तक्रारदार स्वतः गैर अर्जदारासाठी वकील श्री.व्हि.के.शर्मा. मा.अध्यक्षानुसार दिलेले निकालपत्र. 1. तक्रारदाराने सा.वाले सॅमसंग इंडिया लिमिटेड कंपनीचे वातानुकुलित यंत्र घेतले. त्याबद्दल सा.वाले यांनी तक्रारदाराला तात्काळ व योग्य अशी सुविधा दिली नाही, म्हणून त्यांनी वातानुकुलित यंत्र परत घ्यावे व तक्रारदाराला झालेल्या नुकसानी बाबत रु.5 लाख नुकसान भरपाई द्यावी, तसेच वातानुकुलित यंत्राच्या किंमतीवर बँक दराने व्याज द्यावे यासाठी तक्रारदाराने सदरची तक्रार केली आहे. 2. तक्रारदाराने दिनांक 20/06/2006 रोजी ग्लोब रेडीओ, मुंबई यांच्याकडून सॅमसंग कंपनीचे वातानुकुलित यंत्र रु.32,750/- ला विकत घेतले. त्याची वारंटी इनडोअर युनिटसाठी 1 वर्षाची होती व कॉम्प्रेसरसाठी 5 वर्षाची होती. वातानुकुलित यंत्र बसवून दिनांक 22/06/2006 रोजी इंजिनिअरने येऊन त्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले होते. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले होते की, तक्रारदाराने त्या यंत्राबद्दल काही तक्रार केली तर तिचे निरसन 24 तासाचे आत व व्यवस्थित केले जाईल. 3. तक्रारदाराचा आरोप की, सा.वाले यांनी खोटी आश्वासनं देऊन त्याची फसवणूक केली. त्याने दिनांक 24/05/2007 रोजी सा.वाले क्र.3 कडे त्या यंत्राबाबत तक्रार केली होती. दिनांक 26/05/2007 रोजी त्यांचे इंजिनिअर ते यंत्र दुरुस्तीसाठी त्यांच्या वर्कशॉपमध्ये घेऊन गेले कारण काम्प्रेसरमधून गॅसची गळती होत होती. दिनांक 28/05/2007 रोजी रिपेअर करुन ते यंत्र परत करण्याचे कबुल केले होते. त्यानंतर त्याने सा.वाले यांचेकडे बराच पाठपुरावा केला. परंतु ते यंत्र दुरुस्त करुन दिले नाही. शेवटी दिनांक 13/06/2007 रोजी ते यंत्र त्याच्याकडे बसविण्यासाठी घेऊन आले. परंतु त्याने ते घेण्यास नकार दिला. त्याचे म्हणणे की, कुलिंग फिन्स (यंत्राची पाती) खराब झालेली होती. तक्रारदाराचा आरोप की, सा.वाले यांनी उन्हाळा ऋतू असताना त्याला वेळेवर ते यंत्र दुरुस्त करुन दिले नाही व हेतुपुरस्सर त्याला शाररिक व मानसिक त्रास दिला. तसेच सा.वाले यांनी कमी दर्जाचे यंत्र दिले. सा.वाले यांचेकडे प्रशिक्षीत मॅकेनिकल व इंजिनिअर नव्हते. सॅमसंग कंपनीने त्यांचे प्रॉडक्ट सीएफसी(Chlorofluorocarbon) मुक्त करण्याची पॉलीसी अवलंबविली नव्हती. वरील प्रमाणे सा.वाले यांचे सेवेत न्यूनता आहे. 4. सा.वाले यांनी तक्रारीला उत्तर देऊन तक्रारदाराचे संपूर्ण आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, दिनांक 20/06/2006 रोजी तक्रारदाराने वातानुकुलित यंत्र विकत घेतल्यानंतर दिनांक 24/05/2007 रोजी पहिल्यांदा त्या बद्दल तक्रार केली. लगेच दि.25/05/2007 रोजी त्यांनी इंजिनिअर पाठविला. गॅस लिकेज होतो असे त्याचे लक्षात आल्याने दि.26/05/2007 रोजी ते यंत्र वर्कशॉपमध्ये आणण्यात आले व दि.30/05/2007 पर्यत ते पूर्ण दुरुस्त करण्यात आले. त्या दिवशी ते यंत्र तक्रारदाराकडे घेऊन गेले असता तक्रारदाराच्या घराला कुलुप होते. म्हणून त्याची डिलीव्हरी देता आली नाही. दि.3/06/2007 रोजी पुन्हा ते यंत्र बसविण्यासी घेऊन गेले असता वॉचमने सांगीतले की, तक्रारदार अजून गावाहून परत आलेले नाहीत. त्यांनी इमारतीत जाऊही दिले नाही. त्यानंतर दि.05/06/2007 रोजी तक्रारदाराने तक्रार दाखल केली. म्हणून दि.06/06/2007 रोजी त्यांनी इंजिनिअरला तक्रारदाराच्या घरी पाठविले. इंजिनिअरने तक्रारदाराला त्यांनी ते यंत्र बसविण्यासाठी आणले होते परंतु तक्रारदार घरी नसल्यामुळे डिलीव्हरी देता आली नाही, तसेच वॉचमनेही इमारतीत प्रवेश दिला नाही असे सांगीतले. व ते यंत्र दुरुस्त करुन तंयार आहे असे सांगीतले. त्यानंतर दि.13/06/2007 रोजी ते यंत्र बसविण्यासाठी तक्रारदाराकडे गेले असता तक्रारदाराने ते बसवू दिले नाही. त्यामुळे परत आणावे लागले. दि.15/06/2007 रोजीही ते यंत्र बसविण्यासाठी गेले असता तक्रारदाराने नकार दिला. वरील परिस्थिती असताना व त्यांची सेवेत न्यूनता नसताना तक्रारदाराने सदरची खोटी तक्रार पैसे उखळविण्याच्या उद्देशाने केली आहे. सा.वाले यांचे म्हणणे की, यंत्राची डिलीव्हरी देण्यासाठी दि.04/06/2007 ही तारीख दिलेली नव्हती. तक्रारदाराने दि.03/06/2007 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता यंत्राची डिलीव्हरी द्यावी म्हणजे ते घरी राहातील असे सांगीतले होते. दि.07/06/2007, 09/06/2007 व 11/06/2007 रोजी तक्रारदाराने तक्रार केली हे खोटे आहे. दुरुस्त केलेल्या यंत्रामध्ये काहीही दोष नव्हता. ते व्यवस्थित चालत होते. परंतु हेतुपुरस्सर तक्रारदाराने ते बसवू दिले नाही. यंत्र दुरुस्त करुन वर्कशॉपमध्ये आहे असे तक्रारदाराला कळवूनसुध्दा त्यांनी यंत्राची डिलीव्हरी घेण्यास स्वारस्य दाखविले नाही. त्यांच्याकडे प्रशिक्षीत इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहेत. त्यांच्याकडे environment friendly policyनाही हे सा.वाले नाकारतात. सदरची तक्रार रद्द होणेस पात्र आहे व ती रद्द करण्यात यावी असे सा.वाले यांनी विनंती केली आहे. 5. आम्ही सा.वाले तर्फे वकील श्री.व्हि.के.शर्मा यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला, तक्रारदाराने त्याचे शपथपत्र (रिजॉंन्डर) तसेच लेखी युक्तीवाद दिलेला आहे. व काही कागदपत्र दाखल केली आहेत. आम्ही या केसमधील सर्व कागदपत्रं वाचली. 6. वातानुकुलित यंत्र दुरुस्त करुन परत करण्यात सा.वाले यांची सेवेत न्यूनता आहे काय ? यावर मंचाचे उत्तर होकारार्थी आहे. दि.26/05/2007 रोजी सा.वाले यांनी सा.वाले क्र.3 च्या वर्कशॉपमध्ये वातानुकुलित यंत्र दुरुस्तीसाठी नेले. त्यानंतर दि.13/06/2007 रोजी दुरुस्ती केलेले यंत्र बसविण्यासाठी आणले. सा.वाले यांचे म्हणणे की, दरम्यान दि.30/05/2007 रोजी ते यंत्र बसवून देण्यासाठी आणले होते परंतू तक्रारदार मुंबईमध्ये नव्हते व त्याचे घराला कुलुप होते. दि.03/06/2007 रोजी ते यंत्र बसवून देण्यासाठी पुन्हा आणले असता वॉचमने त्यांना इमारतीत प्रवेश दिला नाही. या बाबतीत सा.वाले यांनी जो कुणी त्यांचा इंजिनिअर सदरचे यंत्र तक्रारदाराकडे बसविण्यास घेऊन गेला होता त्याचे शपथपत्र दाखल केले नाही. सा.वाले यांनी हे मान्य केले आहे की, दि.5/06/2007 रोजी तक्रारदाराने त्या यंत्राबद्दल तक्रार केली होती. सा.वाले यांचे म्हणणे की, 06/06/2007 रोजी त्यांचा इंजिनिअर पुन्हा तक्रारदारकडे गेला परंतु त्या दिवशी किंवा त्यानंतर दि.13/06/2007 च्या अगोदर त्या यंत्राची तक्रारदाराला डिलीव्हरी का दिली नाही या बद्दल सा.वाले यांनी खुलासा केलेला नाही. तक्रारदाराचे म्हणणे की, दि.13/06/2007 च्या अगोदर त्यांनी पुष्कळवेळा कॉल सेंटरला फोन करुन यंत्राची डिलीव्हरी मागीतली होती. तक्रारदाराने माहितीच्या अधिकाराखाली एम.टी.एन.एल. न्यु दिल्ली यांचेकडून त्याने टोल फ्रीनंबरवर केलेल्या फोन बद्दल माहिती देऊन ती मंचात दाखल केली आहे. त्यावरुन असे दिसते की, त्याने 1800-110-011 या टोलफ्रि नंबरला दि.5/06/2007, 6/06/2007, 7/6/2007,8/06/2007 व 11/06/2007 रोजी तसेच दि.24/05/2007 व 25/05/2007 रोजी कॉल केले होते. जर वातानुकुलित यंत्र दुरुस्त झालेले असते तर सा.वाले यांनी तक्रारदाराची वेळ नक्की करुन त्यावेळी यंत्राची डिलीव्हरी दिली असती. तसे घडले नाही याचा अर्थ वातानुकुलित यंत्र दुरुस्त होऊन दि.13/06/2007 चे अगोदर डिलीव्हरीसाठी योग्य नव्हते. 7. यंत्र दुरुस्तीसाठी नेले त्यावेळी उन्हाळा ऋतू होता व वातानुकुलित यंत्राची अर्जदाराला नितांत गरज होती. अशा वेळी सा.वाले यांनी यंत्र लवकरात लवकर दुरुस्त करुन यंत्राची डिलीव्हरी द्यावयास पाहिजे होती. हे त्यांनी केले नाही. दि.26/05/2007 रोजी यंत्र दुरुस्तीला नेल्यानंतर दि. 13/06/2007 पर्यत त्यांनी यंत्राची डिलीव्हरी दिली नाही. सा.वाले यांनी यंत्राची डिलीव्हरी पावसाळा सुरु झाला त्यावेळेस देऊ केली. ही सा.वाले यांच्या सेवेत न्यूनता आहे. सा.वाले यांच्या या कृत्यामुळे तक्रारदाराला जो मानसिक त्रास झाला व त्याची गैरसोय झाली त्यासाठी सा.वाले त्याला योग्य ती नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. मंचाचे मते रु.5000/- ही नुकसान भरपाई योग्य व वाजवी आहे. 8. तक्रारदाराने दि.13/06/2007 रोजी यंत्राची डिलीव्हरी घेण्यास नकार दिला. त्याचे म्हणणे की, वातानकुलित यंत्राचे कुलिंग फिन्स(यंत्राची पाती) खराब झालेली होती. त्यामुळे त्याने यंत्राची डिलीव्हरी घेतली नाही. यंत्राची पाती खराब झालेली होती याबद्दल तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेला नाही किंवा त्याबद्दल तक्रारदाराने काही लेखी पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराचा हा आरोप विचारांती आहे असे दिसते. त्यामुळे तो मान्य करता येत नाही. तक्रारदाराने दि.13/06/2007 रोजी यंत्राची डिलीव्हरी घेण्यास नकार देण्यास काही कारण नव्हते. सा.वाले यांनी ते यंत्र परत घ्यावे अशी तक्रारदाराची मागणी मान्य करता येत नाही. कारण यंत्रात काही उत्पादन दोष आहे असा तक्रारदाराचा आरोप नाही. मंचाच्या मते खालील आदेश न्यायाच्या दृष्टीने योग्य आहे. आदेश 1. तक्रार क्र. 67/2011(जुना त.क्र.346/2007) अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. सामनेवाले यांनी वातानुकुलित यंत्र पूर्णपणे दुरुस्त करुन चालू स्थितीत (कंडीशनमध्ये) तक्रारदाराला बसवून द्यावे व तक्रारदाराने ते बसवून घ्यावे. 3. सामनेवाले यांनी तक्रारदाराला रु.5000/-नुकसान भरपाई द्यावी. 4. सामनेवाले यांनी तक्रारदाराला या तक्रारीच्या खर्चापोटी रु.3000/- द्यावे व स्वतःचा खर्च सोसावा. 5. सा.वाले यांनी वरील आदेशीत रकम तक्रारदाराला या आदेशाची प्रमाणीत प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावी अन्यथा विलंबापोटी द.सा.द.शे. 6 दराने व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहातील. 6. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |