::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 29/08/2019)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता यांनी वि.प.यांचेकडून मौजा कोची, ता. भद्रावती जि.चंद्रपूर येथील स.न.167 मधील लेआउट प्लॅननुसार प्लॉट क्र.बी -158 एकूण क्षेत्रफळ 3617 चौ.फुट विकत घेण्याकरिता दि.21/4/1995 रोजी दोघांमध्ये करारनामा झाला. सदर करारनाम्यानुसार प्लॉटची एकूण किंमत रु.25,000/-होती.तक्रारकर्त्याने इसार रक्कम रू.1000/- विरूध्द पक्षांस दिले व वि.प.हे उर्वरित रक्कम 40 महिन्यात किस्तीमध्ये स्विकारणार होते.तक्रारकर्ता यांनी दि.21 /4/1995 ते दि. 26/12/2001 या कालावधीमध्ये प्लॉटची किंमत व प्लॉट विक्री करून घेण्यासाठी येणारा रजिस्ट्रीचा खर्च मिळून रु.28,400/-वि.प.स दिली आहे. वि.प.यांनी तक्रारकर्त्यास एक महिन्याच्या आत विक्री करून देणे बंधनकारक होते परंतु वि.प. यांनी विक्री करून दिली नाही.वि.प.यांनी तक्रारकर्त्यास करारनाम्यानुसार लेआउटला शासकीय परवानगी मिळताच सदर प्लॉटचे विक्रीपत्र मुदतीमध्ये करून देऊ असे आश्वासन दिले. याशिवाय वि.प. हे तक्रारकर्त्यास भूखंड बुकिंग केल्यापासून 20 वर्षांचे कालावधीत सदर प्लॉटवर सागवान पिक घेऊन त्या पासून प्राप्त रक्कम ही तक्रारकर्त्यांस दि.20/4/2015 रोजी देणार होते. परंतु वि.प. यांनी करारनाम्यानुसार कोणतीही कार्यपूर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसान झाले, त्यास वि.प.हे जबाबदार आहेत. तक्रारकर्त्याने वि.प.यांचेकडे सदर प्लॉटची विक्रीपत्र करून देण्यास वारंवार मागणी केली परंतु वि.प.हे सदर विक्रीपत्र करून देण्यास टाळाटाळ करीत आहेत. सबब तक्रारकर्त्याने वि.प. यांना अधिवक्त्यामार्फत दि.8/1/2019 रोजी नोटीस पाठवली परंतु वि.प. यांनी सदर नोटीसला उत्तर दिले नाही वि.प. यांनी तक्रारकर्त्यास सदर प्लॉटचे विक्रीपत्र करून देण्याचे लिखीत आश्वासन दिले परंतु विक्रीपत्र करून दिले नाही हि वि.प. यांनी तक्रारकर्त्याप्रती अवलंबिलेली अनुचित व्यापार पद्धती व न्युनतापूर्ण सेवा आहे. सबब तक्रारकर्त्याने वि.प. यांचे विरुद्ध मंचासमक्ष तक्रार दाखल करून त्यामध्ये वि.प. यांनी उपरोक्त भूखंड विक्री करून देणे व विक्री करून देणे शक्य नसल्यास तक्रारकर्त्याकडून प्लॉटकरीता घेतलेली रक्कम रु.28,400/- त्यावर दि. 26/12/ 2001 पासून 12% व्याजासह परत करावी तसेच विप. यांनी तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासापोटी नूकसानभरपाई रु.2,00,000/- व तक्रार खर्च द्यावा अशी विनंती केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरुध्दपक्षाविरुद्ध नोटीस काढण्यात आला. मात्र नोटीस प्राप्त होवूनही विरूध्द पक्ष यांनी मंचासमक्ष हजर होवून
आपला बचाव दाखल केला नाही. सबब त्यांचेविरूध्द दिनांक 27/06/2019 रोजी नि.क्र.1 वर एकतर्फा आदेश पारित करण्यांत आला.
4. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, तक्रारीतील मजकूर व दस्तावेजांस शपथपत्र समजण्यांत यावे अशी नि.क्र.9 वर पुरसीस दाखल, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : होय
3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे
काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. तक्रारकर्ता यांनी वि.प.यांचेकडून मौजा कोची ता. भद्रावती जि.चंद्रपूर येथील स.न.167 मधील लेआउट प्लॅननुसार प्लॉट क्र. बी-158 एकूण क्षेत्रफळ 3617 चौ.फुट विकत घेण्याकरिता दि.21/4/1995 रोजी करारनामा केला. सदर करारनाम्यानुसार सदर प्लॉटची एकूण किंमत रु.25,000/- होती. त्यापैकी तक्रारकर्त्याने रू.1,000/- इसारापोटी वि.प.ला दिले व उर्वरीत रक्कम वि.प.यांना 40 महिन्यात द्यायची होती. तक्रारकर्ता यांनी दि.21/4/1995 ते दि. 26/12/2001 या कालावधीमध्ये प्लॉटची किंमत रु.25,000/- व प्लॉट विक्री करून घेण्यासाठी येणारा रजिस्ट्रीचा खर्च मिळून असे एकूण रक्कम रु.28,400/- वि.प.स दिली आहे.त्याबाबत वि.प.यांनी तक्रारकर्त्यांस पावत्या दिल्या आहेत. सदर करारनामा व पावत्या नि. क्र. 4 वर दस्त क्र. अ-1व अ-2 वर दाखल आहेत.करारनाम्यानुसार मुदतीत रक्कम अदा केल्यानंतर वि.प. हे तक्रारकर्त्यास सदर प्लॉटचे विक्रीपत्र करून देणार होते तसेच त्यानंतर सदर प्लॉटवर वि.प.ने सागवानाची झाडे लावून त्यांची देखभाल करून 20 वर्षानंतर लाकूड/पिकासह तक्रारकर्त्यांस देण्यांत येईल असे करारनाम्यामध्ये नमूद आहे. यावरून वि.प. यांनी तक्रारकर्त्यास सदर / जमीनचे विक्रीपत्र करून दिल्यानंतर वि.प.हे त्यावरील सागवान पिक/लाकूड घेऊन ते तक्रारकर्त्यास देणार अशी सेवा देण्याचे मान्य केले असल्याने तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षाचा ,ग्राहक सरंक्षण कायदा,1986 च्या कलम 2(1) डी नुसार ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते .
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. तक्रारीत दाखल दस्तावेजांचे अवलोकन करतांना असे निदर्शनांस येते की, विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास उपरोक्त प्लॉट संदर्भात दिनांक 21/4/1995 रोजी करून दिलेल्या करारनाम्यानुसार, तक्रारकर्त्याने सदर प्लॉटचा पूर्ण भरणा केल्यानंतर विरूध्द पक्ष यांनी प्लॉटचे रजिस्ट्रेशन तक्रारकर्त्याचे नांवाने करण्याचे व विक्रीपत्र करून दिल्यानंतर तक्रारकर्ता हे सदर प्लॉट वि.प. यांना सागवान झाडे लागवड करण्याकरीता पट्ट्यावर देण्याचे तसेच सदर जमीन व त्यावर होणारे सागवान पीक दोन्हीही 20 वर्षानंतर 1440 घनफुट लाकूड द्यावयाचे करारनाम्यात नमूद आहे. तक्रारकर्त्याने सदर प्लॉटची खरेदीची किंमत रू.25,000/- व रजिस्ट्रीचा खर्च असे सर्व मिळून एकूण रक्कम रू.28,400/- विरूध्दपक्ष यांना दिनांक 26/12/2001 पावेतो विहीत कालावधीत तक्रारकर्त्याने दिली आहे व त्यानंतर विरूध्द पक्ष यांना प्लॉटचे विक्रीपत्र करून देण्याबाबत विनंतीसुद्धा केली व अधिवक्त्यामार्फत नोटीस देखील पाठविली आहे, परंतु विरूध्द पक्ष यांनी सदर नोटीस प्राप्त होऊनसुद्धा त्याची पुर्तता केली नाही. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याने पूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर करारनाम्यानुसार दिनांक 26/12/2001 नंतर सदर प्लॉटची विक्री करून द्यावयाची होती परंतु विरूध्द पक्ष यांनी सदर प्लॉटचे विक्रीपत्र करून दिले नाही तसेच लाकूड/इतर उत्पन्नसुध्दा दिले नाही. याशिवाय विरूध्द पक्षाने तक्रारप्रकरणात उपस्थीत होवून आपला बचाव दाखल केलेला नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली हे दाखल दस्तावेजांवरुन सिद्ध होते असे मंचाचे मत आहे. वरील वस्तुस्थिती विचारात घेता वि.प. यांनी सदर प्लॉटकरीता रजिस्ट्रीच्या खर्चासह घेतलेली रक्कम तसेच त्यांनी तक्रारकर्त्यास विक्रीपत्र करून न दिल्याने त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी तक्रारकर्ता हे वि.प. यांचेकडून सदर रक्कम व्याजासह परत मिळण्यांस तसेच नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र. 45/2019 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास, प्लॉट करीता रजिष्ट्रीच्याखर्चासह घेतलेली रक्कम रू.28,400/- त्यावर तक्रार दाखल दिनांक 29/3/2019 पासून रक्कम अदा करेपर्यंत 9 टक्के व्याजासह परत द्यावी.
(3) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई रू.3000/- व तक्रारखर्चापोटी रू.2000/- द्यावेत.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष