( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा, श्रीमती रोहिणी दि. कुंडले)
-- आदेश --
( पारित दि. 22 ऑगस्ट, 2012)
1. तक्रारः- तक्रारकर्त्याने कॉम्प्युटरसाठी मॉनिटर खरेदी केला. तो वॉरन्टीच्या काळात बिघडला. त्याची दुरूस्ती अथवा नवीन मॉनिटर मिळण्यासाठी तक्रार दाखल आहे.
2. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः-
3. तक्रारकर्त्याने दिनांक 02/06/2010 रोजी गोंदीया येथील स्थानिक विक्रेते विरूध्द पक्ष-3 ‘कॉप्युटर वर्कशॉप’ यांच्या दुकानातून TFT मॉनिटर – वर्णन- 18.5 इंच, अनुक्रमांक 00133 PGZ224306 रू. 6,200/- मध्ये खरेदी केला. या मॉनिटरवर 3 वर्षाची वॉरन्टी होती. मे-2011 मध्ये दृष्य नीट दिसत नाही म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक 30/05/2011 रोजी विरूध्द पक्ष 1 (दिल्ली येथील कार्यालय) कडे 8432664617 या नंबरवरून तक्रार केली. यावर विरूध्द पक्ष 2 – नागपूर येथील सर्व्हीस सेंटरने दिनांक 11/06/2011 रोजी पत्र पाठवून मॉनिटरला मार/धक्का लागल्याने तो खराब झाला. त्यावर ओरखडे दिसतात. ही बाब वॉरन्टीमध्ये समाविष्ट नसल्याने दुरूस्ती खर्च रू. 4,709/- तक्रारकर्त्याला द्यावा लागेल असे नमूद केले.
4. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, मॉनिटर प्रत्यक्ष न पाहता/तपासता विरूध्द पक्ष 2 ने दिनांक 11/06/2011 रोजीचे उपरोक्त पत्र पाठविले आहे.
5. प्रत्यक्षात विरूध्द पक्ष 2 यांनी मॉनिटर दिनांक 29/07/2011 रोजी पाहिला/तपासला. त्यावेळी दिलेल्या पावतीमध्ये त्यांनी मॉनिटर खराब असल्याचे नमूद केले नाही.
6. तक्रारीस कारण प्रथम दिनांक 02/06/2010 रोजी जेव्हा मॉनिटर खरेदी केला व त्यानंतर दिनांक 11/06/2011 रोजी वॉरन्टी नाकारली तेव्हा घडले. तीनही विरूध्द पक्षांच्या सेवेत त्रुटी आहे, त्यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे म्हणून वादग्रस्त मॉनिटर मोफत दुरूस्त करून अथवा नवा देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती तक्रारकर्ता करतो.
7. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत 4 दस्त जोडले आहेत. ज्यामध्ये 1) खरेदीची रसीद, 2) वॉरन्टी कार्ड, 3) विरूध्द पक्ष 2 चे दिनांक 11/06/2011 चे पत्र व 4) दिनांक 29/07/2011 ची वर्क ऑर्डर.
8. विरूध्द पक्ष 1 यांना पाठविलेली नोटीस “left” या पोस्टाच्या शे-यासह परत आली. पण नेटवरील माहितीवरून ऍड. सावजी हे दिनांक 16 मे, 2012 रोजी हजर झाले व ती नोटीस त्यांनी स्विकारली आणि दिनांक 28/05/2012 रोजी उत्तर दाखल केले.
9. त्यांच्या उत्तरानुसार मॉनिटर खरेदीचा व्यवहार तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष 3 (गोंदीया येथील स्थानिक विक्रेते) यांच्यामध्ये झाला. हा मॉनिटर विरूध्द पक्ष 1 चे उत्पादन आहे. विरूध्द पक्ष 1 ही नामांकित कंपनी असून तिची उत्पादने दर्जेदार असतात. वॉरन्टीनुसार ग्राहकांना सेवा देण्यास ती नेहमीच तत्पर असते.
10. तक्रारकर्त्याने दिनांक 02/06/2012 रोजी त्यांच्या कंपनीचा मॉनिटर खरेदी केला. तो 11 महिने व्यवस्थित चालला. तो बिघडल्याचे तक्रार (दृष्य न दिसणे) मे-2011 मध्ये उद्भवली. याबद्दलची तक्रार तक्रारकर्त्याने दिनांक 30/05/2011 रोजी केली. त्यावरून इंजिनिअर श्री. पिंटु लांजेवार यांना विरूध्द पक्ष 1 तर्फे त्वरित तक्रारकर्त्याच्या ठिकाणी दिनांक 01/06/2011 रोजी पाठविले. त्यांनी मॉनिटर तपासला व त्याच्या पॅनेलला क्षति पोहोचल्याचे तक्रारकर्त्याला सांगितले. तक्रारकर्त्याने दिनांक 01/06/2011 रोजीच्या कस्टमर रेकॉर्ड कार्डवर सही करण्यास नकार दिला.
11. तक्रारकर्त्याला असेही सूचित केले की, पॅनेल/मॉनिटरला क्षति होणे ही बाब वॉरन्टीमध्ये समाविष्ट नाही. म्हणून त्याच्या दुरूस्तीसाठीचा खर्च तक्रारकत्या्रला वहन करावा लागेल.
12. विद्यमान कोर्टासमोर उपरोक्त मॉनिटर तक्रारकर्त्याने हजर केल्यास विरूध्द पक्ष 1 चे इंजिनिअर मॉनिटरला बाहेरून मार लागल्याने ओरखडे पडल्याचे प्रत्यक्षपणे दाखवू शकतील.
13. विरूध्द पक्ष 1 तक्रारकर्त्याचे हे म्हणणे अमान्य करतात की, त्यांनी प्रत्यक्ष मॉनिटर न तपासताच दिनांक 11/06/2011 रोजी क्षति पोहोचविल्याबद्दल पत्र दिले.
14. तक्रारकर्त्याला विरूध्द पक्ष 1 ने त्वरित त्याच्या घरी जाऊन सेवा प्रदान केली आहे. विरूध्द पक्ष 1 च्या सेवेत त्रुटी नाही. त्यांनी कोणत्याही अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला नाही.
15. विरूध्द पक्ष 2 हे विरूध्द पक्ष 1 चे अधिकृत सेवा केंद्र होते, पण ते ऑक्टोबर 2011 पासून बंद झाले आहे. त्यामुळे डाटा उपलब्ध होऊ शकला नाही. तक्रारकर्त्याने व्यापारी तत्वावरील उपयोगासाठी मॉनिटर खरेदी केलेंडर म्हणून तक्रारकर्ता ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)(डी) अंतर्गत ‘’ग्राहक’’ ठरत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासहित खारीज करण्याची विनंती विरूध्द पक्ष 1 करतात.
16. विरूध्द पक्ष 1 चा लेखी युक्तिवाद रेकॉर्डवर आहे (उत्तराप्रमाणे).
17. विरूध्द पक्ष 2 यांना मंचाने रजिस्टर्ड पोस्टाने दिनांक 19/04/2012 रोजी नोटीस पाठविली. त्याची पोच प्राप्त नाही. विरूध्द पक्ष 2 हजर झाले नाहीत अथवा त्यांनी उत्तर सुध्दा दाखल केले नाही. त्यामुळे मंचाने “deemed service” म्हणून विरूध्द पक्ष 2 यांच्याविरूध्द दिनांक 17 जुलै, 2012 रोजी ‘’एकतर्फी’’ आदेश पारित केला.
18. विरूध्द पक्ष 3 चे अर्ध्या पानाचे उत्तर रेकॉर्ड पेज 28 वर आहे. त्यानुसार विरूध्द पक्ष 3 ने तक्रारकर्त्याला विरूध्द पक्ष 1 कंपनी दिल्ली व विरूध्द पक्ष 2 सर्व्हीस सेंटर, नागपूर यांनी जे मतप्रदर्शन केले ते स्विकारण्याचे आवाहन केले. या व्यतिरिक्त त्यांच्या उत्तरात काहीही नमूद नाही.
19. दिनांक 17/07/2012 रोजी तक्रारकर्त्याचे वकील व विरूध्द पक्ष 1 चे वकील यांच्या युक्तिवादाला सुरूवात झाल्यानंतर सर्वानुमते वादग्रस्त मॉनिटर मंचासमोर हजर करण्याचे आवश्यक वाटल्यावरून मंचाने तसे आदेश तक्रारकर्त्याला दिले.
20. दिनांक 16/08/2012 रोजी तक्रारकर्त्याने वादग्रस्त मॉनिटर मंचासमोर सादर केला. त्यावेळी विरूध्द पक्ष 1 चे वकील व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी मंचातील कॉम्प्युटरला मॉनिटर लावला असता त्यावरील ¾ भागातील चित्र/दृष्य अजिबात दिसत नसल्याचे निष्पन्न झाले.
21. मंचाने पुन्हा तक्रारकर्त्याचा व विरूध्द पक्ष 1 चा (वकिलांचा) युक्तिवाद ऐकला. त्यावरून मंचाची निरीक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
- निरीक्षणे व निष्कर्ष -
22. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, मॉनिटरची वॉरन्टी 3 वर्षाची आहे. 3 वर्षेपर्यंत दोष उत्पन्न झाल्यास तो मोफत दुरूस्त करून द्यावा अथवा बदल्यात नवा मॉनिटर द्यावा. तक्रारकर्त्याचा मॉनिटर खरेदीपासून केवळ 11 महिन्यातच नादुरूस्त झाला.
23. विरूध्द पक्ष 1 चे म्हणणे आहे की, मॉनिटरला बाहेरून क्षति पोहोचल्याने आतील प्रणाली बिघडली म्हणून दृष्य दिसत नाही. मॉनिटरवर एखादी वस्तू पडली/आदळली असावी (उदा. चेंडू) अथवा जोरदार धक्का लागला असावा. त्यामुळे आतील द्रव्य (fluid) मॉनिटरवर पसरले असावे.
24. मंचाला विरूध्द पक्ष 1 यांच्या उपरोक्त युक्तिवादात तथ्य वाटत नाही. जर मॉनिटरवर एखादी वस्तू आदळली असती किंवा त्याला जोरदार धक्का लागला असता तर प्लॅस्टिकच्या कडक आवरणाला बाहेरूनही तडा गेला असता. तसे मॉनिटरवर तडे आढळले नाही. त्यामुळे मॉनिटरला बाहेरून क्षति पोहोचली हे सिध्द न केल्याने विरूध्द पक्ष 1 चे विधान मंच ग्राह्य मानत नाही.
25. वादग्रस्त मॉनिटरवर 3 वर्षाची वॉरन्टी आहे. तक्रारकर्त्याचा मॉनिटर वॉरन्टी काळातच बिघडला. म्हणून विरूध्द पक्ष 1 तो बदलून देण्यास बाध्य ठरतात असा मंचाचा निष्कर्ष आहे.
26. मॉनिटरची किंमत रू. 6,200/- अगदी नगण्य आहे. विरूध्द पक्ष 1 ने त्यांच्या कंपनीमार्फत निर्मित दोषपूर्ण मॉनिटर परत घेऊन तक्रारकर्त्याला नवीन मॉनिटर नवीन वॉरन्टीसह देण्याचे आदेश हे मंच देते.
27. विरूध्द पक्ष 1 चा प्राथमिक आक्षेप – मॉनिटरचा उपयोग व्यापारी तत्वावर होत होता म्हणून तक्रारकर्ता ग्राहक ठरत नाही – सिध्द न केल्याने मंच फेटाळते.
सबब आदेश
-// अंतिम आदेश //-
तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
1. विरूध्द पक्ष 1 ने तक्रारकर्त्याला त्याच प्रकारचा दोषरहित नवा मॉनिटर नवीन वॉरन्टीसह द्यावा.
2. विरूध्द पक्ष 2 चे कार्यालय सर्व्हीस सेंटर अस्तित्वात नसल्याने नवीन मॉनिटर देण्याची जबाबदारी विरूध्द पक्ष 1- दिल्ली येथील कंपनीची आहे.
3. विरूध्द पक्ष 3 याचा वादाशी प्रत्यक्षपणे संबंध नाही म्हणून त्यांना या तक्रारीतून वगळण्यात येते.
4. विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 2,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्याला तक्रारीचा खर्च म्हणून रू. 2,000/- द्यावे.
6. विरूध्द पक्ष 1 यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे.