आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याने त्याच्या मालकीची इंडिका विस्टा टीडीआय एल एक्स नोंदणी क्रमांक MH-31/DV-8509 ही कार दिनांक 20/11/2014 ते 19/11/2015 या कालावधीसाठी विमाकृत मूल्य रू. 3,60,000/- करिता Comprehensive Policy क्रमांक 0000000002266575 अन्वये विरूध्द पक्ष एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विमाकृत केली होती.
3. दिनांक 18/06/2015 रोजी चालक मुकेश दशरथ वाडीभस्मे हा सदर कार घेऊन तक्रारकर्त्याच्या नातेवाईकांना आणण्यासाठी गोंदीया येथून आमगांव येथे जात असता मानेगाव फाट्याजवळ अचानक काही विद्यार्थी कार समोर आल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालकास एकाएकी ब्रेक मारावा लागला. त्यामुळे कारचे संतुलन बिघडले आणि कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून अपघात झाला. अपघात एवढा जबरदस्त होता की, तक्रारकर्त्याची कार दुरूस्तीच्या पलीकडे क्षतिग्रस्त झाली. तक्रारकर्त्याने त्याबाबत पोलीस स्टेशन, आमगांव येथे घटनेची माहिती दिल्यावर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दुस-या दिवशी तक्रारकर्त्याने सदर अपघाताची माहिती विरूध्द पक्षाला देऊन नुकसानीचे मूल्यमापन करण्यासाठी सर्व्हेअरला पाठविण्याची विनंती केली.
4. विरूध्द पक्षाने सर्व्हेअरची नियुक्ती केली. सर्व्हेअरने घटनास्थळी भेट दिली आणि अपघातग्रस्त वाहनाची वरवर पाहणी केली आणि अपघातग्रस्त वाहनाचे फोटो काढून इतर कागदपत्रांसोबत त्यांच्या कार्यालयास सादर करण्यांस सांगितले. त्यानंतर दिनांक 03/07/2015 रोजी तक्रारकर्त्याने अपघातग्रस्त वाहन दुरूस्तीसाठी "सिध्दीविनायक मोटर्स लिमिटेड, नागपूर" यांचेकडे पाठविले. त्यांनी दुरूस्तीखर्च रू. 5,88,730/- चे अंदाजपत्रक दिले.
5. ऑगष्ट 2015 मध्ये तक्रारकर्त्याने सर्व दस्तावेजांसह Own damage claim विरूध्द पक्षाकडे सादर केला. तेंव्हापासून तक्रारकर्ता विरूध्द पक्षाला त्याचा विमा दावा मंजुरीसाठी सतत विनंती करीत आहे. परंतु विरूध्द पक्षाने आजपर्यंत केवळ आश्वासन देत राहिले आणि दावा मंजूर केला नाही.
6. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने दिनांक 27/01/2016 रोजी तक्रारकर्त्यास पत्र पाठवून कळविले की, क्लेम फॉर्म आणि वाहन चालकाच्या लेखी बयानाशी वाहनाच्या नुकसानीचे कारण जुळत नाही. तसेच सर्व्हेअरने केलेली पाहणी व फोटो आणि वाहन दुरूस्तीत बदलविण्यांत आलेल्या सुट्या भागात फरक आहे. तसेच असेही नमूद केले की, पंचनाम्याची नोंद पोलीस रेकॉर्डला नसल्याने सदर पंचनामा बनावट आहे.
7. वस्तुस्थिती अशी आहे की, चालकाचे लेखी बयान आणि क्लेम फॉर्म मधील माहितीत जरी काही अंशी तफावत दिसत असली तरी त्याचा अर्थ प्रत्यक्षात अपघात झाला नाही व वाहनाचे अपघातात नुकसान झाले नाही व विरूध्द पक्षाने अपघातग्रस्त वाहनाचे निरीक्षण केले नाही असा होत नाही. अपघाताचे वेळी अपघातग्रस्त वाहनाची वैध विमा पॉलीसी अस्तित्वात असल्याने अपघातातील नुकसानीची भरपाई करण्याची विरूध्द पक्ष विमा कंपनीची कायदेशीर जबाबदारी असतांना 8 महिने होऊनही विमा दाव्याची रक्कम न देता खोट्या कारणाने विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्षाची कृती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. त्यासंबंधाने तक्रारकर्त्याने दिनांक 18/01/2016 आणि 02/02/2016 रोजी विरूध्द पक्षाला पत्र पाठवून विमा दावा मंजुरीची विनंती केली. परंतु विरूध्द पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने तक्रारकर्त्याचे वाहन सिध्दीविनायक मोटर्स, नागपूर येथे पडून आहे. म्हणून तक्रारकर्त्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
अ. रू. 3,60,000/- वाहनाचे विमित मूल्य.
ब. रू. 30,000/- शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई.
क. रू. 5,000/- तक्रारखर्च.
एकूण रू. 3,95,000/-
8. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याने विमा पॉलीसीची प्रत, घटनास्थळ पंचनामा, वाहनचालकाचे बयान, इन्फॉरमेशन लेटर, इस्टिमेट, दावा नामंजुरीचे पत्र, दिनांक 18/01/2016 रोजीचे पत्र, कॅश मेमो, क्लेम फॉर्म इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
9. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना नोटीस मिळाल्यावर ते अधिवक्ता श्री. सचिन जैस्वाल यांच्यामार्फत हजर झाले. परंतु पुरेशी संधी देऊनही लेखी जबाब दाखल केला नाही. म्हणून प्रकरण त्यांच्या विरूध्द लेखी जबाबाशिवाय चालविण्यांत आले.
10. तक्रारकर्त्याची तक्रार व तक्रारीसोबत दाखल केलेले दस्तावेज यावरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? | होय |
2. | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
11. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारीतील वाहन विरूध्द पक्षाकडे विमाकृत असल्याबाबत पॉलीसी शेड्यूल तक्रारकर्त्याने दस्त क्रमांक 1 वर दाखल केले असून ते विरूध्द पक्षाने नाकारलेले नाही. पोलीस स्टेशन, आमगांव, जिल्हा गोंदीया चे पोलीस हवालदार संजय बैस, बक्कल नंबर 482 यांनी दिनांक 18/06/2015 रोजी केलेल्या घटनास्थळ पंचनाम्याची प्रत पोलीस स्टेशनच्या शिक्क्यानिशी दस्त क्रमांक 2 वर दाखल केली आहे. ती खोटी असल्याचे विरूध्द पक्षाने दाखवून दिले नाही. त्यात "जनावरांचा कळप येत असता त्यांना वाचविण्यासाठी अचानक ब्रेक मारला असता गाडीचे संतुलन बिघडल्याने गाडी रोडचे बाजूला पळसाचे झाडाला टकरविल्याने गाडीचे समोरील बफर, बोनट, काच, हेडलाईट फुटले व इंजिन चेपकले असून रोडवर काचेचे तुकडे पडलेले दिसत असून सदर गाडीचे रू. 95,000/- चे नुकसान झाल्याचे चालक मुकेश वाडीभस्मे सांगत असल्याचे नमूद आहे".
सर्व्हेअरने चालक मुकेश वाडीभस्मेचे बयान दिनांक 30/09/2015 रोजी घेतले ते दस्त क्रमांक 3 वर आहे त्यांत देखील अपघाताचे कारण वरीलप्रमाणेच नमूद आहे. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाच्या सर्व्हेअरला दिलेल्या बयानात देखील अपघाताची माहिती वरील प्रमाणेच सांगितली आहे. बयानाची प्रत दस्त क्रमांक 4 वर आहे. सिध्दीविनायक मोटर्स यांनी दिनांक 03/07/2015 रोजी गाडी दुरूस्तीचे दिलेले रू. 5,88,730/- चे इस्टीमेट दस्त क्रमांक 5 वर आहे.
विरूध्द पक्षाने दिनांक 27/01/2016 रोजीच्या पत्रान्वये तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केला. ते पत्र दस्त क्रमांक 6 वर आहे. त्यांत दावा नामंजुरीचे कारण खालीलप्रमाणे नमूद केले आहे.
1) Cause of loss is not matching and is not consistent as per claim form written by you & written statement of driver.
2) In Pre inspection photos & Final survey photos there is a difference noticed in parts of your vehicle like, Mirrors, Handles, Tail Light chrome are different, Mismatch in Antenna, Sticker on front windshield glass.
3) Panchanama produce4d was fake which has no registered entry in police records.
तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रमांक 2 ला विमा दावा मंजुरीसाठी दिनांक 18/01/2016 रोजी पाठविलेल्या पत्राची प्रत दस्त क्रमांक 7 वर आहे. तसेच दिनांक 02/02/2016 ची कुरिअर पावती दस्त क्रमांक 8 वर आहे. क्लेम फॉर्मची प्रत दस्त क्रमांक 9 वर आहे. त्यांत अपघाताचे कारण "गाडीसमोर जाणारे शाळेतील मुले मस्ती करीत अचानक गाडीसमोर आल्याने चालक घाबरल्याने संतुलन बिघडून डावीकडे वळली आणि झाडाला धडकली" असे नमूद आहे.
वरीलप्रमाणे ‘वाहनचालकाने गाडी समोर जनावरे आल्याने’ किंवा क्लेम फॉर्म मध्ये ‘गाडीसमोर शाळकरी मुले आल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात’ वाहन झाडाला धडकून अपघात झाल्याचे नमूद करण्याने अपघाताची घटना खोटी ठरत नाही. विरूध्द पक्षाला संधी देऊनही त्यांनी तक्रारीतील तक्रारकर्त्याचे शपथपत्रावरील कथन नाकारलेले नाही किंवा भिन्न परिस्थिती सिध्द करण्यासाठी सर्व्हेअर अहवाल व त्याचे शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचा Own damage claim नाकारण्यासाठी विरूध्द पक्षाने जी कारणे नमूद केली आहेत ती समर्थनीय ठरत नाहीत. अशाप्रकारे तक्रारकर्त्याचा वाजवी विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्ष 1 व 2 ची कृती विमा ग्राहकाप्रती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
12. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत:- घटनास्थळ पंचनाम्याप्रमाणे अपघातग्रस्त वाहन समोरून झाडाला धडकल्याने त्याचा समोरील भाग व इंजिन क्षतिग्रस्त झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुरूस्ती खर्च अपेक्षित आहे. विरूध्द पक्षाने सर्व्हेअर रिपोर्ट दाखल केला असता तर दुरूस्तीमध्ये कोणते सामान अतिरिक्त लावले आहे ते शोधून काढता आले असते. परंतु विरूध्द पक्षाने सर्व्हे रिपोर्ट दाखल केला नाही म्हणून तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या सिध्दी विनायक मोटर्स लिमिटेड, नागपूरच्या इस्टिमेटप्रमाणे सदर वाहन दुरूस्तीचा खर्च रू. 5,88,730/- गृहित धरण्याशिवाय पर्याय नाही. तक्रारकर्त्याचे वाहन दुरूस्तीचा अंदाजित खर्च जरी रू. 5,88,730/- असला तरी तक्रारकर्त्याच्या वाहनाचे विमाकृत मूल्य रू. 3,60,000/- असल्याने Total Loss गृहित धरल्यास तक्रारकर्ता जास्तीत जास्त रू. 3,60,000/- इतकीच विमा दाव्याची रक्कम विमा दावा नाकारल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 27/01/2016 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे 12% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रु. 10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु. 5,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील तक्रार खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्यास त्याच्या तक्रारीतील कारच्या विमा दाव्याची रक्कम रू. 3,60,000/- विमा दावा नाकारल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 27/01/2016 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे 9% व्याजासह द्यावी.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासाबाबत रु. 10,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- द्यावा.
4. विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी उपरोक्त आदेशाची पूर्तता संयुक्तिकरित्या किंवा वैयक्तिकरित्या करावी.
5. विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी उपरोक्त आदेशाची आदेशाची पूर्तता आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी.
6. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
7. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्यास परत करावी.