निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदाराने सामनेवाले क्र.1 यांनी तयार केलेला फ्रिज मॉडेल क्र.आर.टी.26 ए.व्ही.एम.एस.1 हा दि.14.02.2004 रोजी सामनेवाले क्र.2 या वितरकाकडून एक्सचेंज ऑफरखाली रु.12,563/- ला विकत घेतला. फ्रिजच्या टेक्नीकल पार्टची हमी एक वर्षाची व कॉम्प्रेसरची हमी पाच वर्षाची होती. ऑगस्ट, 2005 मध्ये शेवटच्या आठवडयात फ्रिज बंद पडले, म्हणून तक्रारदाराने सामनेवाले क्र.2 यांना त्याबद्दल कळविले. त्यावरुन सामनेवाले क्र.1 यांचे टेक्निशियन तक्रारदार हिचे घरी गेला. त्यांनी फ्रिज पाहून सांगितले की, विजप्रवाहाच्या चढ-उतारामुळे कॉम्प्रेसर खराब झाले आहे. ते बदलेले तरच फ्रिज सुरु होईल. त्याचा खर्च रु.1,350/- तक्रारदाराला सहन करावा लागेल. परंतु नविन कॉम्प्रेसर बसविल्यानंतरही फ्रिज चालत नव्हता. म्हणून सामनेवाले क्र.1 च्या इंजिनिअरच्या सांगण्यावरुन त्या फ्रिजमधील दोष दुर करण्यासाठी ते फ्रिज सामनेवाले क्र.1 च्या कारखान्यात दि.30.08.2005 रोजी नेण्यात आले. 2 तक्रारदार हिचे म्हणणे की, चालू स्थितीत फ्रिजची डिलेव्हरी एक महिन्यात अथवा त्या अगोदर देऊ असे सामनेवाले क्र.1 कडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र सामनेवाले क्र.1 यांनी फ्रिज परत केलेला नाही. तक्रारदार हिने सामनेवाले क्र.1 यांचेकडे बराच पाठपुरावा केला. पत्र पाठविले. स्मरणपत्रं पाठविले परंतु काही उपयोग झाला नाही ही सामनेवाले यांची सेवेत न्युनता व अनुचित व्यापारी प्रथा आहे असे तक्रारदार हिचे म्हणणे आहे. म्हणून तिने सदरची तक्रार दाखल केली आहे. 3 तक्रारदार हिचे म्हणणे की, एकदा फ्रिज घेण्यासाठी तिने खर्च केल्यामुळे दुसरे फ्रिज विकत घेतले नाही. घरात फ्रिज नसल्यामुळे दररोज जवळजवळ रु.250/- चे अन्न खराब झाले होते. तक्रार दाखल करेपर्यंत जवळजवळ रु.2,73,750/- चे अन्न खराब होत होते. सदरची तक्रार करुन तिने खालील मागण्यां केलेल्या आहेत. · सामनेवाले यांनी तिचे सदोष फ्रिज परत घेऊन नविन फ्रिज द्यावे किंवा · फ्रिजची किंमत रु.12,563/- व्याजासह द्यावी. · सामनेवाले यांनी रु.2,73,750/- एवढी नुकसानभरपाई तक्रारदार हिचे अन्न खराब झाल्यापोटी द्यावी व तक्रार दाखल झाल्यानंतर जे काही अन्नाचे नुकसान होईल त्याचीही नुकसानभरपाई करावी. · तक्रारदार हिला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.25,000/- द्यावे. · या तक्रारीच्या खर्चापोटी रु.15,000/- द्यावे. 4 सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारीला उत्तर देऊन तक्रारदार हिने त्यांच्या विरुध्द केलेला सेवेतील न्युनतेचा व अनुचित व्यापारी प्रथेचा आरोप नाकारला. मात्र तक्रारदार हिने त्यांनी तयार केलेले फ्रिज सामनेवाले क्र.2 यांचेकडून दि.14.02.2004 रोजी रु.12,563/- विकत घेतला हे त्यांना मान्य आहे. फ्रिजची एक वर्षाची हमी होती व कॉम्प्रेसरची पाच वर्षासाठी होती हे सुध्दा त्यांना मान्य आहे. ते फ्रिज एक्सचेंज ऑफरखाली घेतले, परंतु त्या योजनेशी त्यांचा काहीही संबंध नाही असे सामनेवाले क्र.1 चे म्हणणे आहे ती योजना सामनेवाले क्र.2 ची स्वतंत्र होती. 5 सामनेवाले यांचे म्हणणे की, तक्रारदाराने हमी कालावधीत फ्रिजबद्दल काहीही तक्रार केली नाही. म्हणजेच फ्रिजच्या बाबतीत ती समाधानी होती. जवळपास दि.29.08.2005 रोजी म्हणजे हमी कालावधी संपल्यानंतर पहिल्यांदा तक्रारदार हिने फ्रिजबद्दल त्यांचेकडे तक्रार केली की, फ्रिज बंद आहे. हमी कालावधी संपलेला असतानांही व्यवसायाच्या दृष्टीने चांगले संबंध रहावे तसेच त्यांची बाजारात चांगली पत होती म्हणून त्यांनी दि.30.08.2005 रोजी त्यांच्या इंजिनिअरला फ्रिज पाहण्यासाठी पाठविले होते. त्यावेळी इंजिनिअरच्या लक्षात आले की, वीज प्रवाहाच्या चढउतारामुळे फ्रिज काम करीत नाही. ते त्यांच्या वर्कशॉपमध्ये तपासावे लागेल असे इंजिनिअरने सुचविल्यामुळे व तक्रारदाराच्या विनंतीवरुन फ्रिज त्यांच्या वर्कशॉपमध्ये आणण्यात आले. त्याची पूर्ण तपासणी केल्यानंतर असे समजले की, कॉम्प्रेसर चांगले चालत आहे. मात्र विज प्रवाहाच्या चढउतारामुळे फ्रिजचे इतर भाग खराब झाले आहे व ते बदलता येत नाहीत किंवा दुरुस्तही करता येत नाहीत. म्हणून त्यांनी तक्रारदार हिला त्याबद्दल दि.06.09.2005 च्या पत्राने कळविले परंतु तक्रारदार हिने त्याला प्रतिसाद दिला नाही. म्हणून दि.19.10.2005 रोजी स्मरणपत्र पाठवून तिला फ्रिज घेऊन जाण्यास सांगितले. ते पत्र तक्रारदार हिला मिळूनही तिने प्रतिसाद दिलेला नाही. तेव्हापासून फ्रिज त्यांच्याचकडे आहे. ते फ्रिज केव्हाही परत देण्यास तयार होते व आजही आहेत. त्यांची सेवेत न्यूनता नाही. 6 सामनेवाले क्र.1 यांचे म्हणणे की, फ्रिज एक महिन्यात चालू स्थितीत देतो असे त्यांनी आश्वासन दिले नव्हते. तसेच तिला नविन फ्रिज 1/3 रक्कमेत देऊ असेही सांगितले नव्हते. तक्रारदार हिने त्यांना एकही पत्र पाठविलेले नाही. हमी कालावधी संपल्यानंतर फ्रिजबद्दल त्यांची काही जबाबदारी नाही. तक्रारदार हिचे फ्रिज सदोष नव्हते त्यांची सेवेत न्यूनता नाही म्हणून सदरची तक्रार रद्द करण्यात यावी. 7 सदर तक्रारीतील सामनेवाले क्र.2 यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाहीत, म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फाचा आदेश करण्यात आला. 8 आम्हीं तक्रारदारातर्फे वकील-श्रीमती किर्ती शेट्टी व सामनेवाले क्र.1 तर्फे वकील-श्री.व्ही.के.शर्मा यांचा युक्तीवाद ऐकला व कागदपत्रं वाचली. 9 तक्रारदार हिने तक्रारीबरोबर विजेच्या बिलाची प्रत, दि.30.08.2005 ची जॉबशिटची प्रत, सामनेवाले क्र.1 यांना दि.29.08.2006 व दि.09.10.2006 रोजी पाठविलेल्या पत्राची प्रत तसेच पोस्ट मास्तरला दि.22.09.2006 व दि.07.11.2006 रोजी पाठविलेल्या पत्राच्या प्रतीं दाखल केल्या आहेत. 10 तक्रारदार हिची तक्रार व सामनेवाले क्र.1 यांची कैफियत व उभय पक्षकारांचा युक्तीवाद लक्षात घेता, या तक्रारीत विचारार्थ मुद्दा उपस्थित होतो की, “तक्रारदार हिने सामनेवाले यांचे सेवेत न्युनता आहे व त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे” हे सिध्द केले आहे का ? मंचाच्या मते तक्रारदार हिने सामनेवाले क्र.1 यांचे विरुध्द हा आरोप सिध्द केला आहे मात्र सामनेवाले क्र.2 यांचे विरुध्द हा आरोप सिध्द केलेला नाही. 11 दि.14.02.2004 रोजी तक्रारदार हिने सामनेवाले क्र.2 यांचेकडून सामनेवाले क्र.1 यांनी तयार केलेले फ्रिज रु.12,563/- ला विकत घेतले होते हे सामनेवाले क्र.1 यांना मान्य आहे. ते बंद पडले म्हणून तक्रारदार हिने दि.30.08.2005 रोजी सामनेवाले क्र.1 कडे तक्रार केली, सामनेवाले क्र.1 चे इंजिनिअरने जाऊन फ्रिज पाहिले व पूर्ण तपासणीसाठी फ्रिज सामनेवाले क्र.1 च्या कार्यशाळेत त्याच दिवशी आणण्यात आले व तेव्हापासून ते त्यांचेचकडे आहे हे सामनेवाले क्र.1 यांनी नाकारले नाही. 12 सामनेवाले क्र.1 यांचे म्हणणे की, विज प्रवाहाच्या चढउतारा मुळे फ्रिजच्या काही भागांवर एवढा परिणाम झाला आहे की, ते बदलता येऊ शकत नाही किंवा दुरुस्तही करणे शक्य नाही. त्यांचे म्हणणे की, फ्रिजचे कॉम्प्रेसर व्यवस्थित चालत आहे, मात्र वीज प्रवाहाच्या चढ-उतारामुळे फ्रिजचे भाग खराब झाले. या कथनाच्या पृष्ठर्थ सामनेवाले क्र.1 यांनी त्यांच्या इंजिनिअरचे शपथपत्रं दाखल केले नाही. एवढेच नव्हेतर फ्रिजचे कोणते भाग खराब झाले आहेत हे ही सांगितले नाही. त्यामुळे वीजप्रवाहाच्या चढ-उतारामुळे फ्रिजचे भाग खराब झाले हा सामनेवाले क्र.1 चा बचाव फेटाळण्यात येतो. 13 तक्रारदार हिने दि.14.02.2004 रोजी फ्रिज घेतला व लगेच दीड वर्षात त्यातील पार्ट एवढे खराब झाले की ते दुरुस्त करण्यापलिकडेचे आहेत किंव ते बदलता येऊ शकत नाहीत याचा अर्थ फ्रिजमध्ये मूळातच निर्मिती दोष असावा. रु.12,563/- एवढी रक्कम खर्च करुन दीड वर्षात फ्रिज पूर्णपणे बंद होईल की त्याची दुरुस्तीही होऊ शकणार नाही ही अपेक्षा तक्रारदार हिने केली नसावी. दीड वर्षात फ्रिज कायमचा बंद पडला हा तक्रारदार हिचा अपेक्षाभंग आहे. त्यामुळे तिला मानसिक त्रास होणे साहजिकच आहे. 14 सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार हिला दोन पत्रं पाठविली होती असे त्यांचे म्हणणे आहे मात्र त्या पत्राच्या प्रतीं किंवा पोच त्यांनी दाखल केलेली नाही. त्यामुळे त्यांनी तक्रारदाराला दोन पत्रं पाठविली हे मान्य करता येत नाही. या उलट तक्रारदार हिने दि.28.08.2006 व दि.09.10.2006 ची दोन पत्रं सामनेवाले क्र.1 यांना रजिस्टर पोस्टाने पाठविली होती, त्याच्या प्रतीं व रजिस्टर पोस्टाने पाठविल्याच्या पावत्यां तक्रारदार हिने दाखल केल्या आहेत. त्यांच्या पोचपावत्यां न मिळाल्यामुळे तिने संबंधीत पोस्ट मास्तरला दोन पत्रं लिहीलेली होती, त्याच्याही प्रतीं तिने दाखल केल्या आहेत. त्यावरुन तिने सामनेवाले क्र.1 यांना वरील दोन पत्रं पाठविली होती हे सिध्द होते. सामनेवाले क्र.1 हे तक्रारदार हिच्या फ्रिजबद्दल उदासिन दिसून येतात. सदोष फ्रिज देऊन, ते त्यांचेजवळ पडून असताना त्याबद्दल उदासिन रहाणे, तक्रारदार हिला त्या फ्रिजऐवजी नविन फ्रिज न देणे किंवा फ्रिजची किंमत परत न करणे ही सामनेवाले क्र.1 यांची सेवेत न्युनता आहे व अनुचित व्यापारी प्रथा आहे. मात्र सामनेवाले क्र.2 यांची काही सेवेत न्युनता आहे असे तक्रारदार हिने सिध्द केलेले नाही. तक्रारदार हिने फ्रिज नसल्यामुळे दररोज तिचे रु.250/- चे अन्न खराब व्हायचे असे म्हटले आहे व त्यासाठी नुकसानभरपाई मागितली आहे परंतु त्या बाबतीत काही पुरावा दिलेला नाही. घरात फ्रिज नाही हि जाणीव ठेवून तक्रारदार हिने योग्य ती खबरदारी अन्नाच्या बाबतीत घ्यावयास पाहिजे होती. मंचाच्या मते ही नुकसानभरपाई तक्रारदार हिला मंजूर करता येत नाही. फ्रिज बिघडल्यामुळे तिला जो मानसिक त्रास झाला, त्याबद्दल नुकसानभरपाई देणे मंचाला योग्य वाटत नाही कारण सामनेवाले क्र.1 यांनी तिला नविन फ्रिज द्यावे असे मंचाला वाटते व तक्रारदार हिने जवळजवळ दिडवर्षे फ्रिज वापरला होता. मंचाच्या मते, खालील आदेश न्यायाच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे. आदेश (1) तक्रार क्र.68/2011 (449/2008) अंशतः मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार हिला त्याच मॉडेलचे नविन फ्रिज द्यावे. (3) सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार हिला या तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावे व स्वतःचा खर्च सोसावा. (4) सामनेवाले क्र.2 विरुध्दची सदरची तक्रार रद्द करण्यात येत आहे. (5) सामनेवाले क्र.1 यांनी या आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यानंतर एक महिन्याचे आंत या आदेशाची पूर्तता करावी अन्यथा विलंबापोटी दररोज रु.25/- दंडात्मक रक्कम म्हणून तक्रारदाराला देण्यास ते जबाबदार राहतील. (6) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |