(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक–11 जुन 2020)
01. तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2 अनुक्रमे एस.बी.आय.लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि स्टेट बॅंक ऑफ इंडीया यांचे विरुध्द दोषपूर्ण सेवे बाबत प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्तीचा पती सुशिक्षीत बेरोजगार असून तो मजूरीचा व्यवसाय करीत होता. तिचे पतीचे नाव दारिद्रय रेषेखालील यादीत समाविष्ठ होते आणि त्याचा क्रं 15374 असा होता. तिचा पती हा विरुध्दपक्ष क्रं 2 भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखे मध्ये दिनांक-17.07.2015 रोजी गेला होता आणि त्याने भारत सरकारच्या बिमा योजने अंतर्गत विम्याचा लाभ मिळविण्यासाठी संपूर्ण कागदपत्र देऊन कन्सेन्ट कम डिक्लरेशन फार्म भरुन दिलेला होता. तिचे पतीने त्याचे बॅंकेतील बचतखाते क्रं-33670788468 मधून आटो डेबीटचे निर्देश बॅंकेला देऊन फॉर्म जमा केला होता त्यावेळी वि.प.क्रं 2 बॅंकेत काम जास्त असल्यामुळे कागदपत्राची पाहणी करुन विम्याची रक्कम त्याचे खात्यातून कपात करण्यात येईल असे वि.प.क्रं 2 बॅंके तर्फे त्याला सांगण्यात आले होते. तिचे पतीने वि.प.क्रं 2 बॅंके मध्ये खालील विमा योजनेचे फॉर्म भरुन दिले होते-
अक्रं | विमा योजनेचे नाव | विम्याचा हप्ता रुपयामध्ये | विमा राशी लक्ष मध्ये | विमा योजनेचा फॉर्म बॅंकेत जमा केल्याचा दिनांक | तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यू दिनांक | वि.प.क्रं 2 बॅंकेनी विम्याची रक्कम खात्यातून कपात केल्याचा दिनांक | विमा दावा रद्द केल्याचा दिनांक |
01 | व्यक्तीगत सुरक्षा बीमा योजना विमा पॉलिसीचा क्रमांक-143820000000 | 100/- | 2.00 लक्ष | 17.07.2015 | 29.08.2015 | 11.09.2015 | 27.06.2016 |
02 | प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजना विमा पॉलिसीचा क्रमांक-760010000135 | 330/- | 2.00 लक्ष | 17.07.2015 | 29.08.2015 | 19.11.2015 | 30.12.2015 |
उपरोक्त नमुद दोन्ही विमा पॉलिसी मध्ये तक्रारकर्तीचे पतीने तिचे नाव नामनिर्देशित केले होते.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पती दिनांक-29.08.2015 रोजी गोंदीया ते तुमसर रेल्वेने प्रवास करीत असताना तुमसर रेल्वे स्टेशनवर अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला होता. तिचे पतीचे मृत्यू नंतर तिने विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या शाखेत जाऊन आवश्यक दस्तऐवजांसह दोन्ही विमा पॉलिसीचे विमा दावे सादर केलेत. विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने दोन्ही विमा पॉलिसीची हप्त्याची रक्कम उपरोक्त नमुद विवरणा प्रमाणे तिचे पतीचे मृत्यू दिनांका नंतर अनुक्रमे दिनांक-11.09.2015 आणि दिनांक-19.11.2015 रोजी जमा झालेली असल्याने दोन्ही विमा दावे रद्द केल्याचे उपरोक्त नमुद विवरणा प्रमाणे तिला कळविले. तिचे असे म्हणणे आहे की, वस्तुतः तिचे पतीने विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या शाखेत दिनांक-17.07.2015 रोजीच दोन्ही विमा पॉलिसीचे फॉर्म जमा केले होते त्यावेळी तिचे पतीचे बॅंक खात्यात दोन्ही विमा हप्त्यांची रक्कम कपात होईल एवढी पुरेशी रक्कम जमा होती. तिने पुढे असेही नमुद केले की, तिने जेंव्हा विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेत चौकशी केली त्यानंतर तिच्या पतीची विमा हप्त्याची रक्कम वि.प.क्रं 2 बॅंकेनी त्याचे बॅंकेच्या खात्यातून कपात केली होती. तिने असे नमुद केले की, तिचे पतीने दिनांक-17.07.2015 रोजी विमा पॉलिसीचे फॉर्म जमा करुनही त्याचे मृत्यूचे दिनांक-29.08.2015 पर्यंत सर्व कागदपत्र व आवश्यक विम्याची रक्कम त्याचे बॅंक खात्यात जमा असूनही विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी विम्याचे रकमेची कपात केली नाही तसेच विम्याचे दस्तऐवज वि.प.क्र-1 विमा कंपनीकडे विहित मुदतीत जमा केले नाहीत. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी दोषपूर्ण सेवा दिली असल्याने तिचे पतीचे मृत्यू नंतर तिला नामनिर्देशित व्यक्ती म्हणून दोन्ही विमा पॉलिसीची रक्कम मिळाली नाही व विमा दावे फेटाळल्या गेलेत, त्यामुळे तिला आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे.म्हणून शेवटी तिने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे विमा कंपनी आणि बॅंक यांचे विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
तिचे पतीचे मृत्यू नंतर उपरोक्त नमुद विवरणा प्रमाणे दोन्ही विमा पॉलिसीपोटी एकूण रक्कम रुपये-4,00,000/- तसेच पॉलिसीवरील देय लाभांसह येणारी रक्कम दिनांक-29.08.2015 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्के व्याजदाराने तिला विरुध्दपक्षां कडून देण्याचे आदेशित व्हावे. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी तिला दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-30,000 आणि तक्रारीचा खर्च रुपये-15,000/- वि.प.क्रं 1 व क्रं 2 यांचे कडून तिला देण्याचे आदेशित व्हावे. या शिवाय योग्य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) एस.बी.आय.लाईफ इन्शुरन्स विमा कंपनी तर्फे ग्राहक मंचा समोर लेखी उत्तर पान क्रं -29 ते 36 वर दाखल केले. त्यांनी उत्तरामध्ये सध्याचा त्यांचा पत्ता हा सिवूडस ग्रॅन्ड सेंट्रल एफ विंग, 8 वा माळा, प्लॉट क्रं-आर-1, सेक्टर-40, सिवूडस, नेरुल नवि मुंबई-400706 असा असल्याचे व या पत्त्यावर पत्रव्यवहार करण्याची विनंती केली. त्यांनी संक्षीप्त असा बचाव घेतला की, तक्रारकर्तीचे पती श्री लक्ष्मीकांत येले आणि त्यांचे मध्ये कोणताही विमा करार झालेला नसल्याने ग्राहक आणि सेवा देणारे असे संबध निर्माण होत नाही. तक्रारकर्तीचे पती श्री लक्ष्मीकांत येले याचे बचत खाते क्रं-33670788468 मधून त्यांना कोणतीही विमा हप्त्याची रक्कम प्राप्त झालेले नाही. तिचा पती श्री लक्ष्मीकांत येले याचे मृत्यूचे नंतर त्याचे बॅंक खात्यातून विमा रकमेची कपात झालेली आहे. जो पर्यंत विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीला मिळत नाही तो पर्यंत विमा कंपनीव्दारे विम्याची जोखीम स्विकारल्या जात नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक हे वेगवेगळे आहेत. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या चुकीमुळे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची कोणतीही जबाबदारी येत नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला तक्रारकर्तीचा पती श्री लक्ष्मीकांत येले याचे संबधात विमा हप्त्याची रक्कम विहित मुदतीत प्राप्त झालेली नाही. विमा पॉलिसी मंजूर झाल्या नंतर त्याची प्रत विमाधारकास देण्यात येते परंतु तक्रारकर्तीचे पतीची विमा पॉलिसीच निघालेली नाही. प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजना पॉलिसी क्रमांक-760010000135 संबधात विमा हप्त्याची रक्कम रुपये-330/- विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके कडून विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिनांक-19.11.2015 रोजी मिळाली अर्थात ती श्री लक्ष्मीकांत येले याचे मृत्यू नंतर मिळाली म्हणजेच त्याचे मृत्यू पूर्वी कोणताही विमा करार श्री लक्ष्मीकांत येले आणि वि.प.क्रं 1 विमा कंपनी मध्ये अस्तित्वात नव्हता. पुढे विशेषत्वाने असे नमुद केले की, व्यक्तीगत सुरक्षा बीमा योजना विमा पॉलिसी क्रमांक-143820000000 शी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा कोणताही संबध येत नाही कारण सदर पॉलिसी ही एस.बी.आय.जनरल इन्शुरन्स कंपनीची आहे आणि विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी ही एस.बी.आय.लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. व्यक्तीचे मृत्यू नंतर विमा करार असित्वात येऊ शकत नाही. सबब विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे विरुध्दची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती केली.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा कोका तालुका जिल्हा भंडारा यांचे तर्फे पान क्रं 93 व 94 वर ग्राहक मंचात लेखी उत्तर दाखल करण्यात आले. त्यांनी तक्रारीतील संपूर्ण विपरीत मजकूर नामंजूर केला. आपले विशेष कथना मध्ये नमुद केले की, विम्याची जोखीम ही ग्रुप इन्शुरन्स स्कीम मध्ये आपोआप स्विकारल्या जात नाही. एखादया ग्राहकास वैयक्तिक विमा काढावयाचा असल्यास त्याने कन्सेन्ट कम डिक्लरेशन फॉर्म सोबत विहित विमा हप्त्याची रक्कम जमा करणे आवश्यक आहे. तक्रारकर्तीने तिचे पतीचे मृत्यू नंतर प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना विमा पॉलिसी क्रं-760010000135 आणि व्यक्तीगत सुरक्षा बीमा योजना विमा पॉलिसी क्रमांक-143820000000 अन्वये विमा दावे सादर केले होते परंतु विशेषत्वाने असे नमुद करण्यात येते की, व्यक्तीगत सुरक्षा बीमा योजना विमा पॉलिसी क्रमांक-143820000000 ही एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनीची आहे आणि त्यामुळे या तक्रारीमध्ये एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी यांना प्रतिपक्ष करणे आवश्यक होते परंतु तसे केलेले नसल्याने तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्तीचे पती श्री लक्ष्मीकांत येले यांचे हयातीत विमा करार झालेला नसल्याने तक्रारकर्ती आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेमध्ये ग्राहक आणि सेवा देणारे असे संबध निर्माण होत नाही. तक्रारकर्तीचे पती श्री लक्ष्मीकांत येले यांचे बॅंक मध्ये बचत खाते क्रं-33670788468 होते आणि त्या खात्या मधून विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेला विमा हप्त्याची रक्कम श्री लक्ष्मीकांत येले हयातीत असताना मिळालेली नाही. प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना मास्टर विमा पॉलिसी क्रं-760010000135 मध्ये तक्रारकर्तीचा पती हा सदस्य नव्हता. तक्रारकर्तीने तिचे पतीचे मृत्यूची सुचना वि.प.क्रं 2 बॅंकेला दिली नाही आणि तिने सरळसरळ दिनांक-11.09.2015 रोजी विमा प्रस्ताव सादर केला. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेला तिचे पतीचे मृत्यूची कल्पना नव्हती तसेच तक्रारकर्तीने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा प्रस्ताव सादर केल्यामुळे दिनांक-19.11.2015 रोजी बॅंकेने विमा हप्त्याची रक्कम कपात केली होती. तक्रारकर्तीने विमा दावा प्रस्ताव तिचे पतीचे मृत्यूचे नंतर विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेत सादर केला आणि तिचे पतीचे मृत्यूची बाब बॅंके पासून लपवून ठेवली. सबब तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेव्दारे करण्यात आली.
05. तक्रारकर्तीने पान क्रं 12 वरील दस्तऐवज यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने दारिद्रय रेषेखालील दाखला, विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंके मधील तक्रारकर्तीचे पती व तिचे संयुक्त पासबुक, खातेउतारा प्रत, माहिती अधिकाराखालील दस्तऐवज, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने संबधात दिनांक-17.07.2015 रोजीचा वि.प.बॅंकेकडून प्राप्त कन्सेन्ट कम डिक्लरेशन फॉर्म, तिचे पतीचे दिनांक-29 ऑगस्ट, 2015 रोजीचे ग्राम पंचायत देव्हाडी, तालुका जिल्हा भंडारा यांनी दिलेले मृत्यूचे प्रमाणपत्र, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा पॉलिसी क्रं-76001000135 संबधात एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स यांचे कडून विमा दावा रद्द केल्या बाबत प्राप्त झालेले दिनांक-30.12.2015 रोजीचे पत्राची प्रत आणि व्यक्तीगत सुरक्षा बीमा योजना विमा पॉलिसीचा क्रमांक-143820000000 अंतर्गत एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी यांचे कडून विमा दावा रद्द केल्या बाबत प्राप्त झालेले दिनांक-27.06.2016 रोजीचे पत्राची प्रत, उपविभागीय दंडाधिकारी, तुमसर यांचा तक्रारकर्तीचे पतीचे मृत्यू बाबतचा आदेश दिनांक-20.06.2016, रेल्वे पोलीस स्टेशन गोंदीया यांची तक्रारकर्तीचे मृतक पती संबधात दिनांक-29 ऑगस्ट, 2015 रोजीची मर्ग खबरी अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तसेच तक्रारकर्तीने पान क्रं 80 ते 82 वर स्वतःचे शपथपत्र दाखल केले आणि पान क्रं 99 व 100 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
06. विरुध्दपक्ष क्रं-1) एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स कंपनीने लेखी उत्तर पान क्रं -29 ते 36 वर ग्राहक मंचात दाखल केले. तसेच पान क्रं 37 वरील दस्तऐवज यादी नुसार एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स कंपनीचे प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचे ग्रुप पॉलिसीचे दस्तऐवज, विमा दावा दस्तऐवज, पान क्रं 74 वर तक्रारकर्तीचे पतीचे बॅंक स्टेटमेंट अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. वि.प. क्रं 1 एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स कंपनी तर्फे पान क्रं.83 ते 91 वर शपथेवरील पुरावा दाखल केला. तसेच पान क्रं 108 ते 113 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच मा.वरीष्ठ न्यायालयाच्या निकालपत्रांच्या प्रती दाखल केल्यात.
07. विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंके तर्फे पान क्रं 93 व 94 वर लेखी उत्तर दाखल केले. तसेच वैयक्तिक अपघात विमा योजने संबधात त.क.चे पतीचे नावाची विमा प्रस्ताव फॉर्मची प्रत पान क्रं 96 वर दाखल केली. तसेच पान क्रं 102 ते 104 वर वि.प.क्रं 2 बॅंके तर्फे शपथे वरील पुरावा दाखल करण्यात आला तसेच पान क्रं 114 व 115 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेचे सेवानिवृत्त अधिकारी श्री आनंदसिंह माधवसिंह चंदेल यांचे शपथपत्र पान क्रं 130 व 131 वर दाखल केले.
08. तक्रारकर्तीची तक्रार, शपथे वरील पुरावा, लेखी युक्तीवाद व दाखल दस्तऐवज तसेच वि.प. क्रं 1 स्टेट बॅंक लाईफ इन्शुरन्स कंपनीचे लेखी उत्तर, शपथेवरील पुरावा, लेखी युक्तीवाद व दाखल दस्तऐवज त्याच बरोबर विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंकेचे लेखी उत्तर, शपथेवरील पुरावा, लेखी युक्तीवाद व दाखल दस्तऐवज इत्यादीचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले त्याच बरोबर तक्रारकर्तीचे वकील आणि दोन्ही विरुध्दपक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद एैकला असता ग्राहक न्यायमंचा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | त.क. ही दोन्ही विरुध्दपक्षांची ग्राहक होतो काय? | -होय- |
02 | विरुध्दपक्ष्ा क्रं 1 एस.बी.आय.लाईफ इन्शुरन्स कंपनीने त.क.ला दोषपूर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते काय? | -नाही- |
03 | विरुध्दपक्ष क्रं-2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा कोका जंगल, तालुका जिल्हा भंडारा यांनी दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब तक्रारकर्तीने पुराव्यानिशी सिध्द केली काय? | -होय- |
04 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
::निष्कर्ष::
मुद्दा क्रं 1 ते 3 बाबत-
07. प्रस्तुत तक्रारीतील दस्तऐवजाचे अवलोकन केले असता तक्रारकर्ती व तिचे कुटूंब दारीद्रय रेषेखालील होते ही बाब पान क्र 14 वरील दाखल दाखल्या वरुन सिध्द होते. विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया यांचे व्दारा तक्रारकर्तीचे मृतक पती आणि तक्रारकर्ती यांचे पान क्रं 16 वरील दाखल संयुक्त खाते क्रं-33670788468 उतारा प्रत यानुसार सदर खात्यातून दिनांक-11.09.2015 रोजी वैयक्तिक अपघात विमा योजना विमा हप्ता रक्कम रुपये-100/- आणि दिनांक-19.11.2015 रोजी प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना विमा हप्ता रक्कम रुपये-330/- कपात केल्याची बाब खाते उतारा नोंदीवरुन सिध्द होते, परिणामी तक्रारकर्ती ही विमा पॉलिसी मध्ये नामनिर्देशित व्यक्ती असल्याने तिचे पतीचे मृत्यूपरांत ती लाभार्थी म्हणून दोन्ही विरुध्दपक्षांची ग्राहक आहे आणि त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
08. सदर प्रकरणातील पान क्रं 23 वरील रेल्वे पोलीस स्टेशन गोंदीया यांचे मर्ग खबरी नुसार दिनांक-29 ऑगस्ट, 2015 रोजी तक्रारकर्तीचे पती याचा रेल्वे अपघाता मध्ये मृत्यू झाल्याचे दिसून येते. विरुध्दपक्ष क्रं 1 एस.बी.आय.लाईफ इन्शुरन्स कंपनी तर्फे प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीचे पतीने तो हयातीत असताना दिनांक-19.07.2015 रोजी मास्टर पॉलिसी क्रं-76001000135 मध्ये त्याचे बॅंक खात्यातून विमा हप्त्याची रक्कम कपात करण्या बाबत स्वतःचे सहिने दिलेले कन्सेन्ट कम डिक्लरेशन फॉर्मची प्रत पान क्रं 18 वर तक्रारकर्तीने दाखल केलेली आहे. याचाच अर्थ असा होतो की, तक्रारकर्तीचे पतीने त्याचे वि.प.क्रं-2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखेतील बॅंकेच्या खात्यातून सदर विमा हप्त्याची रक्कम रुपये-330/- कपात करण्याचे अधिकार विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या शाखेला दिलेले होते.
09. तक्रारकर्तीने पान क्रं 20 वर विरुध्दपक्ष क्रं 1 एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स कंपनी यांचे विमा दावा रद्द केल्या बाबतचे दिनांक-30.12.2015 रोजीचे पत्राची प्रत दाखल केली. ज्यामध्ये तक्रारकर्तीचे मृतक पती यांची विमा पॉलिसी क्रं-76001000135 संबधात तिचे पतीचा मृत्यू हा दिनांक-29 ऑगस्ट, 2015 रोजी झालेला आहे आणि विमा पॉलिसी ही दिनांक-19.11.2015 रोजी पासून सुरु झालेली असल्याने विमा दावा रद्द केल्याचे नमुद आहे.
10. तर तक्रारकर्तीने पान क्रं 21 वर एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी ज्यांना (तक्रारकर्तीने या प्रकरणात एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी यांना प्रतिपक्ष केलेले नाही) यांचे विमा दावा रद्द केल्या बाबतचे दिनांक-27 जुन, 2016 रोजीचे पत्राची प्रत दाखल केली. यावरुन वैयक्तिक अपघात बीमा योजना क्रं-143820000000 ही पॉलिसी एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी यांची असून त्यामध्ये सुध्दा तिचे पतीचा मृत्यू हा दिनांक-29 ऑगस्ट, 2015 रोजी झालेला आहे आणि विमा पॉलिसी ही दिनांक-11.09.2015 रोजी पासून सुरु झालेली असल्याने विमा दावा रद्द केल्याचे नमुद आहे.
11. यामध्ये विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंके तर्फे लेखी उत्तरात असाही आक्षेप घेण्यात आला आहे की, तक्रारकर्तीने तिचे पतीचे नावे असलेली वैयक्तिक अपघात विमा योजना क्रं-143820000000 ही पॉलिसी एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनीची असून सदर विमा कंपनीस प्रतिपक्ष केलेले नसल्याने तक्रार खारीज करण्यात यावी. ग्राहक मंचाव्दारे स्पष्टपणे नमुद करणे आवश्यक आहे की, हा एक तांत्रीक मुद्दा असून त्यामुळे सत्य वस्तुस्थिती आणि दाखल पुरावा यावरुन तक्रारकर्तीची तक्रार खारीज करणे कायदेशीरदृष्टया योग्य ठरणार नाही तर प्रकरणातील सत्य वस्तुस्थिती वरुन योग्य तो आदेश पारीत करणे योग्य होईल.
12. विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा कोका जंगल, तालुका जिल्हा भंडारा यांनी दाखल केलेले उत्तर, शपथपत्र, युक्तीवाद यामध्ये तक्रारकर्तीने तिचे पतीचे मृत्यू नंतर खोटेपणाने विमा काढला हा घेतलेला बचाव योग्य त्या पुराव्या अभावी अत्यंत तोकडया स्वरुपाचा आधारहिन आणि आपली जबाबदारी झटकण्यासाठी घेतलेला आहे. याचे कारण असे आहे की पान क्रं 18 वर तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 1 एस.बी.आय.लाईफ इन्शुरन्स कंपनी तर्फे प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीचे पती यांनी दिनांक-19.07.2015 रोजी मास्टर पॉलिसी क्रं-76001000135 अन्वये त्याचे बॅंक खात्यातून विमा हप्त्याची रक्कम कपात करण्या बाबत स्वतःचे सहिने दिलेले कन्सेन्ट कम डिक्लरेशन फॉर्मची प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे याचाच अर्थ असा होतो की, तक्रारकर्तीचे पतीने त्याचे वि.प.क्रं-2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखेतील बॅंकेच्या खात्यातून विमा हप्त्याची रक्कम रुपये-330/- कपात करण्याचे अधिकार वि.प.क्रं 2 बॅंकेला दिलेले होते ही बाब सिध्द होते.
13. दुसरी अत्यंत महत्वाची बाब अशी आहे की, विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया यांचे व्दारा तक्रारकर्तीचे मृतक पती आणि तक्रारकर्ती यांचे पान क्रं 16 वरील दाखल संयुक्त खाते क्रं-33670788468 उतारा अनुसार सदर खात्यातून दिनांक-11.09.2015 रोजी वैयक्तिक अपघात विमा योजनेचा विमा हप्ता रक्कम रुपये-100/- आणि दिनांक-19.11.2015 रोजी प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा विमा हप्ता रक्कम रुपये-330/- कपात केल्याची बाब खाते उतारा नोंदीवरुन सिध्द होते. तक्रारकर्तीचे मृतक पती याने तो हयातीत असताना त्याचे बॅंक खात्यातून विमा हप्त्यांची रक्कम कपात करण्यासाठी कन्सेट कम डिक्लरेशन फॉर्म दिनांक-17.07.2015 रोजी भरुन दिलेला होता आणि त्यानंतर त्याचा दिनांक-29 ऑगस्ट, 2015 रोजी मृत्यू झालेला आहे, दरम्यानचे काळात तक्रारकर्तीचे मृतक पतीचे बॅंक खात्यातून विमा हप्त्यांची रक्कम अनुक्रमे रुपये-330/- आणि रुपये-100/- कपात करण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखेची होती परंतु त्यांनी तसे केले नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया यांचे व्दारा तक्रारकर्तीचे मृतक पती आणि तक्रारकर्ती यांचे पान क्रं 16 वरील दाखल संयुक्त खाते क्रं-33670788468 उतारा अनुसार सदर खात्यातून दिनांक-11.09.2015 रोजी वैयक्तिक अपघात विमा योजना विमा हप्ता रक्कम रुपये-100/- आणि दिनांक-19.11.2015 रोजी प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना विमा हप्ता रक्कम रुपये-330/- कपात केल्याची बाब खाते उतारा नोंदीवरुन सिध्द होते, यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्यू नंतर विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा कोका, तालुका जिल्हा भंडारा यांनी विमा हप्त्याच्या रकमेची कपात केलेली आहे. दिनांक-17.07.2015 रोजी तक्रारकर्तीचे मृतक पतीने त्याचे वि.प.क्रं 2 बॅंकेच्या खात्यातून विमा हप्त्याची रक्कम कपात करण्या बाबत कन्सेन्ट कम डिक्लरेशन फॉर्म भरुन दिलेला असल्यानेच वि.प.क्रं 2 बॅंकेनी त्याचे मृत्यू नंतर मागाहून बॅंक खात्यातून दोन्ही विमा पॉलिसीच्या हप्त्यांची रक्कम अनुक्रमे रुपये-300/- आणि रुपये-100/- कपात केली असल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द होते.
14. उपरोक्त नमुद सखोल विवेचनावरुन तसेच उपलब्ध दसतऐवजी पुराव्यां वरुन विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा कोका, तालुका जिल्हा भंडारा यांनीच वेळेच्या आत विरुध्दपक्ष क्रं 1 स्टेट बॅंक ऑफ इंडीया लाईफ इन्शुरन्स कंपनी यांचेकडे प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा रुपये-330/- चा हप्ता जमा केलेला नाही. तसेच वैयक्तिक अपघात विमा योजनेचा रुपये-100/-चा हप्ता स्टेट बॅंक ऑफ इंडीया जनरल लाईफ इन्शुरन्स (ज्यांना या प्रकरणात तक्रारकर्तीने प्रतिपक्ष केलेले नाही) यांचेकडे वेळोच्या आत जमा केलेला नाही आणि तक्रारकर्तीचे पतीचे मृत्यू नंतर विमा हप्त्यांची रक्कम अनुक्रमे रुपये-330/- आणि रुपये-100/- जमा केलेली असल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 एस.बी.आय.लाईफ इन्शुरन्स कंपनी तसेच एस.बी.आय.जनरल इन्शुरन्स कंपनी यांनी तक्रारकर्तीचे विमा दावे रद्द केलेले आहेत यामध्ये दोन्ही विमा कंपन्यांची कोणतीही दोषपूर्ण सेवा दिसून येत नाही त्यामुळे त्यांचे विरुध्द कोणताही आदेश पारीत करता येणार नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया कोका जंगल, तालुका जिल्हा भंडारा यांनीच तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द होते, त्यामुळे दोन्ही विमा दाव्यांची देय रक्कम व्याजासह तक्रारकर्तीला वि.प.क्रं 2 स्टेट बॅंकेच्या शाखे कडून नुकसान भरपाईचे स्वरुपात अदा करण्याचे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल. त्याच बरोबर वि.प.क्रं 2 स्टेट बॅंकेच्या शाखेने दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- वि.प.क्रं 2 स्टेट बॅंकेच्या शाखे कडून तक्रारकर्तीला अदा करण्याचे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर नकारार्थी नोंदवित आहोत आणि आम्ही मुद्दा क्रं 3 चे उत्तर होकारार्थी नोंदवून आम्ही मुद्दा क्रं 3 अनुसार खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
:: अंतिम आदेश ::
01) तक्रारकर्तीची विरुध्दपक्ष क्रं-2) स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा कोका जंगल, तालुका जिल्हा भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक यांचे विरुध्दची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
02) विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा कोका जंगल, तालुका जिल्हा भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीचे मृतक पती श्री लक्ष्मीकांत शंभुलाल येले याचे व्यक्तीगत सुरक्षा बीमा योजना विमा पॉलिसी क्रमांक-143820000000 अन्वये देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) विमा दावा नाकारल्याचा दिनांक-27 जून, 2016 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याजासह नामनिर्देशित व्यक्ती या नात्याने तक्रारकर्तीला नुकसान भरपाईचे स्वरुपात अदा करावी.
03) विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा कोका जंगल, तालुका जिल्हा भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक यांना असेही आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीचे मृतक पती श्री लक्ष्मीकांत शंभुलाल येले चे प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजना विमा पॉलिसी क्रमांक-760010000135 अन्वये देय विमा रक्कम रुपये-2,00,000/-(अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) विमा दावा नाकारल्याचा दिनांक-30.12.2015 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याजासह नामनिर्देशित व्यक्ती या नात्याने तक्रारकर्तीला भरपाईचे स्वरुपात अदा करावी.
04) विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा कोका जंगल, तालुका जिल्हा भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक यांना असेही आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अशी नुकसान भरपाईची रक्कम तक्रारकर्तीला अदा करावी.
05) विरुध्दपक्ष क्रं-1) एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याचे सिध्द होत असल्याने त्यांचे विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
06) एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी (ज्यांना या प्रकरणात तक्रारकर्तीने प्रतिपक्ष केलेले नाही) यांनी सुध्दा तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्याचे सिध्द होत असल्याने त्यांचे विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
07) सदर अंतिम आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा कोका जंगल, तालुका जिल्हा भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक यांनी सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
08) उभय पक्षांना निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी.
09) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.