- आ दे श -
(पारित दिनांक – 12 मार्च, 2019)
श्री. शेखर मुळे, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये वि.प.ने तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारुन सेवेत कमतरता ठेवल्यामुळे वि.प.विरुध्द दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्ता हा MH 40 Y 8792 नोंदणी क्रमांक असलेल्या ट्रकचा मालक आहे. वि.प.क्र. 1 ही विमा कंपनी असून वि.प.क्र. 3 ही त्या कंपनीची नागपूर येथील शाखा आहे आणि वि.प.क्र.2 हे त्या कंपनीचे तक्रार निवारण कार्यालय आहे. सदरहू ट्रकचा विमा वि.प.क्र. 3 मार्फत 07.03.2014 ते 06.03.2015 या कालावधीकरीता रु.6,00,000/- विमा घोषीत मुल्याकरीता काढण्यात आला होता. दि.17.01.2015 ला तो ट्रक त्याचा चालक संतोष परमानंद बेदुआ याच्या ताब्यामध्ये काही किरकोळ दुरुस्तीकरीता होता. दुरुस्ती झाल्यानंतर चालकाने तो ट्रक चावी लावून बंद केला आणि त्याच्या बहीणीच्या घरी थांबला होता. दुस-या दिवशी सकाळी 7.30 वा. त्याला तो ट्रक ठेवलेल्या ठिकाणी आढळून आला नाही. शोध घेतल्यानंतर ट्रक न मिळाल्याने त्याने फोनवरुन त्याची सुचना तक्रारकर्त्याच्या वडिलांना दिली. दोघांनी त्या ट्रकचा शोध घेतला. परंतू त्यांना तो ट्रक मिळाला नाही. तेव्हा चालकाने यशोधरा पोलिस स्टेशन येथे ट्रक चोरीचा रीपोर्ट दिला आणि चोरीचा गुन्हा नोंदविला. तपासाअंती ट्रक सापडून न आल्याने पोलिसांनी न्यायालयाकडून ‘अ’ समरी प्राप्त केली. त्यानंतर दि.13.11.2015 ला तक्रारकर्त्याच्या वडिलांनी वि.प.क्र. 3 कडे सर्व दस्तऐवजांसह विमा दावा दाखल केला. दि.17.11.2015 ला वि.प.क्र. 3 कडून तक्रारकर्त्याला पत्राद्वारे सुचित करण्यात आले की, पॉलिसी अट क्र. 5 चा भंग झालेला असल्याने त्यांचा दावा नामंजूर करण्यात आला. तक्रारकर्त्याने त्यानंतर वि.प.क्र. 2 कडे पुनर्विचारार्थ अर्ज दिला. परंतू त्याचा उपयोग झाला नाही. वि.प.च्या सेवेतील ही कमतरता ठरते असा आरोप करुन तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल केली आहे. वि.प.कडून ट्रकचे विमा घोषीत मुल्य रु.6,00,000/-, त्याला झालेले नुकसान रु.4,40,000/- आणि झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.3,00,000/- असे एकूण रु.13,40,000/- मागितले आहे.
3. वि.प.क्र. 1 ते 3 यांनी तक्रारीस संयुक्तपणे लेखी उत्तर नि.क्र. 9 वर दाखल केले. त्यात ट्रकचे विमा घोषीत मुल्य रु.6,00,000/- करीता वि.प.क्र. 3 कडून विमा काढण्यात आला ही बाब वि.प.ने नाकबुल केली नाही. परंतू ट्रक चोरीची घटना तक्रारीत सांगितल्याप्रमाणे खोटी आहे असे वि.प.ने नमूद केले. तक्रारकर्त्याने विमा दावा दाखल केला होता आणि तो फेटाळण्यात आला होता हे कबूल करुन वि.प.ने पुढे असे म्हटले आहे की, त्या ट्रकच्या चालकाने ट्रक उभा केल्यानंतर ट्रकची चावी ट्रकमध्येच ठेवली, जो त्याचा निष्काळजीपणा होता. पॉलिसीच्या अटीनुसार तक्रारकर्त्याने तो ट्रक चोरी जाऊ नये किंवा त्याचे नुकसान होऊ नये याची योग्य ती खबरदारी घेतली नाही. अशाप्रकारे पॉलिसीच्या अटीचा भंग झाल्याने दावा नामंजूर करण्यात आला. त्यामुळे वि.प.च्या सेवेत कुठलीही कमतरता नाही असे नमूद करुन तक्रार खारिज करण्याची विनंती करण्यात आली.
4. सदर प्रकरणी मंचाने वि.प.च्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारकर्त्याचे सहकारी वकील हजर. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तऐवजांचे व युक्तीवादाचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- नि ष्क र्ष –
5. सदर प्रकरणी ट्रकच्या मालकी हक्कासंबंधी, विमा पॉलिसी, विमा घोषीत मुल्य याबद्दल कुठलाही वाद नाही. तसेच ट्रकचा विमा दावा तक्रारकर्त्याने सादर केला होता हेसुध्दा वि.प.ने कबूल केले आहे. तक्रारकर्त्याने पोलिसांच्या तपासाची कागदपत्रे दाखल केलेली आहे. ज्यावरुन हे सिध्द होते की, त्या ट्रकची दि.17/18 जानेवारी, 2015 च्या मध्यरात्री चोरी झाली होती. तक्रारकर्त्याने केलेला विमा दावा विमा अट क्र. 5 चा भंग झाल्याने फेटाळण्यात आला हेसुध्दा वि.प.ने कबूल केले.
6. विमा पॉलिसीच्या अट क्र. 5 मध्ये विमा धारकाने विमाकृत वाहनाची चोरी किंवा नुकसान होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे नमूद आहे. वि.प.च्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने ट्रक चोरी होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली नव्हती, ज्यामुळे पॉलिसीच्या मुख्य अटीचा भंग झाला आणि म्हणून विमा दावा देय होत नाही. सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने पॉलिसी अट क्र. 5 चा भंग केला होता की नाही याचा फक्त विचार करणे आवश्यक आहे.
7. विमा दावा दाखल केल्यानंतर वि.प.ने त्या घटनेचा तपास केला होता. त्या तपासाचा अहवाल वि.प.ने दाखल केला आहे. ज्या एजेंसीने तपास केला होता, त्यांनी ट्रक चालकाचे बयान घेतले होते. त्या बयानानुसार चालकाने तो ट्रक त्याच्या बहीणीच्या घरासमोर उभा केला होता आणि त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ट्रकची चावी ट्रकच्या केबीनमध्ये ठेवली होती. त्यानंतर ट्रकचा दरवाजा बंद करुन काच वर करुन तो बहीणीच्या घरी झोपला होता. तक्रारकर्त्याच्या वडिलांचे बयानसुध्दा घेण्यात आले होते आणि त्यांनीही अशाच प्रकारचे बयान दिले आहे. ट्रकच्या चालकाने ट्रकची चावी केबिनमध्ये ठेवली होती ही बाब तक्रारकर्त्याने नामंजूर केली नाही आणि त्याने ती बाब नाकारण्यासाठी प्रतीउत्तर दाखल केले नाही. त्यामुळे चालकाने ट्रकची चावी ट्रकच्या केबिनमध्ये ठेवली आणि तो बहीणीच्या घरी रात्री झोपला ही बाब वादग्रस्त नाही. हा ट्रक चालकाचा पूर्णपणे निष्काळजीपणा आहे, ज्याच्या ताब्यामध्ये घटनेच्या वेळी तो ट्रक होता. जर विमाकृत वाहनाची चोरी किंवा नुकसानापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी किंवा काळजी घेतली नसेल तर विमा पॉलिसीच्या अट क्र. 5 चा निश्चितच भंग होतो. चालकाने रात्रीला त्या ट्रकची चावी ट्रकच्या केबिनमध्ये ठेवून एकप्रकारे त्या ट्रकची चोरी करण्यास आमंत्रण दिले होते असे म्हणावे लागेल. सबब, या कारणास्तव वि.प.ने दावा नाकारुन सेवेत कमतरता ठेवली असे म्हणता येणार नाही.
वरील कारणास्तव या तक्रारीत वि.प.ची सेवेत कुठलीही त्रुटी नसल्याने तक्रार खारिज होण्यायोग्य आहे. करिता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आ दे श –
- तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यात येते.
- खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
- आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.