तक्रारदार : वकीलाचे कारकुनामार्फत हजर.
सामनेवाले क्र.1 : वकील श्री.व्ही.के.शर्मा मार्फत हजर.
सामनेवाले क्र.2 : प्रतिनिधी श्री.कमलेश भारवानी मार्फत
हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तुचे उत्पादक आहेत. तर सा.वाले क्र.2 त्या वस्तुचे वितरक आहेत. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेली वॉशिंग मशिन सा.वाले क्र.2 यांचे कडून दिनांक 15.10.2003 रोजी रु.12,000/- ला खरेदी केली. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे खरेदी केल्यापासून सहा महिन्यातच वॉशिंग मशिनमला गंज चढला. व तक्रारदारांच्या तक्रारीवरुन सा.वाले यांनी त्या वॉशिंग मशिनला पुन्हा रंग दिला व ती तक्रारदारांना परत दिली. तक्रारदारांचे असे कथन आहे की, पुन्हा चार महिन्यामध्ये वॉशिंग मशिनला गंज चढला व सा.वाले यांनी ती वॉशिंग मशिन परत घेतली व आवश्यक ती दुरुस्ती करुन तक्रारदारांना वॉशिंग मशिन परत केली. तक्रारदारांचे असे कथन आहे की, नोव्हेंबर,2006 मध्ये वॉशिंग मशिनला छिद्र पडले व गंज चढला. तक्रारदारांनी त्या बद्दल दिनांक 9.1.2009 रोजी सा.वाले यांचेकडे तक्रार केली व वॉशिंग मशिन बदलून देण्याची मागणी केली. सा.वाले यांनी तक्रारदारांची मागणी मान्य केलेली नसल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार सा.वाले यांचे विरुध्द दाखल केली. व सा.वाले यांनी तक्रारदारांना वॉशिंग मशिनची किंमत व्याजासह परत करावी अशी मागणी केली.
2. सा.वाले क्र.1 यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांचे विनंतीवरुन एकदा नव्हेतर दोनदा वॉशिंग मशिनची दुरुस्ती करुन तक्रारदारांना देण्यात आली. सा.वाले यांचे असे कथन आहे की, तक्रारदारांनी आपली वॉशिंग मशिन आपल्या सदनिकेच्या आतल्या स्नानगृहात ठेवली आहे व त्या स्नानगृहात ओल असल्याने वॉशिंग मशिनला सतत जंग चढते. ही बाब तक्रारदारांना सूचविण्यात आल्यानंतर देखील तक्रारदारांनी वॉशिंग मशिनची जागा बदलली नाही. व तक्रारदार आपली वॉशिंग मशिन स्नानगृहात ठेऊनच त्याचा वापर करत आहेत. या प्रकारे वॉशिंग मशिनमध्ये मुलभूत दोष नसल्याने व वापराचे संदर्भात तक्रारदारांची चूक असल्याने सा.वाले यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली नाही असे कथन सा.वाले यांनी केले.
3. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र, व कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत. त्यानंतर सा.वाले क्र.1 यांचे कैफीयतीस तक्रारदारांनी आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. सा.वाले क्र.1 यांनी त्यांचे व्यवस्थापक श्री.अनंत श्रीधर चव्हाण याचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदार व सा.वाले क्र.1 यांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. सा.वाले क्र.2 यांनी आपली कैफीयतीचे शपथपत्र दाखल केलेले आहे. व तेच पुराव्याचे शपथपत्र समजण्यात यावे असे निवेदन केले.
4. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी वॉशिंग मशिनचे संदर्भात तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2. | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून वॉशिंग मशिनची किंमत वसुल करण्यास पात्र आहेत का ? | नाही. |
3. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
5. तक्रारदारांनी तक्रारीसोबत वॉशिंग मशिनचे खरेदीची पावती हजर केलेली आहे. त्यावरुन तक्रारदारांनी सा.वाले 1 यांनी उत्पादित केलेली वॉशिंग मशिन सा.वाले क्र.2 यांचेकडून खरेदी केल्याचे दिसून येते.
6. तक्रारदारांनी तक्रारीत असे कथन केलेले आहे की, वॉशिंग मशिन खरेदी केल्यानंतर वॉशिंग मशिन 6 महिन्याचे आत म्हणजे दिनांक 15.4.2004 रोजी वॉशिंग मशिनला जंग चढला. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये ही बाब मान्य केलेली आहे की, त्यांचे तक्रारीवरुन सा.वाले यांनी वॉशिंग मशिन परत नेली व रंग देऊन तक्रारदारांना परत केली. सा.वाले यांनी देखील आपल्या कैफीयतीचे परिच्छेद क्र.9 मध्ये ही बाब मान्य केलेली आहे व तक्रारदारांनी पहिल्या तक्रारीच्या संदर्भात वॉशिंग मशिनला रंग देऊन वॉशिंग मशिन परत करण्यात आलेली होती असे कथन केले आहे.
7. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीचे परिच्छेद क्र.9 चे शेवटचे भागात असे कथन केलेले आहे की, सा.वले यांच्या प्रतिनिधीने तक्रारदारांना असे सूचविले होते की, तक्रारदारांनी ती वॉशिंग मशिन स्नानगृहात ठेऊ नये व तेथे ओल असल्याने जंग चढण्याची शक्यता असते. परंतु तक्रारदारांनी सा.वाले यांचे प्रतिनिधीला असे उत्तर दिले की, त्यांचेकडे पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने तक्रारदारांना वॉशिंग मशिन तेथेच ठेवावी लागेल. त्यानंतर तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, दुस-यांदा म्हणजे दिनांक 22.1.2006 रोजी वॉशिंग मशिनला गंज दिसून आला व तक्रारदारांचे तक्रारीवरुन सा.वाले यांनी वॉशिंग मशिन दिनांक 24.1.2006 रोजी दुरुस्तीकामी परत नेली. व तक्रारदारांना हंगामी स्वरुपात वापरणेकामी एक वॉशिंग मशिन दिली. त्यानंतर 17 दिवसांनी सा.वाले यांनी तक्रारदारांना जुनी वॉशिंग मशिन परत केली. व तक्रारदारांना असे सांगीतले की, वॉशिंग मशिनचा सांगाडा हा बदलण्यात आलेला असून त्यामध्ये दोष उत्पन्न होणार नाही. या संदर्भात सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीचे परिच्छेद क्र.10 मध्ये स्पष्ट केले आहे की, तक्रारदारांच्या वॉशिंग मशिनच्या संदर्भातील हमी कालावधी ( Warranty period ) दिनांक 14.10.2005 रोजी संपलेला होता तरी देखील दिनांक 22.1.2006 रोजी हमी कालावधी संपल्यानंतर देखील सा.वाले यांनी केवळ ग्राहकाचे समाधान व त्यांची प्रतिष्टा जपण्याचे हेतुने तक्रारदारांकडून वॉशिंग मशिन ताब्यात घेतली व वॉशिंग मशिनचा सांगाडा बदलून ती वॉशिंग मशिन तक्रारदारांना परत करण्यात आली. सा.वाले यांनी कैफीयतीचे पृष्ट क्र.10 मध्ये असे कथन केले आहे की, वॉशिंग मशिन परत करत असतांना सा.वाले क्र.1 यांचे प्रतिनिधींनी अशी सूचना केली होती की, तक्रारदारांनी वॉशिंग मशिन स्नानगृहात ठेवू नये.
8. तक्रारदारांनी त्यानंतर असे कथन केले आहे की, वर्ष 2009 मध्ये वॉशिंग मशिनला छिद्र दिसून आले. व तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे त्या बद्दल तक्रार केली. परंतु सा.वाले यांनी दुरुस्तीचेकामी रु.2,900/- ची मागणी केली. ती मागणी तक्रारदारांनी फेटाळली. सा.वाले यांची कैफीयत असे दर्शविते की, 2009 पूर्वी म्हणजे दिनांक 10.1.2008 रोजी तक्रारदारांनी वॉशिंग मशिनचे संदर्भात तक्रार केलेली होती व सा.वाले यांचे प्रतिनिधीनी तक्रारदारांना असे सूचविले होते की, तक्रारदारांनी वॉशिंग मशिन स्नानगृहात ठेवणे बंद करावे व वॉशिंग मशिन कोरडया जागेत ठेवावी. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीचे परिच्छेद क्र.15 मध्ये असा स्पष्ट आरोप केलेला आहे की, तक्रारदार हे वॉशिंग मशिन स्नानगृहात ठेवत असल्याने त्यास जंग चढला. तक्रारदारांनी आपल्या प्रति उत्तराचे शपथपत्रात ही बाब नाकारली व असे कथन केले की, तक्रारदारांकडे दोन प्रसाधनगृहे असून एका प्रसाधनगृहामध्ये वॉशिंग मशिन ठेवण्यात आलेली आहे. परंतु त्या प्रसाधनगृहाचा वापर ते स्नान वगैरे करण्याकरीता करीत नाहीत.
9. तक्रारदारांच्या प्रति उत्तराच्या शपथपत्रातील वरील स्वरुपाचा खुलासा पटण्यासारखा नाही. कारण मुंबई सारख्या शहरात स्नानगृहाचा वापर स्नान वगैरे करण्याचे ऐवजी केवळ वॉशिंग मशिन ठेवणेकामी केला जाईल हे शक्य दिसून येत नाही. त्यातही तक्रारदारांच्या वॉशिंग मशिनचा सांगाडा सा.वाले यांनी एकदा पूर्ण रंग देवून दुरुस्त केला होता व दुसरे वेळी तो बदलून दिला होता. तरी देखील तक्रारदार अशी तक्रार करतात की, वॉशिंग मशिनला छिद्र पडल्याने या प्रकारे वॉशिंग मशिनचे संदर्भात वारंवार दुरुस्ती करण्याची परिस्थिती निर्माण होत होती. ही बाब असे दर्शविते की, तक्रारदारांच्या वॉशिंग मशिनच्या वापरामध्ये अथवा त्या ठेवण्याचे जागेमध्ये निच्छितच दोष होता. व त्यामुळे वॉशिंग मशिनमध्ये वारंवार दोष निर्माण झाले. सा.वाले यांनी तक्रारदारांना हमी कालावधी संपल्यानंतर दुरुस्तीकामी खर्चाची रक्कम मागीतली असेल तर त्यामध्ये सा.वाले यांचा काही दोष आहे असा निष्कर्ष काढता येत नाही.
10. वरील परिस्थितीत व उपलब्ध पुराव्यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढता येत नाही.
11. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 163/2009 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.