न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे राजापूर, ता.खटाव, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. तर जाबदार हे बांधकाम व्यावसायीक आहेत. तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान दि. 1/10/2010 रोजी साठेखत झाले. प्रस्तुत साठेखत करारामध्ये नमूद केलेप्रमाणे जाबदार यांनी तक्रारदार यांना एकूण रक्कम रु.6,50,000/- बांधकामाचे टप्प्यानुसार व दस्तावरील किंमतीनुसार 650 स्क्वेअर फूट रो हाऊस बांधून देण्याचे ठरले होते व त्याप्रमाणे तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान करार/साठेखत झालेले होते व आहे. तो तक्रारदार व जाबदार या दोघांनाही मान्य होता व आहे. त्यानुसार दि.20/7/2010 रोजी प्रस्तुत मिळकतीचे खरेदीपत्र जाबदाराने तक्रारदाराला करुन दिले आहे. प्रस्तुत जाबदाराने त्यांच्या मालकीच्या जागेत मौजे खेड येथील जुना रि.स.नं. 35/3अ/3 चा नवीन सर्व्हे नंबर 71/3ए/3 मधील प्लॉट नं.4 याचे एकूण क्षेत्रफळ 152 चौ. मी. यात ओंकार रो- हाऊस मधील डेव्हलपमेंट स्कीम मधील इमारतीमध्ये अर्धा हिस्सा 76 चौ.मी. समाईक जागा, पैकी रो-हाऊस नं. 1 चे एकूण क्षेत्र 650 चौ.फुट म्हणजेच 60.40 चौ.मी. बिल्ट-अप, हॉल, किचन, संडास, बाथरुम टेरेस सह संपूर्ण मिळकत यांच्या चतुःसिमा खालीलप्रमाणे,
पूर्वेस - रो हाऊस नं. 2
दक्षिणेस - प्लॉट नं. 13,
पश्चिमेस प्लॉट नं. 3,
उत्तरेस - रस्ता
वरील चतुःसिमांकित मिळकत जाबदार यांनी स्वतः बांधकाम करुन देणेचे ठरलेले होते. त्याबाबतची कागदपत्रे म्हणजेच सदर नंबरचा ले-आऊट प्लॅन मा. सहाय्यक संचालक, नगर रचनाकारसो, सातारा यांचेकडील पत्र क्र. रेखांकन/खेड/
35अ/1079, दि.7/4/1994 रोजी मंजूर झालेबाबतचे पत्र तसेच सदर नंबर मा. जिल्हाधिकारीसो, सातारा यांचेकडील आदेश क्र.महा/तीन/बिनशेती/ना/एस.आर.148 /92 सातारा दि. 8/9/1994 ने बिनशेती झालेचे प्रमाणपत्र, तसेच सदर मिळकतीस बांधकाम परवाना व ग्रामविकास अधिकारी यांचेकडील ठराव क्र.7/2/4 दि.29/3/2010 ने मंजूर झाल्याची कागदपत्रे दाखवून वरील चतुःसिमेतील रो-हाऊस रक्कम रु.6,50,000/- रुपयास देण्याचे ठरविले होते. प्रस्तुत साठेखताचे तारखेपर्यंत रक्कम रु.2,25,000/- अँडव्हान्स म्हणून तक्रारदाराने जाबदाराला दिले होते. या सर्व बाबींचा उल्लेख करारपत्रात आहे. ऊर्वरीत रक्कम रु.4,25,000/- चे हप्ते ठरलेप्रमाणे तक्रारदाराने जाबदाराला अदा केले आहेत. पूर्ण रक्कम तक्रारदाराने जाबदाराला अदा केली आहे. परंतू साठेखतामध्ये नमूद केलेप्रमाणे पुढील सोयी सुविधा जाबदाराने तक्रारदाराला दिलेल्या नाहीत.
i किचन ओटयाला ग्रीन मार्बल बसविली नाही.
ii संडासचे काम पूर्ण केले नाही, पाईप बसविल्या नाहीत.
iii हॉलमध्ये टयूब, फॅन, बाहेरील बल्ब, बेडरुममध्ये टयूब बसविले नाही.
iv बोअरवेल सामाईक राहील असे ठरले असताना प्रस्तुत बोअरवेलसाठी बसविलेली मोटार काढून नेली. ती जाबदाराने आजअखेर बसविली नाही.
v पाण्याची सोय केलेली नाही. बोअरबेलचे पाणी विद्युत मोटारीने वरील पाण्याच्या टाकीत सोडणेसाठी कोणतीही सोय जाबदाराने केली नाही.
vi विद्युत कनेक्शन पाण्याची मोटार व संडास या गोष्टींची पुर्तता जाबदाराने केलेली नाही, संडास वाहून नेणा-या पाईप बसविल्या नाहीत.
vii टेरेसला दरवाजा बसविलेला नाही.
viii टेरेसवर वॉटरप्रुफींग केलेले नाही अगर स्लॅबला उतार दिलेला नाही त्यामुळे पावसाचे पाणी भिंतीमध्ये मुरुन शॉर्ट सर्कीट होण्याची भिती आहे.
अशाप्रकारे साठेखत करारात कबूल केलेप्रमाणे सुविधा जाबदाराने तक्रारदाराला पुरविल्या नाहीत. त्यामुळे अंदाजे रक्कम रु.1,50,000/- चे काम अर्धवट राहीले आहे. अशाप्रकारे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. प्रस्तुत बाबतीत तक्रारदाराने जाबदाराला दि.18/10/2013 रोजी नोटीस पाठविली व प्रस्तुत त्रुटींची व कामांची पूर्तता करुन देणेचे सांगितले. परंतु जाबदाराने साठेखतामध्ये ठरलेप्रमाणे वर नमूद अपु-या सुविधांची/कामांची कोणतीही पूर्तता केली नाही. त्यामुळे जाबदारांविरुध्द प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने मे मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदाराने दि. 1/10/2010 चे साठेखतामध्ये कबूल केलेप्रमाणे सर्व सुविधांची तक्रारदाराचे रो-हाऊस मध्ये पूर्तता करुन द्यावी. प्रस्तुत रो-हाऊसचे कराराप्रमाणे बोअरवेलमध्ये पाण्याची इलेक्ट्रीक मोटर बसवून पाण्याची व्यवस्था करणेबाबत जाबदाराला आदेश व्हावेत, अपु-या राहीले कामासाठी जाबदारांकडून रक्कम रु.1,50,000/- वसूल होवून मिळावेत, जादा दराने कर्ज घ्यावे लागलेने व्याजातील फरकासाठी रक्कम रु.25,000/- जाबदारांकडून वसूल होऊन मिळावेत, नोटीसचा खर्च रक्कम रु.2,000/- जाबदारांकडून मिळावा, मानसिकत्रासापोटी रक्कम रु.20,000/- जाबदारांकडून मिळावेत. अर्जाचा खर्च रक्कम रु.10,000/- जाबदारांकडून वसूल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 चे प्रतिज्ञापत्र, नि. 6/1 चे साठेखत करार, नि.6/2 कडे खुषखरेदीपत्र, नि. 6/3 कडे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, नि. 6/4 सोबत मिळकतीचे फोटो, नि. 6/5 कडे तक्रारदाराने जाबदाराला दिलेली नोटीस, नि. 11 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 16 कडे लेखी युक्तीवाद, नि. 17 कडे जादा युक्तीवाद, नि. 20 चे कागदयादीसोबत नि. 20/1 ते नि. 20/3 कडे अनुक्रमे अपु-या कामाचे फोटो, फोटोग्राफरची पावती, इलेक्टफीक मीटरसाठी तक्रारदाराने जाबदाराला खरेदीपत्रानंतर जादा रक्कम रु.20,000/- अदा केलेची पावती, नि. 23 कडे कमिशन अहवालावर तक्रारदाराचे म्हणणे, कोर्ट कमिशन मंजूर नसलेने उभयतांच्या उपस्थितीत कोर्ट कमीशन करणेसाठीचा अर्ज, नि. 24 कडे, नि. 25 कडे कोर्ट कमीशनर श्री. विक्रम गायकवाड यांची पुरसीस, नि. 26 कडे कमिशन रिपोर्ट, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केले आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदाराने नि. 9 कडे म्हणणे, नि. 9 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 10 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 12 कडे लेखी युक्तीवाद, नि. 15 चे कागदयादीसोबत नि. 15/1 ते नि. 15/3 कडे जाबदार यांना ग्रामपंचायत खेड यांनी दिलेला बांधकाम परवाना, तक्रारदाराने लिहून दिलेला पूर्णत्वाचा दाखला, वाद मिळकतीचा सातबारा उतारा, नि. 21 कडे कोर्ट कमिशनर रिपोर्ट, नि. 22 कडे कोर्ट कमिशनरची पुरसीस, नि. 24 कडे पुन्हा कोर्ट कमिशन नेमणूकीसाठी अर्ज, वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केली आहेत. प्रस्तुत जाबदारांने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविले आहेत.
i. तक्रारदाराचा अर्ज व त्यातील कथने मान्य व कबूल नाहीत. जाबदाराने तक्रारदाराला कोणतीही सेवा त्रुटी दिलेली नाही.
ii तक्रारदाराने जाबदाराची मिळकतीची सर्व कागदपत्रे पाहूनच साठेखत केले व प्रस्तुत मिळकतीमधील म्हणजेच ‘ओंकार रो हाऊस’ मधील रो-हाऊस नं.1 ब याचे बिल्टअप क्षेत्र 650 चौ. फूट म्हणजेच 60.40 चौ.मी. क्षेत्र तक्रारदाराला जाबदाराने साठेखताने देण्याचे ठरले होते. प्रस्तुत जाबदार हे नोकरी करत असून ते बांधकाम व्यावसायिक कधीच नव्हते व नाही. जाबदाराने साठेखतावेळीच टाऊन प्लॅनिंगचा दाखला दिला आहे.
iii. तक्रारदाराने रक्कम रु.25,000/- कर्जाचे ज्यादा व्याजाची केलेली मागणीस जाबदार जबाबदार नाहीत.
iv. रो-हाऊसचे काम पूर्ण झालेवर तक्रारदार यांना जाबदाराने कळविले व दि. 20/7/2010 रोजी खरेदीचा व्यवहार पूर्ण केलेला आहे व खरेदी दिवशीच प्रस्तुत रो-हाऊसचा ताबा जाबदाराने तक्रारदार यांना दिलेला आहे. त्यानंतर तक्रारदाराने प्रस्तुत घरामध्ये गृहप्रवेश केला आहे. त्यानंतर तक्रारदार कांही दिवस प्रस्तुत घरात रहात होते.
v. किचन ओटयाला ग्रीन मार्बल बसविले आहे. संडासचे काम पूर्ण केले आहे, तसेच हॉलमध्ये टयूब, फॅन, बाहेरील बल्ब, बेडरुममध्ये टयूब व इतर वायरींग व त्याप्रमाणे पॉईंट देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे सर्व पॉईंट जाबदाराने तक्रारदाराचे घरात दिले आहेत. टयूब, पॉन, बल्ब वगैरे इलेक्ट्रीक साधने बसविण्याची जबाबदारी तक्रारदाराची स्वतःची असून जाबदाराची नाही व नव्हती. जाबदाराने तक्रारदाराला बोअरवेल इलेक्ट्रीक मोटार बसवून दिली होती. खरेदीनंतर तक्रारदार रहायला होते तेव्हा त्या मोटरचा वापर तक्रारदाराने केलेला होता. परंतू नंतर मुलांचे शिक्षणासाठी तक्रारदार पुसेगांव येथे राहणेस गेलेने व प्रस्तुत इमारतीत इतर कोणी राहणेस नसलेने जाबदाराने सदर इलेक्ट्रीक मोटार काढून ठेवली आहे. तक्रारदार रहायला आलेवर जाबदार प्रस्तुत मोटर जोडून देणेस तयार आहेत.
vi. खरेदीपत्रावेळी तक्रारदाराकडून येणे असलेली ऊर्वरीत राहीली रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) या रकमेपोटी तक्रारदाराने रक्कम रु.50,000/- प्रत्येकी असे दोन चेक नं. 551 व चेक नं. 552 जाबदार यांना दिले होते. पैकी चेक नं. 551 जाबदाराने बँकेत भरला असता जमा झाला. मात्र चेक नं.552 हा तूर्त बँकेत भरु नका असे तक्रारदाराने सांगीतले त्यामुळे जाबदाराने तो बँकेत भरला नाही. त्यामुळे चेक नं. 552 वरील रक्कम रु.50,000/- तक्रारदाराकडूनच येणे आहे. जाबदाराने तक्रारदाराला वारंवार प्रस्तुत रकमेची मागणी केली परंतू तक्रारदार यांनी प्रस्तुत रक्कम जाबदाराला अदा केली नाही.
तसेच तक्रारदाराने गांवकामगार तलाठी यांचेशी हातमिळवणी करुन एकूण क्षेत्र 60.40 चौ. मीटर ऐवजी 76 चौ.मी. याक्षेत्राला स्वतःच्या नावाची नोंद करुन घेतली आहे व तसा फेरफार नं. 13.628 बनविण्यात आला आहे.
तक्रारदाराने सदर व्यवहाराची रक्कम रु.6,50,000/- ठरलेली असतानाही जाबदार यांना फक्त रक्कम रु.6,00,000/- एवढीच रक्कम अदा केली आहे. ऊर्वरीत रक्कम तक्रारदाराने जाबदाराला आजअखेर अदा केलेली नाही. त्यामुळे सदर करार संपुष्टात आणणेसाठी व रो-हाऊस नं. 1 ब या मिळकतीचा ताबा तक्रारदार यांचेकडून मागणेसाठी जाबदार हे मे. दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर यांचे कोर्टात दाद मागणार आहेत.
सबब वरील सर्व कारणास्तव तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हणणे जाबदार यांनी याकामी दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार यांनी जाबदार यांचे मौजे खेड येथील जुना रि.स.नं.35/3अ/अ चा नवीन सर्व्हे नंबर 71/3 ए/3 मधील प्लॉट नं. 4 यांचे एकूण क्षेत्रफळ 152 चौ.मी. यामध्ये बांधलेल्या ओंकार रो-हाऊस मधील तक्रार अर्जात नमूद केलेले रो-हाऊस तक्रार अर्जात नमूद केलेले रो-हाऊस नं.1 ब चे एकूण क्षेत्र 650 चौ. फूट ही मिळकत दि. 1/10/2010 रोजीचे रजिस्टर साठेखत करुन प्रस्तुत साठेखतामध्ये नमूद केलेप्रमाणे रक्कम तक्रारदाराला अँडव्हान्स दिली व साठेखत केले. तसेच दि.20/7/2011 रोजी प्रस्तुत मिळकतीचे खूषखरेदीपत्र जाबदार व तक्रारदार यांचे दरम्यान झाले आहे. या बाबी जाबदाराने मान्य केल्या आहेत. सबब तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा पुरवठादार असे नाते आहे ही बाब स्पष्ट होत असून निर्विवाद सत्य आहे. सबब आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- वर मुद्दा क्र. 1 मध्ये नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराने जाबदार यांचेकडून मौजे खेड येथील जुना रि.स.नं. 35/3/अ चा नवीन सर्व्हे नं. 71/3ए/3 मधील प्लॉट नं. 4 एकूण क्षेत्रफळ 152 चौ. मी. यामध्ये बांधलेल्या ओंकार रो-हाऊस मधील तक्रार अर्जात नमूद केलेले रो-हाऊस नं. 1 ब चे एकूण क्षेत्रफळ 650 चौ. फूट हे दि. 1/10/2010 रोजीचे साठेखताप्रमाणे खरेदी करण्याचे ठरवून प्रस्तुत रो हाऊसचे खरेदी खरेदीपत्र दि. 20/7/2011 रोजी करुन खरेदी घेतले आहे. परंतू जाबदार यांनी नमूद साठेखतामध्ये तक्रारदाराला साठेखतात नमूद केले सोयीसुविधा देणेचे मान्य केले होते. परंतु जाबदाराने साठेखतात कबूल केलेप्रमाणे तक्रार अर्जात नमूद काही सुविधा तक्रारदाराला पुरविलेल्या नाहीत असे तक्रारदाराने कथन केले आहे. प्रस्तुत सुविधा पुरविणेत आल्या आहेत किंवा नाही याची सत्य परिस्थिती मे मंचासमोर यावी म्हणून नि. 24 कडे जाबदाराने कोर्ट कमिशन नेमणूकीसाठी अर्ज दिला. मे. मंचाने प्रस्तुत अर्जावर तक्रारदार यांचे म्हणणे घेतले, तक्रारदाराने हरकत नाही असे म्हणणे दिले. सबब सदरचा कमिशन नेमणूकीचा अर्ज मे मंचाने मंजूर करुन उभयपक्षकारांचे उपस्थितीत कमिशन करणेसाठी अँड. विक्रम गायकवाड यांची नेमणूक केली. प्रस्तुत कोर्ट कमिशनर यांनी मे मंचाचे आदेशाप्रमाणे नमूद मिळकतीचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व कोर्ट कमिशनर यांनी मे. मंचाचे आदेशाप्रमाणे नमूद मिळकतीचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व कोर्टकमिशन रिपोर्ट तयार करुन मे. मंचात नि. 26 कडे दाखल केला आहे. प्रस्तुत कमिशन रिपोर्टचे अवलोकन केले असता पॅरा नं. 2 मध्ये नमूद केले आहे की, सदर मिळकतीत वर जाण्याचे जीन्यामध्ये बाभळीचे काटे टाकून सदर मिळकत बंदिस्त अवस्थेत ठेवली आहे. काटे बाजूला करुन पाय-या चढून जाता डाव्या वरील बाजूस लाईट मीटर बसविलेच्या खाणाखुणा दिसून आल्या मात्र प्रत्यक्षात लाईट मीटर दिसून आले नाही., सर्व जीन्याचे पाय-यांना स्टेप्स बसविल्या आहेत, प्रस्तुत रो हाऊसचे मुख्य प्रवेशव्दारास दारास लागून डाव्या बाजूस बेल पॉईंट बसविलेच्या खाणाखुणा दिसत आहेत. मात्र बेल पॉईंट अस्तित्वात नाही. तसेच लाईट मीटर बेलपर्यंत व घरामध्ये पाईप फिटींग केलेच्या खाणाखुणा दिसून आल्या मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी लाईट फिटींग अस्तीत्वात नव्हते. जाबदाराचे कथनानुसार प्रस्तुत साहीत्य चोरीस गेलेचे कळते. मुख्य दरवाजाला कुलूप असून कुलूपावर सचिन ह. मदने असे नाव असलेचे दिसून आले. हॉलमधील पाईप लाईट फिटींग केलेचे दिसून आले. परंतू फिटींगवरील केसींग हॉलमध्ये विखुरलेले दिसते. तसेच सदर पाईप फिटींगमध्ये वायरिंग नसलेचे दिसून आले. हॉलमध्ये स्वीच बोर्ड बनविण्याच्या खाणाखुणा दिसून येतात. मात्र सर्वच बोर्ड आढळून आले नाहीत. तसेच टयूब, बल्ब, फॅन इ. उपकरणे दिसून आले नाहीत. भिंतीवर हळदी कुंकवाचे ठसे दिसून आले. भिंतीवर ब-याच ठिकाणी कलर केलेनंतर डागडूजी केलेले नवीन बांधकामाचे रंगहीन पॅचेस दिसून येते. इमारतीत वहिवाट असलेची दिसून येते. हॉलचे लगत असले संडास बाथरुमची प्रत्यक्ष पाहणी केली असता संडासमध्ये काम पूर्ण झाले असून अंतर्गत पाईप फिटींग केलेले आहे. परंतू नळ बसविलेले नाहीत. तसेच बाथरुममध्ये सांडपाणी वाहून नेणारी पाईप फ्लोअरींगवरुन नेलेली दिसून येते ती अंतर्गत फिटींग केलेली नाही. बाथरुममध्येही पाण्याचे सोईकरीता पाईप लाईन फिटींग केले असून नळ बसविलेला नाही. मात्र नळ बसविणेची प्रोव्हीजन केल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे किचनमध्ये किचन ओटयावर ग्रीन मार्बलचा टॉप बसविला आहे. किचन कटयास भिंतीस टाईल्स बसविल्या आहेत. तसेच पाण्यासाठी पाईप फिटींग केले आहे. मात्र नळ जोडलेले नाहीत, किचन सिंक बसविलेले नाही, किचन कपाट कडाप्पामध्ये बांधकाम केलेले आहे. इमारतीचे बाहेरील बाजूस उत्तरेस खुल्या जागेत पूर्वाभिमुख बोअरवेल आहे. सदर बोअरवेलला इलेक्ट्रीक मोटार बसविलेले आहे. बोअरवेलला इलेक्ट्रीक लाईट कनेक्शन घेतलेले असून सदरचे बोअरवेल कनेक्शन मुख्य मीटर मधून सबमीटर घेऊन त्यामधून नुकतेच काही दिवसांपूर्वी घेतलेले आहे असे समजते. रो-हाऊसचे पश्चिमेस संडासचे सांडपाणी वाहून नेणारी मोठी टाकी असूनही टाकी शहाबादी फरशी टाकून बंदीस्त केली आहे. या सर्व स्कीमकरीता इमारतीच्या दक्षिणेस असले मोळया प्लॉट लगत असले सिमेंट लाईट पोलवरुन लाईट कनेक्शन घेतलेले असून ते सदरील रो-हाऊस करीता विद्युत पुरवठा करत असलेचे दिसून येत आहे.
अशाप्रकारे निरिक्षणे कमिशन रिपोर्ट मध्ये नमूद आहेत. कोर्टकमिशन उभयपक्षकारांचे उपस्थितीत झालेले असून सदर कोर्ट कमिशनर यांचा नि. 26 कडिल रिपोर्ट उभयपक्षकारांना मान्य व कबूल आहे. याचे सविस्तर अवलोकन केले असता असे दिसून येते की, जाबदाराने तक्रारदाराचे रो-हाऊसमध्ये लाईट फिटींगचे काम पूर्ण केलेले नाही. तसेच तक्रारदाराचे नावावर सेपरेट लाईट मीटर बसविलेले नाही. तक्रारदाराचे नावावर लाईट मीटर असलेचा कोणताही पुरावा जाबदाराने मे. मंचात दाखल केलेला नाही. स्वीच बोर्ड बसविलेले नाहीत, तसेच किचनमध्ये पाण्याचे वापरासाठी पाईप फिटींग करुन ठेवले आहे. मात्र नळ जोडलेले नाहीत, किचन कटयाला सिंक बसविलेले नाही. संडास बाथरुम मध्येही नुसतेच पाण्याचे पाईप फिटींग करुन ठेवले आहे. नळ जोडलेले नाहीत, बाथरुममधील सांडपाणी वाहून नेणारी पाईप फ्लोअरींगवरुन काढली आहे. अंतर्गत फिटींग केलेले नाही असे दिसून येते. वर नमूद सोयी सुविधा जाबदाराने तक्रारदाराला देण्याचे साठेखतामध्ये मान्य व कबूल केले होते. परंतू जाबदाराने आजअखेर प्रस्तुत सोयीसुविधा तक्रारदाराचे रो-हाऊस मध्ये पुरविलेल्या नाहीत. वास्तुशांती दिवशी फक्त तक्रारदाराला जाबदाराने या गोष्टी तात्पुरत्या स्वरुपात जोडून दिल्या असाव्यात असा निष्कर्ष यावरुन निघतो. सबब वर नमूद बाबींची तक्रारदार यांनी जाबदार यांना वारंवार सांगून ही आजअखेर कोणतीही पूर्तता जाबदाराने केलेली नाही असे प्रस्तुत कमिशनरिपोर्ट सिध्द होते. सबब जाबदाराने तक्रारदार यांना प्रस्तुत साठेखतात ठरलेप्रमाणे सोयी सुविधा न देऊन सेवेत त्रुटी केली आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे.
वर नमूद सर्व बाबींचा विचार करुन जाबदार यांनी तक्रारदार यांना रजिस्टर साठेखतामध्ये नमूद केलेल्या सोयी सुविधांची पूर्तता तक्रारदारांचे रो-हाऊस मध्ये करुन दिलेली नाही. त्यामुळे जाबदार यांनी वर नमूद तक्रारदाराला आजअखेर न पुरविल्या सर्व सोयी सुविधा पुरविणे न्यायोचीत होणार असून जाबदारांवर ते बंधनकारक आहे असे आमचे मत आहे.
9. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदाराने तक्रारदार यांना त्यांचे रो-हाऊस नं. 1 ब मध्ये स्वतंत्र लाईट मीटर
(तक्रारदाराचे नावचे) बसवून देऊन लाईट फिटींगचे सर्व अपूर्ण काम पूर्ण करुन
द्यावे.
3. जाबदाराने तक्रारदाराला पाण्याचे वापरासाठी तक्रारदाराचे रो-हाऊसमध्ये केले
पाईप फिटींगला किचन बाथरुम, संडास या सर्व ठिकाणी पाण्याचे नळ जोडून
द्यावेत. तसेच बाथरुममधील सांडपाण्याची पाईप अंतर्गत फिटींग करुन द्यावी.
4. तक्रारदाराचे रो-हाऊसमधील किचन ओटयाला जाबदाराने सिंक बसवून द्यावे.
5. तक्रारअर्जातील मागणी/विनंती कलम ‘ब’ मधील बोअरवेलवर इलेक्ट्रीक मोटरची
पूर्तता जाबदाराने केलेली आहे असे कमिशन अहवालावरुन स्पष्ट होते. सबब
सदर विनंतीबाबत कोणतेही आदेश नाहीत. तसेच तक्रारदाराने त्याचे रो-
हाऊसमध्ये टयूब, बल्ब व फॅन इत्यादी विद्युत उपकरणे स्वतः बसवावीत. ती
जबाबदारी जाबदारांवर नाही. तसेच विनंती कलम ‘क’ मधील मागणी मान्य
करता येणार नाही.
6. जाबदाराने तक्रारदाराला झाले मानसिक व शारीरिक त्रासापोटी व अर्जाचा
खर्च म्हणून रक्कम रु.20,000/- (रुपये वीस हजार मात्र) तक्रारदारास अदा
करावेत.
7. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदाराने आदेश पारीत झाले तारखेपासून 45
दिवसात करावी.
8. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार यांनी न केलेस तक्रारदार
यांना जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई
करणेची मुभा राहील.
9. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
10. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 21-12-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.