जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांक :16/04/2010 आदेश पारित दिनांक :19/10/2010 तक्रार क्रमांक :- 245/2010 तक्रारकर्ता :– श्री. सुनील बाबुराव नायडू, वय अंदाजेः 38 वर्षे, व्यवसायः नोकरी, राह. प्लॉट नं.129, ‘जानकी निवास’, न्यू जागृती कॉलनी, काटोल रोड, नागपूर-440013. -// वि रु ध्द //- गैरअर्जदार :– 1. एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय-स्टेट बँक भवन, मादाम कामा रोड, नरिमन पॉईंट, मुंबई-400 021. 2. एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, कार्पोरेट कार्यालय-तळमजला व दुसरा मजला, टर्नर मॉरिसन बिल्डींग, जी.एन. वैद्य मार्ग, फोर्ट, मुंबई-400 023. 3. एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर, कपास भवन, प्लॉट नं.3-ए, सेक्टर नं.10, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400 021. 4. एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, शाखा कार्यालय-ब्लॉक् नं.34, तिसरा मजला, अचरज टॉवर-2, कोराडी रोड, छावणी, नागपूर-440 001. तक्रारकर्त्याचे वकील :– श्री. पी.जी. मेवार. गैरअर्जदारांचे वकील :– श्री. एस.डी. खटी. गणपूर्ती :– 1. श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष 2. श्री. मिलींद केदार - सदस्य (मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 19/10/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांचे विरुध्द मंचात दिनांक 16.04.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याची सदर तक्रार गैरअर्जदारांनी त्याला दिलेल्या सेवेतील त्रुटी संबंधाने असुन त्याने तक्रारीत नमुद केले आहे की, गैरअर्जदार हे विम्याचा व्यवसाय करणारी कंपनी आहे. गैरअर्जदारांचे प्रतिनिधी श्री. संजय रामटेके यांनी तक्रारकर्त्याची भेट घेतली व त्याला SBI Life - Unit Plus II नावाच्या पॉलिसीबाबत सांगितले. त्यानुसार तक्रारकर्त्याने रु.12,600/- भरुन SBI Life - Unit Plus IIही विमा पॉलिसी घेतली, त्याकरता तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.4 यांना दि.01.12.2009 रोजी HDFC बँकेचा धनादेश क्र.260412 रु.12,600/- चा दिला होता याबाबतची पोचही त्यांनी दिल्याचे तक्रारीत नमुद आहे. 3. गैरअर्जदारांनी सुचविलेल्या रुग्णालयात FMR & TMT ही वैद्यकीय तपासणी करण्या संदर्भात तक्रारकर्त्याला सुचविले, त्या अंतर्गत तक्रारकर्त्याने सदर तपासणी केली. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.3 यांचे दि.16.12.2009 चे पत्र तक्रारकर्त्याला दि.28.12.2009 रोजी मिळाले. त्यामध्ये तक्रारकर्त्यास काही बाबींची पुर्तता करण्याकरता बोलावण्यांत आले. तसेच प्रस्ताव अर्जामध्ये सुनील बाबुराव नायडू व FMR & TMTमध्ये सुनील जागृती नायडू या नावांमध्ये तफावत असल्याचे गैरअर्जदार क्र.3 ने तक्रारकर्त्याकडे स्पष्टीकरण मागितले. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, कोणत्याही अटी व शर्ती त्याला न सांगता तक्रारकर्त्याला Accident Benefit Rider मंजूर करण्यांस गैरअर्जदार हे असमर्थ असल्याबद्दल सदर पत्रामध्ये नमुद होते. त्यामुळे तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.4 शी संपर्क साधला आणि अपघात लाभा शिवाय पॉलिसी स्विकारण्याकरीता संमती दिली. त्यानंतर गैरअजदार क्र.4 यांनी तक्रारकर्त्यास त्वरीत पॉलिसी निर्गमीत करण्यांत येईल असे कळविले. त्यानंतर दि.19.01.2010 रोजी गैरअर्जदारानी पत्र पाठवुन पॉलिसी प्रस्तावाकरीता आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता विहीत कालमर्यादेच्या आंत न करण्यांत आल्यामुळे प्रस्ताव पुढील प्रक्रियेकरीता घेऊ शकत नसल्याबद्दल आणि सदर प्रस्तावा अंतर्गत कोणतीही जोखीम स्विकारण्यांस गैरअर्जदार तयार नसल्यामुळे प्रस्ताव नाकारल्याचे तक्रारकर्त्यास कळविण्यांत आले. सदर पत्रामध्ये गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला इतर कुठल्याही पॉलिसी/प्लॅनकरीता आवेदन करण्याकरीता कळविले. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदारांचे दि.16.12.2009 रोजीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर त्या बाबींची पुर्तता केली असतांना सुध्दा गैरअर्जदारांनी त्याचा प्रस्ताव बेकायदेशिरपणे नाकारला. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.06.02.2010 रोजी गैरअर्जदारांना वकीला मार्फत तसेच ई-मेलव्दारे नोटीस पाठविली. त्यानंतर गैरअर्जदारांनी तकारकर्त्यास उत्तर न देता दि.11.02.2010 रोजी पत्राव्दारे पॉलिसी रद्द केल्याचे सुचविले व एस.बी.आय. मुख्य शाखा, मुंबई यांचा धनादेश पाठविला, तो तक्रारकर्त्याने अजून पर्यंत वटवलेला नसल्याचे नमुद केले आहे. 4. तक्रारकर्त्याने दिलेल्या नोटीसला गैरअर्जदारांनी दि.25.02.2010 रोजी पत्र पाठविले व त्यामधे तक्रारकर्त्याकडून विहीत कालावधीमध्ये आवश्यक बाबी प्राप्त न झाल्यामुळे प्रस्ताव स्विकारण्यांत आला नाही आणि ज्या प्लॅनकरीता प्रस्ताव सादर करण्यांत आला होता तो IRDA च्या मार्गदर्शक तत्वानुसार बंद करण्यांत आला होता. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे व मागणी केली आहे की, SBI Life - Unit Plus IIच्या प्रस्तावार पुर्नविचार करावा व सदर पॉलिसी निर्गमीत करावी, तसेच नुकसान भरपाईचा व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केलेली आहे. 5. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांना नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपले लेखी उत्तर खालिल प्रमाणे दाखल केलेले आहे. 6. गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी आपल्या उत्तरात एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ही नोंदणीकृत विमा कंपनी असल्याचे मान्य केले आहे. तसेच आपल्या प्रारंभिक आक्षेपात नमुद केले आहे की, विमा कंपनी ही प्रत्येक व्यक्तिच्या परिस्थितीचा संदर्भ लक्षात घेऊन व त्याचे काटेकोरपणे वैद्यकीय परिक्षण करुन व जोपर्यंत अटी पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत विमा संरक्षण मंजूर केल्या जात नाही. गैरअर्जदारांनी नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने योग्य वेळेवर माहीती न दिल्यामुळे प्रस्ताव मंजूर झाला नाही व प्रस्ताव रद्द करावा लागला. त्यांनी पुढे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने SBI Life - Unit Plus II ह्यारेग्युलरपॉलिसी करता प्रस्ताव दिला होता. परंतु IRDAकडून देण्यांत आलेल्या संशोधित निर्देशानुसार दि.31.12.2009 रोजी सदर पॉलिसी बंद करण्यांत आली. तसेच तक्रारकर्त्याने आवश्यक बाबींची पुर्तताही केलेली नव्हती त्यामुळे तक्रारकर्त्याचा प्रस्ताव स्विकारल्या गेला नाही व तक्रारकर्त्याचा प्रस्ताव रद्द झाल्यामुळे त्याची जमा असलेली रक्कम परत करण्यांत आली. गैरअर्जदारांनी आपल्या परिच्छेद निहाय उत्तरात तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे नाकारले असुन प्रस्तुत तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 8. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.11.10.2010 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर. उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 9. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांसोबत SBI Life - Unit Plus IIपॉलिसी बाबत प्रस्ताव दिला होता व त्या अनुषंगाने गैरअर्जदारांकडे रु.12,600/- जमा केले होते, ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज व उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘सेवाधारक’, या संज्ञेत येतो, असे मंचाचे मत आहे. 10. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे विमा पॉलिसीचा प्रस्ताव दिल्यानंतर गैरअर्जदारांनी सुचविलेल्या रुग्णालयात FMR & TMTही वैद्यकीय तपासणी दि.04.12.2009 रोजी करण्यांत आली. तक्रारकर्त्याने प्रस्ताव अर्जामध्ये नमुद केलेले नाव सुनील बाबुराव नायडू होते तर वैद्यकीय अहवालात म्हणजेच FMR & TMTयामध्ये सुनील जागृती नायडू असे नाव होते. दोन्ही नावांमध्ये तफावत असल्यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याकडे स्पष्टीकरण मागितले. 11. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने स्पष्टीकरण देत असतांना गैरअर्जदार क्र.4 यांना कळविले की, सदर तफावतीमध्ये जर Accident Benefit नसले तरी अपघात लाभाशिवाय पॉलिसी स्विकारण्यांस तयार आहे. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचा विमा प्रस्ताव दि.19.01.2010 रोजी नाकारल्यानंतर तक्रारकर्त्याने दिलेल्या विहीत कालमर्यादेत आवश्यक असलेल्या बाबींची पुर्तता केली नाही असे म्हटले आहे. तक्रारकर्त्याने आपल्या उत्तरात कथन केले आहे की, दि.16.12.2009 चे पत्र त्याला दि.28.12.2009 रोजी मिळाले, त्यामुळे गैरअर्जदारांनी IRDAच्या नियमांचे उल्लंघन केले आहे असेनमुद केले आहे. 12. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास दि.16.12.2009 रोजी पत्र पाठवुन स्पष्टीकरण मागविले होते सदर स्पष्टीकरण दि.30.12.2009 पर्यंत देण्यांत सांगितले, ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.3 वरुन स्पष्ट होते. तसेच सदर पत्रामध्ये तक्रारकर्त्याने प्रस्तावीत केलेला विमा प्रस्ताव हा दि.31.12.2009 ला संपुष्टात येणार आहे याबाबत सुध्दा कळविले. तक्रारकर्त्यास सदर पत्र दि.28.12.2009 रोजी मिळाल्याचा कोणताही पुरावा मंचासमक्ष दाखल केलेला नाही. त्यामळे सदर पत्र तक्रारकर्त्यास दि.28.12.2009 रोजी मिळाले हे तक्रारकर्त्याचे कथन ग्राह्य धरता येत नाही. मंचाचे असे मत आहे की, जर तक्रारकर्त्याला सदर पत्र दि.28.12.2009 ला प्राप्त झाले तर त्याच दिवशी किंवा दि.29.12.2009 रोजी गैरअर्जदारांना सुचित करुन वेळ मागावयास पाहिजे होता, पण तसेही तक्रारकर्त्याने केले नाही व त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर म्हणजेच दि.06.02.2010 ला गैरअर्जदारांना वकीला मार्फत नोटीस पाठविली. 13. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याने प्रस्तावित केलेला विमा प्रस्ताव दि.31.12.2009 रोजी संपुष्टात आल्यामुळे जमा राशी धनादेशासह तक्रारकर्त्याकडे पाठविली ही बाब सुध्दा दोन्ही पक्षांचे कथनावरुन स्पष्ट होते. सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी कुठेही स्पष्ट होत नाही व गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी दिल्याची बाब सिध्द करण्यास तक्रारकर्ता अयशस्वी ठरल्यामुळे वरील निष्कर्षांवरुन मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येते. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येते. 2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा. (मिलींद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |