::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री नितीन माणिकराव घरडे , मा.सदस्य ) (पारीत दिनांक –13 नोव्हेंबर, 2013 ) 1. तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष पतसंस्थेत मुदतठेव म्हणून ठेवलेली रक्कम देयलाभ व व्याजासह मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगीक मागण्यांसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे थोडक्यात कथन येणे प्रमाणे- तक्रारकर्ता हा वॉर्ड नं.1, पोस्ट कोंढाळी, तहसिल कोंढाळी, जिल्हा नागपूर येथील कायम रहिवासी आहे. विरुध्दपक्ष संतकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोंढाळी ही एक नोंदणीकृत सहकारी पतसंस्था असून तिचा नोंदणी क्रं- र.नं.917/2002 असा आहे. विरुध्दपक्ष पतसंस्थेचे, विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 हे अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव आहेत. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष संतकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोंढाळी येथे रसीद क्रं 95 अनुसार मुदतठेव म्हणून रुपये-12,500/- एवढी रक्कम ठेवली असून, मुदतठेवीचा कालावधी हा दि.24.05.2004 ते 24.05.2010 असा होता. परिपक्वता तिथी म्हणजे दि.24.05.2010 नंतर तक्रारकर्त्यास रुपये-25,000/- एवढी रक्कम मिळणार होती. विरुध्दपक्ष पतसंस्थेने सदर रक्कम मुदतठेवी मध्ये जमा केल्या नंतर तशा आशयाचे मुदतठेव प्रमाणपत्र तक्रारकर्त्यास निर्गमित केले. परिपक्वता तिथी उलटून गेल्या नंतर, तक्रारकर्त्याने मुदतठेवीची रक्कम त्यावरील देयलाभांसह मिळण्या करीता विरुध्दपक्ष संस्थेच्या कार्यालयात वारंवार प्रत्यक्ष्य भेटी देऊन मागणी केली असता, वि.प. पतसंस्थे तर्फे उडवा उडवीची उत्तरे देऊन, रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली. वि.प.पतसंस्थे तर्फे मुदतठेवीची रक्कम मिळत नसल्यामुळे तक्रारकर्त्याने दि.27.06.2008, 07.12.2009, 08.12.2009 व दि.25.01.2010 रोजी सहायक निबंधक, सहकारी संस्था काटोल, जिल्हा निबंधक, सहकारी संस्था, नागपूर अणि मा.विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर यांचेकडे मुदतठेवीची व्याजासहीत रक्कम मिळण्यासाठी अर्ज सादर केलेत. परंतु वि.प.पतसंस्थे कडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे पोलीस स्टेशन, कोंढाळी येथे विरुध्दपक्षाचे विरोधात अनुक्रमे दिनांक 06.09.2009 व दिनांक 09.08.2010 रोजी तक्रारी नोंदविल्यात. सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदविल्याच्या तारखा या अनुक्रमे दि.06.09.2010 व दिनांक 09.08.2011 असल्याच्या प्रत्यक्ष्य तक्रारीचे प्रतीवरुन दिसून येतात. त्यानंतर तक्रारकर्त्याने वि.प.पतसंस्थेच्या पदाधिका-यांना अधिवक्ता यांचे मार्फतीने दि.09.03.2012 रोजी नोंदणीकृत डाकेने कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीस विरुध्दपक्षास मिळाल्या नंतरही, विरुध्दपक्ष पतसंस्थेचे पदाधिकारी वि.प.क्रं 1 ते 3 यांनी सदर नोटीसला उत्तर दिले नाही व कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने मंचा समक्ष प्रस्तुत तक्रार दाखल करुन तीव्दारे खालील प्रकारच्या मागण्या केल्यात- विरुध्दपक्षाने मुदतठेवीची परिपक्वता तिथी नंतर देय रक्कम रुपये-25,000/- प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.18% दराने व्याजासह तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित व्हावे. तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल व आर्थिक नुकसानी संबधाने नुकसान भरपाई म्हणून रुपये-20,000/- विरुध्दपक्षा कडून मिळावेत तसेच प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्षा कडून मिळावा.
3. विरुध्दपक्ष क्रं-1 ते 3 यांना न्यायमंचाचे मार्फतीने नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली.
(अ) पैकी विरुध्दपक्ष क्रं 1- सुनिलभाऊ अजाबराव बोरसे, अध्यक्ष, संतकृपा ग्रामीण शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, रामनगर, कोंढाळी, जिल्हा नागपूर या नाव आणि पत्त्यावर नोंदणीकृत डाकेने पाठविलेली नोटीस “ सदर्हू नोटीस घेण्यास इन्कार” या पोस्टाचे शे-यासह परत आली, ती नि.क्रं 06 वर रेकॉर्डवर उपलब्ध आहे. अशाप्रकारे नोटीस तामील झाल्या नंतर वि.प.क्रं 1 मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्यांनी आपले लेखी म्हणणे मंचा समक्ष मांडले नाही म्हणून वि.प.क्रं 1 विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने प्रकरणात दि.17.10.2013 रोजी पारीत केला. (ब) विरुध्दपक्ष क्रं 2- रेखाताई मनोहरराव बोडखे,उपाध्यक्ष, संतकृपा ग्रामीण शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, रामनगर, कोंढाळी, जिल्हा नागपूर तसेच
विरुध्दपक्ष क्रं 3- विजय माणिकराव भोंगळे ,सचिव, संतकृपा ग्रामीण शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, रामनगर, कोंढाळी, जिल्हा नागपूर या नाव आणि पत्त्यानिशी दैनिक लोकमत दि.08 मे, 2013 या वृत्तपत्रात मंचा समक्ष उपस्थित राहण्या संबधी जाहिर नोटीस प्रकाशित करण्यात आली, ती निशाणी क्रमांक-10 अनुसार अभिलेखावर दाखल आहे. परंतु अशी नोटीस वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्या नंतरही वि.प.क्रं 2 व 3 हे मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्यांनी आपले लेखी म्हणणे मंचा समक्ष मांडले नाही म्हणून वि.प.क्रं 2 व 3 यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने प्रकरणात दि.17.10.2013 रोजी पारीत केला. 4. तक्रारकर्त्याने निशाणी क्रमांक 3 वरील यादी नुसार एकूण 10 दस्तऐवजांच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये मुदत ठेव प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत, मुदतठेवीची रक्कम परत मिळण्यासाठी केलेले विनंती अर्ज एकूण-04, पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या 02 तक्रारअर्जाच्या प्रती, वि.प.नां पाठविलेली कायदेशीर नोटीस, पोस्टाच्या पावत्या व पोच पावत्या अशा दस्तऐवजांचा समावेश आहे.
5. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार व सोबत दाखल केलेले दस्तऐवज तसेच त.क.चे अधिवक्त्यांचा युक्तीवाद यावरुन मंचा समक्ष खालील मुद्दे निर्णयार्थ उपस्थित होतात- मुद्दा उत्तर
(1) वि.प. पतसंस्थेने, तक्रारकर्त्यास मुदतठेवीची परिपक्वता तिथी नंतर देय रक्कम न देऊन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?............................. होय.
(2) काय आदेश?........................................................अंतिम आदेशा नुसार :: कारणे व निष्कर्ष :: मुद्दा क्रं-1 व 2-
6. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेल्या मुदतठेव प्रमाणपत्राच्या प्रतीवरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष संतकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोंढाळी (रजिस्ट्रेशन क्रं 917/2002)
या पतसंस्थेत (“विरुध्दपक्ष”म्हणजे संतकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोंढाळी तर्फे वि.प.क्रं 1 ते 3 असे समजण्यात यावे) रसिद क्रं 95 अनुसार दि.24.05.2004 रोजी मुदतठेव म्हणून रुपये-12,500/- एवढी रक्कम जमा केली. सदर मुदतठेवीचा कालावधी हा दि.24.05.2004 पासून ते 24.05.2010 असा आहे आणि परिपक्वता तिथी म्हणजे दि.24.05.2010 नंतर तक्रारकर्त्यास एकूण रुपये-25,000/- एवढी रक्कम त्यातील देय लाभांसह मिळणार होती. 7. तक्रारकर्त्याने, सदर मुदत ठेवीची रक्कम वि.प.पतसंस्थे कडून परत मिळण्या करीता रजिस्ट्रार नागपूर या नावाने दि.27.06.2008 रोजी अर्ज केला. त्यानंतर विभागीय सह निबंधक, सहकारी संस्था, नागपूर यांचेकडे वि.प. पतसंस्थे कडून मुदतठेवीची रक्कम मिळण्या करीता दि.07.12.2009 रोजी अर्ज केला व त्याची प्रत वि.प.पतसंस्थेला दिल्याचे सदर अर्जावरुन दिसून येते. त्यानंतर विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर यांचेकडे दि.25.01.2010 रोजी अर्ज केला व त्याची प्रत वि.प.पतसंस्थेस दिल्याचे अर्जावरुन दिसून येते. त्यानंतर पोलीस स्टेशन, कोंढाळी येथे वि.प.पतसंस्थेचे पदाधिकारी म्हणजे वि.प.क्रं 1 ते 3 यांचे विरुध्द प्रथमतः तक्रार दि.06.09.2010 रोजी व त्यानंतर दि.09.08.2011 रोजी नोंदविली. त्यानंतर दि.09.03.2012 रोजी अधिवक्ता यांचे मार्फतीने नोंदणीकृत नोटीस वि.प.क्रं 1 ते 3 यांना पाठविली व रजिस्टर नोटीस पाठविल्या बाबत पोस्टाच्या पावत्या व पोच पावत्या अभिलेखावर दाखल केल्यात. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने वि.प.पतसंस्थेत मुदतीनंतर मिळणारी रक्कम मिळण्या करीता वेळोवेळी पत्रव्यवहार केला तसेच पाठपुरावा केल्याचे दिसून येते. व त्यानंतर दि.09.03.2012 रोजी वि.प.पतसंस्थेचे पदाधिकारी म्हणजे वि.प.क्रं 1 ते 3 यांना कायदेशीर नोटीस पाठविली व ती त्यांना प्राप्त झाल्या बद्दल पोस्टाची पोच अभिलेखावर दाखल आहे परंतु वि.प.क्रं 1 ते 3 यांनी सदर नोटीसला कोणताही प्रतिसाद दिला नाही वा उत्तरही दिले नाही. त्याच प्रमाणे मंचाची नोटीस व जाहिर नोटीस वृत्तपत्रात प्रकाशित होऊनही वि.प. मंचा समक्ष उपस्थित झाले नाही व त्यांनी आपले लेखी उत्तरही दाखल केले नाही वा आपली बाजू मंचा समक्ष मांडली नाही. म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने प्रकरणात दि.17.10.2013 रोजी पारीत केला.
8. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्यास, त्याने वारंवार मागणी करुनही व पाठपुरावा करुनही मुदतठेवीची रक्कम परिपक्वता तिथी उलटून गेल्या नंतरही त्यातील देयलाभांसह अदा न करुन तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता, विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे तिचे पदाधिकारी वि.प.क्रं 1 ते 3 यांचे कडून मुदतठेवीची परिपक्वता तिथी नंतर मिळणारी देय रक्कम, प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.15% दराने व्याजासह मिळण्यास तसेच शारिरीक मानसिक त्रास व आर्थिक हानी संबधाने नुकसान भरपाई म्हणून रुपये-5000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- मिळण्यास पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 9. उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही, प्रस्तुत तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत- ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याची तक्रार, “विरुध्दपक्ष” संतकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोंढाळी तर्फे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्दपक्ष संतकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोंढाळी तर्फे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांना निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास मुदतठेवीची परिपक्वता तिथी 24.05.2010 रोजी देय होणारी रक्कम रुपये-25,000/-, परिपक्वता तिथी नंतर म्हणजे दि.25.05.2010 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.15% दराने व्याजासह येणारी संपूर्ण रक्कम अदा करावी. 3) विरुध्दपक्ष संतकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोंढाळी तर्फे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांनी, तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल व आर्थिक नुकसानी बाबत नुकसान भरपाई म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत. 4) सदर आदेशाचे पालन, वि.प. संतकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोंढाळी तर्फे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे. 5) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |