(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून सुर्खलाल महाराणी-31 वाणाचे गाजर बियाणे दि.08/12/2010 रोजी खरेदी केलेले असून अर्जदार यांना सदर बियाण्यातील दोषामुळे पिकाचे झालेल्या नुकसान भरपाईपोटी रु.87,500/-, सदर पिकासाठी खत, फवारणी, निंधणी, खुरपणी साठी झालेला खर्च रक्कम रु.20,000/-, मानसिक, शारिरीक व आर्थीक त्रासापोटी रु.30,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.25 लगत म्हणणे, पान क्र.26 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.18 लगत लेखी म्हणणे, पान क्र.19 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय
2) सामनेवाला क्र.1 यांनी भेसळयुक्त व दोषयुक्त बियाण्याचे उत्पादन
करुन त्याची विक्री सामनेवाला क्र.2 मार्फत अर्जदार यांना करुन
अवैध व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे काय?- होय
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई पोटी रक्कम
वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. अर्जदार हे
सामनेवाला क्र.1 यांचेकडून नुकसान भरपाई पोटी रक्कम वसूल होवून
मिळण्यास पात्र आहेत.
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे
खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय
अर्जदार हे सामनेवाला क्र.1 यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे
खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत.
5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला नं.1
यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे व सामनेवाला क्र.2
यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचनः
या कामी अर्जदार यांनी पान क्र.69 लगत, सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.70 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “अर्जदार यांनी सामनेवाला क्र.2 कडून बियाणे खरेदी घेतले आहे हे मान्य आहे. जिल्हा तक्रार निवारण समितीने केलेला क्षेत्रीय भेटीचा अहवाल व पंचनामा हा बरोबर नसून कबूल नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदोष बियाणे दिलेले नाही. अर्जदार यांनी गाजर बियाण्याची पेरणी चुकीच्या वेळी व चुकीच्या पध्दतीने केलेली असल्याने त्यास अनुकूल तापमान मिळाले नाही. त्या कारणाने अपेक्षीत पिक आलेले नाही व सदरहु पिकास गोंढे आले आहेत. सदरहु बाब ही सामनेवाला यांनी विक्री केलेल्या बियाण्यामुळे नाही तर तक्रारदार यांच्या चुकीमुळे घडलेली आहे. सबब अर्जदाराचा अर्ज रद्द करावा.” असे नमूद केले आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्या जबाबामध्ये “अर्जदार यांना गाजर बियाण्याची विक्री केलेली आहे. सदर बियाणे हे सामनेवाला क्र.1 यांनी उत्पादन केलेले असून सदर बियाण्याची सिलबंद पाकीटे किरकोळ विक्री करीता सामनेवाला क्र.1 यांचेकडून त्यांचे वितरक म्हणून सामनेवाला क्र.2 यांनी वेगवेगळया व्यक्तींना विक्री केलेली आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. अर्ज रद्द करावा.” असे नमूद केले आहे.
या कामी अर्जदार यांनी त्यांना सामनेवाला क्र.2 यांनी दि.08/12/2010 रोजी दिलेल्या रक्कम रु.1000/- च्या बिलाची मुळ प्रत पान क्र.6 लगत दाखल केलेली आहे. सदर बिल व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचा विचार करता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी पान क्र.7 लगत त्यांचे नावावरील शेतजमीन भुमापन क्र.610 हा 7/12 उतारा दाखल केलेला आहे. सदर उतारा पहाता अर्जदार यांनी 0.25 आर क्षेत्रात गाजर या पिकाची लागवड केलेली दिसत आहे.
पान क्र.9 लगत अर्जदार यांनी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक तथा जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती, नाशिक यांचा पंचनामा व अहवालची मुळ अस्सल प्रत दाखल केलेली आहे. सदर अहवालामध्ये “अर्जदार यांनी लागवड केलेले गाजर पिकाचे 85% झाडे ही बिगर महाराणी 31 या वाणाची होती. तर उत्पादक कंपनीने घोषीत केलेल्या महाराणी 31 या वाणाची झाडे 15% होती. सदर पीक 4 महिन्याचे होवून महाराणी 31 या वाणाचे गाजराची पुरेशी वाढ झालेली नव्हती. सदरच्या गाजराचा आकार अंगठयाच्या म्हणजे 1 ते 2 से.मी. (digmeter) आकाराचे असून अंदाजे त्याचे 20 ते 30 ग्रॅम वजन होते. बिगर महाराणी 31 या वाणाचे गाजरे हे अत्यंत बारीक म्हणजे Pencil आकाराचे गाजरे होती. लांब कोणतीही चव नव्हती. त्यास फ्लॉवर (गोंढे) आली होती. गाजराची वाढ ही अत्यंत कमी व बिगर महाराणी 31 वाणाची भेसळ असल्यामुळे उत्पादनात 90 ते 95% नुकसान होणार आहे. पिक काढण्यास खर्च परवडणार नसल्यामुळे शेतक-याचे अपेक्षीत उत्पन्न व उत्पादनात 100% घट येणार आहे.” असे समितीने स्पष्ट नमूद केले आहे.
या कामी साक्षीदार श्री.एस.बी.धस, कृषी अधिकार पंचायत समिती सिन्नर यांचे प्रतिज्ञापत्र पान क्र.65 लगत दाखल केलेले आहे व श्री.धस यांनी त्यांचे प्रतिज्ञापत्रासोबत पान क्र.66 लगत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती यांचा अहवालाची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे.सदर साक्षीदार यांनी प्रतिज्ञेवर निवेदन केले आहे की अर्जदाराच्या शेतावर जावून प्रत्यक्ष पीकपाहणी केली आहे. त्याप्रमाणे निरीक्षण नोंदी केल्यानंतर समितीच्या अन्य सदस्यांनी गाजर पिकाचे नुकसानीस सदोष गाजर बियाणे हेच एकमेव कारण आहे हा काढलेला समितीचा निष्कर्ष बरोबर आहे.
पान क्र.9 लगतचा अहवाल व पान क्र.65 लगतचे साक्षीदार यांचे प्रतिज्ञापत्र हे चुकीचे आहे किंवा योग्य व बरोबर नाही हे दर्शवण्याकरीता सामनेवाला यांनी कोणताही योग्य तो पुरावा दाखल केलेला नाही. किंवा सदरअहवाल चुकीचा असल्याबाबत कोणतीही तक्रार संबंधीतांचे वरीष्ठ कार्यालयाकडे केलेली नाही. तसेच सदर वादग्रस्त बियाण्याचे सिड सर्टिफिकेट दाखल केलेले नाही.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या जबाबातील परिच्छेद 18 खरी परिस्थिती यामध्ये केवळ सदर अहवाल नाकारला आहे व असा बचाव घेतला आहे की अर्जदार यांनी गाजर बियाण्याची पेरणी चुकीच्या पध्दतीने व चुकीच्या वेळी केलेली आहे. परंतु याबाबत सामनेवाला यांनी त्यांच्या बचावाच्या पृष्ठयर्थ कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. समितीच्या अहवालाप्रमाणे बिगर महाराणी 31 चे 85% झाडे व महाराणी 31 चे 15% झाडे आलेली आहेत व सदर झाडास पुरेशी वाढ न होवून गोंढे आलेली आहेत. याबाबत सामनेवाला यांनी कोणताही खुलासा केलेला नाही किंवा अशा पध्दतीचे उत्पादन का आले याची कारणमिमांसा केलेली नाही.
सामनेवाला यांनी त्यांचे सर्व जुने बिलांची विक्री पावती पान क्र.30 लगत दाखल केलेली आहे, कोमलसिंह राजपूत यांनी घेतलेला रिपोर्ट व प्रतिज्ञापत्र पान क्र.31 व पान क्र.32 लगत दाखल केलेले आहे, त्यानंतर सामनेवाला यांचा कार्यालयीन पत्रव्यवहार दाखल आहे. सदर कागदपत्र पहाता या कागदपत्रावरुन अर्जदार यांनी कशा पध्दतीने पेरणी केली याबाबतची पाहणी करुन साक्षीदार यांनी त्यांचा अहवाल दाखल केलेला दिसत नाही. त्याबाबत अर्जदाराचा जबाब घेतलेला नाही. तसेच याच वाणातील याच लॉट नंबरचे बियाणे अन्य शेतक-यांनी पेरणी केली आहे त्या शेतांची पाहणी केलेली नाही व त्या शेतक-यांचे जबाब घेतलेले नाहीत. जो अहवाल दाखल केलेला आहे तो पुर्णपणे हिंदी भाषेत असल्याने तो शेतक-यांनी दिलेला दिसत नाही. तसेच सामनेवाला यांनी पान क्र.43, पान क्र.47, पान क्र.50, पान क्र.53, पान क्र.54, पान क्र.55 लगत शेतक-यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहेत. परंतु सर्व प्रतिज्ञापत्रांचा विचार करता हे प्रतिज्ञापत्र हिंदी भाषेमध्ये लिहीलेले आहेत व सर्व शेतकरी हे जोधपूर, बुलढाणा, शाहपूर(हरीयाणा) येथील राहीवासी आहेत. सदर प्रतिज्ञापत्रावरुन असे सिध्द होत नाही की अर्जदार यांनी चुकीची व चुकीच्या वेळी पेरणी केली आहे व त्यामुळे नुकसान सहन करावे लागलेले आहे. वरील सामनेवाला यांचे साक्षीदारांचे पुराव्यावरुन पान क्र.9 चा अहवाल चुकीचा आहे असे सिध्द होत नाही. वरील सर्व प्रतिज्ञापत्र व कार्यालयीन पत्रव्यवहार तसेच शेतक-यांचे प्रतिज्ञापत्र याचा विचार करता सामनेवाला यांचा बचाव सिध्द होत नाही.
पान क्र.9 लगतचा अहवाल व त्यामधील संपुर्ण मजकूर, पान क्र.65 चे प्रतिज्ञापत्रामधील मजकूर यांचा एकत्रीतरित्या विचार करता सामनेवाला यांनी अर्जदार यांना भेसळीचे सदोष बियाणे विक्री केलेले असल्यामुळे अर्जदार यांचे गाजर पिकाचे संपूर्णपणे नुकसान झालेले आहे हे स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला क्र.1 यांनी भेसळयुक्त सदोष गाजर बियाण्याचे उत्पादन करुन त्याची विक्री अर्जदार यांना सामनेवाला क्र.2 यांचेमार्फत केलेली आहे व त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी अवैध व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.71 चे यादीसोबत पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे दाखल केलेली आहेत.
1) राष्ट्रीय आयोग. 2011 रिव्हीजन पिटीशन नं.1062 ते 1075/2003
ता.11/10/06 महाराष्ट्र हायब्रीड सिडस् कं.लि विरुध्द गोवरी पेडान्ना
निकाल
2) राष्ट्रीय आयोग. रिव्हीजन पिटीशन नं.705/2008 निकाल
ता.26/12/07 गुजरात स्टेट को-आँप मार्केटींग फेडरेशन लि.
विरुध्द घनशामभाई फुलाभाई पटेल
3) 2(2007) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 148. इंडो अमेरीकन
हायब्रीड सिड्स विरुध्द विजयकुमार शंकरराव
परंतु सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे तक्रार अर्जातील हकिकत यामध्ये फरक आहे. या कामी पान क्र.9 चा अहवाल तयार करणा-या अधिका-यांचे प्रतिज्ञापत्र दाखल आहे. तसेच पान क्र.9 लगतचे अहवालानुसार सामनेवाला नं.1 यांनी भेसळयुक्त सदोष बियाण्याचे उत्पादन करुन त्याची विक्री सामनेवाला क्र.2 मार्फत अर्जदार यांना केलेली आहे ही बाब स्पष्ट झालेली आहे. यामुळे सामनेवाला यांनी दाखल केलेली व वर उल्लेख केलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे या कामी लागु होत नाहीत.
याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.
2011 सि.टी.जे. राष्ट्रीय आयोग पान 60. पी.एच.आय. सिड्स लि.
विरुध्द रघुनाथ रेड्डी.
अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये “सामनेवाला यांचेकडून घेतलेल्या गाजर बियाण्याची 25 आर क्षेत्रात लागवड केलेली होती. या गाजर पिकापासून 100 ते 125 क्विंटल गाजराचे उत्पादन मिळाले असते, याकामी त्यावेळचा गाजर बाजारभाव प्रती क्विंटल रु.700/- असा होता. त्याप्रमाणे उत्पन्न रक्कम रु.70,000/- ते रु.87,500/-मिळाले असते.” असा उल्लेख अर्जदार यांनी केलेला आहे. या पिकाच्या नुकसान भरपाईपोटी सामनेवाला यांचेकडून रु.87,500/- ची मागणी अर्जदार यांनी केलेली आहे. परंतु गाजर पिकाचा नक्की भाव काय होता? व अर्जदार यांना नक्की किती उत्पादन मिळाले असते? याबाबतचा कोणताही योग्य तो पुरावा सामनेवाला यांनी दिलेला नाही.
या कामी अर्जदार यांनी, पान क्र.10 लगत दाखल केलेला कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथील एप्रील 2011 या महिन्यातील गाजराचा बाजारभावाबाबतचा तक्ता दाखल केलेला आहे. या तक्त्यामधील गाजराच्या बाजारभावाचा विचार करता प्रती क्विंटल गाजराचा सरासरी भाव रु.500/- इतका होत आहे.
वरील कारणाचा विचार होता अर्जदार यांचे 100 क्विंटल गाजराचे उत्पादनाची किंमत रु.50,000/- इतकी होत आहे, व इतकी किंमत अर्जदार यांना बाजारभावाप्रमाणे मिळाली असती, याचा विचार होता अर्जदार यांना गाजर पिकाचे नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.50,000/- देण्यास सामनेवाला नं.1 हे जबाबदार आहेत.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात “अर्जदार यांना गाजर सिलबंद पाकीटे किरकोळ विक्री करीता सामनेवाला क्र.1 यांचेकडून त्यांचे वितरक म्हणून सामनेवाला क्र.2 यांनी वेगवेगळया व्यक्तींना विक्री केलेली आहेत.” असे नमूद केलेले आहे. याबाबत विचार करता सदर पाकीटे ही फुटलेल्या अवस्थेत अथवा सिल तोडले असल्याबाबत कोणताही उल्लेख अर्जदार यांचे तक्रारीत आढळून येत नाही. सामनेवाला क्र.2 यांनी सिलबंद पाकीटे सामनेवाला क्र.1 यांचेकडून घेवून जशीच्या तशीच सिलबंद अवस्थेतच अर्जदार यांना विक्री केलेली आहेत. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांना या नुकसानभरपाई कामी जबाबदार धरता येणार नाही असे मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागली आहे यामुळे अर्जदार यांना निश्चीतपणे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.5000/- व
तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद व वकिलांचा युक्तीवाद तसेच मंचाचे वतीने आधार घेतलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
आ दे श
1) सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्दची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 यांचेविरुध्द अंशतः मंजूर
करण्यात येत आहे.
3) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1 यांनी अर्जदार यांना
पुढीलप्रमाणे रकमा दयाव्यात
अ) गाजर पिकाचे नुकसानीपोटी रक्कम रु.50,000/- दयावेत.
ब) मानसिक त्रासापोटी रु.5000/- दयावेत.
क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- दयावेत.