(घोषित दि. 30.03.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून एक होंडा अक्टीव्हा गाडी घेतली. त्यासाठी गैरअर्जदाराला रुपये 48,256/- ही गाडीची किंमत व 2,000/- रुपये ऑनमनी म्हणून दिले. त्यापैकी 48,256/- ची पावती त्याला मिळाली. गैरअर्जदारांनी अर्जदाराकडून विमा रक्कम रुपये 891/- घेतले व आय.सी.आय.सी.आय लोंबार्डची पॉलीसी दिली. दिनांक 27.06.2011 रोजी अर्जदार गाडी घेवून गेले.
दुस-या दिवशी आर.टी.ओ. कार्यालयात नोंदणीसाठी जातेवेळी वारंवार प्रयत्न करुनही गाडी चालू झाली नाही. तेव्हा तो शोरुमला गाडी घेवून गेला. एक तासाने गाडी दुरुस्त करुन घेवून आर.टी.ओ. कागदपत्रांचे पाकीट घेवून घरी गेला. परंतू दुस-या दिवशी पण आर.टी.ओ. कार्यालयात जाण्यासाठी गाडी चालू झाली नाही आणि हा प्रश्न तसाच राहिला. अर्जदाराला या काळात वारंवार गाडी ढकलावी लागली. दिनांक 11.07.2011 रोजी पहिल्या सर्विसिंग नंतर पण गाडीतील दोष तसाच होता. त्यामुळे अर्जदाराला तिची नोंदणीपण करता आली नाही.
दिनांक 17.08.2011 रोजी पुन्हा अर्जदार गाडी दुरुस्त करण्यासाठी गेला पण गैरअर्जदाराच्या कामगारांनी त्याला शिवीगाळ केली, मारहाण केली व गाडी ठेवून घेतली. अर्जदाराने पोलीस स्टेशनला तक्रार दिली पण पोलीसांनी केवळ एन्.सी.नोंदवली. परंतू हे समजल्यावर गैरअर्जदारांनी अर्जदार व इतरांच्या विरुध्द पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. तिचा गुन्हा नोंदणी क्रमांक 172/2011 आहे. गाडी अद्यापही गैरअर्जदाराच्याच ताब्यात आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना दिनांक 21.09.2011 रोजी नोटीस पाठवली. त्यावर गैरअर्जदारांचे उत्तरही आले.
अशा परिस्थितीत अर्जदाराने मंचाकडे तक्रार दाखल केली आहे व त्या अंतर्गत (1) गाडीची रक्कम रुपये 50,256/- (2) विमा रक्कम 891/- (3) अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी 5,000/- (4) अर्जदाराचे गाडी नसल्यामुळे झालेले नुकसान आणि तक्रारीचा खर्च मागितला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 मंचासमोर हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. त्या अंतर्गत गैरअर्जदार म्हणतात की, गैरअर्जदाराने केवळ गाडीची रक्कम रुपये 48,256/- अर्जदाराकडून घेतले. आर.टी.ओ. च्या नोंदणीसाठी आवश्यक ती कागदपत्रे अर्जदाराला दिली परंतू त्याने बंधनकारक असूनही गाडी नोंदणीकृत केली नाही. अर्जदाराच्या गाडीत काहीही बिघाड नाही. त्याने सर्वात प्रथम दिनांक 11.07.2011 ला गाडी सर्विसिंगसाठी आणली. त्यानंतर गाडीची स्थिती समाधानकारक असल्याबद्दल सही केली. नंतर त्याने शोरुमला येवून गाडी दुरुस्त करा असे म्हटले व गैरअर्जदाराच्या लोकांनी मारहाण/शिवीगाळ केली हे कथन गैरअर्जदार नाकारतात. परंतू गैरअर्जदारांनी अर्जदारा विरुध्द फिर्याद दिली हे म्हणणे गैरअर्जदारांना मान्य आहे. गाडी दोषपूर्ण आहे हे म्हणणे ही गैरअर्जदार अमान्य करतात. उलट पक्षी अर्जदारानेच त्यांच्या शोरुमचे नुकसान केले आहे. त्यामुळे अर्जदार हा गाडी बदलून मिळण्यास अथवा नुकसान भरपाईस पात्र नाही. सबब त्यांची तक्रार खारिज करण्यात यावी असे गैरअर्जदार म्हणतात.
वरील सर्व विवेचना वरुन खालील मुद्दे मंचाने विचारार्थ घेतले.
मुद्दे उत्तर
1. अर्जदाराला द्यावयाच्या सेवेत गैरअर्जदारांनी कसूर
केला आहे असे अर्जदाराने सिध्द केले आहे का ? नाही
2. कथित होंडा अक्टीव्हा या गाडीत काही मुलभूत
दोष (Manufacturing Defect) आहे असे अर्जदारांनी
सिध्द केले आहे का ? नाही
3. अर्जदाराच्या पक्षात इतर काही हुकूम होण्यास अर्जदार
पात्र आहे का ? अंतिम आदेशा प्रमाणे
4. आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणमीमांसा
अर्जदाराचे विद्वान वकील श्री.प्रदिप कुलकर्णी व गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.एस.बी.देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास केला.
अर्जदाराच्या वकीलांनी सांगितले की, गाडी चालूच होत नव्हती म्हणून तिचे नोंदणीकरण केले नाही आणि दिनांक 27.08.2011 नंतर सतत गाडी गैरअर्जदाराच्याच ताब्यात आहे. त्यामुळे इतर कोणत्या गॅरेजमध्ये दाखवून गाडीत दोष आहे किंवा कसे ते अर्जदार सिध्द करु शकले नाहीत. म्हणून गैरअर्जदारांनीच गाडी दोषविरहीत आहे ही गोष्ट सिध्द करावी. त्याच प्रमाणे गैरअर्जदारांनी चुकीची जॉब-शिट तयार केली आहेत आणि अर्जदार गेट पास न घेताच निघून गेला अशी चुकीची नोंद त्यावर आहे. उलट गैरअर्जदारांनी त्यांना मारहाण व शिवीगाळ करुन हाकलून दिले. म्हणून त्यांची तक्रार मंजूर व्हावी अशी विनंती केली.
गैरअर्जदाराच्या वकीलांनी सांगितले की अर्जदार इतर मार्गांनी गाडी दोषपूर्ण आहे हे सिध्द करुन शकला असता. ती गैरअर्जदारांची जबाबदारी नाही अर्जदाराने प्रथम दिनांक 11.07.2011 ला गाडी सर्विसिंगला आणली तेंव्हा त्यात फक्त अवरेज सेटींग हा दोष होता. समाधानकारक काम म्हणून अर्जदाराची त्या दिवशीच्या जॉब-शिट वर सही देखील आहे. त्या दिवशी गाडी 750 कि.मी. चालवली असे दर्शवते आहे. दिनांक 17.08.2011 रोजीच्या सर्विसिंगला गाडी 2630 कि.मी. चालली असे दर्शवते आहे. त्याच दिवशी कस्टमर गेटपास न घेता गेला अशी ही नोंद आहे. गैरअर्जदाराच्या वकीलांनी एक्साइड कंपनीचे बॅटरी ओके असे पत्र ही दाखल केले त्याची तारीख 27.08.2011 आहे. अर्जदार व इतरांनी त्यांचे शोरुमची तोडफोड केली असे ही त्यांनी सांगितले शेवटी अर्जदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती केली. त्यांनी आपल्या म्हणण्या पृष्ठयर्थ TTT (2008) C.P.J 182 मा.राज्य आयोग उत्तर प्रदेश यांचा दाखला दाखल केले. त्या अंतर्गत मा.राज्य आयोगाने एक्सपर्टच्या मनाशिवाय वाहनात काही मुलभूत दोष आहे ही बाब सिध्द होवू शकत नाही. असे मत व्यक्त केले आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता मंच खालील निष्कर्ष काढत आहे. अर्जदाराला दिलेल्या होंडा अक्टिव्हा गाडीत काही मुलभूत दोष आहे हे अर्जदार सिध्द करु शकला नाही तसेच त्यामुळे त्याचे काही आर्थिक नुकसान झाले ही बाबही अर्जदाराने सिध्द केलेली नाही. परंतू अर्जदाराने गाडीची रक्कम रुपये 48,256/- दिलेली आहे. ही गोष्ट उभयपक्षी मान्य आहे. तेव्हा नैसर्गिक न्यायाचा विचार करता सदरची अक्टीव्हा गाडी अर्जदाराला परत मिळणे उचित होईल असे मंचाला वाटते.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
1. गैरअर्जदाराने अर्जदाराला एम.ई.जे.सी 448 एफ 8312611 इंजिन जे.सी. 44 ई 1423646 ही अक्टिव्हा गाडी आदेश मिळाल्यापासून तीस दिवसांचे आत सुस्थितीत परत करावी.
2. खर्चा बाबत आदेश नाहीत.