निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 10/01/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 12/01/2012
तक्रार निकाल दिनांकः- 07/05/2012
कालावधी 03 महिने.25.दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.
सदस्या- सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
साहेबराव पिता शेषराव भिसे. अर्जदार
वय 50 वर्ष.धंदा.शेती. अड.एस.एन.वेलणकर.
रा.पिंपरी झोला.ता.गंगाखेड जि.परभणी.
विरुध्द
1 सचिव,परभणी जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी गैरअर्जदार.
पत संस्था.म.एस.पी.ऑफीस जवळ,मु.पो.ता.जि.परभणी.
2 शाखाधिकारी. अड.जी.एच.दोडीया.
युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी लि.
दयावान कॉम्पलेक्स,स्टेशन रोड,मु.पो.ता.जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
(निकालपत्र पारित व्दारा श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.)
गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
मयत संगिता भिसे ही परभणी जिल्हा पोलीस कर्मचारी पत संस्था मर्यादीतची सभासद होती. सदर पतसंस्थेने प्रत्येक सभासदाच्या खात्यातून रु.222/- जमा करुन प्रतिवादी क्रमांक 2 कडून रक्कम रु.1,00,000/- ची ग्रुप पॉलिसी घेतली होती. त्याची वैधता दिनांक 02/12/2010 ते 01/12/2015 पर्यंत होती दिनांक 28/04/2011 रोजी रात्री पावणे नऊ वाजता संगिता चीमणी मध्ये रॉकेल टाकतांना अचानक भडका झाला व त्यात ती भाजून जखमी झाली व दिनांक 07/05/2011 रोजी औरंगाबाद येथील बोबडे हॉस्पीटल मध्ये उपचार सुरु असतांना तिचा मृत्यू झाला. अर्जदार हे मयत संगीताचे वडील आहेत. पॉलिसी हमी पोटी संगीताच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांसह क्लेमफॉर्म भरुन गैरअर्जदार क्रमांक 1 कडे सुपूर्द केला. व गैरअर्जदार कमांक 1 ने दिनांक 27/07/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे अर्जदाराचा प्रस्ताव दाखल केला.गैरअर्जदार क्रमांक 2 ने पोलीस रिपोर्ट व खाजगी चौकशी अधिका-यांचा अहवाल जुळत नसल्याच्या कारणास्तव अर्जदाराचा क्लेम दिनांक 29/11/2011 रोजी फेटाळला.म्हणून अर्जदाराने तक्रार अर्ज मंचात दाखल करुन गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी ग्रुप जनता पर्सनल अक्सीडेंट पॉलिसी खाली अर्जदारास रक्कम रु.1,00,000/- 18 टक्के व्याजासह अपघात दिनांक 28/04/2011 पासून द्यावे तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी व सेवेत त्रुटी दिल्याबद्दल रक्कम रु.25,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- द्यावेत.अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि.5/9 मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1, व 2 यांना तामील झाल्यानतर नेमल्या तारखेस गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर न राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला व त्याच्या विरोधात प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले.गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी निवेदन नि.10 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदारांचे म्हणणे असे की, अर्जदाराचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्याने सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी खाजगी चौकशी अधिकारी श्री.मंचकराव खोमने यांची नेमणुक केली होती चौकशी अधिका-यांचा अहवाल व पोलीस रिपोर्ट जुळत नसल्यामुळे गैरअर्जदाराने क्लेम नाकारलेला आहे. यात कोणत्याही प्रकारची सेवात्रुटी गैरअर्जदाराकडून झालेली नाही. म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.11 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.13/1 ते नि.13/12 मंचासमोर दाखल केली.
दोन्ही पक्षांच्या कैफीयती वरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर
1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले
आहे काय ? होय.
2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1, व 2.
मयत संगिता भिसे हीने गैरअर्जदार क्रमांक 1 मार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 कडून रक्कम रु.1,00,000/- ची ग्रुप जनता पर्सनल अक्सीडेंट पॉलिसी घेतली होती.तिचा दिनांक 07/05/2011 रोजी मृत्यू झाला अर्जदार मयत संगिताचे वडील आहेत.पॉलिसी हमीपोटी मयत संगिता भिसे हिच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने प्रस्ताव गैरअर्जदाराकडे दाखल केला असता पोलीस रिपोर्ट व खाजगी चौकशी अधिकारी याचा अहवाल जुळत नसल्याच्या कारणास्तव विमादावा नाकारला. अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, योग्य कारणास्तव विमादावा फेटाळण्यात आलेला आहे.निर्णयासाठी महत्वाचा व एकमेव मुद्दा असा की, गैरअर्जदाराने घेतलेला बचाव योग्य आहे काय ? यावर मंचाचे मत असे की, मयत संगिताचा मृत्यू भाजून झाला या विषयी कुणाचेही दुमत नाही किंवा त्याबद्दल संशय ही कुणीही व्यक्त केलेला नाही फक्त पोलीस रिपोर्ट व खाजगी चौकशी अधिका-यांने अहवालात नमुद केलेला घटनाक्रम थोडासा वेगळा असल्याने वस्तुस्थिती मध्ये फारसा फरक पडत नाही व पोलीस रिपोर्ट कधीही खाजगी अधिका-यांच्या अहवाला पेक्षा कायदेशिरदृष्टया ग्राह्य धरण्या जोगा व विश्वासार्हय असल्याने त्यात नमुद केलेल्या बाबी लक्षात घेउन अर्जदाराच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करुन क्लेम मंजूर करावयास हवा होता, परंतु गैरअर्जदाराने अतिशय तकलादु व हास्यास्पद स्वरुपाचा बचाव घेवुन विनाकारण क्लेम नाकारला असे मंचाचे मत आहे.
सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 2 ने आदेश कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत ग्रुप जनता पर्सनल अक्सीडेंट पॉलिसी अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- विमादावा नाकारला त्या तारखे पासून म्हणजे दिनांक 29/11/2011 रोजी पासून ते पूर्ण रक्कम पदरी पडे पावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी.
3 गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास मानसिक, शारिरीक त्रासापोटी व सेवेत त्रुटी दिल्याबद्दल रक्कम रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,500/-आदेश मुदतीत द्यावी.
2 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ. अनिता ओस्तवाल श्री. सी.बी. पांढरपट्टे
सदस्या अध्यक्ष.