निकालपत्र:- (दि.01/11/2010) (व्दारा-सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला वकीलांमार्फत सदर मंचासमोर हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार सामनेवालांनी तक्रारदारांना स्टेनलेस स्टिल ऑपरेशन टेबल न देता स्टिल कोटींग केलेले टेबल देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेने दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार वैद्यकीय व्यवसाय करीत असून त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णांच्या ऑपरेशनसाठी आवश्यक असणारे हायड्रालिक स्टिल ऑपरेशन टेबल सामनेवालांकडून रक्कम रु.40,000/- किंमतीचे पावती क्र.396 अन्वये दि.12/05/2008 रोजी खरेदी केले. सदर टेबल संपूर्ण स्टिल बॉडीमध्ये असून त्या टेबलास जोडलेल्या अक्सेसरीजही स्टिलच्या आहेत असे तक्रारदारास खरेदी करताना सांगितले. 6 महिन्याच्या कालावधीनंतर नमुद टेबल स्टिल बॉडीचे नसून स्टिल कोटींग केलेले आहे व ते गंजू लागले आहे. तसेच सदर टेबलास जोडलेल्या अक्सेसरीज स्टिलच्या नसून बिडाच्या आहेत. व त्या फुटून पडत आहेत तसेच त्याचे तुकडे पडत आहेत. सदर बाबींची कल्पना तक्रारदाराने सामनेवालांनां फोनवरुन कळविल्यावर त्यांचा प्रतिनिधी अमोल बिद्रे यांनी येऊन टेबलाची पाहणी केली. तसेच चुंबकाचे आधारे सदरचे टेबल स्टिलचे नाही हे त्यांनी मान्य केले व कंपनीचे मालक श्री संजय कुंभार यांचेशी चर्चा करुन दोन महिन्यात नवीन टेबल पाठवून देतो असे सांगितले. दोन महिने झालेवरही सदर टेबल सामनेवालांनी तक्रारदारास दिलेले नाही. तसेच फोनवरुन त्यांचेशी संपर्क केला असता सामनेवाला हे टाळतात व त्याची दखल घेत नाहीत. सबब सामनेवालांनी स्टिल बॉडीचे टेबल आहे असे भासवून तक्रारदारास स्टिल प्लेटींगचे टेबल दिलेले आहे. सबब सामनेवालांचे हे कृत्य सेवेतील त्रुटी असलेने प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दाखल करणे भाग पडले.सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन तक्रारदारास नविन स्टिल बॉडीचे हायड्रोलिक ऑपरेशन टेबल देण्याचा सामनेवाला यांना आदेश व्हावा अथवा टेबलाची रक्कम रु.40,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह परत करावी. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.40,000/- कोर्ट खर्चापोटी रक्क्म रु.5,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ प्रस्तुत टेबल खरेदी पावतीची सत्यप्रत व पूर्वाधार दाखल केला आहे. तसेच दि.11/08/2010 रोजी गंजलेल्या टेबलाचे फोटो व निगेटिव्ह दाखल केले आहेत. तसेच रिजॉइन्डर दाखल केलेला आहे. (4) सामनेवालाने दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार अ) तक्रारदारचा अर्ज हा स्वार्थी मतलबी, बीनबुडाचा, खोटया मजकूराचा आहे. सबब तो मान्य व कबूल नाही. तक्रारदाराने केलेली कथने ही कोणत्याही लेखी पुरावा व कागदपत्रांशिवाय केलेली आहे. कोणतीही वस्तु बनवूण घेत असताना लेखी स्वरुपात मागणी, करार, किंमत वस्तु केव्हा तयार करुन देणे ती ताब्यात घेत असताना पाहून घेणे, सर्व रक्कम देणे व त्याची बिले घेणे, रक्कमांची पूर्ण फेड करणे ही जबाबदारी वस्तु खरेदी करणा-याची आहे. ब) तक्रारदाराने सामनेवालांकडून जो टेबल घेतलेला आहे तो टेबल पूर्णपणे खात्री करुन घेतलेला आहे व तो स्टिल बॉडीमध्ये आहे. तसेच स्टिल बॉडीला कोटींग केलेले असून त्यांचे नटबोल्टसुध्दा स्टिल बॉडीचे आहेत. तसेच सदर टेबलाचा टॉप हा स्टेनलेस स्टिलचा असून टेबलाचा बॉटम व फ्रेम ही स्टिल कोटेड असून सदर बॉटमवरील पत्रा स्टेनलेस स्टिलचा आहे. टेबलाचा टॉप व बॉटम या दोहोमधील जो भाग आहे. तो ओतिव बिडाचाच असतो व ओतिव बिडाचाच लागतो. हायड्रोलिक पंपाचा फुट स्टेनलेस स्टिलचा आहे. सबब तक्रारदाराने टेबलासंबंधी केलेली कथने खोटी आहेत. क) तक्रारदार हे गायनाकॉलॉजीस्ट आहेत. त्यांचे दवाखान्यात पेशंट डिलीव्हरीसाठी येत असतात. प्रस्तुतचा टेबल हा डिलीव्हरीसाठीच घेतलेला आहे. पेशंटची डिलीव्हरी करणेपूर्वी ऑपरेशन थिएटरमध्ये फ्युमिकेशन या केमिकलचा वापर करुन ऑपरेशन थिएटर निर्जंतूक केले जाते. तसेच पेशंटची डिलीवहरी करणेपूर्वी सदर टेबल विशिष्ट प्रकारचे असिडने स्वच्छ केले जाते. सदर टेबलावर पेशंटच्या डिलीव्हरीच्या वेळेला रक्त सांडले जाते व सदरचे रक्त पाण्याने तसेच विशिष्ट प्रकारचे असिडने टेबल स्वच्छ केले जाते. त्याचे प्रमाण जर जास्त झाले किंवा टेबलाच्या खाचेमध्ये पाणी किंवा असिड राहिले तरीसुध्दा स्टिल(लोखंड) गंजण्याची प्रक्रिया चालू होते. म्हणजेच एकंदरीत सदर वस्तुची देखभाल व्यवस्थित केली नाही तर ती वस्तु गंजते. तक्रार अर्जातील कलम 3 मधील कथने केली आहेत. तसे काहीही घडलेले नाही. सामनेवाला स्वत: तक्रारदारांकडे येणे बाकी वसुलीसाठी जात होते हे त्यांनीच हजर केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते. अदयापही रक्कम रु.17,000/- तक्रारदार सामनेवाला यांना देणे लागतात. सदरची रक्कम मागणी करुनही तक्रारदाराने दिलेली नाही. अमोल बिद्रे हे सामनेवालांचे प्रतिनिधी नसून ते सामनेवालांचे मित्र आहेत. त्यांनी टेबलाचे परिक्षण केलेले नाही अथवा बदलून देतो असे सांगितलेले नाही. कलम 5 व 6 मधील केलेली कथने खोटी व चुकीची आहेत. सामनेवाला हे तक्रारदाराकडे टेबल घेतलेपासून दि.20/10/2009 अखेर वसुलीसाठी जात होते. तक्रारदार उर्वरित रक्कम देणार नाहीत व त्यांचा हेतू शुध्द नाही हे पाहून सामनेवाला त्यांचेकडे रक्कम मागणेस गेलेले नाहीत. ड) सामनेवाला यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अमरावती, नाशिक, रत्नागिरी तसेच कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्हयात अशा प्रकारचे टेबलची विक्री केलेली आहे; आजपर्यंत त्याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रारदारांनी जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथील डॉ. ए.एस.पाटील यांना सन 1998 मध्ये अशा प्रकारचे टेबलाची विक्री केलेली आहे व ते टेबल पाहून तक्रारदाराने सामनेवालांकडे अशाच प्रकारचे टेबल खरेदी केलेले आहे. सदर टेबलाचे वजन अंदाजे 300 किलो भरते. तक्रार अर्जातील कलम 7 मधील कथने खरी नाहीत व त्याबाबत तक्रारदाराने केलेली कथने खरी नाहीत. त्याबाबतचा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तक्रार कलम 9 मधील कथने खोटी आहेत. टेबल खरेदी करत असताना टेबलासंबंधीचे डिस्क्रीप्शन अथवा रिक्वायरमेंट दिलेली नव्हती. तक्रारदाराने टेबल पाहून खरेदी केलेले आहे. तक्रारदाराने सामनेवालांकडून घेतलेली वस्तु ही व्यवसायाकरिता घेतलेली आहे. सबब सदरची तक्रार ही ग्राहक कायदयाअंतर्गत बसत नलसेने ती फेटाळणेस पात्र आहे. तक्रारदाराने केव्हाही सामनेवालांना रक्कम रु.40,000/- दिलेले नव्हते. सबब सदरची रक्कम व त्यावर व्याज मागणेचा अधिकार नाही. मूळात तक्रारदार हे सामनेवालांना अदयापही रक्कम रु.22,000/- देय लागतात. तक्रारदाराने सामनेवालांना कधीही अॅडव्हान्स रक्कम दिलेली नव्हती. प्रस्तुतचा खोटा अर्ज दाखल केलेला आहे. प्रस्तुतची तक्रार मुदतीत नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. तसेच तक्रारदारास सामनेवाला यांना रक्कम रु.22,000/-द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने व खर्चापोटी रक्कम रु.5,000/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विंनती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (4) सामनेवालांनी आपल्या म्हणणेच्या पुष्टयर्थ सन 1997 ते 2010 अखेर ऑपरेशन टेबल विक्री केलेल्या डॉक्टरांची व गावांची यादी जोडलेली आहे. (5) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- नाही. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- तक्रारदाराने सामनेवालांकडून टेबल खरेदी केल्याचे मान्य केलेले आहे. तक्रारदाराने दाखल केलेले बील नं.376 दि.12/05/08 चे अवलोकन केले असता सदरचे टेबलाची किंमत रक्कम रु.40,000/- होती. त्यामध्ये सामनेवालांनी रक्कम रु.5,000/- डिस्काऊंट दिला. त्यामुळे सदर टेबलाची किंमत झाली रक्कम रु.35,000/- यामध्ये अॅडव्हान्स म्हणून रक्कम रु.5,000/- दाखवून वजावट केलेली आहे व खाली रक्कम रु.30,000/- नमुद केलेले आहे. जुन्या टेबलापोटीची रक्कम रु.5,000/- वजावट दाखवून रक्कम रु.25,000/- तदनंतर रक्कम रु.3,000/- वजा करुन रक्कम रु.22,000/-, तदनंतर रक्कम रु.3,000/- वजा करुन रु.19,000/-, तदनंतर दि.13/05/08 रोजी रक्कम रु.2,000/- जमादिसून तेथे सामनेवालांची सही आहे. व त्यानंतर खालील बाजूस रक्कम रु.17,000/- पेड असे नमुद केलेले आहे ही बाब सामनेवालांनी आपल्या युक्तीवादाच्या वेळेस नाकारलेली आहे. कारण सदर रक्कम पेड केली असती तर त्यापुढे मी सही केली असती तेथे सही केलेली नाही. सबब सदरचे रक्क्म रु.17,000/- अदयापही येणे आहे. त्याचप्रमाणे अडव्हान्स रक्कम रु.5,000/- ही दिलेली नाही. सदर अडव्हान्सचे येथे फुली मारलेचे दिसून येते. प्रथमत: अडव्हान्स देतो असे सांगितले मात्र न दिलेने त्यासमोर फुली मारलेली आहे. मात्र वजावटीमध्ये सदरची रक्कम आली असली तरी सदरची रक्कम तक्रारदाराने दिलेली नाही. असे एकूण रक्कम रु.22,000/- तक्रारदार देय लागतात असे युक्तीवादाच्या वेळेस प्रतिपादन केलेले आहे. मात्र तक्रारदाराने सदरची बाब नाकारुन सदर टेबलची सर्व किंमत अदा केलेचे आपले रिजॉइन्डरमध्ये नमुद केले आहे. तसेच भरत को-ऑप बँक जयसिंगपूर यांचेवरील चेक क्र.45537 दि.16/06/08 रक्कम रु.5,000/-चा व चेक क्र.56100 दि.16/09/08 रक्कम रु.2,000/- दिलेले असून त्याबाबत बँकेचे स्टेटमेंट दाखल केलेले आहे व रक्कम रु.10,000/- रोख दिलेचे नमुद केले आहे. वरील वस्तुस्थितीचा विचार करता दाखल पावतीवरुन सदरचे टेबल दि.12/05/08 रोजी खरेदी केलेले असून तक्रारदाराने आपल्या शपथपत्रात रक्कम रु.7,000/- चेकने व रु.10,000/- रोखीत दिलेचे नमुद केले आहे. मात्र तशी रोखीची पावती दिसून येत नाही. याचा विचार करता तक्रारदाराने सदर टेबल खरेदी केलेपासून सदर टेबलाची रक्कम अदा करणेसाठी दि.16/09/2008 इतका 4 महिन्याचा कालावधी घेतलेला आहे. खरेदीदिवशीच प्रस्तुतची संपूर्ण रक्कम तक्रारदाराने अदा केलेचे दिसून येत नाही. तसेच सदर हिशोबाबाबत संदिग्धता दिसून येते या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. प्रस्तुत खरेदी पावतीचे अवलोकन केले असता तक्रारीतील नमुद टेबल हे हायड्रोलिक ऑपरेशन टेबल विथ कुशन असलेचे दिसून येते. तक्रारदाराने तक्रारीत सदरचे टेबल हे संपूर्णपणे स्टिल बॉडीचे असलेचे तसेच त्याचे अॅक्सेसरीज हया स्टिल बॉडीच्या आहेत असे सामनेवालांनी तक्रारदारास सांगितले होते असे तक्रार अर्जातील कलम 2 मध्ये नमुद केले आहे. मात्र प्रस्तुतचे टेबल हे स्टिल बॉडीचे नसुन स्टिल कोटींग केलेने ते गंजू लागलेचे व अॅक्सेसरीज या स्टिलचे नसून बिडाचे असलेने त्याचे तुकडे पडू लागलेचे 6 महिन्यानंतर निदर्शनास आलेचे कलम 3 मध्ये नमुद केले आहे. याचा विचार करता तक्रारदाराने युक्तीवादाच्या वेळेस प्रस्तुतचे टेबल हे स्टेनलेस स्टिलचे हवे होते मात्र ते फक्त स्टिल प्लेटींग करुन दिलेले आहे. सामनेवालांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये प्रस्तुत टेबलाचा बॉटम व टॉप हा स्टेनलेस स्टिलचा असून बॉटम व फ्रेम ही स्टिल कोटेड असून त्यावरील पत्रा मात्र स्टेनलेस स्टिलचा आहे. तसेच टेबलाचा टॉप व बॉटम या दोहोमधील भाग हा ओतिव बीडाचाच असतो व बीडाचाच असावा लागतो. तसेच हायड्रोलिक पंपाचा फुट हा स्टेनलेस स्टिलचा आहे असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. तक्रारदार हे गायनाकॉलॉजिस्ट आहेत. तसेच प्रस्तुतचे टेबल हे पेशंटच्या डिलीव्हरीसाठी वापरले जाते. पेशंटची डिलीव्हरी करणेपूर्वी ऑपरेशन थिएटरमध्ये फ्युमिकेशन या केमिकलचा वापर करुन ऑपरेशन थिएटर निर्जंतूक केले जाते. तसेच पेशंटची डिलीवहरी करणेपूर्वी सदर टेबल विशिष्ट प्रकारचे अॅसिडने स्वच्छ केले जाते. सदर टेबलावर पेशंटच्या डिलीव्हरीच्या वेळेला रक्त सांडले जाते व सदरचे रक्त पाण्याने तसेच विशिष्ट प्रकारचे अॅसिडने टेबल स्वच्छ केले जाते. त्याचे प्रमाण जर जास्त झाले किंवा टेबलाच्या खाचेमध्ये पाणी किंवा अॅसिड राहिले तरीसुध्दा स्टिल(लोखंड) गंजण्याची प्रक्रिया चालू होते. म्हणजेच एकंदरीत सदर वस्तुची देखभाल व्यवस्थित केली नाही तर ती वस्तु गंजते हे सामनेवालांचे म्हणणे तक्रारदाराने आपल्या रिजॉइन्डरमध्ये खोडून काढलेले नाही. तसेच तक्रारदाराने अमोल बिद्रे हे सामनेवालांचे प्रतिनिधी येऊन टेबलाचे चुंबकाव्दारे पाहणी केली व सदरचे टेबल लोखंडाचे असलेने गंजले आहे व मालकाशी बोलून(सामनेवाला) दोन महिन्यात नविन टेबल देण्याची व्यवस्था करतो असे कथन केलेले आहे. मात्र त्याबाबत श्री अमोल बिद्रे यांचे शपथपत्र अथवा अन्य कोणताही सबळ पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराने निगेटीव्ह सहीत तीन फोटो दाखल केलेले आहेत. सदर फोटोग्राफ्स वरुन सत्य वस्तुस्थिती निदर्शनास येत नाही. तक्रारदाराने पूर्णत: स्टेनलेस स्टिल बॉडी असणारे टेबल मागणी केलेबाबतचा पुरावा समोर दिसून येत नाही. तसेच पावतीवर नोंद असणा-या हायड्रोलिक ऑपरेशन टेबलप्रमाणे सदर टेबल नसणे अथवा त्यास गंज चढला अथवा कसे याबाबत कोर्ट कमिशनर नेमून त्याबाबतचा वस्तुस्थितीजन्य अहवाल घेणे क्रमप्राप्त असतानाही तक्रारदाराने त्याबाबत कोणतेही पाऊल उचलेले नाहीत. केवळ फोटोग्राफ्स वरुन सत्य वस्तुस्थिती निदर्शनास आलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांनी अशा प्रकारचे टेबलांची सन 1997 पासून ते सन 2010 अखेर इचलकरंजी, जयसिंगपूर, वडगांव, कोल्हापूर, गडहिंग्लज, इस्लामपूर, बत्तीस शिराळा, सांगली, चिक्कोडी, पुणे इत्यादी ठिकाणी जवळजवळ 142 टेबलांची विक्री केलेली आहे व सदर टेबलांबाबत नमुद डॉक्टरांचेकडून कोणत्याही प्रकारची तक्रार आली नसलेचे प्रतिपादन केलेले आहे. तक्रारदाराने युक्तीवादाच्या वेळेस संपूर्ण स्टेनलेस स्टिल असलेले हायड्रोलिक ऑपरेशन टेबलची मागणी केलेली होती. असे प्रतिपादन केले या वेळी सामेनवाला यांनी संपूर्णपणे स्टेनलेस स्टिल हायड्रोलिक ऑपरेशन टेबलची किंमत रक्कम रु.16,00,000/- असलेचे युक्तीवादाच्या वेळेस सांगितले आहे. तसेच तक्रारदारास विकलेले टेबल हे स्टिल बॉडीचे असून सामनेवालांनी तक्रारदाराची कोणतीही फसवणूक केलेली नाही हे तक्रारदारानेच आपल्या कलम 2 मध्ये मान्य केलेले आहे. सबब तक्रारदाराने आपली तक्रार सर्वसंम्मत पुराव्यानिशी शाबीत केलेली नाही. अशा परिस्थितीत सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवलेली आहे असे म्हणता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर हिशोबाबाबत संदिग्धता असलेने त्याबाबत हे मंच कोणतेही भाष्य करीत नाही. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत येते. 2. खर्चाविषयी कोणतेही आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |