नि.15 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 36/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.21/07/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि. 02/09/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या चंद्रकांत खोडिदास बेगडा विश्वनगर, रुम नं.16, चाळ क्र.3 (म्युनसिपल चाळ), नाचणे रोड, पावर हाऊसच्या मागे, रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द संघवीज फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स, एस.टी.स्टँडच्यासमोर, बेंजामीन एनक्लेव्ह, रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदार : व्यक्तिशः सामनेवाले : एकतर्फा. -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.सदस्या, श्रीमती स्मिता देसाई 1. तक्रारदार याने सदरची तक्रार त्याच्या टि.व्ही.बाबत दाखल केली आहे. 2. सदर तक्रारीचा थोडक्यात तपशिल खालीलप्रमाणेः- तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून ओनिडा कंपनीचा टि.व्ही. रक्कम रु.8,900/- इतक्या रकमेस दि.09/10/2009 रोजी खरेदी केला. सदर टि.व्ही. घेतल्यापासून सदर टि.व्ही.मध्ये नेहमी काहीतरी बिघाड होवून टि.व्ही. बंद पडायचा व टि.व्ही. चालू असतानाच आपोआप बंद व्हायचा. याबाबत सामनेवाला यांच्याकडे वारंवार तक्रार करुनही त्यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर दि.06/07/2010 रोजी टि.व्ही. संपूर्ण बंद पडला. त्यानंतर सामनेवाला यांच्या दूकानात जावून टि.व्ही. बंद पडल्याची तक्रार केली. तेव्हा सामनेवाला यांनी दोन दिवसांत सर्व्हीस इंजिनिअर पाठवतो असे सांगितले परंतु त्यांनी सर्व्हीस इंजिनिअर पाठविला नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी दोन-तीन वेळा सामनेवाला यांच्याकडे जावून चौकशी केली असता सामनेवाला यांनी कोणतीही दखल घेतली नाही व शेवटी टि.व्ही. बदलून देणार नाही किंवा दुरुस्त करुन देणार नाही तुम्ही काय करायचे ते करा असे सांगितले. सामनेवाला याने दिलेल्या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.2 ला शपथपत्र व नि.3 चे यादीने एक कागद दाखल केला आहे. 3. सामनेवाला यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली होती परंतु सदरची नोटीस मिळूनही सामनेवाले याकामी हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फा चालविण्याचा हुकूम नि.1 वर करण्यात आला. 4. तक्रारदार याने आपल्या तक्रार अर्जामध्ये टि.व्ही. बदलून किंवा दुरुस्त करुन मिळावा अशी मागणी केलेली आहे. तसेच शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार याने टि.व्ही.च्या खरेदीच्या पावतीची झेरॉक्सप्रत नि.3/1 वर दाखल केली आहे व मूळ पावती नि.12/1 वर दाखल केली आहे. तक्रारदार यांनी युक्तिवादाचे दरम्यान सामनेवाला याने दिलेल्या सदोष सेवेमुळे सामनेवाला यापुढेही आपणास चांगली सेवा देईल याबद्दल खात्री वाटत नाही त्यामुळे आपणास टि.व्ही.ची रक्कम परत मिळावी अशी मागणी केली व नि.13 वर त्याप्रमाणे तक्रार अर्जामध्ये दुरुस्ती करणेसाठी अर्ज सादर केला. त्याप्रमाणे नि.1 वर दुरुस्तीस परवानगी देण्यात आली. 5. तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेल्या पावतीवरुन तक्रारदार यांनी रक्कम रु.8,900/- इतक्या किंमतीस सामनेवालाकडून टि.व्ही. खरेदी केला आहे ही बाब स्पष्ट होते. तक्रारदारचा टि.व्ही. सातत्याने बंद पडत होता याबाबत सामनेवालाकडे तक्रार करुनही सामनेवाला याने दखल घेतली नाही हे तक्रारदाराच्या तक्रारीवरुन व शपथपत्रावरुन स्पष्ट होते. तक्रारदाराने वारंवार तक्रार करुनही सामनेवाला याने त्याची दखल न घेणे व त्याकडे दूर्लक्ष करणे ही निश्चितच सामनेवाला यांच्या सेवेतील त्रुटी आहे. सामनेवाला मंचाची नोटीस मिळूनही याकामी हजर झाले नाहीत यावरुनही सदरची बाब स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवालाविरुध्द प्रतिकूल निष्कर्ष काढण्यात येतो. तक्रारदार याने दि.09/10/2009 रोजी टि.व्ही. खरेदी केला आहे व तो वारंवार बंद पडून शेवटी दि.06/07/2010 रोजी संपूर्णपणे बंद पडला आहे व आजअखेर बंद अवस्थेत आहे. सदरचा टि.व्ही. कोणत्या कारणाने बंद पडला? याबाबत सामनेवाला याने कोणतीही तपासणी केली नाही व तक्रारदारास घेतलेल्या नवीन वस्तूचा व्यवस्थित व पूर्ण समाधानाने उपभोग घेण्यापासून वंचित ठेवले त्यामुळे सामनेवालाकडून भविष्यातही कोणत्याही प्रकारची समाधानकारक सेवा मिळेल असे आपणास वाटत नाही या तक्रारदाराच्या युक्तिवादामध्ये तथ्य आढळून येत असल्याने तक्रारदारास त्याची रक्कम परत करण्याबाबत आदेश करणे संयुक्तिक ठरेल असे मंचाचे मत आहे. तक्रारदार यांच्या तक्रार अर्जावरुन टि.व्ही. तक्रारदार यांच्या ताब्यात आहे असे दिसून येते. तक्रारदार यांच्या ताब्यात असलेला टि.व्ही. परत घेवून जाण्याची सामनेवाला यांना मुभा राहील. 6. तक्रारदार याने शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. नवीन घेतलेला टि.व्ही. व्यवस्थित चालत नाही, सातत्याने बंद पडतो व सदरच्या टि.व्ही.च्या दुरुस्तीबाबत सामनेवाला त्याकडे दूर्लक्ष करतो ही बाब तक्रारदार यांना निश्चितच मानसिक व शारिरिक त्रास देणारी आहे व त्यासाठी तक्रारदार यांना या मंचामध्येही धाव घ्यावी लागली. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.2,000/- मंजूर करणे योग्य होईल असे मंचाचे मत आहे. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे. 2. सामनेवाला याने तक्रारदार यांना रक्कम रु.8,900/- (रु.आठ हजार नऊशे मात्र) परत करावेत असा सामनेवाला यांना आदेश करण्यात येतो. 3. सामनेवाला याने तक्रारदार यास शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.2,000/- (रु.दोन हजार मात्र) अदा करावेत असा सामनेवाला यांना आदेश करण्यात येतो. 4. सामनेवाला याने वर नमूद आदेशाची पूर्तता दि.02/10/2010 पर्यंत करण्याची आहे. सामनेवाला याने विहीत मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास त्यांना वर नमूद दोन्ही रकमांवर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज अदा करावे लागेल. 5. सामनेवाला याने विहीत मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील. रत्नागिरी दिनांक : 02/09/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |