निकालपत्र
(द्वारा- मा.सदस्या - सौ.के.एस.जगपती)
(१) सामनेवाले यांनी अपूर्ण बांधकाम करुन सेवेत त्रुटी केली आहे असे नमूद करुन सामनेवालेंनी दर्जेदार बांधकाम करुन द्यावे या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदार व सामनेवाले यांच्यात रक्कम रु.७,२८,०००/- इतक्या रुपयात घराचे बांधकाम करुन देण्याचा करार झालेला होता. तक्रारदार यांच्या मालकीचे धुळे येथे सर्व्हे नं.४८८/२/४ पैकी प्लॉट नं.५ व त्याचे क्षेत्रफळ १८४/५ प्रमाणे मिळकत आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांच्या जाहिरातीला आकर्षीत होऊन सामनेवाले यांना घराचे बांधकामासाठी लागणारा खर्च रु.६,४०,०००/- मध्ये करार करुन व तत्परतेने बांधकाम करुन देण्याचे ठरविण्यात आले. दुस-या दिवशी बांधकाम करण्याचे आश्वासन देऊन सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून रु.१,५०,०००/- ची मागणी केली. तक्रारदार यांनी दि.०५-०८-२०११ रोजी वरील रक्कम सामनेवाले यांना अदा केली. लेखी करार करण्यापुर्वीच सामनेवाले यांनी रु.६,४०,०००/- ऐवजी रु.७,२८,०००/- एवढी रक्कम बांधकामास लागणार असल्याचे सांगितले व त्याप्रमाणे तक्रारदाराने मान्य करुन रक्कम रु.७,२८,०००/- मध्ये बांधकाम करण्यास मान्यता दिली. लेखी करारा प्रमाणे सामनेवाले यांनी बांधकाम सुरु केले नाही व पुन्हा रु.१,००,०००/- ची मागणी केली व बांधकाम अत्यंत सावकाश्पणे थांबून थांबून अर्धवट स्वरुपात केले. वेळोवेळी सामनेवाले यांनी तक्रारदारांकडे ज्या ज्याप्रमाणे पैशांची मागणी केली त्या प्रमाणे तक्रारदार सामनेवालेंना बांधकामासाठी रक्कम अदा करत गेले. वेळोवेळी रक्कम अदा करुनही सामनेवाले यांनी सप्टेंबर २०११ पासून तक्रारदारांच्या घराचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत संपूर्णपणे बंद केलेले आहे. तक्रारदारांनी वेळोवेळी विनंती करुनही सामनेवाले हे बांधकाम पूर्ण करुन देत नाही. म्हणून तक्रारदारांनी सामनेवाले यांनी सेवेत कसुर केल्याबद्दल त्यांचे विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे.
तक्रारदारांनी आपल्या मागणीत, सामनेवाले यांनी त्यांच्या घराचे बांधकाम प्लॅन प्रमाणे लेखी व तोंडी कराराप्रमाणे दर्जेदारपणे तत्परतेने पूर्ण करुन द्यावे अथवा उर्वरीत बांधकामाचे रक्कम रु.३,५०,०००/- सामनेवाले यांनी तक्रारदारांना अदा करावेत. तसेच मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रक्कम रु.५०,०००/- सामनेवाले यांचेकडून मिळावेत अशी विनंती केली आहे.
(३) आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारदार यांनी, नि.नं.४ वर दस्तऐवज यादी दाखल केली आहे. त्यात तक्रारदार व सामनेवाले यांच्यात घराचे बांधकामाबाबत झालेला लेखी करारनामा, पैसे देण्याबाबत तपशिल, सरदार कन्स्ट्रक्शन यांचे बांधकामाच्या रकमेचे एस्टीमेट, ७/१२ उतारा, बांधकामाची मुळ छायाचित्रे, व कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत.
(४) सामनेवाले यांना या मंचाची नोटीस मिळाल्याचे नि.नं.६ वरील पोहोच पावतीवरुन स्पष्ट होते. परंतु सदर नोटीसीचे ज्ञान होऊनही सामनेवाले सदर प्रकरणी स्वत: अथवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे हजर झाले नाहीत व त्यांनी स्वत:चे बचावपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द नि.नं.१ वर एकतर्फा सुनावणीचा आदेश करण्यात आला आहे.
(५) तक्रारदार यांची तक्रार व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे यांचा विचार करता, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कसूर केला आहे काय ? | : होय |
(ब) आदेश काय ? | : अंतिम आदेशाप्रमाणे |
| | |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – सामनेवाले आणि तक्रारदार यांच्यात दि.२७ ऑगस्ट २०१० रोजी रक्कम रु.७,२८,०००/- एवढया रकमेत घराचे बांधकाम करुन देण्यासाठी लेखी करार झाला होता. सदर करार आणि बांधकामाची छायाचित्रे नि.नं.४ सोबत दाखल केली आहेत. कराराप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदाराचे घराचे बांधकाम कशा पध्दतीने करुन द्यावयाचे तसेच रक्कम कशा पध्दतीने टप्याटप्याने द्यावयाची याचा सविस्तर तपशिल सदर करारामध्ये नमूद केलेला आहे. सदर करारावरुन व दाखल बांधकामाच्या छायाचित्रांवरुन घराचे बांधकाम अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. तसेच दाखल छायाचित्रांवरुन असे दिसून येते की, सदरचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.
तक्रारदारांनी सामनेवाले यांना बांधकामासाठी जी रक्कम टप्प्या टप्प्याने अदा केलेली आहे (Payment of mode) त्याचा तपशिल नि.नं.४ सोबत दाखल केलेला आहे. त्यात दि.०५-०८-२०१० रोजी रक्कम रु.१,५०,०००/-, दि.०५-०१-२०११ रोजी रक्कम रु.१,००,०००/-, दि.०५-०२-२०११ रोजी रक्कम रु.८५,०००/-, दि.१५-०३-२०११ रोजी रक्कम रु.६५,०००/-, दि.२९-०५-२०११ रोजी रक्कम रु.७०,०००/-, दि.०६-०९-२०११ रोजी रक्कम रु.३५,०००/-, दि.०१-११-२०११ रोजी रक्कम रु.३०,०००/-, दि.१६-१२-२०११ रोजी रक्कम रु.१८,०००/- दिल्याचे दिसून येत आहे.
वरील रक्कम विचारात घेतली असता, तक्रारदाराने कराराप्रमाणे बरीचशी रक्कम सामनेवाले यांना दिलेली दिसून येत आहे. तसेच तक्रारदारांनी दिलेली रक्कम सामनेवाले यांनी त्या त्या तारखेस त्यांच्या सहीनिशी स्वीकारलेली दिसून येत आहे. परंतु रक्कम स्वीकारुनही घराचे बांधकाम न करुन देण्याविषयीचा खुलासा सामनेवाले यांनी मंचात दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, सामनेवाले यांनी घराचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत सोडून दिलेले आहे, व ते कराराप्रमाणे पूर्ण न करुन सेवेत कसूर केलेला आहे, असे मंचाचे मत आहे.
तसेच तक्रारदारांनी आपल्या मागणीत उर्वरीत बांधकामासाठी लागणारा खर्च रु.३,५०,०००/- एवढया रकमेची मागणी केलेली आहे. आजपर्यंत तक्रारदारांनी सामनेवालेंना अदा केलेल्या रकमेवरुन मंचास असे वाटते की, सामनेवाले यांनी जवळपास बरीच मोठी रक्कम सदर बांधकामाचे कारणास्तव तक्रारदाराकडून स्वीकारलेली आहे आणि त्या मोबदल्यात घराचे बांधकाम पूर्ण केलेले दिसत नाही. तक्रारदार यांच्याकडून पैसे स्विकारल्यानंतर करारानुसार घराचे बांधकाम करुन देणे ही सामनेवाले यांची जबाबदारी होती. मात्र त्यांनी ती पार पाडली नाही. म्हणून सदर घराचे बांधकाम वेळेवर पूर्ण करुन देण्यास सामनेवाले हे जबाबदार आहेत,असे आमचे मत आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना घराचे बांधकाम पूर्ण करुन न दिल्यास, त्यांनी तक्रारदार यांच्याकडून स्विकारलेली रक्कम परत करणे आवश्यक आहे असेही आम्हाला वाटते. अन्यथा उर्वरीत बांधकामासाठी तक्रारदार यांना लागणारा खर्च रक्कम रु.३,५०,०००/- तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत, असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ - सबब आम्ही पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी, हा आदेश प्राप्त झाल्यापासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदार यांना कराराप्रमाणे, घराचे उर्वरीत राहिलेले बांधकाम पूर्ण करुन द्यावे. तसेच यापूर्वी केलेल्या बांधकामात राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करुन द्याव्यात.
किंवा
- तक्रारदार यांचे मागणीप्रमाणे सदर घराचे उर्वरीत बांधकामासाठी रक्कम रु.३,५०,०००/- (अक्षरी रक्कम रुपये तीन लाख पन्नास हजार मात्र) सामनेवाले यांनी तक्रारदारास द्यावेत.
- तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी एकूण रक्कम रु.५,०००/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार मात्र) आणि तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.१,०००/- (अक्षरी रक्कम रुपये एक हजार मात्र) द्यावेत.
- उपरोक्त आदेश कलम ब (१) मध्ये उल्लेखीलेली रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारास मुदतीत न दिल्यास, संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे. ६ टक्के प्रमाणे व्याजासह रक्कम देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
धुळे.
दिनांक : १३-११-२०१४
(सौ.के.एस.जगपती) (श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.