निकाल
(घोषित दि. 06.01.2017 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार याने सॅमसंग कंपनीचा मोबाईल दि.04.12.2015 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून विकत घेतला, त्यानंतर सहा महिन्यात तो बंद पडला. गैरअर्जदार क्र.2 यांना सदर मोबाईल बंद पडल्यानंतर तक्रारदार याने विचारणा केली असता या प्रकारच्या मोबाईलमध्ये असे दोष असतात असे सांगण्यात आले. तसेच सेवा केंद्रात सदर मोबाईलच्या दोषांचे निर्मुलन करण्याकरता पाठविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यावेळी सदर मोबाईल वॉरंटीच्या कालावधीमध्ये होता, त्यामुळे दुरुस्तीचा खर्च लागणार नाही असेही सांगण्यात आले. तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचे मार्फत सदर मोबाईल आवश्यक त्या दुरुस्तीकरता गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठविला. त्यावेळी गैरअर्जदार क्र.1 यांनी रक्कम रु.7,000/- दुरुस्तीकरता लागणार असून सदर रक्कम भरण्याकरता सुचना दिली. सदर मोबाईल हॅण्डसेट वॉरंटीमध्ये असल्यामुळे तक्रारदार याने ती रक्कम भरली नाही. म्हणून गैरअर्जदार क्र.1 याने त्या मोबाईलची दुरुस्ती करण्यास नकार दिला. अशारितीने गैरअर्जदार यांच्या सेवेत त्रुटी आहे. या कारणास्तव तक्रारदार याने हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार याने त्याची तक्रार त्याच्या विनंतीप्रमाणे मंजूर करावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार याने तक्रार अर्जासोबत जोडलेल्या यादीप्रमाणे आवश्यक कागदपत्रांच्या नक्कला जोडल्या आहेत. त्यामध्ये मोबाईल खरेदीची पावती, सेवा केंद्रातील जॉबशीटचा फॉर्म व वॉरंटीची नक्कल आहे.
गैरअर्जदार क्र.2 हे स्वतः हजर झाले. त्यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार यांच्या मोबाईलमध्ये दोष निष्पन्न झाला त्यावेळी गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदार यास फोन करुन मोबाईलच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च व इतर बाबी कळविल्या. गैरअर्जदार 2 यांचे काम फक्त मोबाईल विकण्याचे आहे. सेवा केंद्र हे कंपनीच्या कार्यक्षेत्राचा भाग आहे. मोबाईल विक्रीच्या पावतीवर स्पष्ट शब्दात लिहीले आहे की, मोबाईल विकल्यानंतर त्याच्या वॉरंटी कालावधीत लागणारी दुरुस्ती कंपनीच्या सेवा केंद्रामधून ग्राहकाने स्वतः घेणे आवश्यक आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचेवर मोबाईल दुरुस्तीची कोणतीही जबाबदारी येत नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करावा अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्र.1 व 3 यांचेतर्फे त्यांचे प्रतिनिधी श्री.गणेश तिवारी यांनी शपथपत्रांच्या स्वरुपात लेखी जबाब दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदाराची तक्रार आहे त्या स्वरुपात चालू शकत नाही. तक्रारदार यांच्या तक्रारीमध्ये यश मिळविण्याकरता कोणताही मुददा उपलब्ध नाही. तक्रारदार हा गैरअर्जदार क्र.1 व 3 यांच्या सेवेत त्रुटी आहे, असे सिध्द करु शकलेला नाही. सदर मोबाईलचा वापर सहा महिने केल्यानंतर त्यात दोष उत्पन्न झाले, त्यावेळी तक्रारदार याने सदर नादुरुस्त मोबाईल हॅण्डसेट गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे सुपूर्द केला व गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर हॅण्डसेट गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पुढील कार्यवाहीकरता पाठविला. गैरअर्जदार क्र.1 यांच्या अभियंत्याने सदर मोबाईल हॅण्डसेट उघडला व तपासला त्यावेळी असे दिसून आले की, सदर मोबाईल हॅण्डसेटवर बाहय शक्तीचा वापर केला आहे. त्याला जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात दाबण्यात आले. त्यामुळे मोबाईल हॅण्डसेटच्या आंतर भागातील जोडणीवर त्याचा विपरीत परिणाम झाला. त्याचप्रमाणे मोबाईलच्या आंतर भागात द्रव पदार्थ गेल्यामुळे सुध्दा त्याचे आंतर भागातील जोडणीचे नुकसान झाले आहे. वॉरंटीच्या कलम 7 अन्वये जर बाहय शक्तीच्यामुळे मोबाईलमध्ये दोष उत्पन्न झाले तर त्याची दुरुस्ती वॉरंटीच्या अंतर्गत करता येत नाही. जर सदर मोबाईल हॅण्डसेटचा गैरवापर केल्यामुळे तो नादुरुस्त झाला तर, वॉरंटीच्या अटी व शर्ती लागू होत नाही. अशा परिस्थितीत मोबाईलची दुरुस्ती जे सुटे भाग उपलब्ध असतील त्यांचा उपयोग सदर सुटया भागांची किंमत वसूल करुन करण्यात येते. तक्रारदार यांच्या नादुरुस्त सुटया भागांची किंमत रु.6,255/- पर्यंत असू शकेल असा अंदाज संबंधित अभियंत्याने काढला. त्यामुळे त्या रकमेचे अंदाजपत्रक तक्रारदार यास देण्यात आले. परंतू तक्रारदार यास वॉरंटीच्या कालावधीमध्ये मोबाईल हॅण्डसेटची दुरुस्ती विनाशुल्क करुन घेण्याची इच्छा होती त्यामुळे त्याने गैरअर्जदार क्र.1 यांच्या प्रस्तावाला धुडकावले. थोडक्यात तक्रारदाराच्या मोबाईल हॅण्डसेटचे जे नुकसान झाले आहे ते वॉरंटीच्या अटी व शर्तीमध्ये येत नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर नादुरुस्त हॅण्डसेट उकलल्यानंतर त्याची छायाचित्रे घेतली आहेत व ती ग्राहक मंचासमोर दाखल केली आहेत. वरील सर्व परिस्थितीत गैरअर्जदार क्र.1 व 3 यांचे सेवेत कोणतीही त्रुटी नाही. तसेच नादुरुस्त हॅण्डसेटमध्ये उत्पादकीय दोष नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र.1 व 3 यांचेतर्फे करण्यात आली आहे.
गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी लेखी जबाबासोबत वॉरंटीच्या अटी व शर्तीचे कागद व नादुरुस्त मोबाईल हॅण्डसेट उकलल्यानंतर त्याची घेण्यात आलेली छायाचित्रे दाखल केली आहेत.
आम्ही तक्रारदार यांची तक्रार व सर्व गैरअर्जदार यांचे लेखी जबाब काळजीपूर्वक वाचले. ग्राहक मंचासमोर दाखल असलेल्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले तसेच युक्तीवाद ऐकला. त्यावरुन आमचे असे मत झाले आहे की, तक्रारदार याने वादातील मोबाईल हॅण्डसेट गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून दि.04.12.2015 रोजी विकत घेतला, सदर मोबाईलचा वापर तक्रारदार याने सहा महिने योग्यरितीने केला परंतू त्यानंतर सदर मोबाईलमध्ये दोष उत्पन्न झाले. त्यामुळे तक्रारदार याने सदर मोबाईल गैरअर्जदार क्र.2 विक्रेता यांचेकडे दुरुस्तीकरता दिला, या गोष्टी दोन्ही बाजुस सर्वसाधारणपणे मान्य आहेत.
तक्रारदार यांचे विशेष करुन असे म्हणणे आहे की, मोबाईल हॅण्डसेट विकत घेतल्यापासून एक वर्षाच्या आत त्यामध्ये दोष उत्पन्न झाले, सदर दोष मोबाईल विकत घेतल्यापासून एक वर्षांच्या आत झाल्यामुळे त्याला वॉरंटीचे छत्र उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी तो मोबाईल विनाशुल्क/विनामुल्य दुरुस्त करुन देणे आवश्यक आहे. तक्रारदार यांच्या म्हणण्यावर गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वॉरंटीच्या अटी व शर्तीमध्ये ठराविक अटींचा अंतर्भाव आहे. त्या अटींचे पालन योग्यरितीने झालेले असेल तरच तक्रारदार यास त्याचा नादुरुस्त मोबाईल हॅण्डसेट विनामुल्य/विनाशुल्क दुरुस्त करुन घेता येतो. परंतू जर त्या अटीचे उल्लंघन झाले असेल तर, तक्रारदार हा विनामुल्य/विनाशुल्क दुरुस्तीच्या लाभास पात्र ठरत नाही.
वॉरंटीच्या अटी व शर्तीमध्ये जर मोबाईल हॅण्डसेटवर बाहय शक्तीचा वापर झाला असेल तर त्यामुळे होणारे नुकसान वॉरंटीच्या अटी व शर्तीमध्ये येत नाही असे अट क्रमांक 7 मध्ये लिहीले आहे. गैरअर्जदार यांनी त्यांचे शपथपत्रांसोबत नादुरुस्त मोबाईल हॅण्डसेट उकलल्यानंतर संबंधित अभियंत्याने घेतलेली काही छायाचित्रे दाखल केलेली आहेत. आम्ही सदर छायाचित्रांचे काळजीपूर्वक अवलोकन केले. पण सदर मोबाईल हॅण्डसेटवर बाहय शक्तीचा वापर झाला अथवा नाही, याबददल कोणताही निष्कर्ष काढण्यास आम्ही असमर्थ आहोत. गैरअर्जदार क्र.1 यांच्या अभियंत्याने असेही निवेदन केले आहे की, मोबाईल उकलल्यानंतर आतील भाग द्रव पदार्थामुळे खराब झालेला होता. आमच्या मताने सदर गोष्ट सिध्द करण्यास सुध्दा कोणताही विशेष पुरावा गैरअर्जदार यांनी दिलेला नाही.
या उलट तक्रारदार यांनी सेवा केंद्रातील जॉबशीटची नक्कल जोडलेली आहे. सदर जॉबशीटवर मोबाईच्या दोषांचे वर्णन ‘डिस्प्ले ब्लॅंक’ असे लिहून केलेले आहे. सदर मोबाईलवर बाहय शक्तीचा वापर झाला, ही विशेष बाब गैरअर्जदार क्र.1 व 3 यांच्याकडून सांगण्यात येते. परंतू ती बाब सिध्द करण्याकरता आवश्यक असणारा पुरावा मात्र गैरअर्जदार क्र.1 व 3 हे देऊ शकलेले नाहीत. सदर मोबाईल हॅण्डसेट वॉरंटीच्या कालावधीत आहे, सदर मोबाईल हॅण्डसेटवर बाहय शक्तीचा वापर झाल्यामुळेच त्यामध्ये दोष उत्पन्न झाले व त्यामुळे सदर मोबाईल हॅण्डसेटच्या दुरुस्तीस वॉरंटीचा लाभ मिळू शकत नाही ही गोष्ट गैरअर्जदार क्र.1 व 3 यथोचित रितीने सिध्द करु शकलेले नाहीत. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी तक्रारदाराचा मोबाईल
हॅण्डसेट विनामुल्य दुरुस्त करुन न देऊन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. या कारणास्तव तक्रारदार हा खालीलप्रमाणे आदेशास पात्र आहे.
आदेश
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येतो.
2) गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या नादुरुस्त मोबाईलची दुरुस्ती
वॉरंटीच्या अटी व शर्तीप्रमाणे विनाशुल्क/विनामुल्य करुन सदर मोबाईल
चालू अवस्थेत हया आदेशाची माहिती मिळाल्यापासून 60 दिवसाच्या आत
द्यावा.
3) गैरअर्जदार क्र.1 यांनी या आदेशाचे पालन आदेशातील विशिष्ट
तरतुदीनुसार केले नाही तर गैरअर्जदार क्र.1 हा तक्रारदार यांना रक्कम
रु.3,000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यास पात्र राहील.
4) गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदारास हया तक्रार अर्जाच्या खर्चापोटी
रक्कम रु.3,000/- द्यावेत.
5) गैरअर्जदार क्र.2 विरुध्द आदेश नाही.
6) मानसिक त्रासांच्या नुकसान भरपाई बददल आदेश नाही.
7) गैरअर्जदार क्र.1 यांनी विहीत मुदतीच्या नंतर सदर मोबाईलची दुरुस्ती
ग्राहक मंचाचे आदेशाप्रमाणे न केल्यामुळे तक्रारदार हा गैरअर्जदार
यांचेकडून सदर मोबाईल हॅण्डसेटची किंमत रु.14,800/- वसूल
करण्यास पात्र आहे.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना