::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/06/2017 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1. सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल करण्यात आलेली आहे.
सदर प्रकरणात तक्रारकर्ता यांनी दाखल केलेली तक्रार व दस्तऐवज, विरुध्द पक्ष यांनी पोष्टाव्दारे पाठविलेले दस्त, या सर्वांचे अवलोकन करुन मंचाने खालील निष्कर्ष काढला तो येणेप्रमाणे.
विरुध्द पक्ष यांना नोटीस मिळून सुध्दा लेखी जबाब मंचात दाखल केला नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाविरुध्द विना जबाब प्रकरण पुढे चालवण्याचा आदेश मंचाने दिनांक 31/03/2017 रोजी पारित केला.
तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षाकडून ब्रिक्वेटींग प्रेस मशीन इंटरनेटव्दारे खरेदी करण्यासाठी विरुध्द पक्ष यांनी सुचविल्यानुसार रुपये 1,00,000/- रक्कम प्राथमिक स्वरुपात अकोला अर्बन को. ऑप. बॅंक लिमी. शाखा कारंजा, जि. वाशिम खाते क्र. 1003014001649 मधुन दिनांक 05/08/2013 रोजी विरुध्द पक्ष यांचे भारतीय स्टेट बॅंक शाखा भाकरी नगर, राजकोट, गुजरात खाते क्र. 30211476817 मध्ये आर.टी.जी.एस. व्दारे जमा केली, त्याची पावती ( दस्त क्र. 10 ) तक्रारकर्त्याने मंचात दाखल केली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक संरक्षण कायदा 1986, कलम-2 (ड) नुसार ग्राहक या संज्ञेत मोडतो.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार विरुध्द पक्ष यांच्या कर्मचा-याने स्वतः येवून शेतीला पुरक असा जोडधंदा करण्यासाठी ब्रिक्वेटींग प्रेस मशीन खरेदी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सदर मशिनची किंमत ही 10,00,000/- रुपये सांगीतली व त्यानुसार विरुध्द पक्षाने सुचविल्यानुसार रुपये 1,00,000/- रक्कम प्राथमिक स्वरुपात अकोला अर्बन को. ऑप. बॅंक लिमी. शाखा कारंजा, जि. वाशिम तर्फे दिनांक 05/08/2013 रोजी विरुध्द पक्षाच्या खात्यावर आर.टी.जी.एस. व्दारे जमा केली. परंतु दोन दिवसानंतर विरुध्द पक्षाचा फोन आला आणि सदर मशिनची किंमत ही रुपये 13,75,178/- झाली आहे, असे सांगितले. त्यामुळे ताबडतोब दिनांक 07/08/2013 रोजी फोन करुन रुपये 1,00,000/- परतीची मागणी केली. विरुध्द पक्षाने रक्कम आज पाठवतो, उद्या पाठवतो असे सांगून ताटकळत ठेवले. सरतेशेवटी विरुध्द पक्षाने फोनव्दारे संपर्क करुन, ऑर्डर कॅन्सलेशन अर्जाची मागणी केली. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दिनांक15/01/2015 रोजी अर्ज केल्यानंतर दिनांक 19/02/2015 रोजी फक्त रुपये 25,000/- परत दिले. उर्वरीत रुपये 75,000/- ची मागणी केली असता, परत करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे राहिलेली रुपये 75,000/- रक्कम परत मिळण्यासाठी सदर प्रकरण मंचात दाखल केले.
2) विरुध्द पक्षाने नोटीस मिळाल्यानंतर पोष्टाव्दारे नियम व अटीचे दस्त पाठवले, ते मंचाने सदर प्रकरणात दाखल करुन घेतले आहे. सदर दस्तामध्ये विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, दिनांक 05/08/2013 रोजी रुपये 1,00,000/- तक्रारकर्त्याने पाठवले आहे व दिनांक 15/01/2015 रोजी ऑर्डर कॅंन्सल केलेली आहे. त्यामुळे रुपये 1,00,000/- रक्कमेतून 75 % रक्कम नियम व अटीनुसार कपात केली आहे व 25 % रक्कम परत केली आहे, ते योग्य आहे.
3) उभय पक्षाने दाखल केलेले दस्त, त्याचे अवलोकन केले असता, मंचाच्या असे निदर्शनास आले की, विरुध्द पक्षाने बचाव म्हणून पोष्टाव्दारे पाठविलेले दस्त मंचाने विचारात घेतले आहेत. सदर दस्तावरुन असे दिसते की, Quotation for Briquetting machine ( Model Ju MBO – BRQ 9075 – Domestic ) मधील Annexure– 4 Commercial offer मध्ये Commercial Terms and conditions payment schedual –
1) 40 % of the ordered value in advance along with your confirm order.
2) 20 % of the ordered value whthin 30 days from date of your confirm order.
3) Balance at the time of delivery, before dispatch.
यामध्ये असे दिसून येते की, मशिनच्या एकूण किंमतीच्या 40 % रक्कम भरलेली असेल तरच ऑर्डर ग्राहय धरण्यात येते. या ठिकाणी तक्रारकर्त्याने फक्त 1,00,000/- रुपये रक्कम भरलेली असल्याने तक्रारकर्त्याची ऑर्डर ग्राहय धरता येणार नाही.
परंतु या प्रकरणात विरुध्द पक्षाने हजर होवून त्यांची बाजू मांडलेली नाही. तसेच पोष्टाव्दारे पाठविलेले नियम व अटी, तक्रारकर्त्याला लागू पडणार नाही. कारण तक्रारकर्त्याने भरलेले रुपये 1,00,000/- हे विरुध्द पक्षाने जवळपास दीड वर्षे वापरलेले असल्यामुळे व केवळ रुपये 25,000/- तक्रारकर्त्यास परत केलेले असल्यामुळे उर्वरीत जी रुपये 75,000/- रक्कम आहे ती दरसाल, दरशेकडा 8% व्याजासह परत मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. तसेच तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाईपोटी, प्रकरणाच्या न्यायिक खर्चासह रक्कम रुपये 8,000/- द्यावी, असे आदेश पारित केल्यास ते न्यायोचित ठरेल, असे मंचाचे मत आहे.
सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ता यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराला उर्वरीत रुपये 75,000/- रक्कम परत करावी व त्या रक्कमेवर दिनांक 19/02/2015 पासुन प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत दरसाल, दरशेकडा 8% दराने व्याज द्यावे. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाईपोटी, प्रकरण खर्चासह रक्कम रुपये 8,000/- ( रुपये आठ हजार फक्त ) द्यावी.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
s.v.Giri