जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 669/2010. तक्रार दाखल दिनांक : 13/12/2010. तक्रार आदेश दिनांक : 28/04/2011. सौ. वनिता प्रकाश पासकंटी, वय 31 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. घर नं. एम.आय.जी. 40, बिडी घरकूल, सी-1 जवळ, हैद्राबाद रोड, सोलापूर – 413 005. तक्रारदार विरुध्द 1. संस्थापक, सोलापूर वृत्तदर्शन, जवळकर बिल्डींग, मुरारजी पेठ, सोलापूर – 413 001. 2. श्री. दत्तात्रय मन्मथ मेनकुदळे, वय 50 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. ढोबळे बिल्डींग, मुरारजी पेठ, सोलापूर – 413 001. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : मिलींद आडम विरुध्द पक्ष गैरहजर / एकतर्फा आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 हे दूरदर्शन चॅनल असून त्यांच्याकडून विविध घडामोडी व मनोरंजन कार्यक्रम प्रक्षेपीत करण्यात येत असत. विरुध्द पक्ष यांनी सुरक्षीत ठेव विभाग म्हणून योजना सुरु केली. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी दि.23/5/2007 रोजी रु.25,000/- द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दराने विरुध्द पक्ष यांच्याकडे गुंतवणूक केले. दि.23/5/2008 रोजी ठेवीची मुदत संपल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी त्यांना रु.29,000/- चा धनादेश दिला. तो धनादेश बँकेतील खात्यामध्ये वटविण्यासाठी जमा केला असता, खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव परत आला. तक्रारदार यांनी अभियोक्त्यामार्फत नोटीस पाठवूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे मुदत ठेव व त्यावरील व्याज असे एकूण रु.42,000/- मिळावेत आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्च रु.8,000/- मिळावा, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे. उचित संधी देऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत किंवा म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे रु.25,000/- रक्कम गुंतविलेले आहेत. ठेवीच्या मुदतीनंतर विरुध्द पक्ष यांच्याकडे ठेव रकमेची मागणी केली असता, दिलेला धनादेश वटला नाही आणि ठेव रक्कम देण्याकरिता टाळाटाळ करण्यात येत आहे, अशी त्यांची प्रमुख तक्रार आहे. 5. मंचाची नोटीस बजावल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी म्हणणे दाखल केलेले नाही किंवा तसे मंचासमोर हजर झालेले नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार त्यांना मान्य असल्यास पुष्ठी मिळते. 6. तक्रारदार यांनी मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम मुदत संपल्यानंतर मागणी करुनही विरुध्द पक्ष यांनी परत केलेली नाही. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे ठेवीमध्ये रक्कम गुंतवून वित्तीय सेवा घेतल्याचे स्पष्ट आहे. मुदतीनंतर ठेव रक्कम परत करणे, हे विरुध्द पक्ष यांचे कर्तव्य असून तशी त्यांची कायदेशीर व करारात्मक जबाबदारी आहे. विरुध्द पक्ष यांनी दि.4/5/2008 रोजी तक्रारदार यांना पत्र पाठवून ठेव रक्कम व्याजासह परत करणार असल्याचे कळविले आहे. मुदत पूर्ण झाल्यानंतरही विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम परत न करुन तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सबब, तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून ठेव पावतीप्रमाणे देय द.सा.द.शे. 16 टक्के व्याजासह ठेव रक्कम मिळविण्यास पात्र ठरतात, या मतास आम्ही आलो आहोत. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे ठेवीमध्ये गुंतविलेली रक्कम रु.25,000/- मुदत ठेव तारीख दि.23/5/2007 पासून द.सा.द.शे.16 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/28411)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |