मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 10/01/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याचेकडे वर्ष 2003-2004 या कालावधीमध्ये क्रेडीट कार्ड अकाऊंट क्र.0004317575012759941 अन्वये क्रेडीट कार्ड घेतले. गैरअर्जदाराकडे असलेल्या रकमेची वेळोवेळी वेगवेगळया रकमा भरुन अकाऊंट सेटलमेंट ट्रेसन क्र. PUNNACNSK 722007501479 अनुसार रु.12,850/- वर सेटलमेंट झाले. त्यानुसार तक्रारकर्त्याने रु.12,850/- दि.26.02.2007 रोजी व रु.5,500/- दि.16.03.2007 रोजी भरले व सदर क्रेडीट कार्ड बंद करण्यात आले. सदर बाबीची नोंद गैरअर्जदाराने आपल्या रेकॉर्डमध्ये घेतली नाही व याउपरही गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला थकित रक्कम म्हणून सतत तपशिल पाठविला व रकमेची मागणी केली. याबाबत तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना नोटीस पाठविला असता गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला 15.04.2010 ला नोटीस पाठवून रु.50,639.18 ची मागणी केली. तक्रारकर्त्याने उभय पक्षांमध्ये समझोता झाल्यानंतरही रकमेची मागणी केल्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास झाला, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल केलेली असून मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाई मिळावी, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 1. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आला असता गैरअर्जदारांना नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा लेखी उत्तरही दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.03.12.2010 रोजी पारित केला. 3. मंचासमोर सदर तक्रार युक्तीवादाकरीता दि.23.12.2010 रोजी आली असता मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. तक्रारकर्त्याकडे गैरअर्जदाराने निर्गमित केलेले क्रेडीट कार्ड क्र. 0004317575012759941 होते व त्याद्वारे तो गैरअर्जदार पुरवित असलेली सेवा घेत होता ही बाब दाखल दस्तऐवजावरुन स्पष्ट होत असल्याने तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 5. मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने दाखल केलेले मासिक स्टेटमेंटचे अवलोकन केले असता गैरअर्जदाराने पाठविलेले सदर विवादित स्टेटमेंटमध्ये तक्रारकर्त्याकडे मोठमोठया थकीत रकमा दर्शविलेल्या आहेत. परंतू तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज क्र. 13 वरील, दि.26 फेब्रुवारी 2007 चे गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला पाठविलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, तक्रारकर्ता व गैरअर्जदारांध्ये समझोता होऊन उभय पक्षांनी ठरविलेली रक्कम तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडे भरलेली आहे व क्रेडीट कार्डची सुविधा बंद करण्यात आलेली असतांनाही यानंतरही जून 2009, सप्टेंबर 2009, डिसेंबर 2009 व जून 2010 गैरअर्जदाराने रक्कम मागणी करणारे देयके तक्रारकर्त्यावर बजावलेली आहेत. गैरअर्जदाराचे सदर कृतीवरुन त्याने अनुचित व्यापार प्रथा अवलंबिल्याचे स्पष्ट होते. यामुळे तक्रारकर्त्याला साहजिकच मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला असेल. तक्रारकर्त्याने सदर त्रासाची भरपाई म्हणून रु.25,000/- ची मागणी केलेली आहे. मंचाचे मते सदर मागणी ही अवास्तव आहे. परंतू तक्रारकर्ता न्यायोचितदृष्टया रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तसेच गैरअर्जदाराने समझोता घडून आल्यावर वारंवार तक्रारकर्त्याला देयके पाठविल्याने तक्रारकर्त्याला मंचासमोर येऊन सदर तक्रार दाखल करावी लागली, म्हणून तक्रारीच्या खर्चाबाबत गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला रु.1,000/- द्यावे असे मंचाचे मत आहे. तसेच समझोता झाल्याने तक्रारकर्त्यावर गैरअर्जदाराने यानंतर कुठलेही देयक बजावू नये असे मंचाचे स्पष्ट मत आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतो की, त्याने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाबाबत क्षतिपूर्तीबाबत रु.2,000/- द्यावे. 3) तक्रारीच्या खर्चाबाबत गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला रु.1,000/- द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे. (मिलिंद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |