निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 31/12/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 18/03/2013
तक्रार निकाल दिनांकः-09/05/2014
कालावधी 1 वर्ष 4 महिने 9 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री प्रदीप निटुरकर, B.Com.LL.B.
सदस्या - सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
डॉ.राजेंद्र दिगंबरराव मुळावेकर अर्जदार
वय 53 वर्षे, धंदा वैद्यकीय व्यवसाय, अWड.एस.एन.वेलणकर
रा.जिंतूर कॉलनी सेलू,
ता.सेलू, जि.परभणी.
विरुध्द
1 संजीवनी मोटर्स तर्फे अधीकृत प्रतिनिधी गैरअर्जदार
प्लॉट क्र.168, भरोसे पेट्रोल पंपाच्या बाजूला, अWड.एम.जे.बोबडे
वसमत रोड, परभणी.
2 अधिकृत प्रतिनिधी-महिंद्रा टू व्हीलर्स लि. अWड.अनिल गायकवाड
ब्लॉक-डी/1, प्लॉट क्र.18/2 (पार्ट),
एम.आय.डी.सी., चिंचवड, पुणे 411019
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.प्रदीप निटुरकर, अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
(निकालपत्र पारित व्दारा – सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या)
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी सेवाञुटी केल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
अर्जदाराने दिनांक 09.04.2012 रोजी पावती क्रमांक 541 अन्वये Duro whilte करिता बुकींग म्हणुन गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडें रुपये 1000/- भरले व उर्वरीत रक्कम रुपये 41,880/- भरुन दिनांक 24.04.2012 रोजी सदरचे वाहन खरेदी केले. त्या वाहनाचा नो.क्र.एम.एच.22/ए.बी.3937 असा आहे. वाहनाचा वापर सुरु झाल्यानंतर त्यांचे अॅव्हरेज 45 किमी न येता 25 ते 29 किमी असल्याचे लक्षात आल्यामुळे दिनांक 06.06.2012 रोजी सदरचे वाहन परभणी येथे आणले. गैरअर्जदार क्र.1 ने First Free Servicing केल्यानंतर व्यवस्थीत अॅव्हरेज देईल असे आश्वासन दिल्यामुळे अर्जदाराने वाहन servicing केल्यानंतर सेलूला नेले. परंतु अॅव्हरेजमध्ये कसलाही फरक पडला नाही. त्याउपर पुन्हा बॅटरीचा प्रॉब्लेम सुरु झाला त्यासाठी दिनांक 07/07/2012 रोजी सदरचे वाहन परभणी येथे पाठविण्यात आले. तब्बल 20 दिवसानंतर रुपये 100/- चार्ज घेवुन बॅटरी बदलुन न देता गैरअर्जदाराने बॅटरी दुरुस्त करुन दिली. अर्जदाराने मिटर रिडींग 0567 व रिडींग 0850 असतांना setting केली. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दिनांक 20.09.2012 रोजी व दिनांक 12.10.2012 रोजी पञाव्दारे अर्जदाराने सर्व समस्याचा उहापोह गैरअर्जदाराकडे केला. गैरअर्जदार क्र.1 चे मेकॅनीक श्री कलीम यांनी दिनांक 28.09.2012 रोजी servicing व average setting करुन दिली परंतु त्यानंतरही अॅव्हरेजचा प्रश्न सुटला नाही. पुर्वी वाहन 29 किमीचे अॅव्हरेज देत होते ते उलट 20 किमी झाले. म्हणुन अर्जदाराने 01.12.2012 रोजी गैरअर्जदारांना कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु गैरअर्जदारांनी त्यांच्या नोअीसला प्रतिसाद न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी सदरचे वाहन हे दोषपुर्ण असल्यामुळे परत घेवुन अर्जदारास वाहनाची पुर्ण किंमत रुपये 42880/- 12 टक्के व्याजासह द्यावी. तसेच मानसीक ञासापोटी रक्कम रुपये 3000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 2000/- मिळावेत अश्या मागण्या मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपञ नि..2 वर व पुराव्यातील कागदपञे नि.4, नि.30, नि.31 वर मंचासमोर दाखल केली.
मंचाची नोटीस गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना तामील झाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन अनुक्रमे नि.23 व नि.26 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदार क्र.1 चे म्हणणे असे की, अर्जदार हा बॅटरीच्या संदर्भात समस्या घेवुन परभणी येथे आला असता नियमाप्रमाणे बॅटरी दिनांक 26.06.2012 रोजी बदलुन दिली त्या नवीन बॅटरीचा क्रमांक 762918 6बी26 असा आहे. दिनांक 28.09.2012 रोजी अर्जदाराच्या वाहनाची दुसरी मोफत सर्व्हीसिंग करुन दिल्यानंतर त्यांच्या कलीम मेकॅनीक यांनी अर्जदाराच्या समक्ष सदरील वाहनाचे अॅव्हरेज काढले असता त्यावेळी 100 मिली ला 05 किमी एवढे अॅव्हरेज काढुन दिले याचा अर्थ एका लिटरला 50 किमी एवढे अॅव्हरेज सदरील वाहन देत होते ही बाब अर्जदाराने सुध्दा मान्य केलेली आहे. पुढे पहिली बॅटरी बदलून दिल्यानंतरही अर्जदाराने केलेल्या तक्रारीमुळे त्याला दिनांक 02.10.2012 रोजी पुन्हा नविन बॅटरी दिली. बॅटरीचा क्रमांक 574047 6एच22 असा आहे. यावरुन गैरअर्जदाराने अधिक तत्परतेने अर्जदारास सेवा पुरवलेली आहे. तसेच सदर वाहनात कोणत्याही प्रकारचा दोष नाही व तो वाहनाचा विक्रेता असल्यामुळे वाहनाच्या निर्मितीमध्ये त्याची काहीही जबाबदारी नसल्यामुळे त्याच्या विरोधातील तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत शपथपञ नि.24 वर व पुराव्यातील कागदपञ नि.25 वर मंचासमोर दाखल केले.
गैरअर्जदार क्र.2 यांचे म्हणणे असे की, अर्जदाराने स्वतः वाहन पाहून तपासून घेवुन त्याची वैशिष्टयेबद्दल व इंधन सरासरीबद्दल खाञी करुन स्वतःच्या मर्जीनुसार वाहन खरेदी केले. त्यासाठी त्याला गैरअर्जदाराच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने कोणत्याही प्रकारचे आमीष, भुलथापा, जोरजबरदस्ती केलेली नाही. तसेच सदरचे वाहन 1 लिटर पेट्रोलमध्ये 45 किमी चालते अशी खाञी, आश्वासन हमी इत्यादी गैरअर्जदाराच्या वतीने कुणीही दिलेली नाही. सदर वाहनाच्या वापरासंबंधी काही निर्देश युजर मॅन्युअलमध्ये देण्यात आलेले आहेत. परंतु अर्जदाराने त्या निर्देशाकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते. तसेच कोणत्याही वाहनाचे पुर्णपणे अॅव्हरेज हे ब-याच गोष्टीवर अवलंबून असते. यामध्ये जे इंधन वापरले जाते त्याची गुणवत्ता, रस्त्याचा दर्जा व स्थिती, वाहनचालकाचे वाहन चालविण्याचे कसब, रस्त्यावरील वर्दळ इत्यादी बाबींचा त्यात समावेश होतो. अर्जदाराने गैरअर्जदारविरुध्द मंचात खोटी तक्रार दाखल केलेली असल्यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1 गैरअर्जदारांनी सदर वाहनाच्या अॅव्हरेज होय
संदर्भात अर्जदाराची दिशाभुल करुन अनुचीत
व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे शाबीत झाले
आहे काय ?
2 आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2 -
अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन दिनांक 24.04.2012 रोजी Duro White हे दुचाकी वाहन खरेदी केले होते. वाहनाचा वापर सुरु झाल्यानंतर त्याचे अॅव्हरेज 45 किमी न येता फक्त 29 किमी व काही दिवसानंतर फक्त 20 किमी / लिटर एवढेच अॅव्हरेज आल्यामुळे सदरचे वाहन दोषपुर्ण आहे अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने स्वतःच्या मर्जीने सदरचे वाहन खरेदी केलेले आहे व सदरच्या वाहनाचे अॅव्हरेज 45 किमी/लिटर असल्याचे अर्जदारास गैरअर्जदाराने कधीही सांगितलेले नाही. सदर वाहनाच्या वापरासंबंधीचे निर्देश युजर मॅन्युअलमध्ये देण्यात आलेले आहे. परंतु अर्जदाराने त्या निर्देशाकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले. पुढे गैरअर्जदाराने घेतलेला बचाव असा की, कोणत्याही वाहनाचे अॅव्हरेज हे ब-याच गोष्टीवर अवलंबून असते जसे इंधनाची गुणवत्ता, रस्त्याचा दर्जा व स्थिती, वाहन चालकाचे वाहन चालविण्याचे कसब इत्यादी तसेच शक्य तेवढी अर्जदारास तत्परतेने सेवा पुरविण्यात आल्याचा दावा गैरअर्जदाराने लेखी निवेदनातुन केला आहे. मंचासमोर अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यातील कागदपञाची पाहणी केली असता खालील बाबी स्पष्ट होतात. अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन दिनांक 24.04.2012 रोजी महिंद्रा कंपनीची Duro दुचाकी वाहन खरेदी केले होते. तदनंतर दोषपुर्ण असलेली बॅटरी वारंटीप्रमाणे गैरअर्जदाराने बदलून दिल्याचेही स्पष्ट होते. त्यामुळे सदरचा वाद फक्त वाहनाच्या अॅव्हरेज पुरताच मर्यादीत आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदनातुन सदरच्या वाहनाचा अॅव्हरेज 45 किमी/लिटर असल्याचा इनकार केला आहे. परंतु गैरअर्जदाराचे मेकॅनीक श्री कलीम याने दिनांक 28.09.2012 रोजी वाहनाचे अॅव्हरेज 10 मिलीला 5 किमी म्हणजे 50 किमी/लिटर असे अॅव्हरेज काढुन दिले. म्हणजे गैरअर्जदाराने लेखी निवेदनातून घेतलेल्या बचावास स्वतःच छेद दिल्याचे लक्षात येते. वास्तविक पाहता गैरअर्जदाराने त्याच वेळेस अर्जदाराचे सदर वाहनाच्या अॅव्हरेज संदर्भातील कथन खोटे असल्याचे सांगावयास हवे होते तसेच महिंद्रा कंपनीच्या वेबसाईटवरुन महिंद्रा Duro च्या स्पेसिफिकेशन काढुन त्याची सत्यप्रत अर्जदाराने नि.31 वर मंचासमोर दाखल केली आहे. त्यावरुन सदर वाहनाचे अॅव्हरेज 45 किमी/लिटर असल्याचे स्पष्ट होते. परंतु कोणत्या परिस्थिती हे अॅव्हरेज मिळू शकते या संदर्भात काहीही नमूद केलेले नाही. त्यामुळे वाहनाचे अॅव्हरेज ब-याच गोष्टींवर अवलंबून असते असा बचाव गैरअर्जदाराला आता घेता येणार नाही. जाहिरातीतच याचा स्पष्टपणे उल्लेख करणे गरजेचे असते. त्यामुळे गैरअर्जदाराने जाहिरातीव्दारे ग्राहकाची दिशाभूल करुन अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे मंचाचे मत आहे. तसेच सदरचे वाहन अॅव्हरेज कमी देते म्हणजे ते वाहन दोषपुर्ण आहे व त्यात मॅन्युफॅक्चरींग डिटेक्ट आहे असे मानता येणार नाही. किंबहुना मॅन्युफॅक्चरींग डिटेक्ट असल्यासंदर्भातील कोणताही ठोस पुरावा मंचासमोर आलेला नाही. त्यामुळे वाहन परत घेवुन वाहनाची पुर्ण रक्कम मिळावी अशी मागणी अर्जदाराने केलेली आहे ती मान्य करता येणार नाही. तसेच अर्जदार व गैरअर्जदारांनी मा.वरीष्ठ न्यायालयाचे खालीलप्रमाणे न्यायनिवाडे मंचासमोर दाखल केले आहे.
1) 2014(1) सीपीआर 43 (एनसी)
2) आरपी क्र.1115/2012 (एनसी)
3) आरपी क्र.2830/2007 (एनसी)
4) आरपी क्र.1652/2006 (एनसी)
5) एफए क्र.723/2006 (एनसी)
मा. राष्ट्रीय आयोगाने उपरोक्त प्रकरणात व्यक्त केलेल्या मतांचाही आधार या प्रकरणात घेण्यात आलेला आहे.
सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात येतो.
2 गैरअर्जदार क्र.2 यांनी निकाल कळाल्यापासुन 30 दिवसांच्या आत अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याच्या कारणास्तव नुकसान भरपाई रक्कम रुपये 2000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- अर्जदारास द्यावी.
3 दोन्ही पक्षांना निकालाच्या प्रती मोफत पुरावाव्यात
सौ.अनिता ओस्तवाल श्री.प्रदीप निटुरकर
सदस्या अध्यक्ष