वकील- पी. बी. आंधळे.
सामनेवाले 1 तर्फे :-वकील- ए. व्ही. कुलकर्णी.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
सामनेवाले नं. 1 हे सॅमसंग मोबाईल कंपनीचे अधिकृत डिलर असून सामनेवाला हे सदर कंपनीचे वितरक आहेत.
तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 कडून एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल दिनांक 14/09/2009 रोजी रक्कम रु. 6800/- मध्ये एक वर्षाच्या गॅरंटी व वॉरंटीसहीत खरेदी केला, ज्याचा मॉडेल नं. 8-700 असून आय.एम.ई.आय./ आर.एस.एन. नं. 358224022178937 असा आहे.
सदरचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल खरेदी केल्यापासून 2 महिन्यामध्येच खराब झाला. त्यावेळी तक्रारदार सामनेवाले नं. 1 कडे मोबाईल दुरुस्तीकरुन घेण्यासाठी गेला असता सामनेवाले नं. 1 यांनी सदर मोबाईल वॉरंटी काळात आहे. सामनेवाले नं. 2 हे कंपनीचे अधिकृत वितरक आहेत. त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठवावा लागेल. दुरुस्तीसाठी 15 दिवस लागतील, अशी तक्रारदाराची समज घालून मोबाईल ठेवून घेतला.
15 दिवसानंतर सामनेवाले यांचेकडे मोबाईल घेण्यासाठी तक्रारदार गेला असता सामनेवाले नं. 1 ने सदरचा मोबाईल सामनेवाले नं. 2 कडे दुरुस्तीसाठी पाठवला आहे, आठ दिवस लागतील, असे सांगितले.
8 दिवसानंतर तक्रारदार सामनेवाले नं. 1 कडे गेले असता मोबाईलमध्ये मोठा दोष निघाला आहे, आणखी वेळ लागेल असे म्हणून तक्रारदाराला परत पाठवले.
त्यानंतरही तक्रारदार सामनेवाले नं. 1 कडे वेळोवेळी जावून सुध्दा सामनेवालेंनी सदरचा मोबाईल दुरुस्ती करुन दिला नाही. शेवटी तक्रारदाराने सामनेवालेकडे मोबाईलची किंमत रु.6800/- ची मागणी केली असता त्यास अरेरावीची भाषा करुन, धमकी देवून परत पाठविले.
तक्रारदाराने शेवटी सामनेवाले नं. 2 कंपनीकडे धाव घेतली असता सदरील सॅमसंग मोबाईल दुरुस्त होवू शकत नाही, असे सांगितले. त्यावर तक्रारदाराने मोबाईलच्या वॉरंटी संबंधी विचारणा केली असता कंपनी दुसरा मोबाईल देवू शकत नाही असे सांगून दि.04/01/2010 रोजी कस्टमर कॉपी देवून परत पाठविले.
सामनेवाले नं. 1 व 2 यांनी सदरचा मोबाईल वॉरंटी काळात असून सुध्दा तक्रारदारास तो दुरुस्त करुन दिली नाही किंवा त्याची किंमत परत केली नाही. म्हणून त्यांनी आपल्या सेवेत कसूर करुन तक्रारदाराची फसवणूक केलेली आहे. सामनेवाले नं. 1 व 2 हे बेकायदेशीर कृत्य असून तक्रारदाराची मानसिक, शारिरीक व आर्थीक फसवणूक केलेली आहे.
दिनांक 04/01/2010 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदारास मोबाईल दुरुस्ती करुन देण्यास किंवा बदलून देण्यास इन्कार केला, त्यामुळे सदर तक्रारीस कारण घडलेले आहे.
विनंती की, तक्रारदारास सामनेवालेकडून दुसरा मोबाईल किंवा सदर मोबाईलची किंमत रु. 6800/- परत देण्याबाबत आदेश व्हावा. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रककम रु. 10,000/- देण्याबाबत आदेश व्हावा.
सामनेवाले नं. 1 यांनी त्यांचा खुलासा तारीख 09/06/2010 रोजी दाखल केला. त्यांचा खुलासा थोडक्यात की, तक्रारीतील कलम- 1 चुकीचा असून सामनेवाले नं. 1 हे वितरक नसून फक्त विक्रेते आहेत.
कलम- 2 मधील मजकूर चुकीचा असून यामध्ये खराब मोबाईल दुरुस्त करुन देण्याबददलची वॉरंटी असते, गॅरंटी नाही. तक्रारदाराने दि. 14/09/2009 रोजी मोबाईल खरेदी केला, हे म्हणणे बरोबर आहे.
कलम- 3 मधील मजकूर कांही अंशी बरोबर व कांही अंशी चुक आहे. तक्रारदार हे सदर मोबाईल घेवून सामनेवाले नं. 1 कडे आले व सामनेवाले नं. 1 यांनी तो दुरुस्तीसाठी सामनेवाले नं. 2 कडे पाठविला. परंतू सामनेवाले नं. 2 यांनी तक्रारदाराने सदरचा मोबाईल व्यवस्थीत वापरला नाही, असा रिपोर्ट देवून तक्रारदारास परत पाठवला. त्या रिपोर्टची एक प्रत (कस्टमर कॉपी) सामनेवाले नं. 1 यांना दिली, त्यामुळे सामनेवाले नं. 1 यांनी त्यांच्या सेवेत कुठलाही कसूर केलेला नाही.
कलम- 4 मधील मजकूर चुकीचा आहे व तो सामनेवाले नं. 1 यांना मान्य नाही. तक्रारदाराच्या चुकीच्या व निष्काळजीपणाच्या वापरामुळे त्याचा मोबाईल खराब झाला. त्यामुळे तो वॉरंटीमध्ये येत नाही, असे सामनेवाले नं. 2 चे म्हणणे आहे. त्यामुळे सामनेवाले नं. 1 यांचा यात कुठलाही निष्काळजीपणा अथवा सेवेत कसूर नाही. केवळ पैसे लुबाडण्यासाठी व नवीन मोबाईल मिळविण्यासाठी तक्रारदाराने ही खोटी केस केलेली आहे.
तक्रार अर्जातील कलम नं. 5,6,7, व 8 मधील मजकूर देखील खोटा काल्पनिक आहे. तक्रारदारास त्याचा मोबाईल सामनेवाले नं. 2 यांनी कस्टमर कॉपीसह व रिपोर्टसह परत केलेला आहे. यामध्ये सामनेवाले नं. 1 चा काहीही संबंध येत नाही.
सामनेवाले नं. 1 हे केवळ विक्रेते असून, उत्पादनावरील वॉरंटी ही कंपनी देत असते व त्याप्रमाणे विक्रेता यांनी त्यांच्या बिलावर सर्व बाबी नमूद केलेल्या आहेत. ग्राहकाकडून जर त्याच्या चुकीच्या वापरामुळे वस्तु खराब झाली तर ती वॉरंटीमध्ये येत नाही, असे सामनेवाले नं. 2 चे म्हणणे आहे. त्यामुळे तक्रार खर्चासह रदृ करण्यात यावी.
सामनेवाले नं. 2 यांनी त्यांचा खुलासा तारीख 12/05/2006 रोजी दाखल केला. त्यांचा खुलासा थोडक्यात की, तक्रारदाराने स्पष्ट चित्र न्याय मंचासमोर उभे केलेले नाही. कांही महत्वाच्या व ख-या बाबी न्याय मंचापासून लपवून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सदरचा वाद हा पूर्णपणे खोटा आहे. केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. परंतू वास्तवात सदरची तक्रार म्हणजे सामनेवालेंना त्रास देण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदयाचा दुरुपयोग केलेला आहे.
या सामनेवालेंना मे. संजय वॉच कंपनी किरकोळ विक्रेता सामनेवाले नं. 1 यांच्याकडून हँडसेट मिळाला. या सामनेवालेंनी सदरचा हँडसेट तपासणी करुन आणि वॉरंटीची वैद्यता तपासून त्यानंतर सदर मे.संजय वॉच कंपनी किरकोळ विक्रेता यांना सदरचा हॅडसेंट सर्व्हीस सेंटरकडे पाठविण्यास सांगितले. या ठिकाणी नमूद करण्यात येते की, तक्रारदाराचा मोबाईल संच हा त्याने योग्य त-हेने हाताळलेला नसल्याकारणाने तो कार्यरत नव्हता आणि त्याची संपूर्ण जबाबदारी तो सामनेवालेंवर टाकू पाहत आहे व सदरची बाब ही कायदयाच्या दृष्टीने बेकायदेशीर आहे. वारंटीच्या शर्ती व अटीनुसार तक्रारदारांना त्यांच्या मागणीनुसार मोबाईलच्या संदर्भात कोणतीही सुविधा सामनेवाले देवू शकत नाहीत.
तक्रारदाराचा मोबाईल हा वॉरंटीच्या नियम व अटीमध्ये येत नसल्याने तक्रारदारांना त्याच्या बदलाव्या लागणा-या भागांची किंमत दयावी लागेल. त्यावेळी तो दुरुस्त करता येईल. परंतू तक्रारदाराने सदरची बाब ही पूर्णपणे नाकारलेली आहे आणि खोटे आक्षेप घेवून सामनेवाले विरुध्द खोटी तक्रार केलेली आहे. या सामनेवालेने तक्रारदारांना प्रामाणिकपणे योग्यती सेवा दिलेली आहे. वादातील मोबाईलमध्ये कोणताही उत्पादित दोष नाही. सदरचा मोबाईल तक्रारदाराच्या चुकीच्या वापरामुळे खराब झालेला आहे. त्यास तक्रारदार स्वत: एकमेव जबाबदार आहे. या ठिकाणी सामनेवाले स्पष्टपणे नमूद करु इच्छितात की, तक्रारदाराने कोणत्याही तज्ञाचा पुरावा उत्पादित दोषाबाबत दाखल केलेला नाही. तक्रारीतील करण्यात आलेले आक्षेप हे सामनेवाले नाकारीत आहेत, म्हणून तक्रारदारांना सदरचा मोबाईल संच बदलून मिळणार नाही किंवा दोषयुक्त मोबाईलची किंमत परत मिळणार नाही. वरील सर्व परिस्थितीवरुन स्पष्ट होते की, तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केलेली आहे, त्यामुळे सदरची तक्रार रदृ करुन सामनेवालेंना रक्कम रु. 5,000/- नुकसान भरपाई देण्यात यावी.
न्याय निर्णयासाठी मुददे उत्तरे
1. तक्रारदारांना सामनेवाले नं. 1 व 2 यांनी
मोबाईल संच बदलून/ दुरुस्ती करुन न
देवून दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब
तक्रारदाराने सिध्द केली आहे काय ? नाही.
2. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
3. अंतिम आदेश ? निकालाप्रमाणे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, तक्रारीसोबतचा सामनेवाले नं. 1 चा खुलासा, शपथपत्र, सामनेवाले नं. 2 चा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराने त्याचे शपथपत्र तारीख्ं 29/06/2010 ते तारीख 04/08/2010 या कालावधीपर्यंत दाखल केलेले नाही व सदरचे प्रकरणे हे युक्तिवादासाठी लागले. तारीख 18/09/2010 पर्यंत तक्रारदाराचा युक्तिवाद नाही. सामनेवाले नं. 1 यांनी त्यांचा लेखी युक्तिवाद ता. 09/08/2010 रोजी दाखल केला.
सामनेवाले नं. 2 चा युक्तिवाद नाही.
तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 कडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल संच तारीख 14/09/2009 रोजी रक्कम रु. 6,800/- ला विकत घेतलेला आहे. त्याबाबत सामनेवाले नं. 1 ने तक्रारदारांना पावती दिलेली आहे. ती निशाणी- 4 वर आहे. सदरची बाब ही सामनेवाले नं. 1 व 2 यांना मान्य आहे.
तक्रारदाराचा मोबाईल संच नादुरुस्त झाला. त्यासाठी तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 कडे मोबाईल दुरुस्तीसाठी दिला. सामनेवाले नं. 1 ने सदरचा मोबाईल संच सामनेवाले नं. 2 कडे दुरुस्तीसाठी पाठवला. सामनेवाले नं. 2 यांनी तक्रारदारांना कस्टमर प्रत देवून तक्रारदाराने सदरचा मोबाईल व्यवस्थीतरित्या हाताळलेला नसल्याने नादुरुस्त झालेला आहे व सदरची बाब ही वॉरंटीच्या नियमात बसत नाही, त्यामुळे सामनेवाले नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना मोबाईल दुरुस्ती करुन देण्यास नकार दिलेला आहे व बदलून देण्यासही नकार दिलेला आहे.
वरील सर्व बाबी तक्रारदाराने तक्रारीत नमूद केलेल्या आहेत. तक्रारदाराची तक्रार पाहता त्यात सदर मोबाईल संचामध्ये काय काय दोष आहेत, याबाबत कोणतीही बाब नमूद केलेली नाही. तसेच मोबाईल संच नादुरुस्त झाल्याबाबतचा कोणत्याही तज्ञाचा पुरावा किंवा शपथपत्र तक्रारदाराने दाखल केलेले नाही.
सामनेवाले नं. 1 ने तक्रारदाराचा मोबाईल संच हा तक्रारदाराने योग्यप्रकारे न हाताळल्याच्या कारणाने नादुरुस्त झालेला आहे, असे म्हटलेले आहे. सामनेवाले नं. 2 चे सदरचे विधान तक्रारदाराने नाकारलेले नाही व त्यासंदर्भातच तक्रारदाराचा तज्ञाचा पुरावा आवश्यक आहे. परंतू त्याबाबत कोणताही पुरावा तक्रारदाराने दिलेला नाही, त्यामुळे सामनेवाले नं. 2 चे सदरचे विधान हे आव्हाना शिवाय असल्याने पुरावा कायदयातील तरतुदीनुसार सदरचे विधान हे मान्य होते व मान्य असेलेले विधान शाबीत करण्याची गरज नाही. त्यामुळे न्याय मंचाला वरील विधान ग्राहय धरण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही.
मोबाईल संचात उत्पादित दोष असल्याची कोणतीही बाब तक्रारीत नमूद नाही अगर त्याबाबत पुरावा नाही, त्यामुळे उत्पादित दोष असतांना सामनेवाले नं. 2 यांनी तक्रारदारांना मोबाईल संच दुरुस्ती करुन दिली नाही, अशी कोणतीही परिस्थिती सदर तक्रारीत दिसत नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदाराचा मोबाईल दुरुस्ती करुन न देवून किंवा मोबाईल बदलून न देवून दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होत नाही. त्यामुळे तक्रारदाराने तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे कोणतीही रक्कम तक्रारदारांना देणे उचित होणार नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार रदृ करण्यात येत आहे.
2. सामनेवालेंच्या खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(सौ. एम. एस. विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, बीड.