंदणी दि. :- 28/1/2016
तक्रार निकाली दि. :-28/7/2016
निकाल कालावधी :- 6 महिने
अर्जदार/तक्रारदार :- श्री. हिरालाल पोपटु अवसरे ,
वय 45 वर्षे, व्यवसाय शेती, मो.क्र.9420143850 पत्ता विसोरा, तह.देसाईगंज, जि. गडचिरोली
- विरुध्द -
गैरअर्जदार/सामनेवाला :- (1) श्री. संचालक यशोदा हाईब्रीड सीड्स प्रा.लि.
पत्ता रजि. ऑफीस 248, लक्ष्मी थिएटर
जवळ हिंगणघाट, तह.हिंगणघाट, जि.वर्धा
(2) श्री मे.शिव कृषी केंद्र,
नाकाडे पेट्रोल पंपाचे समोर, देसाईगंज,
तह.देसाईगंज, जि. गडचिरोली
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री के.ए. जिवानी
गैरअर्जदार क्र.1 करीता :- अधि.श्री जे.एल. भुत
गैरअर्जदार क्र.2 करीता :- अनुपस्थित
गणपूर्ती :- (1) श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष
(2) श्री सादीक मोहसीनभाई झवेरी, सदस्य
(3) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्य)
(पारीत दिनांक : 28 जुलै 2016)
तक्रारकर्ता हयाने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
अर्जदार हा शेतकरी असून त्याने दि.16/6/2015 रोजी गैरअर्जदार क्र.2 चे कृषिकेंद्रातून गैरअर्जदार क्र.1 कंपनीचे धानाचे जयश्रीराम गोल्ड जातीचे बियाणे खरेदी केले. सदर बियाण्याची किंमत रू.1577.17 अशी होती. अर्जदाराने सदर बियाण्याची आपल्या शेतात पेरणी केली, परंतु सदर बियाणे पूर्णतः उगवले नाही. सदर बियाणे पोचट व पोखरलेले होते. याबाबत दि.30/6/2015 रोजी अर्जदाराने मा.कृषि अधिकारी, पंचायत समिती, देसाईगंज यांचेकडे तक्रार करून चौकशी करण्याची विनंती केली. गैरअर्जदार क्र.1 च्या प्रतिनिधीने सुध्दा अर्जदाराच्या शेतीची मौकातपासणी केली. परंतु काहीही कळविले नाही. अर्जदाराने गैरअर्जदार कृषिकेंद्रालासुध्दा बियाण्याचा कमी उगवणीची सुचना दिली व फोनवर बोलणे केले, परंतु त्यांनी दखल न घेता उडवा उडवीची उत्तरे दिली. अर्जदाराने मंडल कृषि अधिकारी, देसाईगंज यांचेकडे तक्रार केली व त्यांचे निरीक्षणानुसार सदर बियाण्याची 25 टक्के उगवण झालेली आहे व उर्वरीत बियाणे हे पोचट असल्याचे आपल्या निरीक्षणात सांगितले आहे. अर्जदाराने गैरअर्जदारांना दि.5/9/2015 रोजी लेखी नोटीस पाठविला. सदर नोटीसवर गैरअर्जदाराने कोणतीही दखल घेतली नाही म्हणून सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, त्याचे झालेले नुकसान रू.7,72,000/- ची गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई म्हणून मिळण्याचे आदेश दयावेत.
दिनांक 17/3/2016 रोजी गैरअर्जदार क्र.2 विरूध्द लेखी उत्तर शिवाय प्रकरण चालविण्याचा आदेश नि.क्र. 1 वर करण्यांत आले.
अर्जदाराची तक्रार स्विकृत करून गैरअर्जदारांवर नोटीस काढण्यांत आला. गैरअर्जदार क्र.1 ने निशाणी क्र.9 वर त्याचे लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्तरात कथन केले की अर्जदाराने लावलेले आरोप खोटे असून त्यांना नाकबूल आहेत. अर्जदार हा शेतकरी नाही व तो गैरअर्जदार क्र.1 चाग्राहक नाही. सबब सदर तक्रार गैरअर्जदार क्र.1 चे विरूध्द खारीज होण्यास पात्र आहे. अर्जदाराचे तक्रारीत पेरणीची तारीख शेती क्रमांक नमूद केलेले नाहीत तसेच अर्जदार स्वतः शेतकरी नाही. बियाण्याची उगवण क्षमताही कायद्यानुसार असल्यामुळे बियाण्यात कोणतीही त्रुटी नव्हती. अर्जदाराची तक्रार खेाटी असून ती खारीज करण्याची विनंती केली.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे काय : होय
2) गैरअर्जदारांने अर्जदाराला दोषपूर्ण बियाणे विकुन
सेवेत न्युनतापूर्ण व अनुचित व्यवहार केला आहे काय ? ः होय
3) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा -
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 कंपनीचे बियाणे गैरअर्जदार क्र.1 कडून खरेदी केले होते याबाबत कोणताही वाद नसल्याने अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देण्यांत येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
6. अर्जदाराने तक्रारीसोबत लावलेल्या दस्तावेजांची पडताळणी करतांना असे दिसते की, अर्जदाराचे नांवे कोणतीही जमीन नाही. परंतु अर्जदाराने नि.क्र.4 नुसार दाखल दस्तऐवजावरुन खरेदी बिलाची पडताळणी केली असता असे दिसते की, वादातील बियाणे अर्जदार गैरअर्जदार क्र.2 कंपनीचे बियाणे गैरअर्जदार क्र.1 कडून खरेदी केली. सदर बियाण्याची पेरणी अर्जदाराने त्याचे वडिलांचे शेतात केली होती व त्याची कमी उगवण झाली हे अर्जदाराने नि.क्र.8,9 व 10 वर दाखल तक्रार व पंचनामा द्वारे सिध्द केलेले आहे. अर्जदाराने या संदर्भात गैरअर्जदारांना दि.5/9/2015 ला नोटीस पाठविला आहे असे सिध्द झाले. गैरअर्जदार क्र.2 ने तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. गैरअर्जदार क्र.1 ने आपले जबाबात कथन केले आहे की, सदर बियाण्याची उगवण क्षमता ही कायद्यानुसार असल्यामुळे बियाण्यात कोणतीही त्रुटी नव्हती. या संदर्भात गैरअर्जदार क्र.2 ने कोणताही साक्षपुरावा दाखल केलेला नाही. नि.क्र.17 वर गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेल्या दस्तावेजांची पडताळणी केली असता सदर दस्तावेज छायांकित प्रती असून त्यावर सत्यप्रतिची कोणतीही नोंद नव्हती. सदर दस्तावेज क्र.17 सिध्द करण्यासाठी गैरअर्जदाराने कोणताही साक्षीपूरावा घेतलेला नाही. उलट गैरअर्जदार क्र.2 कडून घेतलेल्या बियाण्याचा पुरावा व त्यासंदर्भात केलेले उगवणीचे पंचनामा प्रकरणात दाखल करून अर्जदाराने बियाण्याची उगवण फक्त 25 टक्के झालेली आहे असे सिध्द केलेले आहे. यात अर्जदाराने गैरअर्जदाराचे त्रुटीपूर्ण बियाण्याचा वापर केला असतांना शेतीचे नुकसान झालेले आहे आणि गैरअर्जदार क्र.2 ने गैरअर्जदार क्र.1 चे मार्फत त्रुटीपूर्ण बियाणे विकून अनुचित व्यवहार केलेला आहे असे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
7. अर्जदाराने तक्रारीत किती क्षेत्रफळात बियाण्याची लागवड केली याबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे अर्जदाराला एकरी किती नुकसान झाले हे अर्जदार सिध्द करू शकला नाही. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अंतिम आदेश -
(1) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने संयुक्त व वैयक्तिकरीत्या अर्जदाराला गैरअर्जदार क्र.2 कंपनीच्या गैरअर्जदार क्र.1 कडून घेतलेल्या बियाण्याची एकुण किंमत रू.1656/- आदेशाची प्रत गैरअर्जदारांना मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावी.
(2) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने संयुक्त व वैयक्तिकरीत्या अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासाबद्दल रक्कम रू. 5000/- व तक्रारीचा खर्च रू. 3000/- आदेशाची प्रत गैरअर्जदारांना मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावी.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 28/07/2016
(रोझा फु. खोब्रागडे) (सादीक मो. झवेरी) (विजय चं. प्रेमचंदानी)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली.