मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 24/11/2010) 1. तक्रारकर्त्यानी सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याचे गैरअर्जदाराकडे खाते क्र.004006661053062159 असून त्याद्वारे त्याने क्रेडीट कार्डची सेवा घेतली होती. सदर क्रेडीट कार्डन्वये तक्रारकर्ता खरेदी करीत होता. काही अपरीहार्य कारणामुळे तक्रारकर्त्याच्या खात्यात रक्कम थकीत राहिली. यावर गैरअर्जदार व तक्रारकर्त्यामध्ये दि.19.02.2008 रोजी तडजोड होऊन रु.16,000/- तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास द्यावयाचे ठरले. त्यानुसार तक्रारकर्त्याने धनादेश क्र. 179981 रु.5400/-, धनादेश क्र. 179982 रु.5300/- व धनादेश क्र. 179983 रु.5300/- गैरअर्जदारास दिले. मात्र धनादेश क्र. 179983 हा हरविला असल्याचे सांगून त्याबाबत दुसरा धनादेश देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारकर्त्याने दुसरा धनादेश दिला. सदर तिनही धनादेश गैरअर्जदाराने वटविले. तरीहीसुध्दा गैरअर्जदाराने तडजोडीनुसार रक्कम भरली नाही असे नमूद करुन तक्रारकर्त्याला पत्र पाठविले. सदर गोष्टीचा तक्रारकर्त्यावर मानसिक परीणाम झाला. तक्रारकर्त्याने तडजोडीनुसार संपूर्ण रक्कम अदा करुनही गैरअर्जदार परत रकमेची मागणी करीत असल्याने तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, गैरअर्जदाराने सदर विवादित क्रेडीट कार्डचे खाते त्वरित बंद करावे व ‘ना बकाया प्रमाणपत्र’ द्यावे, मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदार क्र. 1 ते 3 वर बजावण्यात आला असता नोटीस प्राप्त होऊनही गैरअर्जदारांनी सदर तक्रारीस उपस्थित होऊन लेखी उत्तर दाखल न केल्याने मंचाने त्यांच्याविरुध्द दि.28.09.2010 रोजी एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला. 3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता मंचासमोर दि.19.10.2010 रोजी आले असता मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार अनुपस्थित. मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने दाखल केलेली कागदपत्रे व शपथपत्रे यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 1 वर उभय पक्षांमध्ये तडजोड झाल्याबाबत व त्याबाबत तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केलेले धनादेश दिल्याचे पत्र दाखल केले आहे. सदर दस्तऐवजावरुन तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा क्रेडीट कार्डचे खातेधारक होता असे निदर्शनास येते व पर्यायाने तो गैरअर्जदारांचा ग्राहक ठरतो. 5. गैरअर्जदाराने तक्रारीसोबत पृष्ठ क्र.11 वर नागपूर नागरीक सहकारी बँकेचे पासबुकची प्रत दाखल केलेली असून त्यामध्ये तक्रारकर्त्याने तडजोडीबाबत दिलेले आधीचे दोन चेक व तिस-या हरविलेल्या चेकऐवजी दिलेला नविन चेक क्र. 179996 रु.5300/- गैरअर्जदारांच्या नावाने वटविल्या गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच गैरअर्जदाराने तडजोड पत्रानुसार नमूद करण्यात आलेली रक्कम गैरअर्जदाराला दि.23.10.2008 रोजी मिळाल्याचे सदर प्रतीवरुन स्पष्ट होते. तरीहीसुध्दा गैरअर्जदाराने दि.25 ते 2009 रोजी तक्रारकर्त्याला थकीत रक्कम असल्याचे विवरण पाठवून ते त्वरित भरण्यास सांगितले आहे. गैरअर्जदाराची सदर कृती ही त्याच्या सेवेतील निष्काळजीपणा दर्शविते. एकदा तडजोडीचा मार्ग स्विकारुन व त्याबाबत रक्कम स्विकारुन परत त्याचबाबत पुन्हा गैरअर्जदाराने वाद निर्माण केलेला आहे. तसेच त्याला ‘ना बकाया प्रमाणपत्र’ अदा केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक त्रास झाला असल्याची संभावना निर्माण होते. यावरुन तक्रारकर्ता दाद मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराने थकीत रकमेचे विवरण पाठवून तक्रारकर्त्याला मानसिक त्रास दिलेला आहे, तक्रारकर्ता सदर त्रासाच्या क्षतिपूर्तीबाबत रु.2,000/- मिळण्याबाबत पात्र आहे. तसेच गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला ‘ना बकाया प्रमाणपत्र’ न दिल्याने व तडजोडीनंतर रकमेची मागणी केल्याने तक्रारकर्त्याला मंचासमोर येऊन तक्रार दाखल करावी लागली, म्हणून तक्रारकर्ता तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सदर प्रकरणी तक्रारकर्त्याच्या तक्रारीवर गैरअर्जदाराने त्याचे काय म्हणणे आहे हे मंचासमोर नमूद न केल्याने तक्रारकर्त्याची शपथपत्रावर व कागदपत्रासह असलेली तक्रार सत्य समजून मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला ‘ना बकाया प्रमाणपत्र’ द्यावे. 3) मानसिक व शारिरीक त्रासाबाबत गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला क्षतिपूर्ती म्हणून रु.2,000/- द्यावे. 4) तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला द्यावे. 5) गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |