द्वारा मा. श्री. श्रीकांत. म. कुंभार, सदस्य
** निकालपत्र **
(30/04/2013)
प्रस्तुतची तक्रार, तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे जाबदेणारांविरुद्ध दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे.
1] यातील तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याशी सर्व्हे नं. 13/2. बाणेर-बालेवाडी रोड, बालेवाडी येथील “साई किमया”, विंग ‘ए’ मधील तीन बेडरुम किचन सदनिका क्र. 201 चा बुकिंग करारनामा केला. सदर करारनाम्यानुसार यातील जाबदेणार हे तक्रारदार यांना जून 2009 मध्ये सदनिकेचा ताबा देणार होते, परंतु प्रत्यक्षात त्यांना दोन महिने उशिराने ताबा देण्यात आला, त्यामुळे तक्रारदार यांना त्यांच्या सदनिकेमध्ये श्री गणेश उत्सव करता आला नाही व त्यांच्या भावनांची पायमल्ली केली गेली. तक्रारदार यांच्या कथनानुसार, साई किमया सोसायटीच्या विंग ‘ए' या इमारतीमध्ये तीन बेडरुम किचनच्या सहा सदनिका आहेत व दोन बेडरुम किचनच्या बारा सदनिका, अशा एकुण 18 सदनिका आहेत. तीन बेडरुम किचनच्या सहा सदनिकांपैकी तीन सदनिका या जाबदेणार, त्यांचे बंधु आणि त्यांचे मेहुणे यांच्या आहेत तसेच चोथी सदनिका ही जाबदेणार यांच्या गावाकडील व्यक्तीची आहे आणि या सर्वांनी मिळून निवडक पार्किंग घेतलेले आहे. पार्किंग अलॉटमेंटच्या वेळी श्री. उमेश कोठावदे (वाणी) यांनी तक्रारदार यांना योग्य पार्किंग दिले जाईल असे आश्वासन दिले होते, तक्रारदार यांना दोन बेडरुम किचनच्या सदनिकेपेक्षा लहान पार्किंग देऊन त्यांच्यावर अन्याय केलेला आहे, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ते चौरस फुटापर्यंत मेंटेनेन्स देत असूनसुद्धा त्यांना छोटे व अरुंद पार्किंग देण्यात आले आहे त्यामुळे त्यांना त्यांची चारचाकी वाहन पार्क करणे गैरसोयीचे झालेले आहे. फर्निचरचे सामान त्यांच्या सदनिकेमध्ये उतरवताना जाबदेणार यांनी मज्जाव केल्यामुळे तक्रारदार यांना वेळेत फर्निचर तयार करता आले नाही, त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी वेळेमध्ये सदनिकेचा ताबा न दिल्यामुळे त्यांना दुसरीकडे भाड्याने रहावे लागले. गॅलरीतील खिडकीची जाळी तक्रारदार यांचेकडून तुटलेली नसताना त्यांना जाळी बसविण्यास रक्कम रु. 200/- देऊन ती दुरुस्ती करुन घेणे भाग पडले, तक्रारदार यांनी जाबदेणार यांना सुरुवातीला साध्या टाईपचे एक तरी संडास पात्र बसवावे अशी विनंती करुनही त्यांनी सर्वच वेस्टर्न टाईपचे संडास पात्र बसविले. तक्रारदार यांना टेरेसवर डिश अॅन्टीना बसविण्यास मज्जाव केला. सदनिकेचा ताबा दिल्यानंतर दोन-तीन महिने कॉर्पोरेशनच्या पाण्याचे कनेक्शन न जोडल्यामुळे तक्रारदार यांना दुसरीकडून पाणी विकत आणावे लागले, वॉशिंग प्लेसचे विस्तरी करणाबाबत वारंवार विनंती करुनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अशा प्रकारे जाबदेणार यांनी तक्रारदार यांचा मानसिक छळ करुन त्रास दिला, त्यामुळे त्यांनी जाबदेणारांविरुद्ध प्रस्तुतची तक्रार या मंचामध्ये दाखल केली. तक्रारदार या तक्रारीअन्वये जाबदेणार यांनी त्यांचे पार्किंग घेऊन जाबदेणार यांचे पार्किंग त्यांना देण्यात यावे अथवा कंपाऊंड वॉलमधून पार्किंगसाठी गेट पाडून द्यावे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,50,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 1,000/- द्यावेत, अशी मागणी करतात.
2] तक्रारदार यांनी या तक्रारीच्या कामी फक्त शपथपत्र, रिजॉईंडर, पॅसिफिक ग्रुप आर्किटेक्ट & इंजिनर यांचे प्रमाणपत्र, नकाशाच्या पानन क्र. 2 ची प्रत व लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे.
3] सदर प्रकरणी यातील जाबदेणार यांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित राहिले व त्यांची लेखी कैफियत सादर केली व तक्रारदार यांच्या तक्रारीतील कथने खोडून काढली. यातील जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार यांची सदनिका जून 2009 मध्ये ताबा देण्यासाठी तयार होती व तसे जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कळविलेले होते व उर्वरीत मोबदल्याची मागणीही केलेली होती, परंतु तक्रारदार यांनी सदनिकेची उर्वरीत रक्कम दिली नाही. ऑगस्ट 2009 मध्ये तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे फर्निचरचे काम करण्यासाठी सदनिकेचा ताबा देण्यासाठी विनंती केली व उर्वरीत रक्कम लवकरात लवकर देण्याची हमी दिल्यानंतर जाबदेणार यांनी सद्भावनेने तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा दिला. तक्रारदार यांच्याकडे आज अखेरही रक्कम रु. 23,073.45 उर्वरीत रक्कम आहे. जाबदेणार यांच्या कथनानुसार, सदनिकेच्या बुकिंगच्या वेळीच तक्रारदार यांना त्यांची सदनिका व पार्किंग नं. 2 अलॉट करण्यात आलेले होते, दि. 28/4/2009 रोजीच्या करारनाम्यामध्येही पार्किंग क्र. 2 चाच उल्लेख केलेला आहे, या सर्व बाबी तक्रारदार यांनी कबुल व मान्य केलेल्या होत्या. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार यांनी मार्च/एप्रिल 2009 मध्ये सदनिकेचे बुकिंग केलेले होते व ताबा जून 2009 मध्ये द्यावयाचा होता व तक्रारदार यांची सदनिका बुक होईपर्यंत जवळ जवळ सर्वच सदनिकांची विक्री झालेली होती व प्रत्येकाला पार्किंग अलॉट करण्यात आलेले होते. तक्रारदार यांना पार्किंगच्या एरियाची कल्पना देण्यात आलेली होती व दि. 28/4/2009 रोजीच्या करारनाम्यामध्येही सदर पार्किंगचा एरिया नमुद करण्यात आलेला होता, त्यामुळे तक्रारदार आता पार्किंगबद्दल तक्रार करु शकत नाहीत. जाबदेणार यांनी सर्व सदनिका धारकांना योग्य पाणीपुरवठा केलेला आहे. जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या इतर सर्व मागण्या अमान्य करीत तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.
4] जाबदेणार यांनी त्यांच्या लेखी जबाबापुष्ठ्यर्थ शपथपत्र, दि. 28/4/2009 रोजीच्या नोंदणीकृत करारनाम्याची प्रत, तक्रारदार यांच्या उर्वरीत रकमेबाबतचे दि. 28/9/2010 रोजीचे स्टेटमेंट, तक्रारदार यांनी दि. 30/11/2010 रोजी जाबदेणार यांना पाठविलेल्या नोटीशीची प्रत व त्यावरील त्यांचे उत्तर, बांधकाम चालू करण्याच्या दाखल्याची प्रत, मुळ नकाशा इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5] तक्रारदार व जाबदेणार यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील व कैफियतीमधील कथने, कागदपत्रे व युक्तीवादाचा विचार करता खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदर मुद्ये व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे-
मुद्ये निष्कर्ष
[अ] जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दिलेल्या :
सेवेमध्ये त्रुटी ठेवलेली आहे का? : नाही
[ब] जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान :
भरपाई देण्यास जबाबदार आहेत का ? : नाही
[क ] अंतिम आदेश काय ? : तक्रार फेटाळण्यात येते
कारणे :-
6] प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार व जाबदेणार यांनी दाखल केलेले कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, यातील तक्रारदार यांची मुळ मागणी फक्त पार्किंगबाबत आहे. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार, ते तीन बेडरुम किचन (3 BHK) सदनिकाधारक आहेत, त्यांना दिलेले पार्किंग हे दोन बेडरुम किचन (2 BHK) सदनिकाधारकास दिलेल्या पार्किंगपेक्षा लहान आहे व जाबदेणार यांनी जाणूनबुजुन त्यांना त्रास देण्याच्या हेतूने लहान पार्किंग दिलेले आहे. प्रस्तुत प्रकरणातील जाबदेणार हेही तक्रारदार राहत असलेल्या इमारतीमध्ये वास्तव्यास आहेत, त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या पार्किंगची मागणी केलेली आहे किंवा त्यांच्या पार्किंगसाठी कंपाऊंड वॉलमध्ये गेट करुन देण्याची मागणी केलेली आहे. यातील तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये सदनिकेच्या खरेदीबाबत दि. 28/04/2009 रोजी नोंदणीकृत करारनामा झालेला आहे. सदर करारनाम्याची प्रत जाबदेणार यांनी दाखल केलेली आहे. करारनाम्यातील कलम नं. 2 मध्ये कार पार्किंग क्र. 2 हे तक्रारदार यांना अलॉट केल्याचे स्पष्ट दिसून येते. सदरच्या करारनाम्यावर तक्रारदार, त्यांची पत्नी व जाबदेणार यांच्या सह्या आहेत. हा करारनामा नोंदणीकृत आहे, त्यामुळे त्यातील अटी व शर्ती या दोन्ही बाजूंवर बंधनकारक आहेत. तक्रारदार यांनी सदरच्या करारनाम्यामध्ये पार्किंग क्र. 2 घेण्याचे कबुल केलेले आहे. त्यामुळे तक्रारदार आता पुन्हा वेगळे पार्किंग मागू शकत नाहीत. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ पॅसिफिक ग्रुप, आर्किटेक्ट & इंजिनिअर्स यांचा इन्स्पेक्शन रिपोर्ट दाखल केलेला आहे, परंतु त्यांचे शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यांच्या अहवालामध्ये पार्किंगचे क्षेत्रफळ हे 8’.6” x 17’.6” असल्याचे नमुद केले आहे. याचा अर्थ सदरच्या पार्किंगचे क्षेत्रफळ हे करारनाम्यामध्ये नमुद केलेल्या क्षेत्रफळाइतकेच आहे. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी एप्रिल 2009 मध्ये सदनिकेच्या बुकिंगचा करारनामा केला व ताबा ऑगस्ट 2009 मध्ये घेतलेला आहे, याचा अर्थ तक्रारदार यांनी बांधकाम जवळ-जवळ पूर्ण झाल्यावरच करार केला, त्यामुळे तेथील वस्तुस्थितीचा अंदाज तक्रारदार यांना होता. त्यामुळे जाबदेणार यांनी त्यांना अलॉट केलेले व तक्रारदार यांनी कबुल केलेले पार्किंगच तक्रारदार यांना घ्यावे लागणार. म्हणून, जाबदेणार यांचे पार्किंग मागण्याची अथवा कंपाऊंड वॉलमधून पार्किंगसाठी गेट पाडण्याची तक्रारदार यांची मागणी ही अयोग्य व बेकायदेशिर आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दोन महिने सदनिकेचा ताबा विलंबाने दिला आहे, अशीही तक्रार तक्रारदार करतात. परंतु जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार यांनी सदनिकेच्या खरेदीपोटी पूर्ण रक्कम दिली नाही, रक्कम रु. रु. 23,073.45 उर्वरीत रक्कम आहे. जाबदेणार यांच्या या कथनाच्या पुष्ठ्यर्थ त्यांनी स्टेटेमेंटची प्रत दाखल केलेली आहे, तसेच तक्रारदार यांचे दि. 7/8/2009 रोजीचे पत्रही दाखल केलेले आहे. त्यामध्ये तक्रारदारांनी, त्यांना दि. 7/8/2009 रोजी सदनिका क्र. 201 चा ताबा मिळालेला आहे, त्यांनी सदनिकेची तपासणी केलेली आहे व ते समाधानी आहेत असे नमुद केलेले आहे, तसेच त्यांनी पूर्ण रक्कम दिलेली नाही, त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष ताबा घेतलेला नाही, असे नमुद केले आहे. यावरुन तक्रारदार यांनीच संपूर्ण किंमत न दिल्यामुळे दोन महिने ताबा विलंबाने मिळाला, हे सिद्ध होते.
तक्रारदार यांनी इतरही तक्रारी मांडल्या आहेत, परंतु त्यापुष्ठ्यर्थ कोणताही स्वतंत्र पुरावा दाखल केलेला नाही किंवा त्या तक्रारी दुरुस्त करुन द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केलेली नाही. त्यामुळे सदरच्या मागण्यांचा विचार मंचास करता येणार नाही.
7] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
:- आदेश :-
1] तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2] तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
4] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.