जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 246/2012.
तक्रार दाखल दिनांक : 13/12/2012.
तक्रार आदेश दिनांक : 15/07/2014. निकाल कालावधी: 01 वर्षे 07 महिने 02 दिवस
(1) श्रीमती स्नेहलता विलास गायकवाड, वय 45 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. गायकवाड गल्ली, उस्मानाबाद,
ता.जि. उस्मानाबाद.
(2) विश्वप्रसाद विलास गायकवाड, वय 22 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. वरीलप्रमाणे.
(3) कु. विद्या विलास गायकवाड, वय 17 वर्षे,
व्यवसाय : शिक्षण, रा. वरीलप्रमाणे.
(4) कु. वर्षा विलास गायकवाड, वय 16 वर्षे,
व्यवसाय : शिक्षण, रा. वरीलप्रमाणे.
अ.पा.क. तक्रारदार क्र.1. तक्रारदार
विरुध्द
(1) संजय प्रभाकर जाधव, तालुका कृषि अधिकारी,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.
(2) नंदकुमार देशपांडे, विभागीय प्रमुख, डेक्कन इन्शुरन्स
अॅन्ड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि., 6, परखडे बिल्डींग,
भानुदास नगर, बिगबझारच्या पाठीमागे, आकाशवाणी चौक,
औरंगाबाद – 413 001.
(3) ज्ञानेश्वर जनार्धन फुलझेले, विभागीय व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि., विभागीय कार्यालय,
शिवाजी चौक, उस्मानाबाद. विरुध्द पक्ष/सामनेवाले
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
श्री. एम.बी. सस्ते, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : बी.बी. देशमुख
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 स्वत:
विरुध्द पक्ष क्र.3 यांचेतर्फे विधिज्ञ : आर.एच. भिंगारे
आदेश
श्री. एम.व्ही. कुलकर्णी अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. विलास गायकवाड या शेतक-याचे अपघाती निधन झाल्यामुळे त्याच्या वारसांनी शेतकरी अपघात विमा रक्कम सामनेवालांनी नाकारल्यामुळे ही तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराचे थोडक्यात कथन असे आहे की, तक्रारदार नं.1 ही पत्नी, तक्रारदार नं.2 हा मुलगा व तक्रारदार नं.3 व 4 ह्या मयत विलास याच्या मुली आहेत. मयत विलास हे शेतकरी असल्यामुळे शासनातर्फे सामनेवाला नं.1 ते 3 यांनी त्याचा शेतकरी अपघात विमा उतरवला होता. विलास यांचे दि.11/7/2010 रोजी वाहन अपघातामध्ये निधन झाले. उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. 154/2010 अन्वये गुन्हा नोंद झालेला आहे. विलास याचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे विमा रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. तक्रारदारांनी सर्व कागदपत्रांसह सामनेवाला नं.1 याच्याकडे विमा रक्कम मिळण्याचा अर्ज दाखल केला. सामनेवाला नं.2 याने काही कागदपत्रांची मागणी केली. ती कागदपत्रे ता. 11/2/2011 रोजी सामनेवाला याच्याकडे तक्रारदाराने दिली. तथापि, अद्यापही सामनेवाला यांनी विम्याची रक्कम तक्रारदारांना दिलेली नाही व उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे ही तक्रार तक्रारदारांनी दाखल केलेली आहे.
3. सामनेवाला नं.1 याने हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्याच्या कथनाप्रमाणे सदरचा विमा प्रस्ताव सन 2009-2010 कालावधीतील असून दि.25/10/2010 रोजी दोन प्रतीमध्ये प्राप्त झाला. कागदपत्राची छाननी करुन तो जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांना पाठविण्यात आला. तसेच संबंधीताने त्रुटीची पूर्तता दि.28/3/2012 रोजी केलेली आहे.
4. सामनेवाला नं.3 याने हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रारदाराच्या सर्व तक्रारी त्याने अमान्य केलेल्या आहेत. तक्रार दाखल करण्यास कुठलेही कारण घडलेले नाही, असे सामनेवाला नं.3 याचे म्हणणे आहे. मयत विलास याचा अपघाती मृत्यू नसल्यामुळे कुठलही भरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र नाहीत, असे सामनेवाला नं.3 याचे म्हणणे आहे. तक्रारदार याने या सामनेवालाकडे केव्हांही विमा रकमेची मागणी केलेली नाही अगर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, असे या सामनेवालाचे म्हणणे आहे. त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे, असे या सामनेवालाचे म्हणणे आहे.
5. सामनेवाला नं.2 याने हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला नं.2 च्या म्हणण्याप्रमाणे ते कोणत्याही प्रकारची फी अथवा आर्थिक मदत शासनाकडून घेत नाहीत. त्यांचे काम मर्यादीत स्वरुपाचे आहे. म्हणजेच अपघाताच्या प्रकारानुसार विमा कंपनीस आवश्यक असणारे दस्तऐवज जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयाकडून गोळा करणे व मुदतीत प्राप्त दस्तऐवजाची छाननी करुन विमा कंपनीस सादर करणे. दाव्याचा निर्णय होईपर्यंत विमा कंपनीकडे पाठपुरावा करणे. दाव्याच्या निर्णयासंबंधी काही दस्तऐवज अपूर्ण व त्रुटी असल्यास जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयास कळविणे. विमा दावेदार व विमा कंपनी यांच्यामध्ये मध्यस्त म्हणून काम करणे. त्यामुळे सामनेवाला नं.2 कुठल्याही प्रकारे जबाबदार नाहीत, असे सामनेवाला नं.2 याचे म्हणणे आहे.
6. सामनेवाला नं.2 याने पुरवणी जबाब देऊन असे म्हटले आहे की, मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अशा दाव्यात दावेदाराने विलंबाबाबत समर्थनिय कारण सादर करणे जरुर आहे. तसे असल्यासच विमा कंपनी ते दावे स्वीकारते. 90 दिवसानंतर प्राप्त झालेले दावे सामनेवाला नं.2 याने विमा कंपनीस जे सादर केले ते त्यांनी नाकारले. अशाप्रकारचे दावे भविष्यात स्वीकारु नये, असे विमा कंपनीने कळविलेले आहे. त्यामुळे मुदतीनंतर आलेले दावे स्वीकारणे सामनेवाला नं.2 ने बंद केलेले आहे. तालुका कृषि अधिकारी, तसेच जिल्हा कृषि अधिकारी हे मस्ट पार्टी असून दावे त्यांच्याकडे प्राप्त झाले व त्यांनी सामनेवाला नं.2 कडे कधी पाठविले, हे कळविणे जरुर आहे. प्रस्तुत दावा हा मुदतीच्या नंतर प्राप्त झाल्यामुळे आम्ही परत केला, असे सामनेवाला नं.2 चे म्हणणे आहे.
7. पक्षकारांच्या परस्पर विरोधी कथनावरुन आमचे निष्कर्षासाठी खालील मुद्दे निघतात. त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर खालील दिलेल्या कारणांसाठी लिहिलेली आहेत.
मुद्दे उत्तर
1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2. तक्रारदार विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? सामनेवालांनी पुन्हा
दाव्याची शहानिशा करावी.
3. हुकूम काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
8. मुद्दा क्र. 1 व 2 :- येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, सामनेवाला नं.1 तालुका कृषि अधिकारी, उस्मानाबाद आहेत. तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे विलास यांचे ता.11/7/2010 रोजी निधन झाले. तक्रारदारांनी दि.25/10/2010 रोजी सामनेवाला नं.1 कडे विमा प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर सामनेवाला नं.2 याने काही कागदपत्रांची मागणी केली. ती कागदपत्रे सामनेवाला नं.2 यांना पुरविण्यात आली. आता सामनेवाला नं.2 याने असा बचाव घेतलेला आहे की, जे दावे 90 दिवसानंतर प्राप्त झाले, ते त्यांनी सामनेवाला नं.1 कडे परत पाठविलेले आहेत. प्रस्तुतचा दावा सुध्दा परत पाठविला की नाही पाठविला, याबद्दल संदिग्धता ठेवलेली आहे. याउलट सामनेवाला नं.3 यांनी आपल्याकडे तक्रारदारांचा दावा आला होता, हेच पूर्णपणे नाकारलेले आहे.
9. तक्रारदारांनी जे दावे सामनेवाला नं.1 कडे दाखल केले, त्याची प्रत हजर केली असून सामनेवाला नं.1 ची ता.11/2/2011 ची त्यावर पोहोच आहे. तो दावा सामनेवाला नं.2 मार्फत सामनेवाला नं.3 कडे गेला, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तक्रारीसोबत एफ.आय.आर. ची कॉपी, पंचनाम्याची कॉपी, विलास यांचे मृत्यू प्रमाणपत्र, मरणोत्तर पंचनामा, शवचिकित्सा अहवाल याची प्रत पण हजर करण्यात आलेली आहे. एफ.आय.आर. प्रमाणे विलास हा मोटार सायकलवरुन जात असताना ट्रकने त्याला पाठीमागून धडक देऊन जखमी केले व त्यामध्ये तो मयत झाला. म्हणजेच मृत्यू अपघाती झाला, याबद्दल दुमत नाही. विलास याच्या जमिनीचा 7/12 उतारा हजर केला असून उस्मानाबाद येथील गट नं. 699/3 पैकी 46 आर. क्षेत्राचा तो मालक असल्याचे दिसते.
10. सामनेवाला नं.2 चे पूर्वाधिकारी कबाल इन्शुरन्स यांनी तक्रारदार यांना दिलेल्या ता.14/12/2011 च्या पत्राची प्रत हजर करण्यात आलेली आहे. काही कागदपत्रांची त्यांनी मागणी केल्याचे दिसते. सामनेवाला नं.3 याने तो प्रस्ताव का नाकारला, याचे कारण कोठेही रेकॉर्डवर आलेले नाही. उलट सामनेवाला नं.3 चे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे प्रस्ताव दाखलच झालेला नाही. सामनेवाला नं.2 चे म्हणणे की, प्रस्ताव उशिरा आल्यामुळे तो परत पाठविण्यात आला. अशाप्रकारे सामनेवाला नं.2 व 3 यांनी जबाबदारी परस्परावर टाकली आहे. मात्र गुणवत्तेवर या दाव्याचा निकाल होणे जरुर होते. ते न केल्यामुळे सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केलेली आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देतो व मुद्दा क्र.2 चे उत्तर सामनेवालाने दाव्याची पुन्हा शहानिशा करावी असे देतो व खालीलप्रमाणे हुकूम देतो.
आदेश
1. सामनेवाल नं.2 याने सामनेवाला नं.1 कडून पुन्हा दाव्याची कागदपत्रे प्राप्त करावेत व सामनेवाला नं.3 कडे ते पाठवावेत व विलंब माफीबाबत स्पष्टीकरण पाठवावे. त्यानंतर सामनेवाला नं.3 याने त्या दाव्याचा गुणवत्तेवर निकाल 90 दिवसात द्यावा.
2. खर्चासंबंधी हुकूम नाहीत.
3. उभय पक्षकारांना प्रस्तुत आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क पुरविण्यात यावी.
(श्री. एम.बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/श्रु/14714)