द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 21 एप्रिल 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे क्रेडिट कार्डासाठी अर्ज केला होता. तक्रारदारांकडून काही कागदपत्रांवर जाबदेणार यांनी सहया घेतल्या परंतू क्रेडिट कार्ड दिले नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिनांक 19/10/2006 रोजीचे स्टेटमेंट पाठवून, रॉयल सुंदरम अलायन्स इन्श्युरन्स यांना रुपये 10,000/- अदा केल्याचे नमूद करुन रुपये 8962/- ची मागणी केली. तक्रारदारांनी रॉयल सुंदरम अलायन्स इन्श्युरन्स यांच्याकडून पॉलिसी घेतली नव्हती त्यामुळे त्यांना रक्कम देण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून तक्रारदारांनी वेळोवेळी जाबदेणार यांना भेटून, ई-मेल करुन सदरहू स्टेटमेंट मागे घेण्याबाबत विनंती केली. परंतु जाबदेणार यांनी तक्रारदारांना अनेक बिले पाठवून व्याजाची, दंडाची मागणी केली. दिनांक 14/12/2008 च्या जाबदेणार यांच्या ई-मेल मध्ये जाबदेणार यांनी तक्रारदारांना क्रेडिट कार्ड देण्यात आले नसल्याचे, जाबदेणार यांना परत मिळाल्याचे मान्य केले. परंतु रुपये 8962/- ची एन्ट्री मागे घेतली नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांना स्टेटमेंट पाठविणे चालूच ठेवले, तसेच तक्रारदारांच्या घरी जाबदेणार यांचे प्रतिनिधी रक्कम वसूली साठी जात असत. तक्रारदारांकडून त्यांच्या शेजा-यांसमोर जाबदेणार यांच्या प्रतिनिधींनी जबरदस्तीने रुपये 570/- वसूल केले व परत रक्कम मागण्यात येणार नाही असेही तक्रारदारांना सांगण्यात आले. तरीदेखील जाबदेणार यांनी रकमेची मागणी करणारे स्टेटमेंट पाठविणे चालूच ठेवले. दिनांक 19/09/2009 रोजी तक्रारदारांकडून 784.82 ची मागणी करण्यात आली. दिनांक 11/11/2009 रोजीच्या नोटीसद्वारे जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून रुपये 29,642.06 ची मागणी केली. तक्रारदारांना जाबदेणार यांच्याकडून कुठलेही क्रेडिट कार्ड प्राप्त झालेले नाही, ते अॅक्टीव्हेट करण्यात आलेले नसतांनाही जाबदेणार यांनी तक्रारदारांना अनेक बिले पाठवून रकमांची मागणी केली म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून क्रेडिट कार्ड क्र.0004317575184642628 संदर्भातील बिले बेकायदेशिर, रद्यबातल आहेत असे डिक्लेअर करुन मागतात. जाबदेणार यांनी भविष्यात उपरोक्त नमूद क्रेडिट कार्ड संदर्भात कुठलेही बिल तक्रारदारांना पाठवू नये, तक्रारदारांना नो डयुज प्रमाणपत्र मिळावे, नुकसान भरपाई पोटी रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च मिळावा अशी तक्रारदार मागणी करतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द एकतर्फा आदेश मंचाने पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या जाबदेणार यांच्या दिनांक 14/3/2008 च्या मेलचे अवलोकन केले असता त्यामध्ये तक्रारदारांचे क्रेडिट कार्ड जाबदेणार यांना परत मिळाल्याचे मान्य केले आहे. तसेच रॉयल सुंदरम इन्श्युरन्स तक्रारदारांच्या नावे SBI कार्ड खात्यातून बुक झाल्याचे नमूद केलेले आहे. तसेच फ्री लुक कालावधीत तक्रारदारांनी सदर इन्श्युरन्स रद्य करण्याबाबत कळविलेले नसल्यामुळे त्यासंदर्भातील एन्ट्री रिव्हर्स करता येणार नाही असेही त्यात नूमद करण्यात आले आहे. यावरुन तक्रारदारांना जाबदेणार यांचे क्रेडिट कार्ड प्राप्तच झालेले नव्हते. तक्रारदारांनी रॉयल सुंदरम ची इन्श्युरन्स पॉलिसी घेतलेलीच नव्हती, यासदंर्भात तक्रारदारांनी जाबदेणार यांना वारंवार पत्रव्यवहार करुन, मेल करुन, प्रत्यक्ष भेटून कळवून देखील जाबदेणार यांनी पॉलिसी संदर्भात तक्रारदारांकडून दिनांक 19/10/2006 च्या बिलाद्वारे रुपये 8962.88 ची केलेली मागणी मागे घेतली नाही ही बाब स्पष्ट होते. उलट दिनांक 19/4/07, 19/5/07, 19/7/07, 19/08/07, 19/09/07, 19/10/07, 19/01/08, 19/04/08 ची बिले पाठवून व दिनांक 19/09/2009 रोजी डिमांड नोटीस पाठवून, त्यानंतर दिनांक 11/11/2009 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठवून तक्रारदारांकडून रकमांची मागणी करण्यात आली, ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी व जाबदेणार यांनी अवलंबिलेली अनुचित व्यापारी पध्दत आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारदारांना जाबदेणार यांनी क्रेडिट कार्ड क्र.0004317575184642628 संदर्भातील पाठविलेली बिले बेकायदेशिर, रद्यबातल आहेत असे जाबदेणार यांनी डिक्लेअर करावे, तसेच उपरोक्त नमूद क्रेडिट कार्ड संदर्भात कुठलेही बिल तक्रारदारांना पाठवू नये, तक्रारदारांना नो डयुज प्रमाणपत्र दयावे ही तक्रारदारांची मागणी मंच मंजुर करीत आहे. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे, अनुचित व्यापारी प्रथेमुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. तक्रारदारांनी नुकसान भरपाईपोटी रुपये 30,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु ही मागणी अवास्तव आहे, म्हणून तक्रारदार नुकसान भरपाई पोटी 10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी जाबदेणार यांच्याकडून रक्कम रुपये 1,000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना क्रेडिट कार्ड क्र.0004317575184642628
संदर्भातील पाठविलेली बिले बेकायदेशिर, रद्यबातल आहेत असे डिक्लेअर करावे, तसेच उपरोक्त नमूद क्रेडिट कार्ड संदर्भात भविष्यात कुठलेही बिल तक्रारदारांना पाठवू नये, व तक्रारदारांना नो डयुज प्रमाणपत्र आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावे.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.