न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांनी दि. 20/12/2018 रोजी वि.प. कडून नवीन मोबाईल विकत घेतला होता. काही महिन्यांचे कालावधीत म्हणजेच वॉरंटी कालावधीमध्ये तक्रारदार यांचे नवीन मोबाईलचे चार्जिंग होणे पूर्णतः बंद झाले. त्यानंतर मोबाईल दुरुस्त करणेकरिता वि.प.क्र.2 यांचेकडे दिला असता वि.प. ने वॉटर डॅमेजचे खोटे कारण सांगून मोबाईल दुरुस्तीकरिता अवाजवी रक्कम रु. 8,479/- इतका खर्च सांगितला व सदरचा मोबाईल वॉरंटी कालावधीमध्ये असून देखील विनामोबदला दुरुस्त करुन देणे अगर मोबाईल बदलून देणेस नकार दिला. सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून झाले नुकसानीची भरपाई करणेकरिता सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
वि.प.क्र.1 ही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बनविणारी कंपनी असून मोबाईल, टीव्ही, फ्रिज इ. उपकरणे बनविणे व त्याची विक्री करणे हा त्यांचा उद्देश आहे. वि.प.क्र.2 हे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, व इतर इलेक्ट्रीकल उपकरणे विक्री करणारे अधिकृत डिलर/रिटेलर असून ग्राहकांना मोबाईल, फोन विक्री करणे हा त्यांचा उद्देश आहे. तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडून वि.प.क्र.1 कंपनीने उत्पादित केलेला मोबाईल विकत घेतलेला आहे. दि. 20/12/2018 रोजी यातील वि.प.क्र.2 यांचे दुकानातून वि.प.क्र.1 म्हणजेच सॅमसंग कंपनीचा सॅमसंग गॅलॅक्सी जे-8 ब्लॅक आय.एम.ई.आय.नं. 351753105117104 तपशीलाचा मोबाईल विकत घेतलेला होता व आहे. सदर मोबाईलला एक वर्षाची वॉरंटी देखील देण्यात आलेली होती व आहे. मोबाईल विकत घेतल्यानंतर साधारणतः 4 महिने व्यवस्थित सुरु राहिला. परंतु त्यानंतर दि.8/4/2019 रोजी म्हणजेच वॉरंटी कालावधीमध्ये सदर मोबाईल चार्ज होणे बंद झाले. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.10/4/2019 रोजी सदरचा मोबाईल वि.प.क्र.2 यांचेकडे दुरुस्तीकरिता दिला असता त्यांनी सदरचा मोबाईल पाण्यामुळे खराब झालेला आहे असे चुकीचे कारण दिले. त्याचे दुरुस्तीसाठी रक्कम रु.8,479/- इतका खर्च येणार असलेचे सांगितले. वि.प. यांनी तक्रारदार यांना मुळातच दोषयुक्त मोबाईल दिलेला होता व आहे व सदरचा मोबाईल वॉरंटी कालावधीमध्ये असूनही मोबाईलचे चार्जिंग बंद होणे व बंद झालेनंतर वि.प.क्र.2 यांचेकडे दिला असता मोबाईल पडल्यामुळे खराब झालेला आहे असे सांगून दुरुस्तीसाठी अवास्तव अशी रक्कम रु.8,479/- इतका खर्च येणार असलेचे वि.प.क्र.1 यांचे अधिकृत सर्व्हिस सेंटर श्री सर्व्हिसेस यांनी वि.प.क्र.2 यांचेमार्फत त्यांचे इस्टीमेटमध्ये नमूद करुन तक्रारदार यांना कळविले. सदरचे मोबाईलमुळे दैनंदिन कामात अनेक अडचणी तक्रारदार यांना येत होत्या. सबब, मोबाईल वॉरंटी कालावधीमध्ये असलेने तो बदलून देणे वि.प. यांचेवर बंधनकारक असूनही तसे न करता तक्रारदार यांना मोबाईल बदलून देणेस अगर विनामोबदला दुरुस्ती करुन देणेस नकार दिलेला होता व आहे. त्यामुळे तक्रारदार यांना आर्थिक, शारिरिकि व मानसिक त्रास झालेला आहे. वि.प. यांचे हे कृत्य पूर्णतः बेकायदेशीर व अयोग्य असे असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारे आहे. सबब, वि.प. यांचेकडून तक्रारदार यांना नवीन मोबाईल किंवा मोबाईलची रक्कम तसेच तक्रारदार यांना झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल होवून मिळणेकरिता सदरचा तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले. तक्रारदार यांनी मोबाईलची रक्कम रु.1,5,990/- तसेच आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.10,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मागितलेला आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत मोबाईलचे बिल व रिपेअर एस्टिमेट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प.क्र.1 व 2 याना आयोगाची नोटीस लागू होवून त्यांनी हजर होवून या आयोगासमोर आपले म्हणणे दाखल केले. वि.प.क्र.1 यांचे कथनानुसार, सदरचा तक्रारअर्ज हा बहुतांशी खोटा व वि.प. यांना मान्य व कबूल नाही. तक्रारदार यांनी दि. 20/12/2018 रोजी वि.प. क्र.2 यांचे दुकानातून वि.प. क्र.1 यांनी उत्पादित केलेला अर्जात नमूद मोबाईल रक्कम रु.1,5,990/- इतक्या किंमतीस विकत घेतला व त्यास एक वर्षाची वॉरंटीही देण्यात आली होती. मोबाईल हा पाण्यामुळे खराब झालेला होता वि.प.क्र.2 यांनी त्यांचे एस्टीमेटमध्ये दुरुस्तीची रक्कम रु.8,479/- नमूद केली आहे हा मजकूर खरा आहे. मोबाईलमधील चार्जिंग सर्कीट त्यात शिरलेल्या पाण्याच्या संपर्कामुळे जळून गेल्याचे आढळून आले. सदर हँडसेटमध्ये पाणी शिरल्याने त्यावर मीठाचा पांढरा थर आढळून आला. “श्री सर्व्हिसेस” यांचेकडून रक्कम रु. 8,479/- चे इस्टीमेट देण्यात आलेले होते. मात्र तक्रारदाराने सदरची रक्कम देणेस नकार दिलेला आहे. पाण्याच्या संपर्कामुळे मोबाईल हँडसेटचे नुकसान झालेने वॉरंटी कराराच्या अटी व शर्ती बाहेरील सदरची बाब आहे. वॉटर डॅमेज, वॅारंटीच्या अटी व शर्तीच्या परिशिष्टात बसत नाहीत. तसेच वॉरंटीच्या कालावधीत प्रॉडक्ट बदलून देणेची जबाबदारी उत्पादकाची नसते. प्रॉडक्टमध्ये उत्पादित दोष असेल तर व तो पुराव्यानिशी शाबीत झाला असेल तरच उत्पादक सदरील उत्पादनासाठी असणा-या दोषास जबाबदार असतो. वादग्रस्त मोबाईलमध्ये कोणत्याही प्रकारचा उत्पादित दोष नाही. तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 यांना विनाकारण तक्रारअर्जात सामील करुन घेतलेले आहे. सबब, सदरचा अर्ज ग्राहक कायद्यानुसार दंडनीय असून तक्रारदार यांचेवर दंडनीय कारवाई करणेत यावी असे वि.प.क्र.1 चे म्हणणे आहे व यासंदर्भात वि.प.क्र.1 यांनी शपथपत्रही दाखल केलेले आहे.
5. वि.प.क्र.2 यांचे कथनानुसार, वि.प.क्र.2 ही इनफीनीटी रिटेल लि. ही कंपनी अॅक्ट 1956 च्या तरतुदीअंतर्गत कंपनी आहे आणि ग्राहकांच्या टिकाऊ वस्तू आणि इलेक्ट्रॅनिक्स वस्तू यांच्या किरकोळ विक्रीचा क्रोमा या ब्रँडखाली व्यवसाय करते. वि.प. क्र.2 विरुध्द दाखल केलेली संपूर्ण तक्रार खोटी चुकीची व निराधार आहे. वि.प.क्र.2 कोणत्याही उत्पादन दोषाशी संबंधीत नाही. सबब, त्यांचेविरुध्द तक्रार रद्द होणेस पात्र आहे. वि.प. क्र.2 ही एक प्रतिष्ठित कंपनी असून जी रिटेल क्षेत्रातील सुप्रसिध्द ब्रॅंड नावाची टाटा सन्सची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. 2005 मध्ये स्थापना झाल्यापासून त्याच्या क्षेत्रातील तारांकीत नोंद आहे. ग्राहकांच्या गरजा आणि बजेटची पूर्तता करणेसाठी उत्तम उत्पादने निवडण्यासाठी त्यांची प्रत्येक आवश्यकता पूर्ण करण्याचा वि.प.क्र.2 नेहमी प्रयत्न करीत असते. कार्यक्षम प्रशिक्षित आणि जाणता स्टोअर सल्लागार नियुक्ती करणेचे काम वि.प.क्र.2 करीत असते. संभाव्य ग्राहकांशी उत्पादकांना जोडण्यासाठी फक्त मध्यस्थ/व्यासपीठ असे वि.प.क्र.2 यांस म्हणता येईल. वि.प.क्र.2 चे ऑपरेशन्सचे प्रोफाईल अरुंद दिसत असले तरी त्यामध्ये अतिरिक्त सेवांचा समावेश आहे व ज्या ग्राहकांना पुरविल्या जातील अशा सेवा आहेत. एखादी वस्तू एकत्रित करणे तसेच पॅकेजिंगच्या कार्यासह मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधीत कामामध्ये वि.प.क्र.2 सामील नाही. जेव्हा डिलरद्वारे पुरविल्या जाणा-या चांगल्या वस्तूंबद्दल उत्पादन दोष होता. परंतु दुस-या पक्षाने म्हणजेच उत्पादकाने सदोष वस्तूंचे उत्पादन, डिलर नसतानाही उत्पादनात निष्काळजीपणे व नुकसान झालेल्या तक्रारींचे चांगले नुकसान होवू शकते. जर त्यांनी उत्पादीत दोष असेल तर त्यांचा पाठपुरावा शक्य तितक्या लवकरात लवकर निराकरण करण्याचा प्रयत्न वि.प.क्र.2 करीत असतात. त्यांची भूमिका विक्रीपुरतीच मर्यादित आहे. विक्रीनंतर व सर्व विक्री सेवांनतर कोणतीही जबाबदारी वि.प.क्र.2 यांची येत नाही. तकारदार यांचे बाबतीत वि.प.क्र.1 यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करुन त्वरित तोडगा काढण्यासाठी आवाहन केले आहे. वि.प.क्र.1 च्या सेवा केंद्रानुसार या प्रॉडक्टमध्ये पाण्याने नुकसान झाले आहे. तक्रारदाराने पैसे भरल्यास त्याची दुरुस्ती करता येईल असे नुकसान वि.प. क्र.1 च्या वॉरंटी पॉलिसीमध्ये समाविष्ट केलेले नाही. विक्रीच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या कालावधीसाठी वि.प.क्र.1 ची म्हणजेच उत्पादकांची सदरची जबाबदारी आहे. वॉरंटीची मुदत संपल्यानंतरही वि.प.क्र.2 कोणत्याही प्रकारास जबाबदार असू शकत नाहीत. सबब, जॉबशीटमध्ये नमूद केल्यानुसार पेमेंटची तरतूद तक्रारदार यांना करावी लागेल. सदरचा दोष हा मॅन्युफॅक्चरिंग दोष नव्हता तर द्रव नुकसान होते. यामध्ये ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की, सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये तक्रारदाराकडून कोणतीही तक्रार नोंदविली गेली नाही. तक्रारदाराने स्वतः चार महिन्यांच्या कालावधीनंतर सदोषपणाचा अहवाल दिलेला आहे. वि.प.क्र.2 ची भूमिका ही केवळ त्याच्या आऊटलेटमध्ये उपलब्ध असलेली उत्पादने ग्राहक आणि क्लायंटला वि.प.क्र.2 ने विक्री केलेली आहेत आणि तक्रारदाराने चुकीच्या पध्दतीने त्यांना जबाबदार धरलेले आहे. वि.प.क्र.2 हा किरकोळ विक्रेता आहे, उत्पादक नाही. सबब, वि.प. क्र.2 च्या विरोधात केलेला अर्ज हा खर्चासह फेटाळणेत यावा असे वि.प.क्र.2 यांचे कथन आहे.
6. वि.प. यांनी या संदर्भात शपथपत्र दाखल केले आहे.
7. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. वि.प. क्र.1 व 2 यांनी |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
8. तक्रारदार यांनी वि.प. क्र.2 यांचे दुकानातून दि. 20/12/2018 रोजी सॅमसंग कंपनीचा सॅमसंग गॅलॅक्सी जे-8 ब्लॅक आय.एम.ई.आय.नं. 351753105117104 मोबाईल विकत घेतलेला होता व आहे. वि.प.क्र.1 ही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बनविणारी कंपनी असून सदरचा मोबाईल हा वि.प. क्र.1 यांनी उत्पादित केलेला मोबाईल आहे. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे. याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
9. अर्जात नमूद मोबाइल दि. 20/12/18 रोजी वि.प. क्र.2 यांचे कडून तक्रारदार यांनी विकत घेतलेला आहे. मात्र वॉरंटी कालावधीमध्ये अचानक दि. 8/42019 पासून सदरचे मोबाईलचे चार्जिंग होणे बंद झालेले आहे. मात्र वि.प.क्र.2 यांचेकडे दुरुस्तीसाठी सदरचा मोबाईल दिला असता तो पाण्यामुळे खराब झाले असलेचे कारण वि.प.क्र.2 यांनी सांगितले आहे व तशी कागदपत्रे वि.प. यांनी दि. 2/3/2021 चे कागदयादीने दाखल केलेली आहेत. यामध्ये Acknowledgement of Service Repairs ची पावती वि.प. यांनी दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी अ.क्र.2 वर एस्टिमेट फॉर रिपेअरचे, रिपेअरी इस्टीमेट दाखल केले आहे. सदरचे इस्टीमेट रक्कम रु. 8,479/- इतक्या रकमेचे दिसून येते. जरी सदरचा मोबाईल हा वॉटर डॅमेज झालेला आहे व त्यासाठी सदरची दुरुस्ती करीत असलेचे कथन वि.प. यांनी केले असले तरी नक्की पाण्यामुळेच सदरचा मोबाईल खराब झाला आहे असे दाखविणारा कोणताही पुरावा या आयेागासमोर वि.प. यांनी दाखल केलेला नाही. मात्र तक्रारदार यांनी यासंदर्भातील वि.प. यांचेकडे खरेदी केलेली क्रोमाची रक्कम रु.15,990/- ची पावती दाखल केलेली आहे. तसेच तक्रारदार यांनी स्वतःचे सरतपासाचे अॅफिडेव्हीटवर सदरची बाब कथन केली आहे याचाही विचार हे आयोग करीत आहे. तक्रारदार यांचे वॉरंटीचे कालावधीमध्येच सदरचा मोबाईल चार्जिंग होणे अचानकपणे बंद झालेची बाब ही वि.प. यांनी नाकारलेली नाही. सबब, वॉरंटी पिरेडमध्ये सदरचा मोबाईल बंद पडलेने त्याचे दुरुस्तीची अगर मोबाईल हँडसेट बदलून देणेची सर्वस्वी जबाबदारी ही वि.प. यांचेवरच आहे असे या आयोगाचे स्पष्ट कथन आहे. वॉरंटी पिरेडमध्ये वॉटर डॅमेज असलेने सदरचा हँडसेट व सदरचे वॉटर डॅमेजची दुरूस्ती ही वॉरंटी पिरेडमध्ये समाविष्ट नसलेने ती दुरुस्ती करणेसाठी तक्रारदार यांना रक्कम रु. 8,479/- इतकी रक्कम द्यावी लागेल असे वि.प. यांचे कथन आहे. मात्र यासंदर्भातील कोणतीही मार्गदर्शक तत्वे वि.प. यांनी या आयोगासमोर आणलेली नाहीत. मात्र मोबाईलचे चार्जिंग होत नसलेची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. सबब, याकरिता येणा-या खर्चाची सर्वस्वी जबाबदारी ही उत्पादक म्हणजेच वि.प.क्र.1 तसेच वि.प.क्र.2 यांचेवरच राहिल या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे व तक्रारदार यांनी मागितलेल्या मागण्या अंशतः मंजूर करणेवर हे हे आयोग ठाम आहे. सबब, सदरचा अर्जात नमूद वर्णनाचा मोबाईल वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या दुरुस्त करुन देणेचे आदेश करणेत येतात. सदरचे खर्चाची सर्वस्वी जबाबदारी वि.प.क्र.1 व 2 यांचीच राहील अथवा ते शक्य नसलेस सदरचा नवीन मोबाईल देणे किंवा तेही शक्य नसलेस मोबाईलची किंमत रक्कम रु.15,990/- ही वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या देण्याचे आदेश वि.प. यांना करण्यात येतात.
10. तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारअर्जाचे खर्चापोटी मागितलेली रक्कम रु.20,000/- व अर्जाचे खर्चापोटी मागितलेली रक्कम रु.10,000/- ही या आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प. क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना वादातील सॅमसंग गॅलॅक्सी जे-8 ब्लॅक आय.एम.ई.आय.नं. 351753105117104 मोबाईल कोणतेही शुल्क न आकारता दुरुस्त करुन देण्याचे आदेश करणेत येतात.
अथवा
वि.प. क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना वादातील सॅमसंग गॅलॅक्सी जे-8 ब्लॅक आय.एम.ई.आय.नं. 351753105117104 मोबाईल बदलून नवीन त्याच मॉडेलचा मोबाईल द्यावा.
अथवा
वि.प. क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना वादातील सॅमसंग गॅलॅक्सी जे-8 ब्लॅक आय.एम.ई.आय.नं. 351753105117104 ची खरेदी किंमत रक्कम रु. 15,990/- अदा करावी.
3. वि.प. क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.