जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २११/२०११
श्री.महेंद्र शरदचंद्र पाटील ....... तक्रारदार
विरुध्द
१. सौ.लीना मोहन आंबोळे
२. श्री.मोहन बसाप्पा आंबोळे
३.आयुक्त, सांगली मिरज आणि कूपवाड
शहर महानगरपालिका
सांगली. ....... जाबदार
नि. १ वरील आ दे श
१. प्रस्तुत तक्रारअर्ज आज रोजी मंचासमोर दाखल करुन घेणेसाठी (Admission) ठेवणेत आला. तक्रार अर्जासोबतची कागदपत्रे व शपथपत्र यांचे अवलोकन केले. तक्रारदाराचे विधिज्ञांना तक्रारदार हे जाबदार क्र.३ चे ग्राहक कसे होतात? व तक्रार अर्ज मुदतीत आहे का? याबाबत युक्तिवाद करणेस सांगण्यात आले. तक्रारदाराचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ व २ यांनी विकसीत केलेल्या राहूल एम्पायर या इमारतीमधील रहिवाशी सदनिका दि.३१/१०/२००१ रोजीचे नोंदणीकृत खरेदीपत्राव्दारे खरेदी घेतली आहे. सदर इमारत विकसीत करताना नकाशामध्ये जे पार्किंग सुचविले आहे त्या पार्किंगच्या जागेचा वापर करणे अशक्य असतानाही जाबदार क्र.३ यांनी नकाशा मंजूर करुन दिला आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जागेमध्ये रजिस्टर खरेदीदस्ताने त्यांना इमारतीच्या मोकळया जागेमध्ये त्यांचे चारचाकी वाहन लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तक्रारदार हे इमारतीच्या दक्षिण बाजूस असणा-या जागेमध्ये चारचाकी वाहन लावत असून त्याचा ते वाहनतळाकरीता वापर करीत आले आहेत. उघडयावर वाहन लावण्यास अडचण निर्माण झालेने तक्रारदार यांनी ऑक्टोबर, २००९ मध्ये चारचाकी वाहन लावत असलेली जागा पत्र्याचे छप्पर घालून बंदिस्त करुन घेतली आहे. जाबदार क्र.३ यांनी तक्रारदार यांना सदरचे वाहनतळ काढून घेणेसाठी दि.२०/०४/२०११ रोजी नोटीस दिली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तसेच जाबदार क्र.३ विरुध्द त्यांनी वाहन तळ काढण्याची कारवाई करु नये? अशी मागणी करणारा तूर्तातूर्त मनाई अर्ज सादर केला आहे.
२. तक्रारदार हे जाबदार क्र.१ व २ यांचे ग्राहक होतात तसेच जाबदार क्र.१ व २ यांनी जाबदार क्र.३ यांचेकडे बांधकाम परवानगीकामी फी भरुन परवानगी घेतली असलेने जाबदार क्र.३ चे अप्रत्यक्षरित्या ग्राहक झाले आहेत असे तक्रारदाराने आपल्या अर्जात नमूद केले आहे. बांधकाम परवानगीसाठी योग्य ती फी भरुन बांधकाम परवानगी घेणेमध्ये सेवा देणे व घेणे या गोष्टींचा अंतर्भाव होत नाही. सदरची परवानगी ही जाबदार क्र.१ व २ यांनी घेतली आहे त्यामुळे तक्रारदार हे जाबदार क्र.३ यांचे ग्राहक होणेचा कोणताच प्रश्न उद्भवत नाही त्यामुळे तक्रारदार हे जाबदार क्र.३ यांचे ग्राहक होत नाहीत असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांना वाहनासाठी खुली जागा वापरणेस परवानगी दिलेली असताना तक्रारदार यांनी त्यावर बंदिस्त शेड उभारले आहे व सदरचे बंदिस्त शेड काढून टाकणेची नोटीस आल्यावर प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केला आहे. जाबदार क्र.१ व २ यांचेविरुध्द तक्रारदार याने पार्किंगच्या जागेबाबत दाद मागितली आहे. तक्रारदार यांनी सदनिकेचा ताबा सन २००१ मध्ये घेतला आहे व प्रस्तुतचा तक्रार अर्ज सन २०११ मध्ये दाखल केला आहे. सदरचे खरेदीखत करुन घेतलेनंतर व सदनिकेचा ताबा घेतलेनंतर जवळजवळ १० वर्षांनी तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मुदतबाहय झाला आहे. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज दाखल (Admit) करुन न घेता काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.२९/०७/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११