जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 180/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-27/01/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 30/10/2013.
श्री.सचिन नारायण बडगे,
उ.व.सज्ञान, धंदाः नोकरी,
रा.प्लॉट नं.103, अजंता हाऊसिंग सोसायटी,
जळगांव,ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. व्यवस्थापक,
सॅमसंग इंडीया इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि.,
बी-1, सेक्टर 81, फेज-2, गौतम बुध्द नगर, नोयडा यु.पी.
2. दिश्रीमा कम्युनिकेशन,
बळीराम पेठ,जळगांव.
3. रितु इंपोर्टेड हाऊस,
171/146, ग्राऊंड फलोअर, गोलाणी मार्केट,जळगांव.
4. जयबाबा मोबाईल सेंट,
दु.नं.4/5, बेसमेंट गोलाणी मार्केट,
नेक्स्ट शोरुम समोर,जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.संतोषकुमार पी.चोपडा वकील.
विरुध्द पक्ष क्र.4 तर्फे श्री.प्रदीप शांताराम सोपारकर वकील.
विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 एकतर्फा.
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः तक्रारदारास सदोष मोबाई हॅण्डसेट विक्री करुन दिलेल्या सदोष सेवेदाखल प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार हा विरुध्द पक्ष क्र. 3 कडे मोबाईल हॅण्डसेट खरेदी करण्यासाठी गेला असता, विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारदारास विरुध्द पक्ष क्र. 1 कंपनीने तयार केलेले सॅमसंग कंपनीचे मोबाईल सेट चांगल्या दर्जाचे असुन कंपनीचे भारतभर नांव आहे तसेच त्यांचे मोबाईल सेट ला एक वर्षाची गॅरंटी देखील आहे अशी हमी दिली. विरुध्द पक्ष क्र. 3 चे बोलण्यावर विश्वास ठेवुन तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 सॅमसंग कंपनीने बनविलेला मोबाईल हॅण्डसेट एल-700 दि.31/07/2009 रोजी बिल नं.ऐ 873 अन्वये रक्कम रु.7,700/- ला खरेदी घेतला. उपरोक्त मोबाईल संच सुरु असतांना एक महीन्यातच मोबाईल सेटची बॅटरी अर्धा तासात डाऊन होऊ लागली, मोबाईल कॉल संपल्यानंतर कॉल बंद केल्यानंतर देखील लागलीच बंद न होणे, बॅटरी फोनवरुन बोलतांनाच बंद होणे अशा प्रकारचे दोष दिसुन आले. तक्रारदाराची सदरची बाब विरुध्द पक्ष क्र. 3 चे निर्दशनास आणली असता त्यांनी तक्रारदारास दुसरी बॅटरी बदलुन दिली मात्र मोबाईल सेट मध्ये पुर्वीचे दोष तसेच कायम राहीले. त्यानंतर तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.3 कडे तक्रार केली असता सदरचा मोबाईल विरुध्द पक्ष क्र.3 चे अधिकृत सर्व्हीस स्टेशन विरुध्द पक्ष क्र.4 कडे देण्यास सांगीतले. त्याप्रमाणे तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.4 कडे दि.29/10/2009 रोजी फॉल्टी बॅटरी बॅक अप व कॉल नॉट कट म्हणुन मोबाईल सेट जमा करुन तशी रिसीट क्र.11177 अन्वये तक्रारदाराने घेतली. सदर हॅण्डसेट कंपनीकडे पाठवुन नवीन त्याच मेकचा हॅण्डसेट देण्याचे आश्वासन विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तक्रारदारास दिलेले होते., तोपर्यंत विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी त्यांचेकडील जुना मोबाईल सेट वापरण्यास दिलेला होता. आजपर्यंत अनेकवेळा तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 कडे नवीन हॅण्डसेट देण्याची विनंती केली असता त्यांनी तक्रारदारास नवीन हॅण्डसेटही दिला नाही अगर त्याची खरेदी किंमतही न देऊन तक्रारदारास सदोष सेवा दिली. सबब विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांनी सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट एल 700 तक्रारदारास द्यावा किंवा सदर मोबाईल सेटची किंमत रु.7,700/- व त्यावरील व्याज द.सा.द.शे.18 टक्के प्रमाणे तक्रारदारास द्यावे, मानसिक, शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.5,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 हे या मंचाची नोटीस मिळुनही याकामी हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली. तसेच विरुध्द पक्ष क्र. 4 हे वकीलां मार्फत हजर झाले तथापी मुदतीत लेखी म्हणणे दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द नो-से आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
4. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, तसेच तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. विरुध्द पक्षांनी तक्रारदारास सदोष मोबाईल सेट विक्री
करुन सदोष सेवा दिली आहे काय ?
असल्यास कोणी होय., वि.प.क्र.1,3 व 4 यांनी.
2. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतीम आदेशानुसार
5. मुद्या क्र. 1 - दोषयुक्त मोबाईल हॅण्डसेट विक्री करुन दिलेल्या सेवेतील त्रृटीदाखल प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे. तक्रारदाराने नि.क्र.3 लगत विरुध्द पक्ष क्र.3 रितु इम्पोर्टेड हाऊस, तळ मजला, गोलाणी मार्केट,जळगांव यांचेकडुन पावती क्र.ए-873 अन्वये सॅमसंग कंपनीचा एल-700 या मेकचा मोबाईल हॅण्डसेट दि.31/07/2009 रोजी एकुण रक्कम रु.7,700/- या किंमतीस खरेदी केल्यादाखल पावतीची छायाप्रत दाखल केलेली आहे. सदर दाखल पावतीनुसार तक्रारदार हा विरुध्द पक्ष क्र.1 कंपनी तसेच विरुध्द पक्ष क्र.3 मोबाईल विक्रेता, व विरुध्द पक्ष क्र. 4 मोबाईल सेवा देणारी फ्रँचाईची यांचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते.
6. मोबाईल हॅण्डसेट खरेदी केल्यानंतर त्यात लागलीच म्हणजे एक महीन्यानंतर बॅटरी बॅक-अप न देणे, कॉल कट न होणे असे दोष तक्रारदारास दिसुन आले. तक्रारदाराने त्याबाबत विरुध्द पक्ष क्र.3 कडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तक्रारदारास एकदा सदर मोबाईलची बॅटरी बदलुन दिली तथापी त्यानंतर देखील सदर मोबाईल हॅण्डसेट मध्ये पुर्वीचे दोष कायम असल्याचे तक्रारदारास दिसुन आले, त्यानंतर तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 3 कडे तक्रार केली असता त्यांनी तक्रारदारास दिलेल्या निर्देशानुसार तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 4 कडे सदर सदोष मोबाईल हॅण्डसेट विरुध्द पक्ष क्र.1 कंपनीकडे पाठविण्यासाठी दि.29/10/2009 रोजी जमा करुन घेतला व त्याचेऐवजी तक्रारदारास नोकीया कंपनीचा सेकंडहॅण्ड 3110 या मेकचा हॅण्डसेट तात्पुरत्या स्वरुपात वापरण्यासाठी दिला असे प्रतिपादन तक्रारदाराचे वकीलांनी या मंचासमोरील युक्तीवादात केले. सदर म्हणण्याचे पुष्ठयर्थ नि.क्र.3 लगत विरुध्द पक्ष क्र. 4 कडे सदोष मोबाईल हॅण्डसेट कंपनीकडे पाठविण्यासाठी जमा केल्याबाबतची रिसीट क्र.11177 दाखल आहे. सदर रिसीटचे अवलोकन करता तक्रारदाराने बॅटरी बॅक-अप व मोबाईल कॉल कट न होणे इत्यादी बाबत तक्रारी उपस्थित केल्या असल्याचे सकृतदर्शनी दिसुन येते. तक्रारदाराकडुन मोबाईल हॅण्डसेट कंपनीकडे पाठविण्यासाठी जमा करुन घेतल्यानंतर वारंवार चौकशी करुनही तक्रारदारास मोबाईल हॅण्डसेट न मिळाल्याने तसेच त्याची खरेदी रक्कमही न मिळाल्याने त्याने व्यथीत होऊन त्यांचे वकीलामार्फत विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांना दि.3/11/2009 रोजी नोटीसा पाठविल्याचे नि.क्र.3 लगत दाखल नोटीसीचे स्थळप्रतीवरुन स्पष्ट होते. एवढेच नव्हे तर या मंचासमोर तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यानंतर मंचातर्फे रजिष्ट्रर ए.डी.नोटीसा प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 हे या मंचासमोर गैरहजर राहीले व त्यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र. 4 हे वकीलामार्फत हजर झाले तथापी मुदतीत लेखी म्हणणे दाखल केले नसल्याने त्यांचेविरुध्द नो-से आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
7. वर नमुद एकंदर विवेचनावरुन विरुध्द पक्ष क्र.3 यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 कंपनीचा सदोष व दोषयुक्त मोबाईल हॅण्डसेट विक्री करुन तसेच त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.3 चे अधिकृत सर्व्हीस स्टेशन विरुध्द पक्ष क्र. 4 यांनी तक्रारदाराकडुन मोबाईल हॅण्डसेट कंपनीस पाठवतो या सबबीखाली घेऊन त्यास तो चांगल्या अवस्थेत अथवा नवीन स्वरुपात परत न करुन सदोष व त्रृटीयुक्त सेवा प्रदान केलेली आहे. तक्रारदाराने या तक्रारीकामी विरुध्द पक्ष क्र. 2 म्हणुन दिश्रीमा कम्युनिकेशन,बळीराम पेठ,जळगांव यांना सामील केले आहे तथापी त्यांचा तक्रारदाराचे तक्रारीशी नेमका संबंध काय याचा कोणताही उहापोह केलेला नाही त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 2 चा तक्रारदाराचे तक्रारीशी कोणताही संबंध येथे प्रस्तापीत होत नसल्याने तक्रारदाराने तक्रार अर्जातुन केलेल्या मागण्यांना विरुध्द पक्ष क्र. 2 हे जबाबदार नाहीत असे आमचे मत आहे. यास्तव तक्रारदारास सदोष मोबाईल प्रकरणी विरुध्द पक्ष क्र.1,3 व 4 यांनी सदोष व त्रृटीयुक्त सेवा प्रदान केल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
8. मुद्या क्र. 2 - विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांनी सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट एल 700 तक्रारदारास द्यावा किंवा सदर मोबाईल सेटची किंमत रु.7,700/- व त्यावरील व्याज द.सा.द.शे.18 टक्के प्रमाणे तक्रारदारास द्यावे, मानसिक, शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.5,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे. तक्रारदाराने दि.29/10/2009 पासुन विरुध्द पक्ष क्र. 4 यांचेकडे सदोष मोबाईल हॅण्डसेट जमा केला म्हणजे तब्बल चार वर्षे एवढा कालावधी उलटुन गेल्यावर देखील तक्रारदाराच्या तक्रारीची साधी दखलही न घेता त्यास त्याचा मोबाईल हॅण्डसेट परत करण्याचे औदार्य विरुध्द पक्ष क्र. 1,3 व 4 यांनी दाखविले नाही यावरुन तक्रारदार हा विरुध्द पक्ष क्र.1,3 व 4 यांचेकडुन वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या मोबाईल हॅण्डसेटची खरेदी किंमत रक्कम रु.7,700/- खरेदी दि.31/07/2009 पासुन द.सा.द.शे.11 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र असुन मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचे खर्चादाखल रु.3,000/- देखील मिळण्यास पात्र असल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
2. विरुध्द पक्ष क्र. 1,3 व 4 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असे आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास मोबाईल हॅण्डसेटची किंमत रक्कम रु.7,700/- (अक्षरी रक्कम रु.सात हजार सातशे मात्र ) दि.31/07/2009 पासुन द.सा.द.शे.11 टक्के व्याजासह या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष क्र. 1,3 व 4 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असेही आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासा दाखल रु.5,000/- (अक्षरी रक्कम रु.पाच हजार मात्र ) व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- (अक्षरी रु.तीन हजार मात्र ) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 30/10/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.