नि.क्र.35
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 300/2010
------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 30/06/2010
तक्रार दाखल तारीख : 01/07/2010
निकाल तारीख : 03/02/2012
-----------------------------------------------
1. अनंतराव बाबुराव राऊत
वय वर्षे – सज्ञान, धंदा – शेती व व्यापार
2. उदय अनंतराव राऊत
वय वर्षे – सज्ञान, धंदा – शेती व व्यापार
3. सौ सुवर्णा उदय राऊत
वय वर्षे – सज्ञान, धंदा – शेती व व्यापार
सर्व रा.साईकृपा बिल्डींग, आंबेडकर रोड,
एस.टी.स्टँडजवळ, सांगली. ...... तक्रारदार
विरुध्द
1. सौ सरोजिनी काशिनाथ इचलकरंजे
वय– सज्ञान, धंदा – शेती
2. सचिन काशिनाथ इचलकरंजे
वय– सज्ञान, धंदा – शेती
3. काशिनाथ शिवलिंगाप्पा इचलकरंजे
वय– सज्ञान, धंदा – शेती
नं.1 ते 3 रा. देवल कॉम्प्लेक्स,
फ्लॅट नं.7, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी,
आंबेडकर रोड, मिरज
4. सहाय्यक अभियंता,
महाराष्ट्र राज्य वितरण कं.लि.
ग्रामीण विभाग, शनिवार पेठ, मिरज
5. महाराष्ट्र राज्य वीत वितरण कं.लि. तर्फे
कार्यकारी अभियंता (ग्रामीण)
विश्रामबाग, सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड एस.एस.रेठरेकर
जाबदारक्र.1 ते 3 तर्फे : अॅड एस.सी.करंदीकर
जाबदारक्र.4 व 5 तर्फे : अॅड सी.डी.घोरपडे
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. अनिल य.गोडसे
1. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज त्यांचे विद्युत मीटरबाबत जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत दाखल केला आहे.
2. सदर तक्रार अर्जाचा तपशिल पुढीलप्रमाणे-
तक्रारदार क्र.2 व 3 हे पती-पत्नी असून तक्रारदार क्र.2 हा तक्रारदार क्र.1 यांचा मुलगा आहे. सर्व तक्रारदार हे एकत्र कुटुंबातील राहणारे आहेत. तसेच जाबदार क्र.1 ते 3 हेही एकत्र कुटुंबातील राहणारे आहेत. जाबदार क्र.5 ही विद्युत वितरण कंपनी असून जाबदार क्र.4 ही त्यांची शाखा आहे. तक्रारदार क्र.1 यांनी जाबदार क्र.1 व 2 यांचे मालकीची मालगांव हद्दीतील गट नं.2398 मधील 64.88 आर क्षेत्र दि.27/12/2007 रोजी खरेदी घेतले आहे. तसेच त्याच दिवशी तक्रारदार क्र.2 व 3 यांनी जाबदार क्र.3 यांच्या मालकीची गट नं.2399/1 मधील 64.88 आर क्षेत्राची जमीन त्यातील बोअर व इलेक्ट्रीकल कनेक्शनसह खरेदी केली आहे. जाबदार क्र.1 ते 3 हे एकत्र कुटुंबात रहात असून गट नं.2399/1 मध्ये बोअर असून सदर बोअरवर असणारे इलेक्ट्रीक कनेक्शन हे जाबदार क्र.1 सरोजिनी इचलकरंजे यांचे नावे होते. सदरच्या वीज कनेक्शनसह अर्जदारांना खरेदीपत्र करुन दिलेले आहे. खरेदी देईपर्यंत वीज बिल भरण्याची जबाबदारी जाबदार क्र.1 ते 3 यांचीच होती. खरेदीपत्रानंतर अर्जदारांनी नाव बदलण्यासाठी अर्ज केलेला होता. तरीही त्यांना जाबदार क्र.1 यांच्या नावाने वीजबिल आलेले होते. त्या बिलाप्रमाणे अर्जदार यांनी सर्व रक्कम भरली आहे. जाबदार क्र.1 यांनी आपले नावाने असलेले इलेक्ट्रीक कनेक्शन बंद करण्यासाठी बेकायदेशीररित्या अर्ज केलेला होता व त्याप्रमाणे जाबदार क्र.4 यांनी संगनमताने विद्युत कनेक्शन बंद करुन मीटर काढून नेले.
3. अर्जदार क्र. 2 यांनी नवीन व ज्यादा कनेक्शन मिळणेसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे अर्ज केला होता. त्याप्रमाणे त्यांना नवीन कनेक्शन घरगुती उपयोगासाठी सप्टेंबर 2009 मध्ये देण्यात आले असून शेतीसाठी दि.2/9/2009 रोजी नवीन कनेक्शन देण्यात आलेले आहे. सदर विद्युत कनेक्शनच्या आधारे अर्जदार हे त्यांच्या द्राक्ष बागेस पाणी देत होते. जाबदार क्र.1 यांच्या नावे असलेल्या विद्युत कनेक्शनची थकबाकी रु.14650/- होती सदर थकबाकीची रक्कम भरण्याची सर्वस्वी जबाबदारी जाबदार क्र.1 ते 3 यांची होती. ती रक्कम भरण्याचा अर्जदार यांचा कोणताही संबंध नव्हता. तरीही जाबदार क्र.4 यांनी अर्जदार क्र.2 यांचे विद्युत कनेक्शन बेकायदेशीररित्या बंद केले. अर्जदार यांनी त्यांचे विद्युत कनेक्शन चालू करण्याबाबत विनंती केली असता थकबाकीची रक्कम भरलेशिवाय विद्युत कनेक्शन चालू करणार नाही असे जाबदार यांनी सांगितल्यामुळे अर्जदार यांनी दि.14/5/2010 रोजी सदरची रक्कम चेकने भरली व त्यानंतर जाबदार क्र.4 यांनी दि.15/5/2010 रोजी खंडीत केलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करुन दिला. अर्जदार क्र.2 चे नावे असलेले कनेक्शन जाबदार क्र.1 यांच्या थकबाकीपोटी बंद करण्याचा कोणताही अधिकार जाबदार क्र.4 यांना नाही. जाबदार यांनी दिलेल्या या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज भरलेली रक्कम परत मिळणेसाठी तसेच शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेला आहे.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.3 ला शपथपञ व नि.5 च्या यादीने 8 कागद दाखल केले आहेत.
4. जाबदार क्र.1 ते 3 यांनी नि.12 वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदारांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार हे त्यांचे ग्राहक होत नाहीत या कारणास्तव तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे नमूद केले. खरेदीपत्रानंतर अर्जदार क्र.2 यांनी विद्युत कनेक्शन त्यांचे नावे करुन घेतले नाही त्यामुळे नाईलाजास्तव जाबदार क्र.1 यांना तिच्या नावावर राहिलेले कनेक्शन बंद करावे असा अर्ज द्यावा लागला. जाबदार नं.1 यांच्या नावावर जमीन खरेदी केली त्या तारखेपर्यंत कोणतीही थकबाकी नव्हती. त्यामुळे जाबदार क्र.1 यांची रु.14,650/- ची थकबाकी होती ही बाब जाबदार यांनी नाकारली आहे. जाबदार क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिली नाही. सबब तक्रारदार यांचा तक्रारअर्ज सदर जाबदारांचेविरुध्द फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.13 ला शपथपत्र दाखल केले आहे.
5. जाबदार क्र.4 व 5 यांनी नि.20 वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदारांनी आपल्या म्हणण्यामध्ये जाबदार क्र.1 सरोजिनी काशिनाथ इचलकरंजी यांचे नावे गट नं.2399/1 मध्ये वीज कनेक्शन होते ही बाब मान्य केली आहे. तक्रारदार यांनी दि.27/12/2007 रोजी जमीन खरेदी केली आहे. जमीन खरेदी केले नंतरचे बिल भरणेची जबाबदारी तक्रारदार यांचीच आहे. रक्कम रु.14,650/- ही थकबाकी सप्टेंबर 2009 ते जानेवारी 2010 या कालावधीतील आहे. या कालावधीमध्ये कनेक्शन जाबदार क्र.1 यांचे नावे असले तरी त्याचा वापर अर्जदार यांनी केलेला आहे. त्यामुळे खरेदीनंतरची वीजबिले अर्जदार यांनी भरलेली आहेत. जाबदार क्र.1 यांच्या थकबाकीपोटी तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा सदर जाबदार यांनी केव्हाही बंद केलेला नाही. अर्जदार व जाबदार क्र.1 ते 3 यांचेमध्ये वीजबिलाबाबत वाद उपस्थित झालेला आहे. जाबदार क्र.1 यांनी आपल्या नावचे कनेक्शन बंद केले त्याचा राग मनात धरुन तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. अर्जदार यांच्या नवीन कनेक्शनचे विद्युत कनेक्शन जाबदार यांनी कधीही बंद केले नव्हते. त्यामुळे ते दि.15/5/2010 रोजी पूर्ववत चालू करण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. सबब तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.21 ला शपथपत्र दाखल केले आहे.
6. तक्रारदार यांनी याकामी नि.22 ला प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये जाबदार यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदारतर्फे नि.26 ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार क्र.1 ते 3 यांनी नि.31 वर आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व जाबदार क्र.4 व 5 ला 32 ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार क्र.1 ते 3 यांनी नि.33 वर तर जाबदार क्र.4 व 5 यांनी नि.34 वर तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरशिस दाखल केली आहे. तक्रारदार हे तोंडी युक्तिवादासाठी उपस्थित राहिलेले नाहीत.
7. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, प्रतिउत्तर, लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात का ? तक्रारदार क्र.2 हे जाबदार क्र.
4 व 5 यांचे ग्राहक होतात.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे का ? नाही.
3. तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळणेस पात्र आहेत
का ? नाही.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेचन -
8. मुद्दा क्र.1
तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज जमीन खरेदी देणार जाबदार क्र. 1 ते 3 व विद्युत वितरण कंपनी जाबदार क्र.4 व 5 यांचेविरुध्द दाखल केला आहे. तक्रारदार यांनी जाबदार क्र. 1 ते 3 यांचेकडून शेतजमीन, त्यामध्ये असलेल्या बोअर व इलेक्ट्रीक कनेक्शनसह खरेदी केली आहे असे कथन केले आहे. जाबदार क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार हे त्यांचे ग्राहक होत नाहीत असा प्राथमिक मुद्दा उपस्थित केला आहे. तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 ते 3 यांचेकडून जमीन खरेदी केलेली आहे. तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 ते 3 यांचेकडून मोबदला देवून कोणतीही वस्तू अथवा सेवा घेतलेली नाही. तक्रारदार व जाबदार क्र.1 ते 3 यांचेतील व्यवहार हा जमीन खरेदीबाबतचा असल्याने ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार तक्रारदार हे जाबदार क्र.1 ते 3 यांचे ग्राहक होणार नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
तक्रारदार क्र.2 यांनी जाबदार क्र.4 व 5 यांचेकडून त्यांच्या खरेदी घेतलेल्या शेतासाठी नवीन विद्युत कनेक्शन घेतलेले आहे. त्यामुळे तक्रारदार क्र.2 हे जाबदार क्र.4 व 5 यांचे निश्चितच ग्राहक होतात असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
9. मुद्दा क्र.2 व 3 एकत्रित
प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.1 ते 3 यांचे तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत असा निष्कर्ष वरील मुद्याच्या कामी काढण्यात आला असल्याने जाबदारांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे का ? या मुद्याचा विचार करताना जाबदार क्र.4 व 5 यांनी तक्रारदार क्र.2 यांना सदोष सेवा दिली आहे का? हे पाहणे क्रमप्राप्त ठरते. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारअर्जाचे अवलोकन करता तक्रारदार यांनी काही अनावश्यक बाबींचा तक्रारअर्जामध्ये ऊहापोह केलेला आहे. तक्रारदार यांचा तक्रारअर्जातील वादाचा विषय हा खरेदी घेतलेल्या शेतजमीनीतील असलेल्या बोअरवरील विद्युत कनेक्शनबाबतचा आहे. सदरचे बोअर हे गट नं.2399/1 मध्ये आहे. सदरची जमीन ही जाबदार क्र.3 यांनी तक्रारदार क्र.2 व 3 यांना खरेदी दिली आहे. सदरच्या बोअरवर असणारे वीज कनेक्शन हे जाबदार क्र.1 यांच्या नावचे आहे. सदर वादविषयाशी तक्रारदार क्र.1 जाबदार क्र.2 यांचा तसेच झालेल्या दुस-या खरेदीखताचा कोणताही संबंध नाही ही बाब याठिकाणी प्रामुख्याने स्पष्ट करणे गरजेचे आहे. गट नं.2399/1 मधील जमीनीचे खरेदीखत हे दि.27/12/2007 रोजी करण्यात आले आहे. सदरचे खरेदीखत हे जाबदार क्र.3 काशिनाथ इचलकरंजे यांनी करुन दिले आहे. सदरच्या खरेदीखतामध्ये इलेक्ट्रीक कनेक्शनचा उल्लेख असला तरी सदरचे इलेक्ट्रीक कनेक्शन हे जाबदार क्र.1 यांचे नावचे आहे ही बाब विचारात घेता सदरचे इलेक्ट्रीक कनेक्शनचा खरेदीखतामध्ये उल्लेख करणेबाबत जाबदार क्र.1 यांची संमती घेण्यात आलेली दिसून येत नाही. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये सदर इलेक्ट्रीक कनेक्शनची थकबाकी रु.14,650/- सदर तक्रारदार यांचेकडून जाबदार क्र.4 व 5 यांनी भरुन घेतली असे नमूद केले आहे. खरेदी तारखेपर्यंत सदर विद्युत कनेक्शनची थकबाकी होती काय हे या ठिकाणी पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेल्या विद्युत देयकांचे अवलोकन केले असता नि.5/3 वर दि.1/10/2007 ते 31/12/2007 या कालावधीचे विद्युत देयक दाखल असून त्यामध्ये वीज वापर तीन युनिट दर्शविला आहे व मागील थकबाकी -1.34 दर्शविण्यात आली आहे. यावरुन खरेदी तारखेपर्यंत सदर इलेक्ट्रीक कनेक्शनबाबत कोणतीही थकबाकी नव्हती ही बाब स्पष्ट होते. त्यानंतरच्या कालावधीचे विद्युत बिल तक्रारदार यांनी अदा केले आहे व तक्रारदार यांनी सदरची बाब मान्य केली आहे. यावरुन खरेदी केलेल्या तारखेनंतर वापर केलेल्या विद्युत देयकाची रक्कम तक्रारदार यांनी वेळोवेळी भरली असल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी रु.14,650/- या थकबाकीचा जो उल्लेख केला आहे व सदरची थकबाकी भरली नाही म्हणून तक्रारदार यांच्या नावचे असणारे विद्युत कनेक्शन जाबदार यांनी बंद केले व सदर थकबाकी भरल्यावर ते पुन्हा चालू केले असे आपल्या तक्रारअर्जामध्ये नमूद केले आहे. सदरची बाब जाबदार क्र.4 व 5 यांनी नाकारली आहे. तक्रारदार यांचे विद्युत कनेक्शन जाबदार यांनी केव्हाही खंडीत केलेले नाही असे नमूद केले आहे. तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा खंडीत केला होता असे दाखविण्यासाठी तक्रारदार यांनी कोणताही पुरावा याकामी दाखल केलेला नाही. रु.14,650/- ची थकबाकी ही सप्टेंबर 2009 ते जानेवारी 2010 या कालावधीची आहे असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. सदर थकबाकीची रक्कम ही खरेदी केलेल्या तारखेनंतरची असल्याने सदरचे विद्युत देयक तक्रारदार यांनी अदा केले या जाबदार यांचे कथनामध्ये मंचास तथ्य वाटते. विद्युत देयकाबाबत वाद उपस्थित होत असल्याने व तक्रारदार यांनी विद्युत कनेक्शन त्यांच्या नावे करुन न घेतल्याने जाबदार क्र.1 यांनी त्यांच्या नावे असलेले विद्युत कनेक्शन बंद करण्यासाठी अर्ज दिला त्याप्रमाणे जाबदार क्र.4 व 5 यांनी बोअरवरील विद्युत कनेक्शन बंद केले. यामध्ये जाबदार क्र.4 व 5 यांचा कोणताही सेवादोष दिसून येत नाही. वरील सर्व विवेचनावरुन जाबदार क्र.4 व 5 यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली हे तक्रारदार यांनी सिध्द केलेले नाही सबब तक्रारदार हे मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहेत.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
सांगली
दि. 03/02/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत – तक्रारदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /2012
जाबदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /2012