:: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगिळ (वैदय) मा.सदस्या.)
(पारीत दिनांक :- ३१/०८/२०१५ )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
१. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार ही चंद्रपूर येथिल रहिवासी आहे. अर्जदार राहत असलेल्या घराची महानगर पालीका कार्यालय चंद्रपूर येथे तिच्या पतीचे आजोबा हिरामण रामजी मून यांच्या नावाने मालमत्ता नोंद असून त्याचा घर क्रं. ९१ आहे. अर्जदाराचे पतीचे आजोबा दि. १६.०२.१९८४ ला मरण पावले. त्यानंतर तिच्या पतीचे वडील ही मरण पावले व अर्जदाराचे पती २००५ मध्ये मरण पावले. अर्जदार व अर्जदार बाईची मुलगी सदर घरात राहत असतांना दि. ११.१२.२०१३ रोजी घरात विदयुत मिटर मिळण्याबाबत गैरअर्जदार क्रं. ३ कडे फॉर्म भरला व त्यानुसार दि. ०७.०१.२०१४ ला २०७६/- रु. रोख भरले परंतु दि. १८.०१.२०१४ ला तक्रारकर्ता/ आक्षेपक झेनिथ हिरामण मून रा. भद्रावती यांनी खोटया आशयाची तक्रार गैरअर्जदार क्रं. ३ कडे दिली. परंतु झेनिथ मून यांनी मालकी हक्काचे कागदपञ दाखल केलेले नाही. अर्जदार पुढे नमुद करते कि, गैरअर्जदार यांनी सदर कारणाने अर्जदारास विदयुत मिटर देण्यास टाळाटाळ करीत आहे. म्हणून अर्जदाराने दि. २४.०१.२०१४ रोजी झेनिथ मून यांना नोटीस पाठविला. त्या नोटीसला उत्तर म्हणून झेनित मून यांनी अर्जदाराला नोटीस पाठविला व त्यात अर्जदार बाईचा मालकी हक्क व अधिकार कबुल केला आहे. अर्जदार ज्या घरात राहते त्या घराचा टॅक्स तिने भरलेला आहे. म्हणून तक्रारकर्त्याला अडथळा आणण्याचा अधिकार नाही. अर्जदाराने दि. २४.०१.२०१४ व १४.०२.२०१४ ला गैरअर्जदाराला मिटर लावण्याकरीता विनंती अर्ज केला. परंतु गैरअर्जदाराने मिटर लावून न देता अर्जदार बाईला २२.०१.२०१४ला पञ दिले. व त्यात हिरामण रामजी मून यांचीजागा असल्यामुळे विदयुत मिटर लावता येत नाही तसेच सदर जागेचे वारसदार यांचे सहमतीपञ मागवावे व टॅक्स पावती स्वतःचे नावाचे आणून दयावी किंवा कोर्टातर्फे सदर ठिकाणी विदयूत पुरवठा मिळण्याबाबत आदेश आणावा असे सुचविले. तरी सुध्दा अर्जदाराने २८.०५.२०१४ ला गैरअर्जदाराला पञ पाठविले. परंतु त्याचे काहीही उत्तर न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली.
२. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्रं. १ ते ३ ने विदयुत मिटर लावून दयावे
३. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं. १० वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक नाही. गैरअर्जदाराने मागितलेल्या मालकी संबंधातील कागदपञ अर्जदाराने सादर केलेले नाही. ज्या जागेवर विदयूत पुरवठा अर्जदार मागत आहे ती जागा वादात असून त्या जागेवर विदयूत पुरवठयासाठी झेनिथ मून यांचा आक्षेप आहे. महानगर पालिकेची पावती मालमत्ता क्रं. ९१ ही अर्जदार त्या जागेचा मालक आहे हे दर्शवित नाही. अर्जदार बाईने त्या जागेची समत्ती दिली ती चुकीची आहे. कारण जागेचा मालक हिरामण मून हे अर्जदार व आक्षेपक यांच्या म्हणण्याप्रमाणे हयात नाही. म्हणून अर्जदाराला विदयुत पुरवठा देता येत नाही. तसेच अर्जदार यांनी भरलेली डिमांडची रक्कम २,०७६/- रु. गैरअर्जदार वापस दयायला तयार आहे. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराला सेवा देंण्यास कोणताही कसुर केलेला नाही.
४. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(१) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
(२) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
(३) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत ः-
५. अर्जदाराने दि. ११.१२.२०१३ रोजी राहत असलेल्या घरात विदयुत मिटर मिळण्याबाबत गैरअर्जदार क्रं. ३ कडे फॉर्म भरला व त्यानुसार दि. ०७.०१.२०१४ ला २०७६/- रु. रोख भरले याबद्दल अर्जदाराने तक्रारीत नि. क्रं. ०३ दस्त क्रं. ०२ वर पावती दाखल केलेली आहे. ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्याने अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक आहे सबब मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २ बाबत ः-
६. अर्जदार बाईने सदर प्रकरणात गैरअर्जदाराकडे ति ज्या घरात राहते व ज्या घरावर तिचा ताबा आहे अशा घरात मिटर लावून देण्याची मागणी केली आहे. सदर प्रकरणात अर्जदार ज्या घरात राहते हे दाखविण्याकरीता अर्जदाराने तक्रारीत नि. क्रं. ०३ वर दस्त क्रं. ०१ व नि. क्रं. ०८ वर दस्त क्रं. ०१ दाखल केलेला आहे. विदयुत कायदा २००३ च्या कलम ४३ अन्वये गैरअर्जदाराला एखादया व्यक्तिने ज्या घराचा तो मालक आहे किंवा त्यात त्याचा ताबा आहे जर मिटरची मागणी केल्यास त्याच्या अर्जापासून ०१ महिण्याच्या आत लावून देणे आवश्यक आहे. सदर प्रकरणातही गैरअर्जदार यांचेकडे अर्जदार बाईने तिचे सदर घरात वास्तव्य असून तिचा त्यावर ताबा आहे व त्यामुळे तिला मिटरची आवश्यकता असल्यामुळे गैरअर्जदाराकडे मिटरची मागणी केलेली होती परंतु गैरअर्जदाराने त्या मागणीकडे दुर्लक्ष करुन अर्जदाराला मुदतीत मिटर न लावून दिल्यामुळे अर्जदाराप्रति सेवेत ञुटी दिलेली आहे. सबब मुद्दा क्रं. २ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ३ बाबत ः-
७. मुद्दा क्रं. १ व २ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(१) गैरअर्जदार क्रं. ०१ ते ०३ यांनी अर्जदाराला आदेशाची प्रत
मिळाल्यापासून ४० दिवसाचे आत तिच्या राहत्या घरात विज
मिटर लावून दयावे.
(२) दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(३) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - ३१/०८/२०१५