तक्रारदारांतर्फे - अॅड.श्री. युवराज वारघडे
जाबदार क्र. 1 व 2 तर्फे - अॅड.श्री. लिखीत गांधी
जाबदार क्र. 3 तर्फे - अॅड.श्री. अभ्यंकर
*****************************************************************
// निकालपत्र //
पारीत दिनांकः- 31/07/2013
(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, अध्यक्ष )
सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक मंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/2005/314 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांच्या आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा मंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/2008/191 असा नोंदविण्यात आला आहे.
2. तक्रारदारांची तक्रार संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
तक्रारदारांनी जाबदार क्र. 3 यांचेकडून जाबदार क्र. 1 या कंपनीचा रक्कम रु. 5,690/- चा मोबाईल हॅण्डसेट दि.4/8/2004 रोजी खरेदी केला. खरेदी करताना जाबदार क्र. 3 यांनी एक वर्षाची वॉरंटी दिलेली होती. हा हॅण्डसेट चांगल्या दर्जाचा असल्यामुळे चांगला चालेल असेही सांगितले. खरेदी केल्यानंतर वापरत असताना त्यामध्ये काही दोष आढळून येत होते म्हणून त्यांनी जाबदार क्र. 3 यांना त्याबद्दलची तक्रार केली, त्यावेळी जाबदार क्र. 3 यांनी तक्रारदारांना जाबदार क्र. 1 यांच्याशी बोलून हॅण्डसेट दुरुस्त तरी करुन देऊ अथवा बदलून तरी देऊ असे सांगितले. काही दिवसांनी जाबदार क्र. 3 यांनी तक्रारदारास बोलावून तशाचप्रकारचे आश्वासन देऊन तक्रारदारांचा हॅण्डसेट जाबदार क्र. 1 यांचकडे पाठवावा लागेल असे सांगितले. त्यानुसार तक्रारदारानी त्यांचा हॅण्डसेट दि. 3/9/2004 रोजी जाबदार क्र. 3 यांच्याकडे दिला जेणेकरुन जाबदार क्र. 3 यांनी जाबदार क्र. 1 यांचेकडे हॅण्डसेट पाहणीकरता पाठवावा. तक्रारदारांनी विचारणा केली असता, जाबदार क्र. 3 यांनी त्यांचा हॅण्डसेट जाबदार क्र. 1 यांच्या दिल्ली येथील ऑफिस / हेडक्वार्टर मध्ये पाठवून दिल्याचे सांगितले. त्यांनतर नोव्हेंबर 2004 मध्ये जाबदार क्र. 3 यांनी हॅण्डसेट रिपेअर करुन आलेला आहे असे तक्रारदारास सांगितले. तक्रारदारांनी तो घेतल्यानंतर पाच महिने वापरला त्या काळातही तो व्यवस्थितरित्या चालत नव्हता. मार्च 2005 मध्ये तो हॅण्डसेट पूर्ण बंदच झाला त्यामुळे तक्रारदारांनी हा हॅण्डसेट जाबदार क्र. 3 यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिला, त्यावेळेस तो व्यवस्थितरित्या दुरुस्त करुन दयावा किंवा बदलून दयावा असे तक्रारदारांनी सांगितले. काही दिवसांनी चौकशीसाठी जाबदार क्र. 3 यांचेकडे तक्रारदार गेले असता त्यांनी सॅमसंग कंपनीचे नवीन ऑफिस पुणे येथे उघडले असल्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदारांचा हॅण्डसेट जाबदार क्र. 2 यांच्याकडे दुरुस्तीसाठी टाकल्याचे सांगितले. तक्रारदारांनी जाबदार क्र. 2 यांच्याकडून उत्तराची वाट पाहिली. शेवटी दि. 6/5/2005 रोजी जाबदार क्र. 3 यांनी तक्रारदारास त्यांचा हॅण्डसेट दिला व सोबत जाबदार क्र. 2 यांची कलेक्शन स्लीप दिली. त्या कलेक्शन स्लीपवर, हॅण्डसेट डेड – रिपेअर्ड ट्वाईस, पी.बी.ए. रिपेअर्ड फ्रॉम दिल्ली हेड ऑफिस तसेच हॅण्डसेट कॅन नॉट बी रिपेअर्ड अंडर वॉरंटी, पी.बी.ए. डॅमेज्ड हा रिमार्क शशांक नावाच्या इसमाने दि. 29/4/2005 रोजी दिल्याचे दिसून येते. म्हणून तक्रारदार जाबदार क्र. 2 यांच्या ऑफिसमध्ये शशांक यांना भेटले. परंतु शशांक यांनी त्यांना समाधानकारक उत्तर दिले नाही त्याचेवेळेस त्यांना हॅण्डसेट बदलून दयावयाचे विचारले असता त्यांनी नकार दिला म्हणून तक्रारदारांनी दि.1/7/2005 रोजी जाबदार क्र. 2 व 3 यांना लिगल नोटीस पाठविली आणि नवीन हॅण्डसेट देण्याविषयी मागणी केली. दोघांनाही या नोटीसा प्राप्त झाल्या. जाबदार क्र. 3 यांनी त्याचे उत्तर दिले आणि हॅण्डसेट बदलून देण्याची जबाबदारी टाळली. जाबदार क्र. 2 यांनी उत्तरही दिले नाही आणि हॅण्डसेटही बदलूनही दिला नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदारांकडून त्यांचा हॅण्डसेट बदलून नवीन हॅण्डसेटची मागणी करतात किंवा हॅण्डसेटची किंमत रु. 5,690/- ची मागणी करतात तसेच नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.2,000/- आणि इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. जाबदार क्र. 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब संयुक्तपणे दिलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, जाबदार क्र. 1 व 2 ही आय्.एस्.ओ. स्टॅण्डर्ड कंपनी आहे. जाबदार क्र.1 व 2 हे ग्राहकांना त्यांचे हॅण्डसेटस अटी व शर्ती आणि वॉरंटीसहित विकतात. प्रस्तुतच्या तक्रारीत तक्रारदारांनी हॅण्डसेट सहा महिन्यापर्यंत वापरला होता त्यावेळी त्यामध्ये कुठलाही दोष नव्हता म्हणजेच त्यामध्ये कोणताही उत्पादकीय दोष नव्हता. तक्रारदाराचा हॅण्डसेट दोन वेळेस त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आला होता. दोन्ही वेळेस त्यांच्या एक्सपर्ट टेक्निशीयननी हॅण्डसेट दुरुस्त करुन दिला आहे, तक्रारदारांनीच त्यांच्या हॅण्डसेटची काळजी घेतली नाही, त्यांच्या निष्काळजीपणामुळे तो बिघडला आहे आणि तो डेड झाला आहे. प्रस्तुतच्या तक्रारीत तक्रारदारांनी हॅण्डसेटमध्ये नेमका कुठला दोष आहे, तो नमुद केला नाही. तकारदार हॅण्डसेटची दुरुस्ती करुन मिळण्यास इच्छित नाही तर हॅण्डसेटच्या रकमेचा परतावा मागण्याची त्यांची इच्छा आहे. वॉरंटी कंडीशन क्र. 8 नुसार, जाबदार क्र. 1 व 2 हे फक्त हॅण्डसेट मधील पार्टस रिपेअर किंवा बदलून देऊ शकतात, ते पूर्ण हॅण्डसेट बदलून देऊ शकत नाहीत. यावरुन यामध्ये जाबदारांची कुठेही सेवेत त्रुटी दिसून येत नाही. अटी व शर्तीनुसार दिल्ली येथे आरबीट्रेटरचे (लवाद) ऑफिस आहे, तेथेच त्यांचे कार्यक्षेत्र आहे म्हणून प्रस्तुतच्या मंचास कार्यक्ष्ेात्र नाही. तकारदाराची तक्रार दंडासहित नामंजूर करावी अशी मागणी जाबदार करतात. जाबदारांनी त्यांच्या म्हणण्यासोबत शपथपत्र दाखल केले आहे.
4. जाबदार क्र. 3 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारास हॅण्डसेट विक्री करताना त्यांना कुठलेही आश्वासन दिलेले नव्हते आणि ते कुठलेही सव्हिसेस देऊ शकत नव्हते. जाबदार क्र. 1 ही उत्पादकीय कंपनी असून विक्रीपश्चात तेच सेल्स सर्व्हीस त्यांच्या सेपरेट सर्व्हीस स्टेशनमधून देतात. तक्रारदारांनी त्यांच्याकडे हॅण्डसेटची तोंडी तक्रार दिली होती हे म्हणणे चुकीचे आहे. ज्यावेळेस त्यांनी हॅण्डसेट दुरुस्त करुन दिला होता त्यावेळेस तक्रारदार देखील समाधानी होते. त्यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, तक्रारदाराच्या तक्रारीवरुन असे दिसून येते की हॅण्डसेटमध्ये उत्पादकीय दोष आहे त्यासाठी जाबदार क्र. 3 हे जबाबदार नाहीत. तक्रारदाराच्या तक्रारीवरुन असे दिसून येते की, सदोष हॅण्डसेटबाबतच्या तक्रारीसाठी प्रस्तुतचे जाबदार हे जबाबदार नाहीत. कुठल्याही नुकसानभरपाईसाठी प्रस्तुतचे जाबदार हे जबाबदार ठरत नाही, म्हणून प्रस्तुतची तक्रार नामंजूर करावी असे जाबदार म्हणतात.
5. सर्व पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दि. 4/8/2004 रोजी जाबदार क्र. 3 यांच्याकडून सॅमसंग कंपनीचा हॅण्डसेट रक्कम रु.5,690/- ला खरेदी केल्याचे दिसून येते. त्यास एक वर्षाची वॉरंटी दिल्याचे दिसून येते. खरेदी केल्यानंतर काही दिवस वापरल्यानंतर त्यांचा हॅण्डसेट योग्य पध्दतीने चालत नव्हता. जाबदार क्र. 3 यांना विचारणा केली असता त्यांचा मोबाईल हॅण्डसेट दुरुस्तीसाठी दयावा असे त्यांनी तक्रारदारास सांगितले. त्यानुसार दि. 3/9/2004 रोजी जाबदार क्र. 3 यांनी तक्रारदाराचा हॅण्डसेट जाबदार क्र. 1 यांच्याकडे दिल्ली येथे पाठवून दिल्याचे म्हणतात. जाबदार क्र. 1 व 2 आणि 3 यांचे असे म्हणणे आहे की तक्रारदारांच्या मोबाईल हॅण्डसेट मध्ये काय दोष आहे तो त्यांनी नमुद केला नाही परंतु दुरुस्तीसाठी जाबदार क्र. 3 यांचेकडे हॅण्डसेट नेल्यानंतर जाबदार क्र. 2 सर्व्हीस सेंटर यांनीच त्यांच्या हॅण्डसेटमध्ये काय दोष आहेत हे जॉबकार्डवर नमुद करणे हे त्यांचे कर्तव्य ठरते, तसे जाबदार क्र. 1 यांच्या सर्व्हीस सेंटरने केल्याचे दिसून येत नाही. जाबदार क्र. 3 यांच्याकडे दोनवेळेस हॅण्डसेट दुरुस्तीसाठी दिल्यानंतर तशाप्रकारचे जॉबशीट त्यांनी दिल्याचे दिसून येत नाही हीच मुळात सर्वच जाबदारांच्या सेवेतील त्रुटी असल्याचे दिसून येते. शेवटची कलेक्शन स्लीप मात्र दाखल केली आहे. त्याची पाहणी केल्यानंतर असे दिसून येते की, त्यांच्या हॅण्डसेटमध्ये कुठल्या प्रकारच्या तक्रारी होत्या हे जाबदारांनी नमुद केल्याचे दिसून येत नाही. फ्रंटकव्हर स्क्रॅचेस, फ्रंटकव्हर कलर फेड, अॅन्टेना ब्रोकन / डिफॉर्मड, अॅडॉप्टर ब्रोकन इ. प्रकारची बरीच कारणांची यादी दिलेली आहेत तसेच खाली कंप्लेंटमध्ये हॅण्डसेटमध्ये काय कम्प्लेंटस आहेत हे त्यात नमुद केले नाही. केवळ “Dead Repaired twice P.B.A. Repaired from Delhi H.O. Handset cannot be repair under warranty P.B.A. Damaged” असे त्यावर नमुद केलेले आहे. पी. बी. ए. डेड झाल्यानंतर हे वॉरंटीमध्ये नाही अशाप्रकारच्या अटी व शर्ती जाबदार क्र. 1 ते 3 यांनी मंचात दाखल केल्या नाहीत आणि हॅण्डसेटमध्ये कुठला दोष होता हेदेखील स्पष्ट केलेले नाही. एक वर्षाच्या आत हॅण्डसेट खरेदी केल्यानंतर दि. 4/8/2004 रोजी लगेच दुस-याच महिन्यात म्हणजेच दि. 3/9/2004 रोजी हॅण्डसेट चालत नाही म्हणून हॅण्डसेट दुरुस्तीसाठी टाकला तोदेखील वॉरंटीच्या कालावधीत, तर हॅण्डसेट डेड असल्यामुळे वा इतर कारणास्तव दुरुस्त करता येत नाही यासाठी जाबदारांनी कुठलेही तांत्रिक व शास्त्रीय, योग्य ते पटेल असे कारण न देता त्यांचा हॅण्डसेट दुरुस्त केला नाही हे दिसून येते. वास्तविक जाबदार क्र. 1 ते 3 यांच्याकडे हॅण्डसेट दुरुस्तीसाठी तज्ञ लोक आहेत त्या हॅण्डसेटमध्ये नेमके काय झाले हे तेच सांगू शकतात, असे असतानासुध्दा कुठल्याही तज्ञाचे शपथपत्र त्यांनी दाखल केले नाही किंवा लिटरेचर, अटी व शर्ती दाखल केले नाही, जे की त्यांना शक्य होते. हॅण्डसेट एका महिन्याच्या आत नादुरुस्त होणे आणि तो जाबदार क्र. 1 ते 3 यांच्याकडे दुरुस्तीसाठी देऊनही तो दुरुस्त होऊ शकत नाही म्हणजेच त्यामध्ये काहीतरी उत्पादकीय दोष आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून मंच असा आदेश करते की, जाबदार क्र.1 ते 3 यांना एकत्रितपणे व संयुक्तिकपणे हॅण्डसेटची रक्कम तक्रारदारास परत करावी कारण सन 2004 सालीचा त्याच मॉडेलचा हॅण्डसेट आता त्याच किंमतीत सन 2013 मध्ये मिळू शकत नाही. तसेच जाबदारांनी दिलेल्या त्रुटीयुक्त सेवेमुळे झालेला आर्थिक व मानसिक त्रास विचारात घेऊन, तक्रारदारांना हॅण्डसेटची रक्कम रु.5,690/- व नुकसानभरपाई खर्च देणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. म्हणून जाबदार यांनी तक्रारदारास नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.2,000/- व खर्चाची रक्कम रु. 3,000/- दयावी.
वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी एकत्रितपणे व
संयुक्तिकपणे तक्रारदारांना मोबाईल हॅण्डसेटची
रक्कम रु. 5,690/- ( रक्कम रु. पाच
हजार सहाशे नव्वद फक्त) या आदेशाची प्रत
मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावी.
3. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी एकत्रितपणे व
संयुक्तिकपणे नुकसानभरपाईपोटी तक्रारदारांना
रक्कम रु.2,000/- (रक्कम रु. दोन हजार फक्त)
व तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- (रु. तीन हजार
फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा
आठवड्यांच्या आंत द्यावी
4. निकालाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
याव्यात.