ग्राहक तक्रार क्र. 104/2013
अर्ज दाखल तारीख : 01/08/2013
अर्ज निकाल तारीख: 10/04/2015
कालावधी: 01 वर्षे 08 महिने 10 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) शेख शकील शेखलाल,
वय - 28 वर्षे, धंदा – शेती,
रा.जवळे (दु) ता. जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) व्यवस्थापक,
प्रो. सौरभ दिपक अजमेरा हिरो टू व्हिलर डिलर,
प्रतिभा हिरो, राजीव गांधी नगर,
उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एम.एस.पाटील,
विरुध्द पक्षकार तर्फे विधीज्ञ : श्री.पी.डी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
अ) विरुध्द पक्ष (विप) दुचाकी वाहन विक्रेत्याने अधीकची रक्कम घेऊन सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळणेसाठी तक्रारकर्ता (तक) ने ही तक्रार दिलेली आहे.
1) तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे.
विप हा हिरो कंपनी या दुचाकी उत्पादकाचा विक्रेता उस्मानाबाद येथील आहे. तक ला हिरो कंपनीची पॅशन प्रो ही दुचाकी घ्यायची असल्याने विचारणा करता विप ने वाहनाची मुळ किंमत रु.48,350/- सांगितली, आर.टी.ओ. कर रु.4,520/-, स्मार्ट कार्ड रु.400/-, विमा रु.1,300/-, हँन्डलींग रु.300/- गुडलाईफ रु.250/- अशी एकूण रु.55,670/- किंमत सांगितली. तक ने त्याप्रमाणे एच. डी. एफ. सी. बँकेचे कर्ज घेऊन रक्कम विप ला दिली त्याप्रमाणे गाडी दि.13/12/2012 रोजी मिळून रजिष्ट्रेशन दि.19/12/2012 रोजी झाले.
3) तक ने विप कडे आर.टी.ओ. टॅक्सची पावती मागीतली असता विप ने टाळाटाळ केली. शेवटी पावतीची झेरॉक्स दिली त्याप्रमाणे आर. टी. ओ. टॅक्स रु.3,336/- भरल्याचे दिसते. म्हणजेच विप ने रु.4,520/- वजा रु.3,336/- = रु.1,184/- जास्त घेतले. तक ने सदर रकमेची मागणी केली असता विप ने स्पष्ट नकार दिला. शेवटी दि.17/07/2013 रोजी नोटिस पाठवली त्यानंतरही विप ने रक्कम दिली नाही. म्हणून ही तक्रार दि.01/08/2013 रोजी दिलेली आहे.
ब) विप ने या कामी आपले म्हणणे दाखल केलेले नाही.
क) आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहलेली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
1) विप ने तक ला दिलेले दि.28/12/2012 चे कोटेशन तक ने हजर केलेले आहे. त्याप्रमाणे गाडीची मुळ किंमत रु.48,350/-, आर.टी.ओ.रु.4,520/-, स्मार्ट कार्ड रु.400/- विमा रु.1,500/-, हँन्डलींग रु.300/-, वॉरंटी रु.550/-, गुडलाईफ 250/-, हायपोथीकेशन रु.100/-, एकूण किंमत रु.57,770/-, दाखविली आहे. आर.टी.ओ. पावतीप्रमाणे टॅक्स रु.3,126/-, रजिष्ट्रेशन रु.50/-, आर.सी. डिलीव्हरी चार्ज रु.50/-, हायपोथीकेशन रु.100/-, एकूण रु.3,336/- दाखवली आहे.
2) विप ने दिलेली पावती क्र.254 दि.04/01/2013 ची तक ने हजर केलेली आहे. त्यामध्ये मुळ किंमत रु.48,350/-, इन्शूरंन्स रु.1,548/-, सि.आर.टी.एम.रु.250/-, रोड टॅक्स रु.3,692/-, हायपोथीकेशन रु.100/-, वॉरंटी रु.550/-, एक्सटेन्डेड वॉरंटी रु.350/, गुड लाइफ 250/-, + रु.250/-, + रु.250/-, असे एकूण रु.55,540/-
3) तक चे म्हणण्याप्रमाणे तसेच कोटेशनप्रमाणे गुडलाईफ चे रु.250/- देणे होते. आता अधिक रु.500/- घेतल्याचे दिसते. वारंटीचे रु.550/- असतांना एक्सटेंडेड चे अधिकचे रु.350/- घेतले. एक्सटेन्डेड वॉरंटी घेणे बरेच ग्राहक पसंत करतात मात्र गूडलाईफचे रु.500/- अधिक का घेतले याबद्दल विप समर्थन देऊ शकत नाही. टॅक्स पोटी रु.4,520/- ची मागणी केली पण पावतीप्रमाणे टॅक्सचे रु.3,692/- होतात. त्याचा मेळ लागण्यासाठी गुडलाईफचे रु.500/- पावतीमध्ये अधीक लावल्याचे दिसते. तसेच आणखी CRTM चे रु.250/- का जास्त घेतले याचे समर्थन विप करु शकला नाही म्हणजेच विप ने तक कडून अधीकचे रु.750/- घेतले म्हणून मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
अ) तक ची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते
1) विप ने तक ला अधीकचे घेतलेले रु.750/- (रुपये सातशे पंन्नास फक्त) त्वरीत परत करावे तसेच त्यावर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे 9 दराने व्याज दयावे.
2) विप ने तक ला तक्रारीचा खर्च म्हणून रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) दयावे.
3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.