(घोषित दि. 20.08.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार क्रमांक 1 व 2 हे पती पत्नी आहेत. गैरअर्जदार ही बॅंक असून त्यांची परभणी येथे स्टोडीयम जवळ शाखा आहे. दोनही तक्रारदारांनी वरील शाखेत बचत खाती उघडलेली असून त्यांचे क्रमांक 52071319733 व 52071300867 असे आहेत.
फेब्रूवारी 2008 मध्ये गैरअर्जदार यांच्या तत्कालीन व्यवस्थापकांनी बॅंकेने ग्राहकांसाठी सुरु केलेली +मॉड या योजनेची माहिती तक्रारदारांना दिली. या योजनेनुसार बचत खाते +मॉड खात्यात परिवर्तित केले तर त्या कालावधीत जेवढी रक्कम बचत खात्यात असेल तेवढया रकमेवर त्या कालावधीसाठी बचत खात्याच्या व्याजदरा ऐवजी मुदत ठेवी प्रमाणे अधिकचा व्याज दर देण्यात येणार होता. तक्रारदारांनी व्यवस्थापकांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्यांचे बचत खाते +मॉड खात्यामध्ये परावर्तीत करण्यासाठी सम्मती दिली. एप्रिल 2008 मध्ये वरील बचत खात्याचे +मॉड खात्यामध्ये परावर्तन झाल्याचे व्यवस्थापकांनी तक्रारदरांना सांगितले व तशी नोंदही पासबुकात करण्यात आली. परंतू तक्रारदारांना वरील खात्यामध्ये जमा रकमेवर +मॉडचा व्याजदर न आकारता प्रचलित व्याजदर आकारुन व्याजाची रक्कम तक्रारदारांच्या खात्यात जमा करण्यात आली.
तक्रारदार क्रमांक 1 यांचे खाते क्रमांक 52071319733 मधील एप्रिल 2008 ते जुलै 2013 या कालावधीतील व्याज दरातील त्रुटीची रक्कम 40,920/- रुपये होती. त्याच प्रमाणे तक्रारदार क्रमांक 2 यांचे खाते क्रमांक 52071300867 वरील खात्यातील एप्रिल 2008 ते जुलै 2013 पर्यंतच्या व्याजातील त्रुटीची रक्कम 78,104/- एवढी होते. नियमानुसार होणारी व्याजाची रक्कम न देऊन गैरअर्जदारांनी तक्रारदारांना त्रुटीची सेवा देऊन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे.
तक्रारदारांनी गैरअर्जदारांकडे दिनांक 07.07.2013 रोजी लेखी तक्रार केली तेंव्हा गैरअर्जदारांनी त्यांना तक्रारदार क्रमांक 2 चे खाते कधीही +मॉड मध्ये परावर्तीत झालेले नाही व तक्रारदार क्रमांक 1 चे खाते +मॉड मध्ये परावर्तित न होता बी.प्लस प्रिमियम सेव्हींग मध्ये परावर्तीत झाले आहे. ती योजना देखील 2012 ला बंद पडली असे संताप जनक उत्तर दिले.
गैरअर्जदारांनी तक्रारदार क्रमांक 2 यांच्या खात्यावर देखील बचत खात्याचे व्याजदरा नुसारच व्याज दिलेले दिसते. गैरअर्जदारांच्या या कृत्यामुळे तक्रारदारांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार तक्रारी अंतर्गत उपरोक्त व्याजातील फरकाची रक्कम त्याच प्रमाणे रुपये 25,000/- शारिरीक व मानसिक त्रास यांची नुकसान भरपाई व रुपये 10,000/-, तक्रार खर्च अशी मागणी करत आहेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत दोनही तक्रारदारांचे खाते उता-याची छायांकीत प्रत व तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यातील पत्रव्यवहार दाखल केला आहे.
प्रस्तुत तक्रार मा. राज्य आयोग, मुंबई यांनी परभणी येथील मंचातून जालना मंचात वर्ग केली.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या लेखी जबाबानुसार गैरअर्जदारांचे अधिका-यांनी +मॉड या योजनेची माहिती तक्रारदारांना दिली ही गोष्ट त्यांना मान्य आहे. ते आजही तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये मागितलेली रक्कम देण्यास तयार आहेत. काही तांत्रिक कारणामुळे तक्रारदारांचे खाते +मॉड मध्ये परावर्तीत होवू शकले नाही. परंतू त्या संबंधी त्यांना वेळोवेळी पाठपुरावा करुन तक्रारदारांशी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामुळे यात त्यांचेकडून सेवेतील त्रुटी झालेली नाही. म्हणून फिर्यादीत मागितलेली व्याजातील फरकाची रक्कम देण्यास ते तयार आहेत. त्यामुळे त्यांच्या वर नुकसान भरपाईचा बोजा टाकण्यात येऊ नये अशी विनंती गैरअर्जदारांनी केलेली आहे.
तक्रारदारां तर्फे विव्दान वकील श्री. विपुल देशपांडे व गैरअर्जदार यांचे तर्फे विव्दान वकील श्री.एन.डी.देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला.
गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी जबाबातच तक्रारदारांना व्याजातील फरकाची रक्कम देण्याची तयारी दर्शविलेली आहे. दिनांक 12.03.2014 रोजी तसे पत्र त्यांनी तक्रारदार यांना देखील पाठविल्याचे दिसते. त्यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारदार क्रमांक 1 व 2 यांना त्यांच्याै कडील बचत खाते क्रमांक 52071319733 व 52071300867 या खात्यातील रकमेवरील माहे एप्रिल 2008 ते ऑगस्ट 2014 या कालावधीची व्याजातील फरकाची रक्कम (+मॉड खात्या प्रमाणे व्याज दर आकारल्यास होणारी रक्कम वजा तक्रारदारांना प्रत्यक्ष मिळालेली व्याजाची रक्कम) द्यावी असे आदेश देणे योग्य ठरेल असे मंचाला वाटते.
गैरअर्जदार यांनी तांत्रिक चुकीमुळे प्रस्तुत घटना झाली असे कबूल करुन +मॉडच्या व्याज दरानुसार व्याज देण्याची तयारी दर्शविलेली आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांना नुकसान भरपाई पोटी कोणतीही रक्कम द्यावयास लावणे न्याय्य ठरणार नाही असे मंचाला वाटते. परंतू झालेल्या घटनेमुळे तक्रारदारांना मंचात प्रस्तुत तक्रार दाखल करण्याचा खर्च करावा लागला. म्हणून गैरअर्जदार यांनी त्यांना तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- देणे योग्य ठरेल असे मंचाला वाटते.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना त्यांचे बचत खाते क्रमांक 52071319733 व 52071300867 यातील जमा रकमेवर एप्रिल 2008 ते ऑगस्ट 2014 या कालावधीसाठी होणारी वरील प्रमाणे व्याजातील फरकाची रक्कम आदेश प्राप्ती पासून 30 दिवसात द्यावी.
- गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी वरील रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास पुढील कालावधीसाठी 9 टक्के व्याज दराने व्याज द्यावे.
- गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना तक्रार खर्च रुपये 3,000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) द्यावा.