जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 90/2011 तक्रार दाखल तारीख – 05/01/2012
तक्रार निकाल तारीख– 22/03/2013
जयंत पि. सुखदेव शिनगारे
वय 35 वर्षे, धंदा शेती,
रा.धारुर ता.जि.बीड . ..अर्जदार
विरुध्द
व्यवस्थापक,
सान्या मोर्टार्स प्रा.लि.
गट नं.61 घोसापुरी, नामलगांव फाटयाजवळ,
जालना रोड,बीड ता.जि.बीड. ...गैरअर्जदार
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
तक्रारदारातर्फे - अँड.आर.बी.धांडे
गैरअर्जदारा तर्फे – अँड.एस.एस.शिंदे
------------------------------------------------------------------------------------ निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,तक्रारदार हा शेतकरी असून गैरअर्जदार हे टाटा कंपनीच्या कारचा विक्री व विक्री पश्यात सेवा असा व्यवसाय करण्या-या सान्या मोटार्सचे व्यवस्थापक आहेत. तक्रारदारांनी त्यांचे कडे नॅनो सी.एक्स. हे मॉडेल पसंत केले त्यांची मुळ किंमत रु.1,68,702/- आहे व त्यांच्या अँडव्हान्स पोटी रु.10,000/- जमा केले.
तक्रारदार दि.16.02.2011 रोजी गैरअर्जदाराकडे गेले व त्यांनी वाहनाची मागणी केली तेव्हा गैरअर्जदारांनी त्यांना सांगितले की, पाहिजे ते मॉडेल आले आहे पण फायनान्सचे काम झाले नाही. आजच गाडी हवी असेल तर सुरक्षा रक्कम रु.1,40,000/- चा कोरा चेक दया तक्रारदार यांने सदर चेक दिला व गाडी घेतली.
तक्रारदाराने 2-3 दिवसांनी इन्शुरन्सची कव्हर नोट बघितली असता कमी किंमतीच्या इन्शुरन्स उतरवल्याचे आढळले म्हणून त्यांला गैरअर्जदारांच्या व्यवहारा बददल शंका आली.
दि.27.03.2011 रोजी टाटा फायनान्सचे पत्र अर्जदाराला मिळाले व त्यात नमूद केलेंडर होते की, रु.1,40,000/’ एवढे कर्ज मंजूर झाले आहे. तक्रारदाराचे व गैरअर्जदारांचे असे ठरले होते की, गाडीची मुळ किंमत रु.1,68,702/- व विमा रक्कम रु.6525/- एवढे गैरअर्जदारांला दयावयाचे.
असे की, गैरअर्जदारांला तक्रारदाराकडून एकूण खालील प्रमाणे रक्कम दिली.
दि.05.02.2011 रोजी रु.10,000/- रोख
दि.16.02.2011 रोजी रु.1,40,000/- रोख
रु.1,40,000/- फायनान्स कंपनीकडून मिळाले.
------------------
एकूण रु.2,90,000/-
-----------------
तक्रारदाराने वारंवार विनंती करुनही गैरअर्जदार यांनी आजपर्यत तक्रारदारास फरकाची रक्कम दिलेली नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार आहे. तो गैरअर्जदाराकडून फरक रक्कम रु.1,40,000/- तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/-, तक्रार खर्च रु.3,000/- धारुर हून बीडला वारंवार खेपा घालण्याचा खर्च रु.5,000/- असे एकूण रु.18,000/- मागत आहे.
गैरअर्जदार मंचासमोर हजर झाले त्यांनी लेखी जवाब दाखल केला. त्यांत त्यांनी अर्जदाराला आम्ही सुरक्षा रक्कम भरण्यास सांगितले नाही. त्यांने स्वतःहून सुरक्षा रक्कम रु.1,40,000/- भरली व कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांने ती स्वतः येऊन परत घेतली असे सांगितले.
त्याचप्रमाणे अर्जदाराला त्यांनी फरकाची रक्कम वजा जाता त्यांस मिळणारे रु.1,40,000/’ परत केले आहेत व आजमितीला त्यांच्याकडून कोणतेही येणे बाकी नाही. सबब तक्रार खारिज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदाराने केली. त्यांनी आपल्या जवाबासोबत टाटा मोटार्स फायनान्सची रिलीज ऑर्डर दि.16.02.2011 ची रु.1,40,000/- ची मुळ पावती, दि.26.02.2011 ची अर्जदाराने रक्कम परत नेल्याची चिठठी, बिल फॉर्म, दि.26.02.2011 ची अर्जदाराला रु.35,814.00 परत केल्याची पावती इत्यादी गोष्टी दाखल केल्या.
वरील विवेचनावरुन खालील मुददे मंचाच्या विचाराधीन झाले.
मुददे उत्तर
1. या मंचाला सदरची तक्रार चालवण्याचा अधिकार
आहे का नाही.
2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मूददा क्र.1 व 2ः-
अर्जदारातर्फे विद्वान वकील श्री. धांडे व गैरअर्जदारातर्फे विद्वान वकील श्री.शिंदे यांचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही पक्षातर्फे दाखल करण्यात आलेल्या कागदपत्राचा मंचाने बारकाईने अभ्यास केला.
अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्याने रु.1,40,000/- रोख भरले. त्यांची मुळ पावती गैरअर्जदाराने दाखल केली. तर झेरॉक्स प्रत अर्जदाराने दाखल केली. गैरअर्जदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी रु.1,40,000/- रोख अर्जदाराला परत केले आहेत. त्यांनी त्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ एक कागद दाखल केला. त्यावर दि.26.02.2011 अशी तारीख आहे व रु.1,40,000/- सेक्युरिटी कॅश बाय हँण्ड मिळाली असे हस्ताक्षरात लिहीले आहे. तो कागद कंपनीचा लेटरहेड देखील नाही. त्यावर कंपनीच्या कोणत्याही अधिका-यांची सही नाही. एक सही “शिनगारे” अशी दिसते पण ती वर वर पाहता अर्जदाराच्या सहीशी जुळत नाही. गैरअर्जदारांनी शिवाय रु.35,814/- ची एक संगणकीकृत प्रत दाखल केली आहे. त्यांची मुळ पावती कोर्टासमोर नाही. जे पैसे त्यांनी अर्जदाराला दिले असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु ती रक्कम नेमकी कोणत्या कारणाने परत दिली यांचा उल्लेख नाही. ती रक्कम, गाडीची किंमत व इन्शुरन्स हप्ता यांची बेरीज केली तरी ती कोणाच्याच कथनाशी जुळत नाही. तक्रारदार म्हणतात की, त्यांना गैरअर्जदारांच्या व्यवहाराबददल शंका आहे. परंतु त्यांनी फौजदारी न्यायालयात या विरुध्द दाद मागितली नाही अशा परिस्थितीत सदरच्या खटल्यात सखोल पुराव्याची आवश्यकता आहे असे या मंचाचे मत आहे.
सबब, मंच सदरची तक्रार खारीज करत आहे.
आदेश
1. सदरची तक्रार खारिज करण्यात येत आहे.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड