नि.28 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 86/2011 नोंदणी तारीख – 15/06/2011 निकाल तारीख – 14/10/2011 निकाल कालावधी – 121 दिवस श्री महेंद्र एम गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या ( श्री महेंद्र एम गोस्वामी, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारीत केला) -------------------------------------------------------------------------------- 1. श्री. नागू मनू शेंडे मु.पो.आसू, ता.फलटण,जि.सातारा ----- अर्जदार (वकील श्री.पी.जे.फौजदार) विरुध्द 1. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा शाखा- आसू, ता.फलटण, जि. सातारा (सदरचे समन्स/नोटीस संस्थेचे शाखाप्रमुख श्री. कदम आर.एम.यांचेवर बजावण्यात यावे) 2. विकास अधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा शाखा- आसू, ता.फलटण, जि. सातारा (सदरचे समन्स/नोटीस संस्थेचे शाखाप्रमुख श्री. वाय.डी.सस्ते यांचेवर बजावण्यात यावे) --- विरुध्दपक्षकार क्र.1 व (वकील श्री संग्राम मुंढेकर) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. प्रस्तुत कामातील तक्रारदार हे मु.पो. आसू, ता. फलटण, जि. सातारा येथील रहिवाशी असून त्यांचा शेती हा व्यवसाय आहे. तेथे त्यांची 0.35 हे.आर. जमीन असून तिचा गट नं. 365 असा आहे. अर्जदार सदर जमिनीमध्ये गहू, ऊस इ. प्रकारची उत्पन्न घेवून त्यांचा चरितार्थ चालतो. त्यांचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा शाखा- आसू, येथे बचत खाते असून त्याचा क्र. 144 (जुना क्र.806) आहे. अर्जदार यांना दोन मुले असून त्यातील दत्तात्रय अर्जून शेंडे हे त्यांचेपासून विभक्त राहतात. आणि अर्जदार व त्यांचा दुसरा मुलगा अर्जून नागू शेंडे हे दोघे एकत्र राहतात. अर्जदार यांचा मुलगा श्री. अर्जून नागू शेंडे हेही शेती करतात त्यांची 68 गुंठे शेतजमीन मौजे आसू येथेच आहे. तिचा गट नं. 403 असा आहे. त्यांचा दुसरा मुलगा दत्तात्रय नागू शेंडे हे सुध्दा शेती करतात त्यांचीही 70 गुंठे क्षेत्र असलेली जमीन मौजे आसू येथेच आहे. त्याचा गट क्र. 335/2 असा आहे. अर्जदार यांचा मुलगा दत्तात्रय नागू शेंडे हा दीपगंगा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या., आसू, ता. फलटण या संस्थेचे कर्जदार असू शकतात असे त्याच्या जमीनीचा उतारा पाहील्यानंतर लक्षात येते. अर्जदार व त्यांचा मुलगा अर्जून हे दोघेही दत्तात्रय नागू शेंडे यांचेपासून वेगळे रहात असल्याने व त्याची शेतजमीन त्यांचे स्वतंत्रपणे नावावर असल्याने त्याने संस्थेकडील कर्ज फेडले की नाही याबद्दल अर्जदाराला कोणतीही कल्पना नाही किंवा अर्जदार हे त्यांचे या मुलाला कोणत्याही कर्जाला जामीनदार राहीलेले नाहीत. अर्जदार दरवर्षी आपला ऊस श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग, फलटण, जि. सातारा या कारखान्यामध्ये गाळपासाठी पाठवित असतात. सालाबादप्रमाणे यावर्षीही म्हणजे गळीत हंगाम 2010-11 साठी अर्जदार यांनी आपल्या गट क्र. 365 मधील 30 गुंठे क्षेत्रातील व त्यांचा मुलगा अर्जून नागू शेंडे यांच्या गट क्र. 403 मधील 68 गुंठे क्षेत्रातील एकूण 49.381 इतका ऊस दि.22/4/11 ते 29/4/11 या काळात गाळपासाठी पाठविला आहे. दरम्यानचे काळात अर्जदार यांना औषधोपचारासाठी व इतर काही आर्थिक गरजा भागविण्यासाठी पैशाची गरज भासल्याने दि.9/5/11 रोजी साखर कारखान्याकडून अर्ज करुन रक्कम रु. 60,000/- उचल म्हणून मागितली. त्यानंतर अर्जावर कार्यवाही झाली किंवा कसे याची चौकशी केली असता तेथील अधिका-यानी संपूर्ण रक्कम बँकेच्या आसू शाखेत जमा करणेत येईल असे सांगीतले व कारखान्यास आलेले दिपगंगा विविध कार्यकारी सहकारी सेवा मर्या.,आसू यांनी पाठविलेले पत्र पाहण्यास दिले. सदर पत्रात अर्जदार यांचा मुलगा दत्तात्रय नागू शेंडे हा संस्थेचा कर्जदार असून गट क्र. 335/2 या येथे असलेल्या 70 गुंठे जमिनीतील ऊस वडीलांच्या नावे म्हणजेच नागू मनु शेंडे यांचे नावे कारखान्यास पाठविला आहे तरी संस्थेचे कर्जदार श्री दत्तात्रय शेंडे यांनी संस्थेचे कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने असे कृत्य केले असून नागू मनु शेंडे यांना देण्यात येणारी सर्व रक्कम जप्त करुन संस्थेत जमा करणेचे कळविले. परंतु कारखान्याने त्यांनी दिलेल्या पत्राप्रमाणे कारवाई करता येत नसून सातारा जिल्हा मध्य.सह.बँक लि.सातारा शाखा आसू बँकेतील खात्यावर जमा करीत असलेचे संस्थेस कळविले व रक्कम अर्जदार यांचे खात्यात रक्कम रु.88,885/- दि.27/5/11 रोजी विना कपात जमा करण्यात आली. त्यानंतर दीपगंगा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या., आसू यांनी विरुध्दपक्षकार क्र. 1 व 2 यांना विनंती अर्ज देवून अर्जदारांचे खात्यावरील रक्कम अर्जदारांचे मुलगा दत्तात्रय नागु शेंडे यांच्या कर्जापोटी संपूर्ण रक्कम कपात करणेस विनंती केली. त्याप्रमाणे विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 यांनी कोणतीही चौकशी न करता अर्जदार यांची संपूर्ण रक्कम दत्तात्रय शेंडे याच्या कर्जापोटी वर्ग करण्याचे ठरविले. सदरची बाब अर्जदार यांना कळल्यानंतर अर्जदार व त्यांचा मुलगा अर्जून चौकशीसाठी बँकेकडे गेले व त्यांना वस्तुस्थिती सांगून दत्तात्रय हा मुलगा विभक्त रहात असून त्याची जमीन त्याचे स्वतंत्र नावावर आहे व रेशनकार्डही वेगळे आहे त्यात एकमेंकांचा कांही संबंध नाही व असे असूनसुध्दा दिपगंगा विविध कार्यकारी सहकारी सेवा मर्या.,आसू या संस्थेचे सचिव हे अधिकाराचा गैरफायदा घेवून केवळ अर्जदार व त्यांचा मुलगा दत्तात्रय यांचे पितापुत्राचे नाते असलेचा गैरफायदा घेवून अर्जदार यांचे हक्काचे व कष्टाचे पैसे विनाकारण जप्त करीत असलेबाबत सांगितले व त्यानंतर लगेच अर्जदार यांनी कारखान्याकडून मिळणारी संपूर्ण रक्कम कपात न करता बचतखात्यावर जमा करावी असा अर्ज केला. त्यानंतर बँकेने संस्थेच्या सचिवाच्या विनंती अर्जावरुन अर्जदाराची संपूर्ण रक्कम दत्तात्रय नागू शेंडे याच्या कर्जखात्यावर वर्ग करण्यात आली. वास्तविक अर्जदारांचा मुलगा दत्तात्रय याच्या जमिनीचा गट नं.335/2 असा असून त्याच्या स्वतंत्र नावाने ऊसाची नोंद आहे व व या जमिनीवर संस्थने कर्ज दिले असून त्याची नोंद 7/12 उता-यावर नोंद दिसून येते. त्यामुळे दत्तात्रय नागू शेंडे यांचे संस्थेचे कांही कर्ज बाकी राहीले असल्यास ते त्यांचे जमीनीतून मिळणा-या उत्पन्नातूनच वसुल केले पाहीजे. तसेच अर्जदार हे दत्तात्रय शेंडे याचे कर्जास जामिन नसताना व बँकेचे कोणतेही कर्ज नाही किंवा कोणालाही स्वतःच्या रकमेतून थकीत कर्ज भरुन देण्याबाबत हमीपत्र दिले नसताना कोणतीही पूर्वसूचना न देता व चौकशी न करता विरुध्दपक्षकार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांचे ऊसाचे बिलातून मुलाच्या संस्थेच्या कर्जापोटी रक्कम वर्ग करुन विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 यांनी ग्राहक या नात्याने सदोष सेवा दिलेली आहे. विरुध्दपक्षकार क्र. 1 यांनी विरुध्दपक्षकार क्र. 2 यांचे सल्ल्याने अर्जदार यांचे खात्यावरील ऊसाचे बिलाची रक्कम दीपगंगा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या., आसू यांचेकडे मुलाचे कर्जापोटी वर्ग केलेली रक्कम रु. 88,885/- व्याजासह, आर्थिक व शारिरिक नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.25,000/- तक्रार अर्जाचे खर्चापोटी नुकसानभरपाईची मागणी केलेली आहे. 2. विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 यांनी मंचासमोर हजर होवून नि. 10 कडे आपले म्हणणे व नि. 11 कडे प्रतिज्ञापत्र दाखल करुन अर्जदाराचे बचत खाते असलेचे मान्य करुन तक्रारदारांच्या अन्य तक्रारी नाकारलेल्या आहेत. या विरुध्द पक्षकारांचे कथनानुसार विरुध्दपक्षकार बँक ही सहकार कायद्यामधील तरतूदीस अनुसरुन रजिस्टर्ड सहकारी बँक आहे. त्यामुळे बँकेस महाराष्ट्र सहकारी सोसायटीचा कायदा 1960 मधील सर्व तरतूदींचे पालन करावे लागते व वरील कायदा बंधनकारक आहे. दीपगंगा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या., आसू, ता फलटण जि.सातारा येथील सहकारी संस्था असून तिचे दत्तात्रय नागू शेंडे हे कर्जदार आहेत. दत्तात्रय शेंडे यानी संस्थेमधून कर्ज घेवून आपल्या मालकीच्या आसू येथील गट क्र. 335/2 मधील जमीनीमध्ये ऊसाचे पीक केले होते. मात्र वरील संस्थेची कर्जाची रक्कम बुडविण्याचे वाईट हेतूने दत्तात्रय शेंडे यांनी आपल्या मालकीच्या जमीनीतील ऊस वडिलांचे म्हणजे अर्जदारांचे नावे कारखान्यास घातला. याची माहिती सदर संस्थेस मिळालेनंतर संस्थेने प्रथम साखर कारखान्याकडे तक्रार केली मात्र त्याबाबत कारखाना दाद देत नसल्याने वरील संस्थेने सहकारी कायद्यातील तरतूदीनुसार दि.2/6/11 रोजी विरुध्दपक्षकार यांना रितसर पत्र दिले त्या पत्रास अनुसरुन विरुध्दपक्षकारांनी सहकार कायद्यातील तरतूदींचे पालन करुन ऊसाचे बील हे दत्तात्रय नागू शेंडे यांच्या येणेपोटी संस्थेस पाठवून दिले आहे त्यामध्ये कायद्यास सोडून काहीही केले नसलेचे कथन केले आहे. दत्तात्रय नागू शेंडे यांचा संस्थेस फसविण्याचा प्रयत्न असफल झाल्यामुळे आपले वडिलांमार्फत सदरचा खोटा व लबाडीचा तक्रारअर्ज दाखल केलेला आहे. वास्तविक पाहता अर्जदारांची तक्रारअर्जातील संपूर्ण तक्रार पाहता सदरची तक्रार ही संस्थेविरुध्द व मुलाविरुध्दच दिसून येते अर्जदार यांनी खरी वस्तुस्थिती कोर्टासमोर येवू नये म्हणून मुद्दामच संस्थेला व मुलाला पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. उत्पादित ऊस कोणत्या जमीनीतील आहे व त्याचप्रमाणे त्याचे बिलाचे पैसे कोठे जमा आहेत याची अर्जदार यांना संपूर्ण माहिती आहे. अर्जदार यांनी पाठविलेल्या दि. 4/06/2011 रोजीच्या नोटीसीस दीपगंगा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या., आसू ता फलटण जि.सातारा यांनी आपले वकीलांमार्फत रितसर उत्तर दिलेले आहे याचा उल्लेख जाणीवपूर्वक अर्जदारांनी तक्रार अर्जामध्ये केलेला नाही. सबब विरुध्दपक्षकार यांनी अर्जदारांचा कोणताही विश्वासघात केला नाही किंवा फसवणूक केली नाही. अर्जदार यांचा प्रत्यक्षात ऊस नसल्यामुळे त्याच्या बिलाची रक्कम ही त्यांना मागता येणार नाही त्यामुळे तक्रारदारांची तक्रार ही रद्द होण्यास पात्र असून खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती विरुध्दपक्षकार क्र.1 व 2 यांनी केलेली आहे. 3. तक्रारदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. तसेच नि. 5 सोबत दाखल केलेली 5/1 ते 5/16 कडे कागदपत्रे, नि. 13 कडे तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 15 कडे कागदपत्रे व नि.18 कडे लेखी युक्तीवाद व नि. 26 कडील लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. तसेच विरुध्दपक्षकारांनी म्हणण्यासोबत नि.12 कडे व नि. 21 कडे कागदपत्रे व नि.27 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. 4. प्रस्तुत प्रकरणात उभयपक्षकारांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. तक्रारदार व जाबदार यांचे कागदपत्रे पाहीली. सदर प्रकरणात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तक्रारदाराने त्याचा ऊस श्रीराम जवाहर शेती सहकारी साखर उद्योग, फलटण यांचेकडे दिलेचे दिसून येते व या ऊसाची रक्कम रु. 88,885/- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात विरुध्द पक्षकार यांचेकडे जमा होणार असल्याचेदेखील ऊस खरेदी अडव्हान्स बिल नि. 5/8 वरुन दिसून येते; परंतु सदरची रक्कम तक्रारदाराचे बचत खातेमध्ये विरुध्दपक्षकाराने जमा करुन नंतर दिपगंगा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या.,आसू यांनी दिलेल्या सूचनेवरुन तक्रारदारांचा मुलगा नामे दत्तात्रय शेंडे याचे कर्जखात्यास वर्ग केले. या प्रकरणातील कागदपत्रांचे अवलोकन करता व नि. 20 वर तलाठी मोजे आसू यांनी दिलेले फेरफार पत्रक बघता तक्रारदारांच्या मुलाचा कर्जाचा बोजा कमी झाला असल्याची फेरफार नोंद दि. 20/09/2008 रोजी झाल्याचे दिसून येते. एवढे असतानादेखील विरुध्दपक्षाच्या बँकेने तक्रारदारांच्या ऊसाची रक्कम बेकायदेशीरपणे दिपगंगा विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडे वर्ग केली ही निश्चितच सेवेतील त्रुटी दर्शविते. 5. तक्रारदार हा त्याच्या मुलापासून वेगळा रहात असून त्याची मुले वेगवेगळी रहात असल्याचे नि.5 सोबत जोडलेल्या रेशनकार्डावरुन दिसून येते. तसेच तक्रारदारांची शेतजमीनदेखील वेगळी असल्याचे व मुलाची शेतजमीन वेगळी असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार व त्याचा मुलांचा एकमेकांशी फक्त वडील व मुलगे असा संबंध असून ते विभक्त रहात असल्यामुळे मुलाच्या कर्जासाठी तक्रारदारास जबाबदार धरता येत नाही. परंतु कर्जबोजा कमी केला असूनदेखील व तक्रारदाराने ऊसाच्या रकमेची मागणी करुनदेखील विरुध्दपक्षाच्या बँकेने परस्पर दिपगंगा कार्यकारी सेवा सोसायटीच्या सूचनेवरुन तक्रारदारांची रक्कम त्याच्या मुलाच्या खाती वर्ग केली. त्यामुळे या प्रकरणात दीपगंगा सोसायटीला पार्टी करण्याची कोणतीही गरज नसून तक्रारदार त्याची रक्कम विरुध्दपक्षाच्या बँकेकडून मिळण्यास पात्र आहेत. 6. उभयपक्षकारांच्या वकीलांची त्यांचे तोंडी युक्तीवादाच्या दरम्यान मंचाचे लक्ष Maharashtra Co-operative Society Act मधील कलम 48A मध्ये दिलेल्या प्रावधानाकडे वेधले. तक्रारदाराचे वकीलांनी Purchaser ची व्याख्या या कलमात स्पष्टपणे नमूद केली असल्याचे नमूद केले तर विरुध्द पक्षाचे वकीलांनी 48 A या कलमातील प्रावधानानुसार कर्जासाठी देय रक्कम कपात करण्याचे अधिकार बँकेला असल्याचे स्पष्ट केले. परंतु चौकशीदरम्यान सदर प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांचे व शपथपत्रावर देण्यात आलेल्या पुराव्याचे अवलोकन करता तक्रारदाराच्या मुलाचे नावाने सन 2008 ला कर्जबोजा कमी केल्याचे कागदोपत्री दिसून येत असल्याने विरुध्दपक्षाच्या बँकेने केलेली कृती ही नियमबाहय असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर होण्यास पात्र असून त्यादृष्टीकोनातून खालील अंतिम आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदाराची देय रक्कम रु.88,885/- अदा करण्याचे आदेश पारीत करण्यात येत आहेत. 3. ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केल्याबद्दल व तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी एकत्रितपणे रक्कम रु.5,000/- विरुध्दपक्षकार क्र. 1 व 2 यांनी देण्याचे आदेश पारीत करण्यात येत आहेत. 4. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत करण्यात येत आहेत. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.14/10/2011 (श्री.महेंद्र एम गोस्वामी) (श्रीमती.सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |