उपस्थिती तक्रारकर्त्या तर्फे ऍड.एस.बी.राजनकर
तक्रार व दस्त हाच लेखी युक्तिवाद समजावा अशी पुरसीस दिली.
विरुध्द पक्ष 1 तर्फे ऍड. व्ही.टी.लालवानी.
विरुध्द पक्ष 1 डिलर तर्फे ऍड. लालवानी हजर.
त्यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला.
विरुध्द पक्ष 2 तर्फे ऍड.एन.आर.मचाडे
वि.प. 2 उत्पादक कंपनी तर्फे ऍड.मचाडे हजर.
त्यांनी उत्तर व दस्त हाच लेखी युक्तिवाद समजावा अशी पुरसीस दिली.
सदर प्रकरण दि. 29/02/2012 रोजी आदेशासाठी होते. या मंचातील कामाचा हा शेवटचा दिवस होता. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे अध्यक्ष मंचात उपस्थित राहू शकले नाहीत. तशी सूचना रजिस्ट्रार यांना सकाळी 10.00 वाजता फोन द्वारा देण्यात आली होती व त्यानंतर रीतसर वैद्यकीय रजेचा अर्ज (दि. 29 फेब्रुवारी, 1,2,3 मार्च ) पाठविण्यात आला आहे. दि. 1 ते 15 मार्च पर्यंत गोंदिया मंच कार्यरत नव्हते. म्हणून आज दि. 16 मार्च रोजी हा आदेश पारित करण्यात येत आहे.
( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा, श्रीमती आर.डी.कुंडले)
-- निकालपत्र --
( पारित दि. 16 मार्च 2012)
तक्रार सदोष बियाणेमुळे उगवण कमी झाली. परिणामी उत्पन्न कमी आले म्हणून दाखल आहे.
1 तक्रारकर्त्याने दिनांक 21/06/2011 रोजी विरुध्द पक्ष 1 डिलर कडून 2 बॅग प्रत्येकी 12 कि. ‘‘सुप्रीम सोना’’ या नावांच्या धानाची बिजाई प्रति बॅग रु.550/- प्रमाणे एकूण रु.1100/- मध्ये खरेदी केले.
2 दि. 24.06.2011 रोजी बियाण्याची पेरणी केली. तक्रारकर्त्यानुसार धानाची उगवण फक्त 20% झाली. म्हणून त्याबद्दल दि. 6.7.2011 रोजी तक्रारकर्त्याने कृषि अधीक्षक गोंदिया यांच्याकडे तक्रार केली. त्यावर कृषि अधिका-याने व संबंधित इतरांनी दि. 19.07.2011 रोजी शेताची पाहणी केली व पंचनामा केला.
3 तक्रारकर्त्याने दोन एकर पे-यासाठी धान 24 कि. ( 2 बॅग) विकत घेतले होते. उगवण कमी झाल्याने जेवढे रोपे उगविले ती केवळ एकाच एकरात पुरतील असे पंचनाम्यात नमूद आहे. बियाणे मुदतबाहय असल्याचेही पंचनामा म्हणतो. तक्रारकर्त्याला पूर्ण उगवण झाली असती तर एकरी रुपये 15000/- चे उत्पन्न झाले उसते असे तक्रारकर्ता म्हणतो. उगवण झालेल्या रोपाची लागवड तक्रारकर्त्यानुसार केवळ अर्ध्या एकरात करता आली. उर्वरित दिड एकर शेत रिकामे राहिले. एकरी रुपये 15000/- चे नुकसान धरल्यास तक्रारकर्त्याचे दिड एकर शेत रिकामे राहिल्याने रुपये 22,500/- चे नुकसान झाले.
4 हे बियाणे मुदतबाहय झालेले असतांना ही विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी विक्रीसाठी बाजारात ठेवले ही त्यांच्या सेवेतील त्रृटी आहे. तसेच अनुचित व्यापार प्रथा आहे असे तक्रारकर्ता म्हणतो. म्हणून तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसान भरपाईस विरुध्द पक्ष 1 व 2 हे जबाबदार ठरतात.
5 तक्रारीचे कारण दि. 21.06.2011 या दिवशी (खरेदीची तारीख) घडले.
6 तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत एकूण 6 कागपत्रे जोडली आहेत.
7 तक्रारकर्त्याची प्रार्थना खालीलप्रमाणे
(अ) विरुध्द पक्ष 1 व 2 यांच्या सेवेत त्रृटी आहे असे जाहीर करावे. दिड एकर शेत रिकामे राहिल्याने रुपये 22,500/- (एकर रुपये 15000/- उत्पन्न अपेक्षित) नुकसान भरपाई विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी देण्याचा आदेश व्हावा.
(ब) शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- मिळण्याचा आदेश व्हावा.
विरुध्द पक्ष 1 डिलर चे उत्तर थोडक्यात खालीलप्रमाणे .
8. तक्रारकर्त्याला ही तक्रार दाखल करण्यासाठी Locus नाही. कारण धान खरेदीचे बिल तक्रारकर्त्याच्या नांवे नाही. म्हणून तक्रारकर्ता ‘ग्राहक’ठरत नाही. ही तक्रार मंचासमोर चालू शकत नाही असा प्राथमिक आक्षेप आहे.
9 उत्तरात वि.प. 1 यांनी दि. 21.06.2011 चे बिल व उत्तर सर्व तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त अमान्य केलेले आहे. पुढे वि.प. 1 म्हणतात की, तक्रारकर्ता शुध्द हेतूने मंचासमोर आला नाही. त्यानी अनेक गोष्टी जाणीवपूर्वक उघड केल्या नाही. खोटी तक्रार केली आहे. वि.प.1 चे कृषिधिका-याचे संबंध चांगले नाही याचा फायदा घेऊन तक्रारकर्ता व कृषिधिकारी यांनी संगनमत केले आहे. तक्रारकर्त्याने दि. 21.06.2011 रोजी बियाणे खरेदी केले व उगवण झाली नसल्याची तक्रार दि. 6.7.2011 रोजी केली. परंतु, त्यांनी पेरणी कोणत्या तारखेला केली, पाणीपुरवठा केला किंवा नाही याबद्दल काहीही नमूद केले नाही. वि.प. 1 चे नांव (Good Will) खराब करण्याचा तक्रारकर्त्याचा प्रयत्न आहे.
10 दोषपूर्ण बियाणे संदर्भात तक्रारकर्त्याने तज्ञांचा अहवाल सादर केला नाही. संपूर्ण पिकाचे नुकसान झाल्याबद्दल तक्रारकर्त्याची तक्रार नाही. फक्त काही बियाणे उगविले नाही असे तक्रारकर्ता म्हणतो. कमी उगवणिसाठी अनेक गोष्टी अंतर्भूत ठरतात. जसे हवा-पाणी, जमिनीचा दर्जा, पोषक किंवा मारक वातावरण इत्यादी. तक्रारकर्त्याच्या 7/12 च्या उता-यात शेतात ओलित होते काय ते नमूद नाही. अन्य लोकांनी या वाणाचे बियाणे पेरले. त्यांची तक्रार नाही. बियाणे प्रमाणित असल्याने (सत्यता दर्शक) ते दोषपूर्ण नाही.
11 मुदत बाहय झालेले बियाणे वि.प. 1 ने विकले . ही तक्रारी ही निराधार आहे असे होते तर तक्रारकर्त्याने तेव्हाच ते पेरण्या ऐवजी परत करायला पाहिजे होते. कंपनीच्या धोरणानुसार तक्रारकर्त्याला ते बदलून दिले असते.
12 या प्रकरणात मोठया प्रमाणात साक्षी पुराव्याची गरज असल्याने मंचाच्या समरी ज्युरिडिक्शन मध्ये ते चालू शकणार नाही. वि.प. 1 च्या सेवेत त्रृटी नाही महणून खर्चासह तक्रार खारीज होण्यास पात्र ठरते.
विरुध्द पक्ष 2 उत्पादकाच्या उत्तरानुसार
13 वि.प. 1 प्रमाणेच Locus नाही. तक्रारकर्ता ‘ग्राहक’ ठरत नाही असा प्राथमिक आक्षेत घेतलेला आहे.
14 कमी उगवणी बाबत तक्रारकर्त्याने वि.प. 2 कडे तक्रार केली नाही. बियाणे खरेदी वि.प. 1 कडून केली हे स्पष्ट होत नाही. कारण बिलावर बॅच नंबर, मुदत इत्यादी तपशील नमूद नाही.
15 बियाण्यांची वैधता दि. 13.02.2011 पर्यंतच होती, तर तक्रारकर्त्याने दि. 21.06.2011 रोजी हे बियाणे मुदतबाहय म्हणून खरेदी करायला नको होते.
16 तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त 1 , 2 व 3 ते 6 खोटे आहे.
17 दि.21.06.2011 रोजी तक्रारीस कारण घडले हे वि.प. 2 अमान्य करतात.
18 वि.प. 1 ने मुदतबाहय बियाणे विकले असल्यास त्याची माहिती वि.प.2 ला नाही.
19 तक्रारकर्त्याची तक्रार मंचासमोर चालविणे योग्य नसल्याने खर्चासह ताबडतोब खारीज करावी.
20 वि.प. 2 उत्पादक कंपनीला त्याचा तक्रारकर्त्याशी किंवा वादाशी कोणताही संबंध नसल्याने विनाकारण गोविण्यात आले आहे. दि. 19.07.2011 रोजीचा पंचनामा करतांना वि.प. 2 यांना सूचना देण्यात आली नाही.
21 मंचाने तक्रारकर्त्याचे व वि.प. 1 व 2 च्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. रेकॉर्डवरील संपूर्ण कागदपत्रे तपासली.
मंचाची निरीक्षणे व निष्कर्ष
22 तक्रारकर्त्याने दि. 21.06.2011 रोजी विरुध्द पक्ष 1 डिलर कडून दोन बॅग धान प्रत्येकी 12 किलो रुपये 550/- प्रत्येकी बॅग प्रमाणे बियाणे खरेदी केले हे बिलावरुन स्पष्ट होते असा मंचाचा निष्कर्ष आहे.
23 7/12 च्या उता-यावर तक्रारकर्त्याचे नांव आहे. म्हणून तक्रारकर्त्याने स्वतःच्या मालकिच्या शेतात पेरण्यासाठी हे बियाणे खरेदी केले हे सुध्दा स्पष्ट होते. प्रत्यक्षात खरेदी तक्रारकर्त्याच्या मुलाने केल्याने बिलावर तक्रारकर्त्याच्या मुलाचे नांव आहे असे असले तरी त्यामुळे तक्रारकर्त्याच्या ‘’ग्राहक’’ या दर्जाला बाधा पोहचत नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. म्हणून या संदर्भातील वि.प. 1 व 2 ची तक्रारकर्त्याला Locus नसल्याबद्दलचा व तक्रारकर्ता ‘’ग्राहक’’ नसल्याबद्दलचा आक्षेप हे मंच फेटाळून लावते.
24 दि. 21.06.2011 रोजी खरेदी केलेले धान तक्रारकर्त्याने दि. 24.06.2011 रोजी पेरले. तक्रारकर्त्यानुसार उगवण केवळ 20% झाली म्हणून दि. 6.7.2011 रोजी तक्रारकर्त्याने संबंधित कृषि अधिका-यांकडे तक्रार केली.
25 संबंधित कृषि अधिका-यांनी दि. 19.07.2011 रोजी प्रत्यक्ष शेताची पाहणी केली. या पाहणीच्या वेळी खालील तज्ञं व्यक्ति उपस्थित होते.
25 1. कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया
25 2. मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया.
3. कीटक शास्त्र तज्ञ, कृ.वि.के. हिवरा.
4. जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, गोंदिया
5. तालुका कृषि अधिकारी, आमगांव.
6. क्षेत्रीय अधिकारी, महाबीज गोंदिया.
7. कृषि अधिकारी, पंचायत समिती, आमगांव.
या पुढे तक्रारकर्ता व त्याच्या मुलाचे ही नांव असून त्यांची नांवे व सहया आहेत. या सर्वांच्या सहया पंचनाम्यावर आहेत. तज्ञांनी उगवण 40 ते 45% झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. मंचाला हा पंचनामा तंज्ञाच्या उपस्थित केल्याने ग्राहय वाटते. यावरुन बियाण्यांची उगवण केवळ 40 ते 45% झाली. कारण बियाणे मुदतबाहय होते असा निष्कर्ष पंचनाम्यावरुन हा मंच नोंदविते.
26 रेकॉर्डवरील पेज नं. 20 वर (डाक्युमेंट नं. 2 ) बियाण्याची उगवण क्षमता 80% नमूद आहे. तक्रारकर्त्याचे बियाणे अर्धे अधिक उगविल्याने ते सदोष होते असा निष्कर्ष निघतो. तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसान झाले असेही पंचनामा म्हणतो.
27 विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी कमी उगवण झाल्याबद्दल तक्रारकर्त्याला दोष दिला आहे. तक्रारकर्त्याने पेरणीच्या आधि, पेरणी करतांना व पेरणी नंतर काळजी घेतली नसावी. खत, पाणी योग्य दिले नसावे. पक्षी मुग्या यांनी बियाणे खाऊन टाकले असावे असे अतार्किक प्रश्न उपस्थित केले. मंचाला त्यात तथ्य वाटत नाही. प्रतिकुल नैसर्गिक घटना व प्राणी पक्षी यांच्याद्वारे होणारे नुकसान ग्राहय धरले तरी उगवन 60% नी कमी होत नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. वि.प. 1 व 2 यांनी प्रत्यक्ष पुराव्या द्वारे नैसर्गिक प्रतिकुल घटक कशा प्रकारे कमी उगवणीसाठी जबाबदार ठरले याचा तपशील/पुरावा दिला नाही. कोणताही शेतकरी स्वतःच्या पिकाच्या बाबत जाणूनुबुजून निष्काळजीपणा करीत नाही. कारण त्यावर त्याचे कुटुंब , रोजगार नफा नुकसान इत्यादी अवलंबून असते असे मंच मानते.
28 बियाणे मुदतबाहय झाल्याने कमी उगविले हे तक्रारकर्त्याचे म्हणणे मंचाला ग्राहय वाटते. तज्ञांचा अहवालही तसाच आहे. वादातील बियाण्यांची मुदत दि. 13.02.2011 पर्यंतच होती. या मुदती पूर्वी त्याची विक्री अपेक्षित होती. मुदत निघून गेल्यानंतर हे बियाणे वि.प. 1 व 2 यांनी बाजारातून काढून घ्यायला पाहिजे होते. कारण मुदतबाहय बियाण्याची विक्री seeds Act नुसार गैरकायदेशीर ठरते. मुदत निघून गेलेल्या बियाण्यांची उगवण क्षमता क्षीण होते. हे कोणीही नाकारु शकत नाही. मुदतबाहय बियाण्यांची विक्री करणे ही वि.प. 1 व 2 यांच्या सेवेतील गंभीर त्रृटी आहे व ती ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1) (आर) नुसार ’अनुचित व्यापार प्रथा ’ सुध्दा ठरते असा मंचाचा निष्कर्ष आहे.
29 तक्रारकर्त्याने मुदतबाहय बियाण्यांची खरेदी कां केली किंवा ते बदलून कां घेतले नाही हे वि.प. 1 व 2 यांनी उपस्थित केलेले प्रश्न अप्रस्तुत आहेत. आपली जबाबदारी तक्रारकर्त्यावर ढकलण्याचा तो केविलवाणा प्रयत्न आहे. बियाण्यांची वैधता दि. 13.02.2011 पर्यंतच होती तर या तारखेनंतर वितरक किंवा उत्पादकाने त्याची विक्री करणे गैरकायदेशीर ठरते. तरीही वि.प. 1 ने मुदतीनंतर 4 महिने 8 दिवस पर्यंत या लॉटच्या बियाण्यांची बेकायदेशीर विक्री करुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते असा मंचाचा निष्कर्ष आहे.
30 जेवढी उगवण झाली ती रोपे केवळ एका एकरात खपली( अहवालानुसार), उर्वरित एक एकर शेत रिकामे राहिले. म्हणूनच तक्रारकर्त्याला आर्थिक नुकसान झाले हे मंच ग्राहय मानते.
31 तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई देण्यास वि.प. 1 व 2 जबाबदार ठरतात असा मंचाचा निष्कर्ष आहे.
32 तक्रारकर्त्याने वि.प. 1 अथवा 2 कडे कमी उगवणीबाबत तक्रार केली नाही व ती सरळ कृषि अधिका-यांकडे केली. कृषि अधिकारी व वि.प. 1 चे संबंध चांगले नसल्याने तक्रारकर्त्याने व कृषिधिका-याने संगनमत करुन खोटा अहवाल दिला या वि.प. 1 च्या म्हणण्यात तसा कोणताही पुरावा नसल्याने मंचाला तथ्य वाटत नाही. या संदर्भात हे मंच खालील केसचा हवाला देते.
IV (2011) CPJ 264 (NC)
शक्तिवर्धक हायब्रिड सीडस प्रा.लि. व इतर वि. नरसी.
त.क. व कृषी अधिका-यांनी संगनमत करुन खोटा अहवाल दिला हे वि.प.चे म्हणणे पुराव्याअभावी फेटाळले आहे.
33 तक्रारकर्त्याने त्याच्या म्हणण्याच्या समर्थनार्थ खालील 4 केस लॉ दाखल केले आहे.
क) I (2009) CPJ 99 (NC)
नॅशनल सीडस कार्पोरेशन लि. वि. पी.व्ही.कृष्णा रेड्डी
मुदतबाहय बियाणाच्या विक्रीबाबत आहे. --- लागू होतो.
ख) II (2009) CPJ 389 (NC)
हमिद ऍन्ड कं. वि. बसवराजप्प व इतर
सदोष बियाणाबद्दल आहे.
वितरक व उत्पादक दोघांनाही जबाबदार धरले आहे.-- लागू होतो.
ग) II (2009) CPJ 352 (NC)
महाराष्ट्र हायब्रीड सीडस कं.लि. वि. बजरंगलाल यादव व इतर
तथ्य भिन्न असल्याने, लागू होत नाही.
I (2012) CPJ 160 (NC)
मलगोंडा धुळगोंडा पाटील वि. महा. स्टेट सीडस कार्पोरेशन लि. व इतर
बियाणातील भेसळीबद्दल आहे. भेसळीचा मुद्दा हातातील प्रकरणात नसल्याने लागू होत नाही.
34 विरुध्द पक्ष 1 ने दाखल केलेले केस लॉ
अ) 2011 CJ 905 (NC)
महिको सीडस लि. वि. जी व्यंकट सुब्बा रेड्डी व इतर
हा बियाण्याच्या अनुवंशिक शुध्दतेबद्दल आहे. हा मुद्दा इथे नसल्याने लागू होत
नाही.
आ) हरियाणा सीडस डेव्हल्पमेंट कार्पोरेशन लि. वि. साधू व इतर (2005) 2 SCT 569 या प्रकरणात वि. प. उत्पादकांनी – तज्ञांचा अहवाल देऊन त्यांचे बियाणे सदोष
नसल्याचे सिध्द केले होते. ते आ. सर्वोच्च न्यायालयाने ग्राहय मानले. – हातातील प्रकरणात वि.प. 1 व 2 यांनी असा तज्ञांचा अहवाल/परीक्षण -- इ. पुरावा दिला नाही. सबब केस लॉ लागू होत नाही.
35 तक्रारकर्त्याला 35 ते 40% उगवणीतून किती उत्पन्न झाले हे त्याने स्पष्ट केले नाही. म्हणून संपूर्ण नुकसान भरपाईची मागणी मंच मान्य करु शकत नाही.
सबब आदेश
आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष 1, 2 यांनी तक्रारकर्त्याला बियाणे खरेदीची किंमत रुपये 1100/- द्यावे.
3. विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत रुपये5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
4. वि.प.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल रुपये5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) द्यावे
5. वि.प. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला या तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2000/- (अक्षरी-रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
6. विरुध्द पक्ष 1 व 2 यांची जबाबदारी वैयक्तिक आणि संयुक्तिक अशी दोन्ही स्वरुपाची राहील.
आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत करावे.