द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
** निकालपत्र **
दिनांक 25 एप्रिल 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या एअर होस्टेस अकॅडमी मध्ये 09/06/2009 रोजी प्रवेश घेतला. त्याच दिवशी तक्रारदारांनी रुपये 2000/- व दुस-या दिवशी रुपये 3000/- जाबदेणार यांच्या सांगण्यावरुन भरले. कोर्स एक वर्षांचा होता, कोर्स पूर्ण झाल्यावर चांगल्या पगाराची नोकरी मिळेल असे तक्रारदारांना सांगण्यात आले. तक्रारदारांची आर्थिक परिस्थिती बिकट असतांना देखील त्यांनी दिनांक 19/06/2009 रोजी रुपये 20,000/- जाबदेणारांकडे भरले. दिनांक 25/06/2009 पासून क्लास सुरु होणार होता. पैसे भरण्याबाबत जाबदेणार यांनी वारंवार सांगितल्यामुळे तक्रारदारांनी दिनांक 15/07/2009 रोजी रुपये 75000/- भरले. ब-याच वेळा शिक्षक येत नसत. स्वाईन प्लू मुळे एक आठवडा क्लास बंद होता. दिनांक 12/10/2009 पासून दिवाळीची सुट्टी देण्यात आली. दिनांक 21/10/2009 पासून क्लास सुरु होणार होता. दिनांक 21/10/2009 रोजी जाबदेणार यांनी दुरध्वनीवरुन क्लास दिनांक 28/10/2009 पासून सुरु होईल असे सांगितले. नंतर संस्थेला कुलूप लागल्याचे तक्रारदारांना कळले. तक्रारदार चौकशी साठी गेले असता तेथे सर्व विदयार्थी काही माजी विदयार्थी देखील होते. म्हणून तक्रारदार, इतर विदयार्थी व म.न.से यांचे कार्यकर्ते यांनी जाबदेणार श्रीमती सपना गुप्ता यांच्याविरुध्द पोलिस तक्रार केली. परंतु पोलिसांनी बोलावून देखील रोज एक एक कारण सांगून त्या येण्याचे टाळत असत. कर्मचा-यांना पाठवित असत. ब-याचवेळा आंदोलन केल्यानंतर श्रीमती सपना गुप्ता तेथे आल्या, व क्लास परत सुरु करते, परंतु पैसे परत देणार नाही असे सांगितले. परंतु त्यांचा हा निर्णय तक्रारदारांना मान्य नव्हता कारण माजी विदयार्थ्यांना जाबदेणार यांनी अद्यापपर्यन्त प्रमाणपत्र वा नोकरी दिलेली नव्हती. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे भरलेले पैसे परत मागूनही जाबदेणार यांनी पैसे परत दिले नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 1,50,000/- परत मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या जाबदेणार यांच्या दिनांक 15/07/2009 रोजीच्या पावतीचे अवलोकन केले असता त्यावर सेशन्स 2009-10, एनरोलमेंट नं P ENR 09-087, P ADM 09 037, जाबदेणार यांना रुपये 75000/- अदा केल्याचे स्पष्ट होते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या जाबदेणार यांच्या दिनांक 09/06/2009 च्या पावतीवरुन रुपये 2000/-, दिनांक 10/06/2009 च्या पावतीवरुन रुपये 3000/-तक्रारदारांनी जाबदेणार यांना अदा केल्याचे स्पष्ट होते. तसेच जाबदेणार यांच्या दिनांक 19/06/2009 च्या पावतीवरुन तक्रारदारांनी जाबदेणार यांना रुपये 20,000/- अदा केल्याचे स्पष्ट होते. तक्रारदारांनी जाबदेणार यांना वर नमूद केल्याप्रमाणे रुपये 1,00,000/- One Year Diploma in Aviation and Hospitality Management साठी अदा केल्याचे स्पष्ट होते. जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिलेल्या प्रमाणपत्रावरुन तक्रारदारांना सदरहू कोर्स दिनांक 25/06/2009 पासून एक वर्षासाठी सुरु होणार होता, 100 टक्के जॉबची गॅरंटी तक्रारदारांना देण्यात आली होती. तक्रारदारांनी दाखल केलेल्या त्यांच्या वडिलांचा सन 2008-2009 कालावधीचा उत्पन्नाचा दाखल्यावरुन त्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये 36000/- असल्याचे स्पष्ट होते. असे
असतांनाही तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे फी रुपये 1,00,000/- भरुनही जाबदेणार यांनी कोर्स पुर्ण केला नाही, तक्रारदार विदयार्थ्यांचे एक वर्षाचे नुकसान झाले, ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून भरलेली रक्कम रुपये 1,00,000/- तक्रार दाखल दिनांक 06/01/2010 पासून 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
** आदेश **
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणारक्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना 1,00,000/- दिनांक 06/01/2010 पासून 9 टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम अदा होई पर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
[3] जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.