(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 13/01/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 09.05.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्यांनी नमुद केले आहे की, त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून मौजा चिंचभुवन, प.ह.नं.43, ता.जिल्हा नागपूर येथील शेत सर्व्हे नं.179,180/2 व 179,180/3 या शेत जमीनीतील भुखंड क्र.4 व 5 ज्याचे एकूण क्षेत्रफळ 3100 चौ. फूट असुन एकूण किंमत रु.49,600/- ला विकत घेण्याचा सौदा केला होता. त्यानंतर तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारास संपूर्ण रक्कम दिल्यानंतर गैरअर्जदार संस्थेने दि.14.11.1994 रोजी भुखंड क्र.5 चे खरेदी खत तक्रारकर्ता क्र.1 च्या नावे व भुखंड क्र.4 चे तक्रारकर्ता क्र.2 च्या नावे विक्रीपत्र करुन दिले. तक्रारकर्त्यांनी पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदार संस्थेने दि.30.07.2002 रोजी तक्रारकर्त्यांना विकलेल्या दोन्ही भखंडासंबंधात दुरुस्तीपत्र नोंदवुन दिले. सदर दुरुस्तीपत्रात चतुःसिमा लिहीण्यात आल्यामुळे दुरुस्तीपत्र करुन देण्यांत आल्याचे नमुद केले आहे. तक्रारकर्त्यांचे म्हणण्यानुसार सदर दोन्ही भुखंड मिहान प्रकल्पाकरीता राखीव ठेवण्यात आल्याची माहिती गैरअर्जदार क्र.2 नागपूर सुधार प्रन्यास यांनी दि.09.02.2005 रोज कळविली. त्यामुळे तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराने कायदेशिर ताबा द्यावा व भुखंडांची मोजणी करुन देण्याची मागणी केली. परंतु गैरअर्जदार क्र.1 यांनी टाळाटाळ केली याकरीता तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार दाखल केलेली असुन ती व्दारे मागणी केली आहे की, गैरअर्जदार संस्थेने त्यांना राखीव जागेतील भुखंड क्र.4 व 5 चा कायदेशिर ताबा द्यावा, जर तसे शक्य नसेल तर सदर भुखंडांच्या ऐवजी तेवढयाच क्षेत्रफळाचे दुसरे भुखंड त्याच ले-आऊटमधे द्यावे किंव आजच्या बाजार भावाप्रमाणे भुखंडांची रक्कम परत करावी. तसेच गैरअर्जदाराने दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे त्यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.25,000/- मिळण्याबाबत मंचासमक्ष मागणी केलेली आहे. 3. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले परंतु त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केलेले नाही. त्यामुळे मंचाने दि.08.11.2010 रोजी विना लेखी जबाब प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारित केला. दि.05.01.2011 रोजी सदर प्रकरण युक्तिवादाकरीता मंचासमक्ष आले असता उभय पक्ष गैरहजर होते. त्यामुळे गुणवत्तेवरील निकाला करता ठेवण्यांत आले. मंचासमक्ष दाखल दस्तावेज व तक्रारकर्त्यांचे कथन यांचे निरीक्षण केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहोचले. -// नि ष्क र्ष //- 4. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ही प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असुन त्यांनी तक्रारीत नमुद केले आहे की, त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून मौजा चिंचभुवन, प.ह.नं.43, ता.जिल्हा नागपूर येथील शेत सर्व्हे नं.179,180/2 व 179,180/3 या शेत जमीनीतील भुखंड क्र.4 व 5 एकूण क्षेत्रफळ 3100 चौ. फूट खरेदी केले होते ही बाब तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या दस्तावेज क्र.2 व 3 वरील विक्रीपत्रावरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ते हे गैरअर्जदार क्र.1 चे ‘ग्राहक’ ठरतात, असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र.2 हे नागपूर सुधार प्रन्यास असुन त्यांनी तक्रारकर्त्यांस कोणत्याही प्रकारची सेवा प्रदान केली नसल्यामुळे ते गैरअर्जदार क्र.2 यांचे ‘ग्राहक’ ठरत नाही. 2. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्त्यांस उपरोक्त ले-आऊट मधील भुखंड क्र.4 व 5 चे विक्रीपत्र करुन दिलेले आहे व सदर भुखंड मिहान प्रकल्पाकरीता राखीव ठेवण्यात आले असुन सदर भुखंडाचा प्रत्यक्षात ताबासुध्दा गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्त्यांस दिला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, विक्रीपत्र करुन दिल्यानंतर प्रत्यक्षात भुखंडाचा ताबा न देणे ही गैरअर्जदाराचे सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्यांस सदर ले-आऊटमधील तेवढयाच क्षेत्रफळाचे म्हणजेच 3100 चौ.फूटाचे दुसरे दोन भुखंड द्यावे, जर तसे करणे शक्य नसेल तर आजच्या बाजार भावाप्रमाणे तक्रारकर्त्यांना रक्कम अदा करावी, असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र.2 विरुध्दची तक्रार खारिज करण्यांत येते. 3. तक्रारकर्त्यांनी शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.25,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव वाटत असल्यामुळे न्यायोचितदृष्टया तक्रारकर्ते शारीरिक, मानसिक करीता प्रत्येकी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.5,000/- मिळण्यांस ठरतात असे मंचाचे मत आहे. 4. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदार क्र.1 यांनी सेवेत त्रुटी दिल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदार क्र.1 यांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्यांना भुखंड क्र.4 व 5 चे ऐवजी सदर ले-आऊटमधील तेवढयाच क्षेत्रफळाचे म्हणजेच 3100 चौ.फूटाचे दुसरे दोन भुखंड द्यावे, जर तसे करणे शक्य नसेल तर आजच्या बाजार भावाप्रमाणे तक्रारकर्त्यांना रक्कम अदा करावी. 4. गैरअर्जदार क्र.1 यांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्यांना प्रत्येकी शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.5,000/- अदा करावे. 5. गैरअर्जदार क्र.2 विरुध्दची तक्रार खारिज करण्यांत येते. 6. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र.1 यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी अन्यथा भाजार भावाप्रमाणे देय रकमेवर भुखंड क्र.4 व 5 चे विक्रीपत्र करुन दिल्याच्या दिनांक 14.11.1994 पासुन द.सा.द.शे.9% व्याज रक्कम अदा होईपर्यंत देय राहील.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |