ग्राहक तक्रार क्र. 213/2014
दाखल तारीख : 17/10/2014
निकाल तारीख : 23/10/2015
कालावधी: 01 वर्षे 0 महिने 07 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. प्रभाकर देविदास धाबेकर,
वय - 62 वर्ष, धंदा – शेती,
रा.दुधगाव, ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मे. संजयकुमार डाळेप सव्यवस्थापक,
स्टेशन रोड, कसबे तडवळे, ता. जि. उस्मानाबाद,
2. मार्क अॅग्रो, जेनेटीक्स प्रा. लि.
रिजनल ऑफिस, लोहिया निवास, राजपथ टु अंबादेवी रोड,
मुधोळकर पेठ, अमरावती,
3. तालूका कृषी अधिकारी,
कार्यालय उसमानाबाद,
ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.आर.आर.मुंढे.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधिज्ञ : श्री.जे.डी.पवार.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
1. विरुध्द पक्षकार (विप) क्र. 2 मार्फत निर्मित विक्रेता विप क्र.1 कडून सोयाबीनचे बी घेऊन पेरले असता बी सदोष असल्यामुळे उगवण झाली नाही व नुकसान झाले म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्ता (तक) याने ही तक्रार दिलेली आहे.
2. तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
तक हा दुधगाव ता.जि. उस्मानाबादचा शेतकरी आहे व तेथे त्याला जमीन गट क्र.262 आहे. दि.11/07/2014 रोजी आपल्या जमीनीत पेरण्यासाठी तक ने विप क्र.2 निर्मित विक्रेता विप क्र.1 यांचेकडून सोयाबीन जेएस335 लॉट क्र.MAPRL 138 दोन बॅगा प्रत्येकी 30 किलोच्या प्रत्येकी रु.2,425/- ला विकत घेतल्या. आपले जमीनीत पेरणी केली. आठ दिवसानंतर बियाणांची उगवण झाल्याची दिसून आली नाही. विप क्र. 1 शी संपर्क साधला असता त्याने ता. कृषी अधिकारी यांचेकडे जाण्यास सांगितले. तक ने दि.17/07/2014 रोजी तसा अर्ज दिला. त्यांनी पाहणी करुन बियाणे उगवले नसल्याचा अहवाल तयार केला.
3. तक ला नांगरणीसाठी रु.4,000/-, मोगडणी रु.2500/-, पेरणी व खत रु.6,000/-, इतर मशागत रु.5,000/- असा खर्च आला. बियाणांची किंमत रु.4850/- व अपेक्षित उत्पन्न रु.62650/- असे एकूण रु.85,000/- चे नुकसान झाले आहे. मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- विप कडून तक ला मिळणे जरुर आहे. म्हणून ही तक्रार दि.17/10/2014 रोजी दाखल करण्यात आलेली आहे.
4. तक ने तक्रारी सोबत दि.11/07/2014 ची पावती दि.17/07/2014 चा अर्ज, दि.16/09/2014 चे पत्र, दि.20/07/2014 चा तपासणी अहवाल, सातबारा उतारा, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
5. विप क्र.1 ने दि.29/212/14 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक ने बियाणे स्वत:साठी वापरलेले नाही असे विप चे म्हणणे आहे. तक ने बियाणे न उगवल्याची तक्रार या विप कडे केली हे अमान्य आहे. कृषी अधिकारी यांनी पंचनामा केला हे अमान्य आहे. त्याबद्दल नोटीस या विप ला दिलेली नव्हती. तक चे नुकसान झाले हे अमान्य. त्यामुळे तक ची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
6. विप क्र.2 यांनी दि.18/11/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले आहे. बियाणांची उगवण झाली नाही हे अमान्य केले आहे. कृषी अधिकारी यांनी अहवाल दिला हे अमान्य केले. तक विप यांचा ग्राहक आहे हे अमान्य. विप चे बियाणे उकृष्ठ दर्जाचे असते. वातावरण मातीचा दर्जा वापरलेली खते, किटकनाशके, पाऊस व इतर घटक उगवण शक्तीवर परिणाम करतात. शासकीय अहवाल तक ने हजर करणे जरुर होते. तक ने स्वत:चा सातबारा उतारा हजर केलेला नाही. नियम 23 अ प्रमाणे बियाणे नमूना प्रयोगशाळेत तपासणी करीता पाठवून अहवाल मागवणे आवश्यक होते. असा नमूना तपासून घेण्यास विप तयार आहे. तथाकथित पंचनामा कायदेशीर नाही व शासनाचे परिपत्रकाप्रमाणे केलेला नाही. त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
7. विप क्र.3 नोटीस बजावूनही हजर झाले नाही त्यामुळे तक्रार त्यांचे विरुध्द एकतर्फा चालली आहे.
8. तक ची तक्रार, त्याने दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात. आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप यांनी तक याला सदोष बियाणे पुरवले काय ? नाही.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 व 2
9. हे लक्षात घेतले पाहिजे की सदरची तक्रार प्रभाकर देविदास धाबेकर याने केलेली आहे. बियाणे खरेदीची पावती दि.11/07/2014 ची त्याचेच नावाने आहे. गट क्र.262 या जमीनीचा सातबारा उतारा असे दर्शवितो की सौ.सुमन प्रभाकर धाबेकर दोन हेक्टर 34 आर जमीनीची मालकीण आहे. ती तक ची बायको असावी मात्र जमीन तिचे नावे का झाली आहे याबद्दल तक्रारीत खुलासा नाही. कदाचित तिला आईवडीलाकडून जमीन वारसा हक्काने आलेली असू शकते. एकत्र कुटुंबकर्ता म्हणून तक ती जमीन वहिवाटतो असा उल्लेख तक्रारीत करण्यात आलेला नाही. तक ने याबद्दल संदिग्दता दूर केलेली नाही.
10. तक ने तक्रारीत म्हंटले आहे की बियाणे घेतले त्याच दिवशी पेरणी केली म्हणजेच दि.11/07/2014 रोजी पेरणी केली. तक ने दिलेल्या दि.17/07/2014 चे अर्जात पेरणीची तारीख दिलेली नाही. तक ला जे उत्तर तपासणी अहवालाबद्दल मिळाले ते दि.16/09/2014 चे आहे मात्र ते सुमन प्रभाकर धाबेकर हिचे नावाने दिलेले आहे. त्यावर संदर्भ दि.17/07/2014 चे अर्जाचा लिहिला असून क्षेत्र पाहणी अहवालाची तारीख दि.20/07/2014 नमूद करण्यात आलेली आहे. समितीचा निष्कर्ष बियाणे दोषयुक्त असल्याचा नमुद करण्यात आलेला आहे. तपासणी अहवाल सोबत दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये तारखांमध्ये खाडाखोड करण्यात आलेली आहे. बियाणे खरेदीची तारीख 11/07/2014 लिहिली असून पेरणीची तारीख दि.10/07/2014 लिहिली आहे. असे वारंवार आढळून येत आहे की पंचनामे हे बेजबाबदारपणे केले जात आहेत. संबंधित अधिकारी त्यासाठी जबाबदार आहेत.
11. अहवालाप्रमाणे चौकशीय उपसमितीने दि.20/07/2014 रोजी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. पेरणी हंगामी पावसानंतर केलेली होती. बियाणांची खोली पाच सेंटीमीटर नमूद आहे मात्र तो आकडा गिरवलेला आहे. बियाणे कुजलेले दिसून आले. जमीनीत ओलावा योग्य होता. बियाणे तिफणीने पेरले होते. उगवण टक्केवारी 12.32 होती. बियाणे सदोष आढळून आले असे नमूद केलेले आहे. संतोष प्रभाकर धाबेकर यांने पेरणी केली असे नमूद आहे.
12. समितीच्या अहवालावर विश्वास ठेवला तर उगवण अतिशय कमी म्हणजेच 12.32 टक्के झाली होती. बियाणे पाच सेंटीमीटर खोलीवर पेरलेले होते व कुजलेले दिसून आले. असे नमूद आहे. मात्र विप क्र.2 ने दि.18/11/2014 रोजी असा अर्ज दिला की सदर लॉट मधील नमूना बियाणे प्रयोगशाळेत पाठवून त्याचा अहवाल मागवण्यात यावा. तक तर्फे या अर्जास विरोध करण्यात आला नाही. शासकीय प्रयोगशाळा नागपूर येथे विप क्र. 2 चे खर्चाने नमूना पाठविण्याचा आदेश करण्यात आला. विप क्र. 2 यांने सदर बियाणाचा नमूना हजर केल्या नंतर सिलबंद स्थितीत नागपूर प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला. प्रयोगशाळेचा अहवाल दि.17/01/2015 रोजी प्राप्त झाला आहे. त्यावर पक्षकाराना म्हणणे देण्यास सांगण्यात आले. मात्र पक्षकारांनी म्हणणे दिले नाही. त्या अहवालाप्रमाणे सामान्य वाढ 82 टक्के होती तर असामान्य वाढ 13 टक्के होती. मृत बियाणे 5 टक्के आढळून आले. बियाणे चांगल्या प्रतीचे होते.
12. आपल्या अर्जाच्या पुष्ठयार्थ विप क्र. 2 यांनी खालील केस लॉवर भर दिला होता.
महाराष्ट्र हायब्रिड सिडस विरुध्द अलवालापतीचंद्र III(1998)CPJ 8 SUPREME COURT
NSC LTD. विरुध्द गुरुस्वामी I (2002) CPJ 13 NC
नुझीवीदू सिडस विरुध्द गोविंद REV.36/2013 महाराष्ट्र आयोग.
नुझीवीदू सिडस विरुध्द विठठल REV. 57/2010 महाराष्ट्र आयोग.
अंतिम युक्तिवादाच्या पुष्ठयार्थ विप क्र. 2 ने खालील केस लॉवर भर दिला आहे.
1) खामगाव तालूका विरुध्द बाबू कुटटी III (2006) CPJ Page 269.
2) सोमनाथ् विरुध्द विलास II (2009) CPJ 414 महाराष्ट्र आयोग.
3) चरणसिंग विरुध्द हिलिंग टच III (2000) CPJ 1 सुप्रिम कोर्ट.
4) बेंजो विरुध्द शिवाजी ii (2003) CPJ 628 महाराष्ट्र आयोग.
5) महाराष्ट्र हायब्रिड विरुध्द गौरी I (2007) CPJ (266) नॅशनल कमिशन.
6) नुझीवीदू सिडस विरुध्द बाबासाहेब IV (2014) CPJ 119 नॅशनल कमिशन.
वर म्हंटल्याप्रमाणे तक ने केवळ तालुका स्तरीय चौकशी उपसमितीच्या पाहणी अहवालावर आपली केस उभी केली आहे. वर म्हंटल्याप्रमाणे समितीने विचारपुर्वक पाहणी अहवाल दिल्याचे दिसून येत नाही. बियाणे खरेदीपुर्वी पेरणी केल्याचे नमूद केले आहे. बियाणांची खोली किती होती हे संशयातीत नाही. कदाचित बियाणे जास्त खोल पेरल्या गेल्यामुळे ते कुजून केले असावे. बियाणे पेरण्याच्या सुचनेनुसारच पेरणी केली तरच योग्य उगवण होऊ शकते. प्रयोगशाळेमध्ये चांगल्या प्रकारची उगवण दिसुन आली व बियाणे चांगल्या प्रतीचे असल्याचा शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल आलेला आहे. त्यामुळे सदोष बियाणामुळे नुकसान झाले हे तक शाबीत करु शकला नाही. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 च उत्तर नकारार्थी देतो व खालीप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार रद्द करण्यात येते.
2) खर्चाबद्दल आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.