Pronounced and dictated in open Court-
द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
:- आदेश :-
दिनांक 17 एप्रिल 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे -
1. तक्रारदारांनी जाबदेणारांकडून कॅनॉन कंपनीचे झेरॉक्स मशिन मॉडेल 8530 खरेदी केले. तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिनांक 23/1/2008 रोजी रुपये 50,000/- रोख स्वरुपात व दिनांक 4/2/2008 रोजी रुपये 30,000/- चा धनादेश दिला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार यांनी मशिन हाताळण्याची जुजबी माहिती दिली. मशिनची देखभाल केली नाही. त्यामुळे मशिन बंद पडले. जाबदेणार यांनी मशिन सर्व्हिसिंगचे आश्वासन देऊनही सर्व्हिसिंग केले नाही. त्यामुळे तक्रारदारांचे रुपये 10,000/- चे नुकसान झाले. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून मशिनची किंमत रुपये 80,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/-, कामकाजाच्या नुकसानीपोटी रुपये 2,40,000/-, नोटिसचा खर्च रुपये 5000/- एकूण रुपये 3,75,000/- 18 टक्के व्याजासह मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार टायपिंग, झेरॉक्स व जनरल स्टोअर्सचा व्यवसाय करतात. दोघांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यात नातेसंबंध आहेत. जाबदेणार यांना नवीन झेरॉक्स मशिन खरेदी करावयाची असल्यामुळे त्यांच्याकडील कॅनॉन कंपनीचे झेरॉक्स मशिन मॉडेल 8530 तक्रारदारांना रुपये 80,000/- ला विकले. जाबदेणार यांचा मशिन विकणे हा व्यवसाय नव्हता. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार मशिन देते वेळी मशिन जुनी असल्याचे सांगून, गॅरंटी देता येणार नसल्याचेही तक्रारदारांना सांगितले होते. असे असूनही तक्रारदारांनी तक्रार दाखल केली ती नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणार हे कॅनॉन झेरॉक्स मशिनचे एजंटही नाहीत आणि उत्पादकही नाहीत. झेरॉक्स मशिन विकणे हा जाबदेणार यांचा व्यवसाय नव्हता. तशा प्रकारची कागदपत्रे तक्रारदारांनी दाखल केलेली नाहीत. फक्त नातेसंबंधातून तक्रारदारांनी जुनी झेरॉक्स मशिन जाबदेणार यांच्याकडून खरेदी केलेली होती. ग्राहक सरंक्षण कायदयानुसार तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यातील वाद ग्राहक वाद होऊ शकत नाही, तक्रारदार जाबदेणार यांचे ग्राहक नाहीत म्हणून मंच तक्रारदारांची तक्रार नामंजुर करीत आहे.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.