तक्रारदार : प्रतिनिधी वकील श्रीमती विनीता साळुंखे हजर.
सामनेवाले : व त्यांचे वकील गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाली ही इलेक्ट्रोनिक्स कंपनी असून ते मोबाईल हॅन्डसेटचे उत्पादक आहेत. सा.वाले क्र.2 व 3 हे सा.वाले क्र.1 यांचे अधिकारी आहेत. तर सा.वाले क्र.4 हे सा.वाले क्र.1 यांचे अधिकृत सेवा केंद्र आहे. यापुढे सा.वाले क्र.1 ते 4 सर्व सा.वाले यांना सा.वाले कंपनी असे संबोधिले जाईल.
2. तक्रारदारांनी दिनांक 15.7.2008 रोजी सा.वाले यांनी उत्पादित केलेला मोबाईल हॅन्डसेट 6,800/- रुपयास विकत घेतला. तक्रारदारांनी तो मोबाईल हॅन्डसेट वापरण्यास सुरुवात केल्यानंतर वारंवार बिघाड होऊ लागला. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 4.8.2008 रोजी सा.वाले यांच्या अधिकृत सेवा केंद्राकडे तो जमा केला. व अधिकृत सेवा केंद्रातील कर्मचारी श्री.राकेश यांनी तो स्विकारला. व दुरुस्त करण्यात येईल असे तक्रारदारांना सांगीतले. त्यानंतर तक्रारदार दिनांक 11.8.2008 रोजी सा.वाले यांचे अधिकृत सेवा केंद्र म्हणजे सा.वाले क्र.4 यांचेकडे गेले परंतु तो मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त होऊन आला नाही व तक्रारदारांना असे सांगण्यात आले की, तो मोबाईल हॅन्डसेट मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला आहे. तक्रारदारांनी मोबाईल हॅन्डसेट ताब्यात घेण्यासाठी सा.वाले क्र.4 यांचेकडे दिनांक 18.8.2008, 25.8.2008, 29.8.2008 रोजी भेट दिली. परंतु तक्रारदारांना मोबाईल हॅन्डसेट परत मिळाला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 5.9.2008 रोजी सा.वाले क्र.4 सेवा केंद्रमध्ये दूरध्वनीवर संपर्क साधला व त्यावेळी सा.वाले क्र.4 यांनी आपली चूक कबुल केली व दुसरा मोबाईल हॅन्डसेट तक्रारदारांना देण्यात येईल असे सांगीतले. तक्रारदारांची कागदपत्रे देखील सा.वाले यांनी हरविली होती. तक्रारदारांनी त्यांचेकडील कागदपत्रांच्या छायाप्रती काढून सा.वाले यांना पुरविल्या. तरी देखील तक्रारदारांना मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त होऊन मिळाला नाही. तक्रारदारांनी जवळपास 4 महिने वाट पाहिल्यानंतर दिनांक 26.11.2008 रोजी सा.वाले यांचे विरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये मोबाईल हॅन्डसेटची किंमत रुपये 6,800/- सा.वाले यांनी तक्रारदारांना परत द्यावेत. तसेच दरम्यानच्या काळात रिलायन्स कंपनीने त्यांचे सिमकार्डबद्दल तक्रारदारांकडून जी जास्त वसुली केली ते रु.860/- अदा करावेत व तक्रारदारांना नुकसान भरपाई रुपये 1 लाख अदा करावेत अशी मागणी केली.
3. सा.वाले यांनी कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, मोबाईल हॅन्डसेट विक्रेत्यास तक्रारदारांनी पक्षकार करण्े आवश्यक होते व विक्रेते पक्षकार नसल्याने तक्रार चालु शकत नाही. तक्रारदारांनी सा.वाले यांनी उत्पादित केलेला मोबाईल हॅन्डसेट विकत घेतला ही बाब सा.वाले यांनी मान्य केली. त्याचप्रमाणे दिनांक 4.8.2008 रोजी तक्रारदारांनी सा.वाले क्र.4 अधिकृत सेवा केंद्रामध्ये तो मोबाईल हॅन्डसेट
दुरुस्तीकामी दिला ही बाब देखील सा.वाले यांनी मान्य केली. सा.वाले यांचे कैफीयतीमधील कथनानुसार सा.वाले यांनी तो मोबाईल हॅन्डसेट बेंगलोर येथील त्यांचे कार्यशाळेत दुरुस्तीकामी पाठविला. व सा.वाले यांना तो दिनांक 28.8.2008 रोजी प्राप्त झाला. त्यानंतर सा.वाले यांनी दूरध्वनीव्दारे तक्रारदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. विशेष दुतामार्फत तक्रारदारांना सूचना देण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु तक्रारदार सापडले नाहीत. या प्रमाणे दुरुस्त केलेला मोबाईल हॅन्डसेट सा.वाले यांचेकडेच राहीला. त्याप्रमाणे सा.वाले यांनी असे कथन केले की, मोबाईल हॅन्डसेट दुरुस्तीकामी बेंगलोर येथे पाठविल्याने दुरुस्तीचे कामात थोडा विलंब झाला परंतु त्या मुळे सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या तक्रारदारांच्या आरोपास नकार दिला.
4. तक्रारदारांनी सा.वाले यांचे कैफीयतीस आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. तेच पुराव्याचे शपथपत्र म्हणून गृहीत धरण्यात यावे असे नमुद केले. तक्रारदारांनी यादीसोबत कागदपत्रे दाखल केली व लेखी युक्तीवाद दाखल केला. सा.वाले यांनी त्यांचे अधिकारी श्री.अनंत चव्हाण यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. कागदपत्रे दाखल केली व लेखी युक्तीवाद दाखल केला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांचा मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त करण्यास विलंब करुन तक्रारदारांना सेवा सुविधा करण्यास कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार त्याबद्दल मोबाईल हॅन्डसेटची किंमत व नुकसान भरपाई सा.वाले यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी सा.वाले कंपनीने उत्पादित केलेला मोबाईल हॅन्डसेट दिनांक 15.7.2008 रोजी संबंधित विक्रेत्याकडून रु.6,800/- किंमतीस विकत घेतला होता या बद्दल वाद नाही. तो मोबाईल हॅन्डसेट नादुरुस्त झाल्याने तक्रारदारांनी दिनांक 8.8.2008 रोजी सा.वाले क्र.4 यांचेकडे म्हणजे अधिकृत विक्री केंद्रामध्ये दुरुस्तीसाकामी दिला गेला होता त्या बद्दलही वाद नाही. तो मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त होऊन तक्रारदारांना तक्रार दाखल होईपर्यत परत देण्यात आलेला नाही या बद्दलही वाद नाही. सा.वाले यांनी या संबंधात असा खुलासा केला की, संबंधीत मोबाईल हॅन्डसेट दुरुस्तीकामी बेंगलोर येथे पाठविण्यात आला होता व बेंगलोर येथूर तो दुरुस्त होऊन येण्यास बराच विलंब झाला व त्यानंतर तक्रारदारांना वेगळी सूचना देण्याचा प्रयत्न केला परंतू तक्रारदारांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे मोबाईल हॅन्डसेट तक्रारदारांना परत दिला जाऊ शकला नाही.
7. या संदर्भात सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत जॉब कार्डच्या प्रति दाखल केलेल्या आहेत. दिनांक 4.8.2008 च्या जॉब कार्डमधील नोंदी असे दर्शवितात की, मोबाईल हॅन्डसेट तक्रारदारांनी सा.वाले क्र.4 यांचेकडे ज्या दिवशी दिला त्या दिवशी जमा केलेले होते. सा.वाले यांनी दुसरी जॉब कार्डची प्रत निशाणी ब येथे हजर केलेली आहे. त्यातील नोंदी असे दर्शवितात की, दिनांक 25.12.2008 रोजी सा.वाले क्र.4 सेवा केंद्र यांना हॅन्डसेट प्राप्त झाला व तो व्यवस्थित होता. सा.वाले यांनी जॉब कार्ड निशाणी अ दिनांक 4.8.2008 च्या मागील बाजूस असलेल्या नोंदींचा उल्लेख आपल्या कैफीयतीमध्ये केलेला आहे. सा.वाले आपल्या कैफीयतीमध्ये असे म्हणतात की, दिनांक 28.8.2008 रोजी दुरुस्त होऊन हॅन्डसेट सा.वाले यांना प्राप्त झाला व तक्रारदारांना त्या दिवशी सूचना देण्यात आली. त्यानंतर दिनांक 3.11.2009 रोजी तक्रारदारांना दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु तक्रारदार सापडू शकले नाही. दरम्यान दिनांक 25.12.2008 रोजी सा.वाले क्र.4 यांनी त्यांचा कर्मचारी तक्रारदारांकडे पाठविला परंतु तक्रारदारांनी दिलेल्या पंत्यावर तक्रारदार सापडू शकले नाहीत. या कथना पृष्टयर्थ सा.वाले यांनी जॉब कार्ड निशाणी अ, दिनांक 4.8.2008 चे मागील बाजूस असलेल्या नोंदीचा आधार घेतला आहे. त्या नोंदी असे दर्शवितात की, सा.वाले यांचे कर्मचारी श्री.राकेश यांनी दिनांक 5.8.2008, 28.8.2008, व 3.11.2008 रोजी तक्रारदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. हया सर्व नोंदी एकाच शाईने घेतलेल्या असून हस्तांक्षर एकाच व्यक्तीचे आहे. व राकेश नावाच्या व्यक्तीने त्या नोंदीवर सही केलेली आहे. त्या नोंदीमधील तारीख जरी वेगळी असली तरी त्या सर्व नोंदी एकाच दिवशी व एकाच बैठकीत केल्याचे दिसून येते. त्यातही सा.वाले यांनी राकेश नावाचे कर्मचा-याचा येथे नोंदीचे संदर्भात तसेच कैफीयतीमधील वर उधृत केलेल्या कथनाचे संदर्भात शपथपत्र दाखल केलेले नाही. सा.वाले यांनी ज्या कर्मचा-यास तक्रारदारांकडे पाठविले होते त्याचे देखील शपथपत्र नाही. पुढील महत्वाची बाब म्हणजे जॉब कार्ड निशाणी ब दिनांक 25.12.2008 मधील नोंद असे दर्शविते की, मोबाईल हॅन्डसेटचे सॉप्टवेअर व्यवस्थित होते व हॅन्डसेट व्यवस्थित होता. त्या जॉबकार्ड खालील भागात Job completed by या रकान्यात राकेश असे नांव लिहीले असून दिनांक 25.12.2008 नमुद आहे. ही नोंद असे दर्शविते की, संबंधीत हॅन्डसेट दिनांक 25.12.2008 रोजी दुरुस्त होऊन तंयार झाला होता. दरम्यान तक्रारदारांनी बरेच हेलपाटे मारुन व सा.वाले यांचेशी संपर्क साधून दिनांक 26.11.2008 रोजी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. या प्रमाणे तक्रार दाखल होण्यापर्यततरी सा.वाले यांचेकडून मोबाईल हँन्डसेट दुरुस्त होऊन तक्रारदारांना तशी सूचना दिली गेलेली होती असे दिसून येत नाही.
8. तक्रारदारांनी आपल्या पुराव्याचे शपथपत्रात असे स्पष्ट कथन केलेले आहे की, मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त करणेकामी सा.वाले क्र.4 यांचेकडे जमा केल्यानंतर त्यांनी दिनांक 18.8.08,25.8.2008 व 29.8.2008 रोजी सा.वाले 4 दुरुस्ती केंद्रात जमा केल्यानंतर त्यांनी दिनांक 18.8.08,25.8.2008 व 29.8.2008 रोजी सा.वाले 4 दुरुस्ती केंद्राला भेट दिली व मोबाईल हॅन्डसेटची चौकशी केली. त्यानंतर दिनांक 5.9.2008 रोजी सा.वाले क्र.4 यांचेकडे दुरुस्तीबाबत दूरध्वनीवर मोबाईल हॅन्डसेट बाबत चौकशी केली व तक्रारदारांना असे सांगण्यात आले की, मोबाईल हॅन्डसेट अद्याप दूरुस्त झालेला नाही. तक्रारदार असे म्हणतात की, दिनांक 5.9.2008 रेाजी सा.वाले क्र.4 यांचे कर्मचा-यानी असे सांगीतले की, तक्रारदारांचे तक्रारीतील कागदपत्रे गहाळ झाली असून तक्रारदारांनी त्यानंतर कागदपत्रांच्या छायाप्रती सा.वाले यांचेकडे दिल्या. तक्रारदारांनी या करीता जॉब कार्ड दिनांक 4.8.2008 निशाणी अ ची छायांकित प्रत आपल्या कागदपत्राच्या यादीसोबत निशाणी क येथे दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्रात असे कथन केलेले आहे की, तक्रारदारांनी दिनांक 16.9.2008 व दिनांक 23.9.2008 रोजी पुन्हा सा.वाले क्र.4 सेवाकेंद्राला भेट दिली. परंतू तो पर्यत मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त होऊन आला नव्हता आणि श्री.प्रफुल नावाचे कर्मचा-यांस तक्रारदारांना संपर्क करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा दिनांक 26.9.2008 रोजी सा.वाले 4 दुरुस्त केंद्रास भेट दिली. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीत असे कथन केलेले आहे की, दिनांक 25.12.2008 रोजी सा.वाले यांनी तक्रारदारांना संपर्क प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु दरम्यान तक्रारदारांनी दिनांक 26.11.2008 रोजी तक्रार दाखल केलेली होती.
9. वरील नमुद केलेल्या घटणा असे दर्शवितात की, तक्रारदारांनी दिनांक 26.11.2008 रेाजी आपली तक्रार प्रस्तुत मंचाकडे दाखल करेपर्यत तरी सा.वाले यांनी तक्रारदारांना मोबाईल हॅन्डसेट दुरुस्ती करुन तक्रारदारांना परत दिलेला नव्हता. सा.वाले यांनी तक्रारदारांकडून दिनांक 4.8.2008 रोजी मोबाईल हॅन्डसेट दुरुस्तीकामी स्विकारला तेव्हा तक्रारदारांना एका आठवडयाचे आत दुरुस्त करुन परत मिळेल असे आश्वासन दिले होते व त्या नुसार तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे सतत हेलपाटे मारले. परंतु तक्रारदारांना त्यांचा मोबाईल हॅन्डसेट सा.वाले यांचेकडून दुरुस्त करुन मिळालेला नाही. हया सर्व बाबी सा.वाले यांनी निष्काळजीपणा व सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली हे सिध्द करतात.
10. दरम्यान तक्रारदारांकडून रिलायन्स कंपनीने मोबाईल हॅन्डसेटमधील सिमकार्डचे मासिक शुल्क व इतर शुल्क तक्रारदारांकडून वसुल केले. तक्रारदारांनी त्या बद्दलची देयक दाखल केलेले आहे. या प्रमाणे तक्रारदारांचा मोबाईल हॅन्डसेट बंद असतांना देखील त्यांना रिलायन्स कंपनीस रु.860/- अदा करावे लागले. दरम्यान सा.वाले यांनी तक्रारदारांना अन्य एक मोबाईल वापरणेकामी दिला नाही व तक्रारदारांची होणारी गैरसोय व कुचंबणा विचारात घेतली नाही. तक्रारदारांकडे मोबाईल हॅन्डसेट नसल्यामुळे तक्रारदारांची खुपच कुचंबणा व गैरसोय झाली असेल. तक्रारदारांनी आपल्या शपथपत्रामध्ये व युक्तीवादामध्ये असे स्पष्ट कथन केलेले आहे की, सा.वाले यांनी पर्यायी मोबाईल हॅन्डसेट पुरविला नसल्याने तक्रारदारांची कुचंबणा झाली. तक्रार दाखल होऊन तिन वर्षाचा कालावधी उलटलेला आहे. तक्रारदारांनी निच्छितच दुसरा मोबाईल हॅन्डसेट विकत घेतला असेल यावरुन सा.वाले यांचेकडे असलेला मोबाईल हॅन्डसेट तक्रारदारांना परत द्यावा या प्रकारचा आदेश निरुपयोगी ठरेल. त्यातही तक्रारदारांनी वकील लावून प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली व तक्रारीमध्ये शपथपत्र व कागदपत्रे दाखल करावे लागले. त्याकामी त्यांना खर्च करावा लागला. तक्रारदारांच्या मुळच्या मोबाईल हॅन्डसेटची किंमत रु.6800/-तक्रारदारांना रिलायन्स कंपनीस अदा करावेल लागलेले रु.860/- व तक्रारदारांची झालेली कुचंबणा,मानसिक त्रास व गैरसोय यांचा एकत्रित विचार करता सा.वाले यांनी तक्रारदारांना रुपये 30,000/- नुकसान भरपाईबद्दल अदा करणे योग्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
11. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 689/2008 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना मोबाईल हॅन्डसेटच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामेनेवाले क्र.1 ते 4 यांनी, संयुक्तीकरित्या किंवा वैयक्तिकरित्या, तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रुपये 30,000/- अदा करावेत असा आदेश देण्यात येतो.
4. सामनेवाले यांनी वरील नुकसान भरपाईची रक्कम न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून आठ आठवडयाचे आत अदा करावी. अन्यथा त्यावर मुदत संपल्या दिनांकापासून 9 टक्के व्याज अदा करावे.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.