मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवालाकडून रक्कम रु.10,00,000/- मिळावेत, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.5,00,000/- व अर्जाचा खर्च रु.50,000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.132 लगत इंग्रजी भाषेमध्ये लेखी म्हणणे, पान क्र.188 लगत मराठी भाषेमध्ये लेखी म्हणणे व पान क्र.173 लगत इंग्रजी भाषेमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दें विचारात घेतले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे
काय?-होय.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम वसूल होवून
मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी
रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द
अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी अर्जदार यांचे वतीने अँड.वैशाली वि.गुप्ते यांनी युक्तीवाद केलेला आहे. तसेच सामनेवाला यांनी पान क्र.209 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून विमापॉलिसी घेतलेली आहे. ही बाब सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.15 लगत स्टेटमेंट ऑफ अलोकेशन तसेच पान क्र.16 लगत पॉलिसी डिटेल्सची झेरॉक्स प्रत हजर केलेली आहे. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व पान क्र.15 व पान क्र.16 लगतची कागदपत्रे यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “मयत श्री. संजय बारे यांचा रक्कम एक कोटी दहा लाख मात्र या रकमेची मागणीचा क्लेम त्यांचे मिळकतीबाबतची व उत्पन्नाचे साधनाबाबत त्यांनी खोटी माहिती दिल्याचे कारणावरुन नाकारलेला आहे. तक्रारदाराने दृष्ट हेतुने दुस-या पॉलिसीबाबतची माहिती या मंचापासून लपवून ठेवून फक्त रुपये दहा लाख एवढीच मागणी केलेली आहे. एक कोटी दहा लाखाची मागणी केल्यास मंचाचे आर्थीक अधिकार क्षेत्राचे कारणावरुन या मंचासमोर तक्रार अर्ज दाखल करता येणार नाही. विमा करार हा श्रध्देचा, अटमोस्ट गुडफेथचा करार आहे. विम्याचा प्रस्ताव सादर करतांना उत्पन्न व इतर विमापॉलिसीज, उत्पन्नाची साधने याची माहीती उघड करणे बंधनकारक असते. मयत संजय बारे यांनी त्यांचे प्रस्ताव अर्जात ते शेतकरी असून त्याचे वार्षीक उत्पन्न सोळालाख रुपये इतकी आहे व त्याची मिळकत सदुसष्ट लाख रुपये इतकी आहे असे कळविले आहे. परंतु प्रत्यक्ष तपासाअती मयत विमाधारकाकडे वर उल्लेख केलेल्या मिळकती व उत्पन्नाचे साधने नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अर्जदार यांनी चुकीचे माहिती दिल्यामुळे विमापॉलिसीचा अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. अर्ज नामंजूर करण्यात यावा असे म्हटलेले आहे.
विमापॉलिसी घेतांना विमादाराने प्रपोजल फॉर्मसोबत त्याचे स्थावर व जंगम मिळकतीची माहिती देणे बंधनकारक आहे, याचा कोणताही उल्लेख सामनेवाला यांचे पान क्र.147 चे विमापॉलिसीचे अटी व शर्तीमध्ये दिसून येत नाही. तसेच अर्जदार यांनी विमापॉलिसी घेतांना त्यांचे उत्पन्नाबाबत जी माहिती दिलेली आहे ती माहिती खोटी व चुकीची आहे हे स्पष्टपणे शाबीत करण्याकरीता सामनेवाला यांनी कोणताही योग्य तो पुरावा, जमीनीच्या किंमतीबाबतची दर पत्रके दाखल केलेली नाहीत. या उलट सामनेवाला यांनीच पान क्र.147 ते पान क्र.167 लगत अर्जदार यांचे विमापॉलिसीबाबत जी कागदपत्रे दाखल केलेली आहेत, त्या कागदपत्रांचा व अर्जदार यांनी पान क्र.8 ते पान क्र.115 लगत विमापॉलिसीबाबत जी कागदपत्रे, प्रपोजल फॉर्म, मिळकतीची माहितीपत्रके सादर केलेली आहेत, या सर्व कागदपत्रांचा एकत्रीतरित्या विचार करता अर्जदार यांनी त्यांचे मिळकतीबाबत योग्य तीच माहिती सामनेवाला यांना सादर केलेली होती व आहे असे स्पष्ट दिसून येत आहे.
वास्तविक विमापॉलिसी मंजूर करणे या गोष्टीचा व अर्जदार यांचे स्थावर व जंगम मालमत्तेच्या व मिळकतीबाबतचा अर्थाअर्थी कोणताही संबंध राहात नाही. विमापॉलिसी ही जोखीम म्हणून स्विकारलेली असते त्यामुळे विमेदाराच्या नावावर कोणकोणती मालमत्ता आहे, कोणकोणती मिळकत आहे याचा व विमापॉलिसी मंजूर करण्याचा कोणताही संबध दिसून येत नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अयोग्य व चुकीचे कारण देवून अर्जदार यांचा विमाक्लेम नाकारलेला आहे व त्यायोगे सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
पान क्र.15 चे स्टेटमेंट ऑफ युनिट अलोकेशन याचा विचार करता अमाऊंट ऑफ लाईफ कव्हर रुपये दहा लाख दिसून येत आहे. पान क्र.15 चे कागदपत्राचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांची रक्कम रुपये दहा लाखाची जोखीम स्विकारलेली होती हे स्पष्ट होत आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम रुपये दहा लाख इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमची रक्कम वसूल होवून मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचामध्ये दाद मागावी लागली आहे. वरील सर्व कारणामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यातः
अ) विमा क्लेमपोटी रक्कम रु.10,00,000/-(रुपये दहा लाख) द्यावेत.
ब) मानसिक त्रासापोटी रु.15,000/- द्यावेत.
क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत