::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 22.12.2016 )
आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार
1. तक्रारदाराने सदरहु तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये, विरुध्दपक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी हा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्याकडून दि. 24/2/2015 रोजी सॅमसंग कंपनीचा मॉडल नं. जी 7102 मोबाईल रु. 15,200/- ला विकत घेतला. सदरहु मोबाईलचा आयएमए नं.353202/06/683842/1 व 353203/06/683842/9 असे आहेत. सदरहु मोबाईल खरेदी केल्याच्या पाच महिन्यानंतर, मोबाईलचा टच लाईट अचानक खराब झाला व काम करीत नव्हते. सदर मोबाईल वॉरंटी काळामध्ये असल्याने विरुध्दपक्ष क्र. 3 यांच्याकडे दि. 7/6/2015 रोजी मोबाईल दुरुस्ती करण्याकरिता दिला असता, विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी मोबाईल दुरुस्तीचा खर्च रु. 7000/- मागीतले. सदर मोबाईल वारंटी काळात असतांना सुध्दा विरुध्दपक्ष यांनी पैशांची मागणी केली, विरुध्दपक्ष क्र. 1 ने सदोष माबाईल तयार करुन बाजारात विकण्यासाठी आणला. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवा देण्यास न्युनता दर्शविली. तक्रारकर्त्याने दि. 10/7/2015 रोजी वकीलामार्फत विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांना नोटीस पाठवून मोबाईलची किंमत रु. 15,200/- परत मागीतली किंवा मोबाईल बदलून देण्याची मागणी केली, परंतु विरुध्दपक्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्षांकडून मोबाईची किंमत रु. 15,200/- परत मिळावी, तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 25,000/- व नोटीसचा खर्च रु. 1000/- तसेच तक्रारीचा खर्च रु. 5000/- देण्याचा आदेश व्हावा.
तक्रारकर्त्याने सदर तक्रारीसोबत एकूण 04 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष क्र.1 चा लेखी जबाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला असून तक्रारीतील आरोप नाकबुल केले आहेत. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी असे नमुद केले की, तक्रारकर्ता विरुध्दपक्षाचा ग्राहक, या सदरात बसत नाही. सदर मोबाईल मध्ये पाच महिन्या पर्यंत कुठलाही बिघाड नव्हता, त्यामुळे त्यात निर्मिती दोष नाही, विरुध्दपक्ष क्र. 3 कडे दि. 7/7/2015 ला सदर मोबाईल आणण्यात आला, त्यावेळी विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी पाहता क्षणी सांगीतले की, सदर मोबाईल हा पाण्याचे खराब झाला आहे व वॉरंटी कार्डच्या अटी व शर्ती प्रमाणे सदरहु मोबाईल वॉरंटी मध्ये बसत नाही. वारंटी कार्ड मध्ये स्पष्ट नमुद आहे की, सदर वॉरंटी कोणत्या परीस्थितीत व कशा प्रकारे दिली जाईल. सदर मोबाईलचा टच लाईट हा पाण्याचे खराब झाालेला आहे आणि म्हणून वॉरंटी कार्डच्या अटी शर्ती प्रमाणे सदर मोबाईल वॉरंटी मध्ये बसत नाही. वरील कारणास्तव सदर मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी पैसे मागीतले आहे. सदर वॉरंटी कार्ड प्रमाणे, गैरअर्जदार सेवा देण्यास तयार आहे. सदर मोबाईल मध्ये कसल्याही प्रकारचा उत्पादन दोष नाही. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी आहे व ती दंड आकारुन खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र.2 यांचा लेखी जबाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांना सदर प्रकरणाच्या नोटीसची बजावणी होऊन सुध्दा ते प्रकरणात हजर झाले नाही, त्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
विरुध्दपक्ष क्र.3 यांचा लेखी जबाब :-
विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी पुरसीस दाखल करुन विरुध्दपक्ष क्र. 1 द्वारे दाखल जबाबातील मजकुर त्यांचा जबाब समजण्यात यावा, असे कळविले आहे.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेखाद्वारे पुरावा दाखल केला, तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 चे वतीने लेखी पुरावा दाखल करण्यात आला, तक्रारकर्त्यातर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला
::: का र णे व नि ष्क र्ष :::
तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार व दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांचा लेखी जबाब, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर, विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखी पुरावा, तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचा तोंडी युक्तीवाद, या सर्वांचे अवलोकन करुन मंचाने निष्कर्ष काढला तो खालील प्रमाणे...
विरुध्दपक्ष क्र. 2 यांना मंचाची नोटीस मिळून सुध्दा ते उपस्थित राहीले नाही, त्यामुळे मंचाने विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द दि. 17/2/2016 ला एकतर्फी आदेश पारीत केला.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्याकडून दि. 24/2/2015 रोजी सॅमसंग कंपनीचा मॉडल नं. जी 7102 मोबाईल रु. 15,200/- ला विकत घेतला. सदर मोबाईलचे बिल प्रकरणात (दस्त क्र. 12) जोडले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे, हे सिध्द होते.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार सदरहु मोबाईल खरेदी केल्याच्या पाच महिन्यानंतर, मोबाईलचा टच लाईट अचानक खराब झाला व काम करीत नव्हता. सदर मोबाईल वॉरंटी काळामध्ये असल्याने विरुध्दपक्ष क्र. 3 यांच्याकडे दि. 7/6/2015 रोजी मोबाईल दुरुस्ती करण्याकरिता दिला असता, विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी मोबाईल दुरुस्तीचा खर्च रु. 7000/- मागीतले. सदर मोबाईल वारंटी काळात असतांना सुध्दा विरुध्दपक्ष यांनी पैशांची मागणी केली, ही सदोष सेवा विरुध्दपक्षाने दिली आहे.
यावर, विरुध्दपक्षाचे म्हणणे असे आहे की, सदर मोबाईल मध्ये पाच महिन्या पर्यंत कुठलाही बिघाड नव्हता, त्यामुळे त्यात निर्मिती दोष नाही, विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी पाहता क्षणी सांगीतले की, सदर मोबाईल हा पाण्याने खराब झाला आहे व वॉरंटी कार्डच्या अटी व शर्ती प्रमाणे सदरहु मोबाईल वॉरंटी मध्ये बसत नाही. वारंटी कार्ड मध्ये स्पष्ट नमुद आहे की, सदर वॉरंटी कोणत्या परिस्थीतीत व कशा प्रकारे दिली जाईल. वरील कारणास्तव सदर मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी पैसे मागीतले आहे. सदर वॉरंटी कार्ड प्रमाणे, गैरअर्जदार सेवा देण्यास तयार आहे.
यावर, मंचाचे असे मत आहे की, सदर मोबाईल पाच महीण्यांपर्यंत तक्रारकर्त्याने विना तक्रार वापरला होता, त्यामुळे यात निर्मिती दोष होता, हे सिध्द होत नाही, विरुध्दपक्षाच्या मते सदरचा मोबाईल पाण्याने खराब झाला आहे व हे त्यांचे म्हणणे सिध्द करण्यासाठी त्यांनी मंचासमोर वादातील मोबाईलचे छायाचित्र दाखल केले होते, परंतु त्यावर तक्रारकर्त्याने, सदर छायाचित्र त्याच्या मोबाईलचे नसल्याचा किंवा इतर कोणताही आक्षेप घेतलेला नाही. मात्र विरुध्दपक्षाने सदर फोटोवरुन पांढुरका झालेला मोबाईलचा भाग हा पाण्यामुळे खराब झाल्याचे दाखवून दिले, ही बाब तक्रारकर्त्याने नाकारलेली नाही, किंवा मोबाईल मध्ये निर्मिती दोष असल्याचे कोणत्याही तज्ञांच्या पुराव्यासह मंचासमोर सिध्द केले नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाने वॉरंटी कार्डच्या अटी व शर्ती प्रमाणे सदर मोबाईल दुरुस्त करण्यासाठी पैशांची मागणी केली आहे. विरुध्दपक्ष हा वॉरंटी कार्ड प्रमाणे सेवा देण्यास आजही तयार आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाने सेवेत कसल्याही प्रकारची त्रुटी व अनुचित व्यापार केलेला नाही, असे दिसून येते. त्यामुळे सदर तक्रार ही योग्य पुराव्या अभावी खारीज करण्यात येते, सबब अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे.
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते
- न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारीत नाहीत
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.